एक बेट मंतरलेलं (भाग -२७) #मराठी_कादंबरी

Horror island story. Story of college friends. Horror dalls island story. Ira blogging stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -२७) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
आता जास्त विचार करून सुद्धा काहीही उपयोग नव्हता. प्रवीण ला सगळं सांगितल्या मुळे तिचं मन सुद्धा हलकं झालं होतं. तिच्या या विचार चक्रात रात्रीची जेवायची वेळ झाली होती. 

"नमु! अगं जेवायला ये...." तिच्या बाबांनी तिला हाक मारली. 

"हो आले..." ती म्हणाली. 

आणि लगेच बाहेर आली. आज जेवणात तिच्या आवडीची सांडग्याची भाजी होती ती पाहून तर ती खुश झाली. 

"अरे वा आई! आज सांडगे!" ती म्हणाली. 

"हो... काय करणार.... आमची लेक सतत काळजीत असते तिला बरं वाटावं म्हणून काही ना काही करावं लागतंय आजकाल..." तिची आई नम्रता चा मूड ठीक करण्यासाठी म्हणाली. 

"अगं आई तसं काही नाही... पण, आम्ही सगळे बेटावर जाऊन आलो आणि जे काही घडत गेलं त्यामुळे.... सोड ते जाऊदे..." ती म्हणाली. 

सगळे जेवायला बसले. आपल्या डोक्यात जे काही सुरू आहे हे आईला समजतंय आणि आई - बाबांना अजून काळजी नको म्हणून आता नॉर्मल वागायचं असं तिने ठरवलं. 

"आई.... एकदम मस्त झाली आहे भाजी.." नम्रता हातचा मोर करून छान हसून म्हणाली. 

"चला... आवडली ना... जेव आता शांतपणे." तिची आई म्हणाली. 

गप्पा मारता मारता जेवण सुरू होतं. तिच्या आई - बाबांचा आजचा दिवस कसा गेला हे त्यांचं सांगून झालं. त्यांच्या घरात नियमच होता रात्री जेवताना आपला दिवस कसा गेला, काय वेगळं घडलं आणि त्यातून आपण काय शिकलो किंवा काय शिकायचं हे सांगायचं. त्याप्रमाणे तिच्या आई - बाबांचं सांगून झालं. 

"नमु! तू सांग आता... आज तुम्ही सगळे देवळात जाणार होतात ना? काय झालं आज?" तिच्या बाबांनी विचारलं. 

देऊळ आणि आज काय घडलं हे ऐकूनच तिला ठसका लागला! 

"अगं हळू हळू... घे आधी पाणी पी.." तिची आई काळजीने तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. 

तिला आता जरा बरं वाटू लागलं. 

"अगं असं एकदम काय झालं? सावकाश जेव बघू आधी.... मग सांग..." तिचे बाबा म्हणाले. 

तिने फक्त मान डोलावली आणि जेवू लागली. आता जे काही घडलं ते सांगितलं तरी यांचा विश्वास बसेल का हा प्रश्न होताच आणि खोटं काही सांगायचं झालं तर आपण खोटं बोलतोय हे आई - बाबांना नक्की समजेल! याच विचारात ती जेवत होती. 
**************************
बेटावर आता अमन, श्वेता ची पूर्ण सज्जता झाली होती. श्वेता कोणती बाहुली तिथून मुलांच्या मदतीला गेली आहे हे बाकीच्या बाहुल्यां ना वेठीस धरून काढून घेऊ पाहत होती. 

"आता सांगताय का हिच्या सारखीच सगळ्यांची हालत करू?" श्वेता तिचा फुटका डोळा बाहेर काढून सगळ्यांना तिच्या पंजात असलेल्या, मान फाटलेल्या बाहुलीला दाखवत म्हणाली. 

सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. सगळ्याच बाहुल्या एकमेकींना चिकटून उभ्या होत्या आणि थरथरत होत्या. काही वेळ शांततेत गेला... कोणीही काहीही बोलत नाही पाहून श्वेता अजूनच चवताळली. तिचा आवाज आता पूर्ण बेटावर परसला होता आणि अमन सुद्धा तिकडे आला. 

"काय चाललंय हे? तुला माहितेय ना आपल्याला सध्या शक्ती अशी कशीही वापरून चालणार नाहीये...." अमन तिला समजावत म्हणाला. 

श्वेता ने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्या सारखं केलं. ती आता पूर्णपणे सूडाच्या भावनेने पेटून उठली होती. तिचा तो अवतार बघून अमन ला सुद्धा कळून चुकलं होतं बोलून काहीही फायदा होणार नाही. त्या बाहुल्या सुद्धा एकमेकींकडे बघत घाबरून उभ्या होत्या. श्वेता रागाने दुसरी बाहुली उचलणार एवढ्यात आवाज आला! 

"थांब! आपलं सैन्य कमी करून काहीही होणार नाहीये...." सैतान मागून येऊन म्हणाला. 

त्याच्या आवाजाने श्वेता जागच्या जागी थांबली आणि मागे वळून पाहिलं. 

"सैतान तुम्ही!" ती आणि अमन एकदम म्हणाले. 

"तुला जाणून घ्यायचं आहे ना इथून दुसरी कोणती बाहुली बाहेर गेली... मला विचारायचं होतं.... तुमच्या सारख्या कुप्रवरुत्ती साठीच तर मी आहे... हा.. हा.. हा.." तो सैतान एकदम किळसवाण्या पद्धतीने म्हणाला. 

"हो... पण, तुमची साधना करत असताना कोणीतरी त्यातूनही ही अशी दीड दमडीची बाहुली व्यत्यय आणते या विचारानेच मी पेटून उठले आणि सरळ असं वागले..." श्वेता ने तिच्या वागण्याचं समर्थन केलं. 

"ते काहीही असो.. तुझ्याकडून चूक झाली आणि आता तुला शिक्षा ही मिळणार.... तुझी शिक्षा पूर्ण झाली की मगच तुला त्या बाहुली बद्दल समजेल...." सैतान एकदम भयानक पद्धतीने तिच्याकडे पाहत म्हणाला. 

काहीही झालं तरी ते वाईट जग होतं. जिथे पापं सतत वाढत असतात. शेवटी सैतान च तो! तो थोडीच त्याच्या भक्ताच्या हातून चूक झाली म्हणून त्याला माफ करणार होता.... त्या काळया, अंधाराच्या पापी जगात माफी, प्रेम असे काही शब्दच नव्हते! 

"मला तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे..." ती खाली मान घालून म्हणाली. 

"ठीक आहे! आता तुझा जो काही अर्धा मानव अवतार शिल्लक राहिला आहे त्याचा तू त्याग करायचा, हे संपूर्ण मानवी शरीर गळून पडलं पाहिजे.... तू जेव्हा पूर्णपणे सावलीत परावर्तित होशील तेव्हाच तुझी शिक्षा पूर्ण झालेली असेल." सैतान म्हणाला. 

"पण सैतान! यामुळे तर तिच्या सगळ्या शक्ती कमी होतील...." अमन बोलत होता. 

"ठीक आहे! मी इथून चाललो आहे...." सैतान वैतागून म्हणाला. 

"नाही.. नाही... सैतान! मला मान्य आहे..." श्वेता त्याला अडवत म्हणाली. 

सैतान लगेचच थांबला. या वाईट विश्वात ज्याला  त्याला फक्त स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा असतो आणि आपल्या वाचून सगळं कसं अडेल हे दाखवायचं असतं हे सैतानाने दाखवून दिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता छद्मी हास्य होतं आणि काहीही न बोलता तो तिथून निघून गेला. 

"काय गरज होती तुला इथे यायची..." अमन श्वेता वर भडकला. 

"आता त्याचा काहीही उपयोग नाही.... सैतान कोपण्यापेक्षा माझ्या शक्ती कमी झालेल्या चालतील... त्या पुन्हा मिळतीलच..." श्वेता त्याच्याकडे बघून म्हणाली. 

तिचं बोलणं आता त्याला पटलं होतं आणि तो तिथून निघून गेला. 
**************************
नम्रता ने आता जे काही आहे ते खरं सांगून मोकळं व्हायचं असं ठरवलं आणि आई - बाबांना आपण मस्करी करतोय असं वाटलं तर काहीही न बोलता ऐकुन घ्यायचं असं तिने ठरवलं. 

"नम्रता! बघ पुन्हा कुठेतरी हरवलीस. अगं काही झालं आहे का? आज कोणाचं भांडण झालं का ग्रुप मध्ये?" तिच्या आई तिला विचारात गढलेल पाहून म्हणाली. 

"नाही... भांडण वैगरे काहीच नाही... बरं मी हात धुवून येते मग सगळं आवरून झालं की बोलूया.." ती म्हणाली आणि गेली. 

नम्रता ने सगळं आवरून घेतलं आणि सगळे एकत्र बसले. 

"आई - बाबा! मला माहितेय मी तुम्हाला आत्ता सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही... पण, आज आम्ही सगळे जेव्हा देवळात गेलो होतो तेव्हा आपल्या नेहमीच्या जोशी गुरुजींना भेटलो. त्यांना जो काही घडलेला प्रकार होता तो सगळा सांगितला आणि दीपा ला सुध्दा त्यांना दाखवलं. तिच्या मुक्तीसाठी म्हणूनच आम्ही गेलो होतो... तेव्हा त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की, जश्या चांगल्या शक्ती असतात तश्याच वाईट सुद्धा! आणि त्या शक्तींचा प्रभाव आमच्यावर होता. आत्ता सुद्धा दीपा वर वाईट शक्तींचा प्रभाव आहे... तिच्या मुक्तीसाठी आम्ही सगळे उद्या पुन्हा देवळात जाणार आहोत... गुरुजी काहीतरी पूजा करणार आहेत." नम्रता ने थोडक्यात जे काही घडलं ते सांगितलं. 

"बरं... जा सगळे... पूजा करण्यात काहीही वाईट नाही... तुला समधान मिळणार आहे ना मग झालं... आता जाऊन झोप..." तिची आई म्हणाली. 

नम्रता ने निदान आता आई - बाबांनी काहीही विरोध न करता सगळं ऐकुन घेतलं आणि पुन्हा आपल्यालाच समजवायचा प्रयत्न केला नाही म्हणून सुटकेचा निःश्वास सोडला आणि ती झोपायला गेली. 

"मला वाटतंय आपण बाकीच्या पालकांच्या कानावर हे घातलं पाहिजे... मुलं एवढं म्हणतायत आणि सगळ्यांना सोडायला ते हरीश आले होते ते सुद्धा असंच काहीतरी बोलत होते म्हणजे थोडा तरी मुलांवर विश्वास ठेवून त्यांच्या मनाप्रमाणे आपण एकदा करून बघू... या सगळ्यातून सगळे बाहेर आले पाहिजेत.. आपण असताना सुद्धा फक्त आपण मुलांचं बोलणं ऐकून घेत नाहीये म्हणून मुलं  अशी वणवण करून स्वतःला त्रास करून घेतायत हे काही मला पटत नाहीये..." नम्रता ची आई तिच्या बाबांना म्हणाली. 

"हम्म! बरोबर आहे तुझं. मी आत्ताच सगळ्यांना कॉन्फरन्स कॉल लावतो.." तिचे बाबा म्हणाले. 

त्यांनी लगेचच सगळ्या पालकांना कॉन्फरन्स कॉल लावला. 

"हॅलो! मला जरा तुमच्या सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे... नऊ वाजेपर्यंत सगळे आपल्या गार्डन जवळ भेटा ना.. मुलांना काहीही सांगू नका.." नम्रता चे बाबा म्हणाले. 

सगळ्यांनी बरं म्हणून फोन ठेवला आणि नऊ पर्यंत सगळे गार्डन जवळ जमले. 

"बरं झालं सगळे आलात..." नम्रता च्या बाबांनी बोलायला सुरुवात केली. 

त्यांनी सगळ्यांच्याच डोळ्यात प्रश्न पाहून लगेचच आज नम्रता ने जे काही सांगितलं ते सगळं त्यांना सांगितलं. बराच वेळ सगळ्यांची चर्चा सुरू होती... नक्की हे प्रकरण काय आहे हेच कोणाला समजत नव्हतं. 

"मी काहीतरी सांगू का..." मयुर चे बाबा म्हणाले. 

"हो बोला ना.." समृध्दी चे बाबा म्हणाले. 

"तुम्हाला तर माहितेय मी international कंपनी मध्ये कामाला आहे. त्यामुळे माझे परदेशात कॉन्टॅक्ट आहेत. तिकडे मी काही घोस्ट हंटर ना बघितलं आहे... माझे कलिग आहेत त्यांच्याकडून मला नंबर मिळेल. आपण त्यांची मदत घेतली तर? म्हणजे जर आता आपण मुलांच्या कलाप्रमाणे घेणार आहोत तर त्यांचं सुद्धा समाधान.." त्यांनी सगळं सविस्तर सांगितलं. 

"हो चालेल ना... तुम्ही लगेच बोलून घ्या आणि ते इथे कधी येऊ शकतील विचारा." नम्रता चे बाबा म्हणाले. 

लगेचच मयुर च्या बाबांनी त्यांना फोन करून सगळ्या हालचाली सुरू केल्या. या सगळ्या चर्चेत आणि उपाय काढण्याच्या नादात रात्रीचे १० वाजून गेले होते. मयुर चे बाबा फोन करण्यात व्यस्त होते तर बाकी सगळे यातून नक्की आता काय मार्ग निघेल या चिंतेत! एवढ्यात नम्रता च्या बाबांचा फोन वाजला. 

"हरीश चा फोन आहे..." ते काळजीने म्हणाले. 

"अहो उचला तर..." नम्रता ची आई म्हणाली. 

नम्रता च्या बाबांनी फोन घेतला. त्यांचं बोलणं सुरु होतं आणि त्या बोलण्यावरून तरी काहीतरी टेंशन आहे हे सगळ्यांना जाणवलं. 

"मी त्याच्या बाबांसोबत लगेच येतो तिथे..." तिचे बाबा म्हणाले आणि लगेचच त्यांनी फोन ठेवला. 

"काय झालं? आत्ता एवढ्या उशिरा कोणासोबत चालला आहात तिकडे?" नम्रता च्या आई ने विचारलं. 

"प्रवीण च्या बाबांसोबत! काय झालं ते येऊन सांगतो..." नम्रता चे बाबा घाईत काळजीने म्हणाले. 

त्यांच्या बोलण्यातली घाई आणि काळजी प्रवीण च्या बाबांना जाणवली होती म्हणून त्यांनी सुद्धा काहीही न विचारणे पसंत केले आणि त्यांच्या बरोबर जाऊ लागले. 

"लवकर या... आणि कळवा काय झालं आहे.." नम्रता ची आई त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून म्हणाली. 

"नक्की काय झालं असेल? हे असं न सांगता जाणं..." प्रवीण ची आई काळजीने म्हणाली. 

"बघूया.. ते आल्यावर समजेलच.... नक्की काहीतरी सिरियस असेल म्हणून इथे वेळ न वाया घालवता दोघं गेले असतील..." नम्रता ची आई प्रवीण च्या आईला समजावत म्हणाली. 

या सगळ्या पालकांच्या चिंतेत आता हरीश ने केलेल्या फोन मुळे भर पडली होती. सगळं काही ठीक होईल असं स्वतःच्याच मनाला सगळे समजावत होते. 

क्रमशः.....
*************************
नक्की काय झालं असेल? नम्रता चे बाबा प्रवीण च्याच बाबांना घेऊन का गेले असतील? हरीश ने का फोन केला असेल? मयुर चे बाबा ज्या घोस्ट हंटर्स ना बोलवणार आहेत ते मुलांची मदत कशी करतील? दीपा ला मुक्ती मिळेल? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all