एक बेट मंतरलेलं (भाग -३) #मराठी_कादंबरी

Horror island story. Marathi kadambari. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -३) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
श्वेता आणि अमन नी तर जवळ जवळ त्यांना तिथे जायला आम्ही परवानगी मिळवून देऊ हे पटवून दिलं होतं. सगळे मिळून तिथे कधी जायचं, काय काय सामान घेऊन जायचं, किती दिवस जायचं याचं प्लॅनिंग करू लागले. 

"ऐका.. ऐका... गोंधळ नको... आपण तिकडे चार दिवसांनी जाऊ... आम्ही दोघं तुम्हाला सगळं सांगतो... पण, घाई नका करू..." अमन म्हणाला. 

"हो दादा! सांग लवकर..." मयुर म्हणाला. 

सगळे आता श्वेता आणि अमन काय सांगतात ते नीट लक्ष देऊन ऐकत होते. फायनली त्यांना तिकडे जायला मिळणार म्हणून अजूनच उत्साहात सगळे बसले होते. 

"तर मी मगाशी सांगितलं होतं, आम्ही दोघं तिकडे दोन, तीन वेळा जाऊन आलो आहे.. त्यामुळे तिथलं वातावरण आम्हाला माहितेय.. आम्ही जे सांगतोय अगदी तेच सामान घेऊन या.. उगाच वजन नको जास्त म्हणून..." श्वेता म्हणाली. 

"हो ताई... तुम्ही दोघं जे काही सांगाल ते आम्ही ऐकू..." प्रवीण म्हणाला. 

त्या दोघांनी कॅम्प साठीची बेसिक लिस्ट त्यांना सांगितली! ज्यात पाण्याच्या बाटल्या, सुका खाऊ, फर्स्ट एड किट, माचिस, टॉर्च असं सगळं सामान होतं. 

"बरं! आणि तिथे रात्रीच्या वेळी जरा जास्त थंडी असते म्हणून गरम कपडे घेऊन या..." अमन म्हणाला. 

सगळ्यांनी व्यवस्थित सगळं ऐकुन घेतलं. सगळे आता त्या दोघां बरोबर प्रवीण च्या घरी गेले. 

"आई.... कोण आलंय बघ..." प्रवीण ने आई ला हाक मारून सांगितलं. 

"अरे! नम्रता, समृध्दी, मयुर तुम्ही सगळे! या ना.. बसा... मी लगेच तुमच्यासाठी काहीतरी गरम गरम खायला आणते..." प्रवीण च्या आई ने त्यांना बसायला सांगितलं. 

"नको काकू.. आम्ही वडापाव खाल्ला होता. अजून भूक नाही लागली." समृध्दी म्हणाली. 

"बरं... बसा तुम्ही सगळे... प्रवीण! हे दोघं कोण? तुमचे नवीन मित्र आहेत का?" प्रवीण च्या आई ने श्वेता आणि अमन ला बघून विचारलं. 

"काकू? तुम्ही आम्हाला नाही ओळखलं का? आम्ही तुमच्या गावचे! दरवर्षी समर कॅम्प अरेंज करायचो... तुम्ही इथे येण्या आधी प्रवीण आमच्या बरोबरच यायचा कॅम्प ला... विसरलात का?" श्वेता प्रवीण च्या आईच्या डोळ्यात बघून म्हणाली. 

क्षणभर तिला काही सुचेनासे झाले. प्रवीण जसा अगदी शून्यात हरवला होता तशी त्याची आई पण हरवली. "कोणतं गाव? आम्ही तर इथेच राहतो ना? आम्हाला गाव आहे?" ती विचारात गढली. 

"काकू... आठवलं का काही?" श्वेता तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवून म्हणाली. 

"हो.. हो... आठवलं..." प्रवीण ची आई एकदम भानावर येऊन म्हणाली. 
खरंतर जसं प्रवीण ला आपण कुठे आहोत आणि हे दोघं कोण हे लक्षात येत नव्हतं अगदी तसंच त्याच्या आईच्या बाबतीत होत होतं. जणू काही त्या दोघांनी काहीतरी जादू केली आहे. सगळ्यांना त्या दोघांची भुरळ पडली होती. ते दोघं फक्त एकमेकांकडे बघून हसत होते. एक छद्मी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं जे बाकी कोणालाही दिसत नव्हतं. 

"काकू... आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत." अमन म्हणाला. 

प्रवीण ची आई सुद्धा आता ते दोघं काय बोलतायत हे ऐकू लागली. ते दोघं तिला परिचित वाटतच नव्हते! पण, आपण यांना ओळखीचं समजून का याचं ऐकतोय, हे नक्की कोण आहेत हे काही तिच्या लक्षात येत नव्हतं. 

"प्रवीण ने तुम्हाला एका बेटाबद्दल सांगितलं होतं ना?" अमन ने विचारलं. 

"हो..." त्याची आई म्हणाली. 

"मग तुम्ही तिथे जायला या सगळ्यांना नकार का दिलात?" श्वेता ने विचारलं. हे विचारताना मात्र तिच्या डोळ्यात जरा राग दिसत होता! जसं की, हे चौघे तिथे आले नाहीत तर कोणतं तरी फार मोठं काम अडणार आहे. ते प्रवीण च्या आई ने बरोबर ओळखलं होतं. 

"ती खूप सामसूम जागा आहे म्हणून... अजून हे चौघे लहान आहेत.. पण, तू जरा रागावलेली वाटतेस मला... काय झालं?" प्रवीण च्या आई ने विचारलं. 

अमन ने श्वेता च्या हातावर हळूच हात ठेवला आणि तिला शांत केलं... तिने स्वतःला सावरलं. पुढे डोळ्यांवर आलेले केस कानामागे टाकले आणि घसा साफ करून बोलायला लागली; "कुठे काय? काही नाही... तुम्हाला वाटलं असेल.... मी का रागवेन.. बरं ते जाऊदे आम्ही दोघं तुमची आता खरंतर परवानगी घ्यायलाच आलो आहे." 

"कसली परवानगी? त्या बेटावर जायची?" प्रवीण च्या आई ने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. 

"हो... आधी मुलं एकटी होती म्हणून त्यांना जाऊ देत नव्हता ना... आता आम्ही असू त्यांच्या सोबत! शिवाय गेली दोन वर्षे आम्ही तिकडे जाऊन आलो आहोत... छान आहे ती जागा." अमन म्हणाला. 

त्याचं बोलणं ऐकून प्रवीण ची आई एकदम शांत झाली. थोडावेळ अशीच शांतता पसरली होती.... त्या शांततेत एक भय होतं! कोणाच्या काहीही लक्षात येत नव्हतं; आपण काय विचार करतोय.... त्यांचं मन जे विचार करत होतं त्यावर त्यांचा स्वतःचा ताबा नाहीये असंच वाटत होतं... सगळे स्वतःचं भान हरपून बसले होते. त्यातल्या त्यात फक्त नम्रता जरा भानावर होती. 

"काकू! तुम्ही अश्या शांत का झालात? काय झालंय?" तिने विचारलं. 

तिच्या या प्रश्ना बरोबर श्वेता आणि अमन नी तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला! याकडे मात्र तिचं अजिबात लक्ष नव्हतं. तिच्या आवाजाने सगळेच भानावर आले. 

"नम्रता! अगं आत्ता अचानक काय झालं होतं?" प्रवीण च्या आई ने विचारलं. 

"मला सुद्धा तेच समजलं नाही... श्वेता ताई नी तुम्हाला सगळं सांगितलं आणि तुम्ही अचानक गप्प झालात..." नम्रता म्हणाली. 

प्रवीण ची आई पुन्हा काही क्षण विचारात गढून गेल्यासारखी बसली आणि बोलू लागली; "मला आता कसली काळजी नाही... तुमच्या बरोबर हे दोघं असतील... जा तुम्ही तिकडे... मस्त एन्जॉय करा.." 

ती हे बोलली पण, त्या बोलण्यातून हे कोणीतरी बोलून घेतंय असं वाटत होतं. नम्रता च्या हे लक्षात आलं. तिला यात नक्की काहीतरी गडबड आहे असं सारखं वाटत होतं. तिने हळूच तिरक्या नजरेने श्वेता आणि अमन कडे बघितलं तर ते दोघं एक कुत्सित स्मित करत होते. पण, नक्की हे काय घडतंय हे काही तिला समजत नव्हतं. प्रवीण च्या आई ने होकार दिल्यावर तिने लगेच त्याच्या बाबांना याबद्दल सांगितलं! आता मोठं कोणीतरी आहे त्यातही जे कॅम्प दरवर्षी अरेंज करतात ते! म्हणजे आपली मुलं सुखरूप राहतील हा विचार करून त्यांनी सुद्धा होकार दिला. 

"चला काकू... आम्ही आता मयुर च्या घरी जातो." श्वेता म्हणाली. 

ते सगळे उठून जायला लागले. खुर्चीतून उठून जाताना नम्रता चा श्वेता ला धक्का लागला आणि ती एकदम सावध झाली. 

"सॉरी ताई.. पाय अडखळला." नम्रता तिची माफी मागत म्हणाली. 

श्वेता ने तिच्याकडे नीट पाहिलं... वरच्या वर जरी ती "इट्स ओके" म्हणाली तरी ती तिच्याकडे नम्रता च्या ही न कळत बघत होती. मोठं कपाळ, त्यावर लहान गंध, हातात देवाच्या पूजेचा धागा, गळ्यात एक बाप्पाचं लॉकेट, डोळ्यात छान प्रसन्नता आणि एकूणच चेहऱ्यावर एकदम सात्विक भाव! 

"ताई.. चल ना.. अजून आपल्याला माझ्या घरून समृध्दी आणि नम्रता च्या घरी पण जावं लागेल." मयुर म्हणाला. 

त्याच्या आवाजाने श्वेता ची तंद्री तुटली आणि ती मानेने हो म्हणून निघाली. सगळे आता मयुर च्या घरी जाण्यासाठी रस्त्याने चालत होते. श्वेता ला मात्र तिथे नक्की काय घडलं आणि नम्रता च्या चेहऱ्यावर असणारं हे सात्विक तेज नक्की काय आहे याबद्दल जाणून घ्यायचं होतं. 

"नम्रता! तू किती छान आहेस ग... म्हणजे, तुझी स्किन एकदम नितळ आहे... एक वेगळंच तेज तुझ्या डोळ्यात आहे. काय सिक्रेट आहे याचं?" श्वेता ने विचारलं. 

"कुठे काय? काहीच नाही... मला तर साधं राहायला आवडतं... त्यामुळे काहीही सिक्रेट वैगरे नाही." नम्रता म्हणाली. 

पण, श्वेता ला काय म्हणायचं आहे हे तिला डायरेक्ट सांगता येत नव्हतं. आडून आडून ती नम्रता दिवसभर काय करत असते, तिचं एकंदरीत रूटीन आणि आवडी निवडी विचारत होती. 

"अगं ताई.. आमची नम्रता खूप साधी आहे.. सगळ्यांना समजून घेते, अगदी संस्कृती ला धरून चालणारी आहे. रोज देवाचं दर्शन घेतल्या शिवाय तिचा दिवस सुरू होत नाही." समृध्दी म्हणाली. 

"अरे वा... छान... नम्रता! हेच तेज आहे तुझं." श्वेता कसनुसं स्मित करत म्हणाली. 

बोलता बोलता सगळे मयुर च्या घरी पोहोचले. मयुर ने दार वाजवलं. त्याच्या बाबांनी दार उघडलं आणि सगळे आत गेले. मयुर चे बाबा एका इंटरनॅशनल कंपनी साठी काम करायचे म्हणून दिवसा त्यांना सहसा वेळ असायचा. 

"आई.... आई...." मयुर ने घरी गेल्या गेल्या आई ला हाका मारल्या. 

त्याची आई मयुर च्या बाबांसाठी डबा करत होती. त्याच्या आवाजाने ती पटकन बाहेर आली. 

"बोल काय झालं? मला तुझ्या बाबांचा डबा करायचा आहे आणि मला सुद्धा थोड्या वेळात कामाला निघायचं आहे.. बोल पटकन.." ती घाईत म्हणाली. 

त्याने त्या दोघांना श्वेता आणि अमन बद्दल सांगितलं. अजूनही या पोरांच्या डोक्यातून हे खूळ गेलं नाहीये पाहून त्या दोघांनी एक मेकांकडे पाहिलं आणि आता श्वेता, अमन काय बोलतायत हे ऐकू लागले. प्रवीण च्या घरी जे काही सांगितलं होतं तेच त्यांनी यांना सांगितलं. हो नाही करत मयुर चे आई - बाबा पण तयार झाले. 

"एक मिनिट हा.. मला जरा एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. तेवढा करून येतो." मयुर चे बाबा म्हणाले आणि ते दुसऱ्या खोलीत गेले. 

त्यांनी प्रवीण च्या बाबांना फोन करून श्वेता आणि अमन बद्दल विचारलं. त्यांच्याकडून जेव्हा त्या दोघां बद्दल त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांचा विश्वास बसला आणि ते आता निश्चिंत झाले. बाहेर तोवर मयुर च्या आई नी सगळ्यांसाठी लिंबू सरबत केलं होतं ते सगळे घेत होते. अमन आणि श्वेता मात्र फक्त एकमेकांकडे बघून तसंच छद्मी हास्य करत होते. 

"ताई... आता माझ्या घरी जाऊ... माझ्या घराच्या दोन बिल्डिंग पुढेच नम्रता च घर आहे.. तिकडे नंतर जाऊ.." समृध्दी म्हणाली. 

"नको.. नम्रता! तुझ्या आई - बाबांपैकी कोणाला वेळ असेल त्यांना समृद्धीच्या घरी बोलवून घेतेस का? म्हणजे आपला वेळ वाचेल." श्वेता म्हणाली. 

नम्रता फक्त हो म्हणाली आणि तिने घरी आई ला फोन लावून समृद्धीच्या घरी यायला सांगितलं आणि सगळे आता तिकडेच जायला निघाले. 

"बरं, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बद्दल जास्त काही सांगितलच नाही... तुम्हाला काय काय आवडतं? किती कॅम्प केले आहेत तुम्ही आजवर?" अमन ने विचारलं. 

"दादा! मी सांगते." समृध्दी म्हणाली. आणि तिने त्यांच्या ग्रुप बद्दल सगळं त्यांना सांगितलं. 

चालता चालता समृध्दीने त्यांची झालेली ओळख, कॅम्प मध्ये कोण कोणत्या कामात पारंगत आहे ते, त्यांनी केलेली धम्माल हे सगळं सांगितलं आणि त्याचे फोटो सुद्धा दाखवून झाले. 

"अरे वा.. मस्तच! तुम्ही सगळे छान मजा करता. असंच आयुष्य जगायचं असतं. नंतर कोणी बघितलं आहे..." अमन म्हणाला. 

"हो दादा! आम्ही सगळे मस्त बिनधास्त असतो. जेवढी मस्ती करतो तेवढाच अभ्यास पण.." ती म्हणाली. 

बोलता बोलता आता सगळे समृद्धीच्या घरी पोहोचले होते. 

क्रमशः..... 
**************************
हे श्वेता आणि अमन नक्की आहेत कोण? नम्रता ला जे वाटतंय, त्यांच्यात काहीतरी गडबड आहे ते खरं असेल का? की तिच्या स्वभावामुळे असं वाटतंय? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all