एक बेट मंतरलेलं (भाग -३१) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Horror dalls island story. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -३१) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
त्या बाहुली मुळे आज पुन्हा मुलांच्या जीवावर बेतल होतं. प्रवीण च नशीब बलवत्तर म्हणून आज तो वाचला होता. 

"हो ना.. काय आपल्या पोरांच्या मागे लागलं आहे काय माहीत..." समृध्दी ची आई म्हणाली. 

एवढ्यात नर्स आली. त्याला हळूहळू उठवून बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. 

"तुम्ही सगळे आता बाहेर थांबा! पेशंट ला आराम करू दे... कोणीतरी एक जण इथे बसा." नर्स ने सांगितलं. 

सगळे बाहेर येऊ लागले... प्रवीण नम्रता कडे बघत होता... त्याच्या आईने सुद्धा हे बघितलं. मागशी नम्रता जे बोलत होती ते तिने पण ऐकलं होतं आणि प्रवीण सोबत तिला हे बोलायचं होतंच! सगळे बाहेर गेले. 

"प्रवीण! मगाशी बाहेर नम्रता तुमचं एकमेकांवर प्रेम आहे असं म्हणत होती हे खरं आहे का?" त्याच्या आईने जरा खडसावून विचारलं.

"हो..." तो एवढंच म्हणाला. 

"आत्ता तू या अवस्थेत आहेस म्हणून... पण बरा हो नंतर यावर सविस्तर बोलू..." त्याची आई म्हणाली. 

आईला हे बहुतेक आवडलं नाही हे प्रवीण च्या लक्षात आलं पण ही वेळ आणि जागा योग्य नाही म्हणून तो सुद्धा गप्प बसला. नर्स ने दिलेल्या औषधांमुळे त्याला आता झोप येत होती आणि तो झोपला. या सगळ्यात दुपार झाली होती. तो झोपला आहे म्हणून त्याची आई बाहेर आली. 

"मला वाटतंय तुम्ही सगळे देवळात जाऊन या... परत दुपार नंतर ते पॅरा नॉर्मल investigators येणार आहेत तुमच्या सगळ्यांची धावपळ होईल आणि आता प्रवीण ठीक आहे..." ती म्हणाली. 

"नाही वहिनी! त्या investigators ना महत्वाचं काम आलं आहे त्यामुळे ते आठवड्या नंतर येणार आहेत..." मयुर च्या बाबांनी सांगितलं. 

"अरे देवा! एक एक गोष्टी सगळ्या काळजीत टाकणाऱ्या घडतायत..." प्रवीण ची आई म्हणाली. 

"काकू नका काळजी करू... होईल सगळं ठीक.. यात सुद्धा काहीतरी बाप्पाची योजना असेल..." नम्रता म्हणाली. 

प्रवीण च्या आईने तिच्याकडे फक्त बघितलं आणि मान डोलावली. आपण मगाशी जे बोलून गेलो ते आईला आणि प्रवीण च्या आईला सुद्धा आवडलं नाही हे तिच्या लक्षात आलं. 

"काकू! हा अंगारा प्रवीण ला लावा... त्याला जरा लवकर बरं वाटेल... औषधां सोबत देवाची साथ असली की अजून लवकर बरं व्हायला मदत होईल.." नम्रता त्याच्या आईच्या हातात अंगारा देत म्हणाली. 

"हो.. जरा ये ना मला तुझ्याशी बोलायचं आहे.. वहिनी तुम्ही पण या.." प्रवीण ची आई नम्रता ला आणि तिच्या आईला थोडं बाजूला घेऊन गेली. 

"काकू! मला माहितेय तुम्हाला काय बोलायचं आहे... माझ्या आणि प्रवीण च्या नात्याबद्दलच ना?" ती म्हणाली. 

"हो... अगं हे सगळं करायला तुम्ही अजून किती लहान आहात... मी काही तुला दोषी वैगरे म्हणत नाहीये किंवा फक्त तुलाच हे सांगत नाहीये... प्रवीण ला सुद्धा मी बोलणार आहे.. हे तुमचं आत्ताचं वय शिकण्याचं, स्वतःला घडवण्याचं आहे... प्रेम वैगरे गोष्टी अजून तुम्हाला कळत नाहीत..." प्रवीण ची आई म्हणाली. 

"तुमचं बरोबर आहे... मी सुद्धा तिला हेच सांगितलं." नम्रता ची आई म्हणाली. 

"आई! काकू! मला तुमचं सगळं पटतंय.. प्रवीण आणि मला सुद्धा याची जाणीव आहे.. आम्ही दोघं तुम्हाला हे सांगणार होतोच! पण हे सगळं घडत गेलं आणि..." नम्रता खाली मान घालून म्हणाली. 

तिला असं बघून तिची आणि प्रवीण ची आई एकमेकींकडे बघून हसायला लागल्या! त्यांना असं बघून नम्रता ला आश्चर्य वाटलं! ती प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघत होती. 

"अगं! असं काय बघतेस.. आम्ही गम्मत करत होतो! आम्हाला दोघींना केव्हाच कळलं होतं तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात ते! फक्त तुम्ही दोघं कधी सांगताय आणि आम्ही नाराज झालो तर कसे react होताय म्हणून हे सगळं केलं." तिची आई म्हणाली. 

नम्रता ने लाजून खाली बघितलं आणि गोड हसली. 

"हा पण माझी एक अट आहे.." प्रवीण ची आई म्हणाली. 

तिच्या या वाक्याने नम्रता जरा बुचकळ्यात पडली. तिचा चेहरा एकदम उतरला होता. तिला असं बघून प्रवीण ची आई हसली आणि बोलू लागली; "अगं! एवढी काय टेंशन घेतेस? माझी अट एवढीच आहे की तुम्ही दोघं आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं, करीयर बाबतीत तुमची जी स्वप्न असतील ती पूर्ण करायची. विशेषतः तू! लग्न झालं म्हणून किंवा ठरलं म्हणून जराही स्वतः कडे दुर्लक्ष करायचं नाही. तुझी जी स्वप्न असतील त्या आड तू कोणालाही येऊ द्यायचं नाहीस." 

हे ऐकुन नम्रता आणि तिच्या आईला सुद्धा खूप बरं वाटलं. नम्रता च्या डोळ्यात आनंदाश्रु तरळत होते. प्रवीण च्या आईने तिचे डोळे पुसले आणि त्या तिघी पुन्हा सगळे थांबले होते तिथे आल्या. 

"बरं! आता तुम्ही सगळे देवळात जाऊन या.. आधीच उशीर झाला आहे... गुरुजी तिथे वाट बघत असतील." प्रवीण ची आई म्हणाली. 

"मी तुमच्या सोबत थांबते... इथे एकट्याच नका थांबू! मगाशी तुम्हाला सुद्धा त्रास होत होता..." समृध्दी ची आई म्हणाली. 

समृध्दी ची आई आणि प्रवीण ची आई हॉस्पिटल मध्येच थांबल्या आणि बाकी सगळे देवळात जायला निघाले. नम्रता समृध्दी आणि मयुर सोबत होती तर सगळे पालक एकत्र होते. नम्रता ला हॉस्पिटल मध्ये काय झालं हेच सतत आठवत होतं आणि न कळत ती स्वतःशीच हसत होती. हे मयुर आणि समृध्दी ने बघितलं होतं. त्या दोघांचं तिला चीडवणं सुरू झालं होतं. असेच बोलता बोलता सगळे देवळात पोहोचले. 

"नम्रता! काही काळजी करण्यासारखं घडलं आहे का? तुम्हाला सगळ्यांना खूप उशीर झाला यायला आणि प्रवीण पण दिसत नाहीये..." गुरुजींनी विचारलं. 

"हो... आम्ही सगळे सकाळी निघालो तेव्हा प्रवीण पुन्हा बाहुलीच्या प्रभावाखाली गेला. त्याचा accident झाला आहे... आज त्याला हॉस्पिटल मध्येच ठेवणार आहेत." नम्रता ने थोडक्यात त्यांना सगळं सांगितलं. 

"बरं. बाप्पा आहे... बाप्पाच आता त्याला बरं करेल... मला वाटलं होतं त्याही पेक्षा जास्त प्रभाव पडतोय त्या शक्तींचा!" गुरुजी थोडे काळजीने म्हणाले. 

सगळे एकमेकांकडे बघत होते. काही क्षण असेच शांततेत गेले. 

"कोणीही काळजी करू नका.. नेहमी विजय हा सत्याचाच होतो. आजवर नेहमी चांगल्याने वाईटावर विजय मिळवला आहे.. आणि यापुढे सुद्धा तसंच होईल..." गुरुजींनी सगळ्यांना धीर दिला. 

"गुरुजी! आज प्रवीण चा accident झाला पण, काल सुद्धा खूप काही घडलं आहे ते आधी तुम्हाला सांगायचं आहे..." नम्रता म्हणाली. 

"हो... बोलूया.. मी पूजेची सगळी तयारी झाली आहे ना बघून येतो... पूजा सुरू करण्याआधी बोलू." गुरुजी म्हणाले. 

नम्रता ने होकारार्थी मान डोलावली आणि सगळे लगेच हात पाय धुवून बाप्पाला नमस्कार करायला गेले. 

"बाप्पा! आता तूच तारणहार आहेस... पोरांना बळ दे... तुझे आशीर्वाद आहेत म्हणून आज सगळे सुखरूप आहेत... असेच तुझे आशीर्वाद असुदे आणि तुझ्या वरचा विश्वास जराही ढळू देऊन नकोस..." नम्रता ची आई डोळे मिटून प्रार्थना करत होती.

"बाप्पा! उगाच आम्ही बेटावर जाण्याचा हट्ट केला. आधीच मोठ्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं... पण, आता तूच या सगळ्यातून बाहेर काढ..." मयुर मनात म्हणाला. 

"थँक्यू बाप्पा! आज तुझ्या कृपेने आम्ही सगळे सुखरूप आहोत... मला माहितेय यापुढे सुद्धा तूच आमची मदत करशील आणि त्या वाईट शक्तींचा पराभव नक्की होईल... याकाळात तूच भक्ती सुद्धा करून घेतलीस आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना या संकटांना तोंड देता आलं.. तूच तुझ्या अस्तित्वाच्या खुणा देत जराही विश्वास कमी होऊ दिला नाहीस... मला माहितेय तू संकटात नेहमी आमच्या पुढे असतोस आणि तुझ्या लाडक्या भक्तांसाठी तू हाक मारायची वाट बघत नाहीस... अलगद त्यातून बाहेर काढतोस.... पुढचे काही दिवस संकटाची तीव्रता जास्त आहे हे तू कालच गुरुजींच्या तोंडून सांगून आमची मदत केली आहेस... शिवाय प्रवीण ला सुद्धा तूच हरीश काकांच्या रूपात येऊन वाचवलं आहेस याची  मला खात्री आहे... आज सुद्धा त्या एवढ्या शांत रस्त्यावर त्याचा अपघात घडवून तूच त्याला बेटावर जाण्यापासून थांबवलं आहेस... असाच आमच्या पाठीशी रहा.. आणि तुला जे योग्य वाटतं ते आमच्या हातून घडवून घे..." नम्रता डोळे मिटून मनापासून सगळं बोलत होती. 

सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आणि काळजी होती पण फक्त नम्रता अशी होती जिच्या चेहऱ्यावर काळजीचा लवलेश सुद्धा नव्हता. एकदम प्रसन्न मुद्रा, डोळ्यात बाप्पा बद्दल चा कमालीचा विश्वास आणि मनात विजय हा आपलाच होणार हा निश्चय होता. तिच्याकडे बघूनच बाकीच्यांना थोडा धीर मिळत होता. 
*************************
बेटावर तर पूर्ण जल्लोष साजरा होत होता. रक्त पिशाच्च त्यांना इथे मुलांच्या आयुष्यात काही वाईट घडलं की लगेच सांगत होतं. प्रवीण चा झालेला accident सुद्धा त्यांना समजला होता. आता तो शारीरिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे म्हणजे तो मानसिक दृष्ट्या सुद्धा तसाच कमकुवत झाला असणार म्हणजे आता त्याला वश करणं तरी सोपं जाईल म्हणून हा जल्लोष साजरा होत होता. 

"हे रक्त पिशाच्च! मला एक विचारायचं होतं." अमन म्हणाला. 

"विचार..." रक्त पिषाच्याच्या अर्ध मूर्तीतून आवाज आला. 

"तुम्ही म्हणाला होतात की श्वेता ने जी बाहुली मुलांच्या मागावर सोडली होती ती समुद्र किनारी होती ती पुन्हा मुलांच्या मागावर पोहोचली का?" अमन ने विचारलं. 

"हो... त्या बाहुली ला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे असणाऱ्या वाईट शक्तींनी तिला सोडवलं. आता ती प्रवीण च्या घरात आहे. मुलांसोबत जी बाहुली आहे तिला वश करण्यात यश आलं आहे आणि म्हणूनच आपल्याला तिच्या मार्फत काही माहिती मिळाली." रक्त पिशाच्च म्हणालं. 

"अरे वा! बरं झालं.... आता त्या मुलांना माहीतच नाहीये त्यांच्या जीवाची रक्षकच त्यांची भक्षक बनणार आहे... हा... हा.. हा..." अमन म्हणाला आणि जोरजोरात हसायला लागला. 

श्वेता ची सावली सुद्धा जोरात इकडून तिकडे घुटमळू लागली. त्यांना असं वाटत होतं की सगळं आता आपल्या इच्छेनुसार होतंय... पण, त्यांना हे माहीत नव्हतं की, त्यांना फक्त अर्धी माहिती मिळतेय! अशी माहिती जी त्या वाईट  शक्तींना गाफील ठेवेल. त्यांना त्यांचा विजय होताना दिसेल पण, प्रत्यक्षात तसं काही नसेल. 
*****************************
देवळात आता पूजेची सगळी तयारी झाली होती. 

"चला... तुम्ही तिघे इथे बसा आणि मग नम्रता काल काय झालं ते सांग.." गुरुजी म्हणाले. 

देवळाच्या मध्यभागी गुरुजींनी पूजेची तयारी केली होती. मधोमध हवन कुंड, बाजूला चार बस्करं, फुलं, धागा आणि एक पोथी अशी सगळी मांडणी केली होती. सगळे तिथे बसले. त्यांच्या मागे त्यांचे पालक बसले होते. 

"गुरुजी! काल आम्ही सगळे इथून गेलो तर मला एक स्वप्न पडलं होतं... दीपा च्या गळ्यात जी आधीची माळ होती ती नव्हती... मी तुम्ही दिलेली माळ तिला घातली आणि तिने सैतान, सावध हे दोन शब्द उच्चारले होते." तिने सांगितलं. 

"बरं... दीपा ला तुम्ही सगळे देवळात घेऊन आला होतात म्हणून शक्ती मिळाली असेल आणि ती हे सांगू शकली... याचा अर्थ तुमच्या चौघांवर सैतानाचा प्रभाव पडू शकतो किंवा पडला आहे त्यापासून ती तुम्हाला सावध करत होती." गुरुजी म्हणाले. 

"बहुतेक प्रवीण वर याचा जास्त प्रभाव आहे... कारण, काल रात्री प्रवीण अचानक त्या बेटावर जायला निघाला होता आणि...." नम्रता ने जे काल रात्री घडलं ते सांगितलं. 

"बरं! काल प्रवीण ज्यांना दिसला त्यांनी काही विशेष असं सांगितलं का?" गुरुजींनी त्याच्या बाबांकडे बघून विचारलं. 

क्रमशः...... 
****************************
प्रवीण आता हळूहळू बरा होईल... सध्याच्या या काळजीच्या काळात त्याच्या आयुष्यात नम्रता आली आहे. त्यांच्या घरी सुद्धा त्यांचं प्रेम मान्य आहे. या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये ही एक चांगली गोष्ट झाली आहे. पण, त्या वाईट शक्तींना अर्ध्याच गोष्टी समजत आहेत त्या पूर्ण समजायला लागल्या तर? गुरुजी आता काय करतील? पुन्हा प्रवीण ला त्रास होईल का? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all