एक बेट मंतरलेलं (भाग -२८) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Ira blogging Marathi horror stories. Story of dalls island.

एक बेट मंतरलेलं (भाग -२८) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
नम्रता आणि प्रवीण चे बाबा तिथून गेले होते आणि मयुर च्या बाबांचं पॅरा नॉर्मल अॅक्टिविटी बघणाऱ्या टीम सोबत कॉन्टॅक्ट झाला होता. 

"माझ्या कलीग कडून मला पॅरा नॉर्मल अॅक्टीविटी investigator टीम चा नंबर मिळाला आणि माझं बोलणं झालं आहे. ते सध्या भारतातच आहेत! दिल्लीत आहेत ते... उद्या दुपार पर्यंत आपल्या इथे येतील म्हणालेत." मयुर च्या बाबांनी सांगितलं. 

"बरं... चला एक काम तरी झालं..." नम्रता ची आई म्हणाली. 

एवढ्यात तिचा फोन वाजला. नम्रता च्या बाबांचा फोन आला होता. 

"हॅलो... बोला... तुम्ही अचानक कुठे गेला आहात? कधी येणार?" तिच्या आई ने प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

"हो.. हो.. ऐक! आम्ही हरीश च्या घरी चाललो आहोत. तू प्रवीण च्या आई ला आपल्या घरी घेऊन जा... आम्ही तिकडेच येऊ..." तिचे बाबा म्हणाले. 

"पण नक्की काय झालं आहे?" नम्रता च्या आईने गोंधळून विचारलं. 

"ते सगळं आल्यावर सांगतो. आत्ता नको." तिचे बाबा म्हणाले. 

त्यांचं फोनवरच बोलणं झालं आणि त्यांनी फोन ठेवला. 

"काय झालं? कुठे गेले आहेत दोघं?" प्रवीण च्या आईने काळजी ने विचारलं. 

"तसं काही बोलणं झालं नाही पण ते दोघं हरीश च्या घरी गेले आहेत. त्यांनी तुम्हाला आमच्या घरी थांबायला सांगितलं आहे." नम्रता च्या आईने जे काही बोलणं झालं ते सांगितलं. 

"मला वाटतंय आपण सगळेच तुमच्या घरी थांबुया.... नक्कीच काहीतरी घडलं असेल... काही टेंशन असेल तर आपण सगळे एकत्र असलो की जरा धीर येईल.." समृध्दी ची आई म्हणाली. 

"हो ते सुद्धा आहेच! चला सगळे..." नम्रता ची आई म्हणाली. 

सगळे आता नम्रता च्या घरी गेले. साधारण साडे दहा वाजून गेले होते. एवढ्या रात्री एकतर असा कोणाचा फोन येणं म्हणजे सगळ्यांच्याच चिंतेत भर होती. नम्रता आणि प्रवीण चे बाबा आता कधी येतात याची वाट बघत सगळे हॉल मध्ये बसले होते. कोणीच काही बोलत नव्हतं. 

"सगळे असे तोंड पाडून का बसला आहात? आपण टेंशन घेऊन काही होणार नाहीये... नम्रता आणि प्रवीण चे बाबा आले की समजेलच.... सगळे आधी रिलॅक्स व्हा..." समृध्दी चे बाबा म्हणाले. 

"तुमचं बरोबर आहे.... पण, असं अचानक एवढ्या रात्री फोन येणं आणि त्या दोघांचं काहीही न सांगता जाणं म्हणजे जीवाला घोर आहे...." प्रवीण ची आई म्हणाली. 

"हो... मान्य पण आपण असं इथे काळजी करत बसलो तर कसं चालेल?" समृध्दी च्या बाबांनी पुन्हा समजावलं. 

सगळ्यांच्या बुध्दीला ते पटत होतं पण, मन मात्र मानायला तयार होत नव्हतं. या सगळ्या विचारातच साडे अकरा कधी होऊन गेले कोणालाच समजलं नाही. प्रत्येक जण घड्याळ आणि मोबाईल कडे डोळे लावून बसलं होतं. एवढ्यात नम्रता बाहेर आली. 

"आई, काकू, काका... तुम्ही सगळेच इथे! तेही एवढ्या रात्री? काय झालं?" तिने विचारलं. 

"तू झोपली नव्हतीस का? एवढं काही नाही झालं.. जा तू झोप..." नम्रता ची उगाच तिला काही सांगायला नको म्हणून म्हणाली. 

"अगं आई मी झोपले होते पण आज खोलीत पाणी ठेवायला विसरले. पाणी प्यायला चालले होते.... पण, तू सांग आधी काय झालंय? माझ्यापासून प्लीज काही लपवू नका.." ती सगळ्यांकडे बघून म्हणाली. 

"ये नम्रता! बस इथे... वहिनी मला वाटतंय तसंही मुलांना उद्या सगळं कळणार आहेच तर आजच हिला सांगू!" मयुर ची आई म्हणाली. 

त्या नंतर कोणीच काहीही बोललं नाही. थोडा वेळ जरा शांततेत गेला. नम्रता ला कळत होतं नक्की काहीतरी गडबड आहे. तिचा स्वतःशीच विचार सुरू होता; "रात्री थोडावेळ प्रवीण ऑनलाईन होता... आम्ही बोलत होतो पण, नंतर अचानक तो ऑफलाईन गेला... त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता आणि आत्ता इथे सुद्धा त्याची आई जास्त काळजीत दिसतेय.. त्याचे बाबा पण दिसत नाहीयेत... नक्की काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवलं जातंय.. एवढ्या रात्री सगळ्यांचेच आई - बाबा इथे आहेत... कोणाला काही माहीत आहे की नाही देवाला माहीत... काय झालं असेल एवढं? बाप्पा सगळ्यांना सुखरूप ठेव...." ती तिच्या विचारात पूर्णपणे गढून गेली होती. 

"ठीक आहे.. पण, नमु! आत्ता तू हे कोणालाच सांगणार नाहीस... उद्या सगळ्यांना आम्ही मोठे मिळून सांगू..." तिची आई म्हणाली. 

त्या आवाजाने नम्रता विचारातून बाहेर आली. 

"हो चालेल.. सांग.." ती म्हणाली. 

तिच्या आईने तिला सगळे गार्डन मध्ये भेटले तिथपासून सगळं सांगितलं. नम्रता सगळं शांतपणे ऐकुन घेत होती. तिच्या लक्षात आलं होतं नक्कीच त्या वाईट शक्तीचा प्रभाव प्रवीण वर पडला असेल.... आता फक्त तिचे बाबा आणि प्रवीण चे बाबा हरीश कडे का गेले याचा उलगडा व्हायचा होता. तिच्या मनात ९९% शंका होती प्रवीण तिथे गेला आहे पण, गुरुजींनी काल सगळ्यांना धागे बांधले होते त्यामुळे त्याला काहीही होणार नाही याची तिला खात्री होती. 

"अच्छा... असं झालं आहे तर... तुम्ही कोणीच काहीच काळजी करू नका... बाप्पा आहे." नम्रता म्हणाली. 

त्यांनतर तिने सगळ्यांना कालच्या दिवसात जे काही घडलं ते सगळं सांगितलं. सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे होतं. एव्हाना आता रात्रीचा एक वाजून गेला होता. दार उघडल्या च्या आवाजाने तिथली शांतता शांतता भंग पावली. नम्रता चे बाबा आणि प्रवीण चे बाबा आले होते. सोबत प्रवीण होता पण त्याला धड उभं सुद्धा राहता येत नव्हतं. दोघांनी आधार देऊन त्याला इथवर आणलं होतं. 

"प्रवीण! अरे काय झालं? अहो... कुठे गेला होतात तुम्ही? प्रवीण ची ही अशी अवस्था? नक्की काय झालं आहे?" प्रवीण च्या आईने त्याला असं पाहून काळजीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

"वहिनी... शांत व्हा... थांबा आधी त्याला इथे बसवू दे... मग बोलूया..." नम्रता च्या आईने प्रवीण च्या आईला खांद्याला धरून धीर दिला आणि बाजूच्या खुर्चीवर बसवलं. 

मयुर आणि समृध्दी च्या बाबांनी नम्रता आणि प्रवीण च्या बाबांना प्रवीण ला सोफ्यावर बसवायला मदत केली. त्याची अवस्था फार विचित्र होती. तो शुद्धीत होता तरीही त्याला बोलता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं आणि एकदम मरगळून गेल्यासारखं होत होतं. त्याच्या सगळ्या कपड्यांवर वाळू लागली होती शिवाय थोडे ओले झाले होते. त्याची ही अवस्था बघून नम्रता ने पटकन जाऊन पाणी आणलं. त्याच्या तोंडावर थोडं पाणी मारलं आणि त्याला थोडं पाणी तिने स्वतः पाजलं. 

"काय झालं हे? आता तरी काहीतरी सांगा.." नम्रता ची आई म्हणाली. 

"हरीश चा फोन आला तेव्हा प्रवीण तिकडे समुद्रातून चालत कुठेतरी चालला होता. साधारण माने पर्यंतच्या पाण्यात तो गेला होता पण, हरीश नी बघितलं आणि म्हणून प्रवीण वाचला." नम्रता च्या बाबांनी थोडक्यात सांगितलं. 

"पण हा घरात झोपला होता.... एवढ्या लगेच तिकडे पोहोचलाच कसा?" प्रवीण ची आई गोंधळून म्हणाली. 

"हो... मी सुद्धा हरीश ना तेच सांगितलं. पण, त्यांचं म्हणणं होतं जेव्हा हा त्यांना दिसला तेव्हा त्याच्या हातात एक बाहुली होती.... त्याला हाका मारल्या तरी त्याचं आवजाच्या दिशेने लक्ष लागत नव्हतं. कसंबसं जाऊन त्यांनी याला धरलं आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. एवढ्या लगेच हा तिथे पोहोचला कसा आणि अचानक त्याचं वागणं असं कसं झालं माहीत नाही." प्रवीण चे बाबा सुद्धा काळजीने म्हणाले. 

एवढ्यात प्रवीण ला नीट शुद्ध येऊ लागली. एवढा वेळ आपण कुठे आहोत याचं सुद्धा त्याला भान नव्हतं पण, आता त्याला सगळं जाणवत होतं. 

"आई..... नम्रता! आपण नम्रता च्या घरी कधी आलो?" त्याने डोक्याला हात धरून सगळ्या घराकडे नजर फिरवून गोंधळून विचारलं. 

"थांब तू आधी शांत हो.... कसला त्रास नको करून घेऊ... शांतपणे पडून रहा..." नम्रता ची आई म्हणाली. 

"नाही काकू मी ठीक आहे... आई सांग ना काय झालंय?" त्याने पुन्हा विचारलं. 

प्रवीण ची आई त्याचा एक हात हातात घेऊन बसली होती प्रवीण चे बाबा सुद्धा त्याच्या बाजूला बसले आणि त्यांनी जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. 

"तुला काही आठवतं का तू घरातून कधी बाहेर पडलास? तिथे समुद्र किनारी कधी गेलास?" त्याच्या बाबांनी विचारलं.

प्रवीण डोक्यावर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काहीही आठवत नव्हतं. एवढा आठवण्याचा प्रयत्न केल्याने त्याचं डोकं जड होऊन त्याला गरगरल्या सारखं व्हायला लागलं. 

"आई.. मला काहीच आठवत नाहीये ग... डोकं जड झालंय आणि डोळ्या समोर अंधारी येतेय.." तो म्हणाला. 

"नमु! जा पटकन लिंबू सरबत घेऊन ये..." नम्रता ची आई म्हणाली. 

ती पळतच किचन मध्ये गेली. तोवर समृध्दी च्या आईने तिथे ठेवलेल्या जग मधून त्याला पाणी दिलं. लगेचच नम्रता लिंबू सरबत घेऊन आली. ते पिल्यावर प्रवीण ला थोडं बरं वाटायला लागलं. 

"तुला आत्ता काही आठवत नसेल तर नको डोक्याला ताण देऊ..." समृध्दी चे बाबा म्हणाले. 

"आठवतंय थोडं थोडं.... म्हणजे जेवण झाल्यावर मी झोपायला गेलो... झोप लागत नव्हती म्हणून मोबाईल घेऊन बसलो होतो. अचानक जोरजोरात वारे वाहू लागले आणि खोलीतला लाईट, फॅन चालू बंद होत होत्या... मला वाटलं व्होल्टेज कमी जास्त होत असेल म्हणून मी बाहेर आलो.. तेव्हा घरात आई - बाबा नव्हते. मग लाईट नीट झाल्या... मी विचार केला आई - बाबा शतपावली करत असतील म्हणून पुन्हा खोलीत झोपायला गेलो तर वरून एक बाहुली पडली. ती मी उचलून बघितली तर ती माझ्या हातातून खाली उडी मारून उभी राहिली.... मला काहीच कळत नव्हतं. आधी वाटलं हे स्वप्न असेल.. पण, नाही.. ती बाहुली जेव्हा खाली पडली तेव्हा छान होती पण नंतर एकदम विचित्र झाली. तिचे अर्धे केस गायब झाले, एक डोळा नव्हता आणि खूप भयाण दिसत होती. त्यानंतर काय झालं आठवत नाहीये...." त्याने जे काही आठवलं ते एका दमात सांगून टाकलं आणि हे सांगताना सुद्धा त्याला घाम फुटला होता. 

"अरे प्रवीण पण दीपा इथे आहे! मग तुझ्या घरी?" नम्रता म्हणाली. 

"अगं तेच तर मला माहित नाहीये.... आपण बेटावर जी भयानक बाहुली बघितली होती तीच आहे ती... मला वाटतंय अजून ती घरी असेल.. आई! मला घरी जायला भीती वाटतेय.." तो पुन्हा घाबरून म्हणाला. 

त्याच्या आई - बाबांनी त्याला जवळ घेतलं. त्याची अवस्था अशी याआधी कधीच झाली नव्हती. एवढा हुशार आणि चुणचुणीत मुलगा आज एवढा घाबरत होता. 

"प्रवीण! बघ तिकडून निघताना त्या श्वेता ने आपल्या राफ्ट वर काहीतरी फेकलं होतं... मला वाटतंय तिने तीच बाहुली फेकली असेल.... तू काळजी करू नकोस.. आता सकाळ व्हायला काही तासच आहेत.... आपण गुरुजींना सांगू हे सगळं...." नम्रता म्हणाली. 

"हो... उद्या आम्ही सगळे पण तुमच्या बरोबर देवळात येऊ..." मयुर चे बाबा म्हणाले. 

"हो... प्रवीण! तू काहीही काळजी करू नकोस.. आम्हाला सगळ्यांना पटलं आहे तुम्ही मुलांनी जे काही सांगितलं त्याच्यावर आता आमचा विश्वास आहे... आता तुम्ही चौघे एकटे नसाल तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत." समृध्दी ची आई म्हणाली. 

त्यांचं बोलणं ऐकून आता नम्रता आणि प्रवीण दोघांनाही धीर आला होता. आता आपल्याला काहीही खोटं न बोलता आई - बाबांच्या साथीने या सगळ्यांवर मात करता येईल म्हणून दोघं सुखावले होते. 

"बरं... प्रवीण! आता बरं वाटतंय? जाऊया घरी? खूप उशीर झाला आहे ना बाळा... उद्या लवकर उठायचं म्हणजे आत्ता थोडावेळ तरी झोप मिळाली पाहिजे ना..." त्याची आई त्याला समजावत म्हणाली. 

"हो आई.. आता बरं आहे... चल जाऊया.." तो म्हणाला. 

"थँक्यू! तुम्ही आम्हाला जाणीव करून दिलीत आणि आज आपण गार्डन जवळ भेटलो, सगळे होतो म्हणून प्रवीण ला वाचवता आलं...." त्याचे बाबा नम्रता च्या बाबांना हात मिळवून म्हणाले. 

"अहो थँक्यू काय त्यात... आणि प्रवीण हरीश मुळे वाचला आहे.... एकदा हे सगळं संकट दूर होऊ दे... मग आपण पुन्हा तिकडे खास  त्यांचे आभार मानण्यासाठी जाऊ..."नम्रता चे बाबा म्हणाले. 

आता कसलंच टेंशन नव्हतं. सकाळी देवळात आणि दुपार नंतर पॅरा नॉर्मल investigators येणार मग काही काळजीचं कारण नसेल हे सगळ्यांना जाणवलं होतं. सगळे आपापल्या घरी जायला निघाले आणि दार उघडलं तर दाराच्या बाहेर.....

क्रमशः..... 
*************************
काय असेल दाराबाहेर? प्रवीण च्या घरी जी बाहुली आहे ती तर नाही? काय होईल पुढे? सगळ्या पालकांना आता मुलांच्या बोलण्यावर विश्वास बसला आहे पण, खूपच उशीर झालेला नसेल ना? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all