एक बेट मंतरलेलं (भाग -२६) #मराठी_कादंबरी

Horror island story. marathi kadambari. Ira blogging horror stories. Story of horror dalls island.

एक बेट मंतरलेलं (भाग -२६) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
बेटावर त्या सैतानाच्या येण्याने अशुभ असं वातावरण तयार होऊ लागलं होतं. पूर्ण बेटाभोवती काळे ढग दाटून आले होते. जोरदार वाऱ्यासह विजांचा प्रचंड गडगडाट आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. ऐन उन्हाळी दिवसात हे असं वातावरण तयार होणं म्हणजे त्या वाईट शक्तींना पोषक असं वातावरण तयार होण्यासारखं होतं. 

"आत्ता कुठे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत... हा... हा... हा...." अमन जोरजोरात ओरडत हसून म्हणाला. 

"फक्त सैतानाच्या येण्याने एवढं सगळं घडू शकतं तर बळी दिल्यावर तर सगळीकडे फक्त आणि फक्त आपलं राज्य!" श्वेता सुद्धा त्याच्यात सामील होत म्हणाली. 

त्या बेटावरच्या तश्या वातावरणामुळे सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांना जे हवं होतं ते घडायला लागलं होतं... फक्त त्यांचे बळी तिथे येण्याची वाट त्यांना बघायची होती. सैतान जागृत केल्याने आणि पौर्णिमा जवळ येत असल्याने त्यांच्या शक्तित आपसूक वाढ होणार होती आणि मुलं तिथे जाणार हे आता काळया दगडावर च्या रेषेप्रमाणे होते. 

"आपण पुढच्या विधिंची तयारी करायला हवी." श्वेता वाकडी मान करून अमन कडे बघत म्हणाली. 

त्याने सुद्धा तिच्याकडे तसंच बघत सहमती दर्शवली आणि दोघे तयारी ला लागले. त्याआधी श्वेता ला सतत मुलांच्या मदतीला कोण गेलं असेल हा प्रश्न सतावत होता. रक्त पिशाच्याने जरी सांगितलं असलं लवकरच समजेल तरी तिला जराही धीर नव्हता. म्हणून काहीतरी मनाशी पक्कं करून ती अमन सोबत तयारी करत होती. आधी जी तयारी करून ठेवली होती त्यात आता जिथे जिथे रक्ताचा वापर केला होता त्या सगळ्यात सापांचं विष मिसळायचं होतं. दोघेही एक एक साप धरून तोंडाने त्याचे लचके तोडून त्यातलं विष रक्तात मिसळत होते. ते काम झालं आणि काहीही न बोलता श्वेता मुलांनी जिथे कॅम्प लावला होता तिकडे गेली. 

"इथे जे कोणी पहारा देत होतं लगेच समोर या..." ती किंचाळून म्हणाली. 

तिच्या त्या किंचाळण्याने आणि एकदम भेसूर आवाजाने सगळ्या बाहुल्या थरथर कापत तिथे उभ्या राहिल्या. 

"कोणी मदत केली त्या सगळ्यांना इथून पळून जायला...." श्वेता ने एका बाहुलीला तिच्या मानगुटीला तीक्ष्ण नखात उचलून धरलं आणि विचारलं. 

तिच्या त्या अचानक आणि तीव्र वाराने ती बाहुली मानेतून फाटली आणि सगळा कापूस बाहेर आला. हे पाहून सगळ्या बाहुल्या अजूनच घाबरल्या आणि अंग चोरुन उभ्या राहिल्या. 
***************************
इथे मुलं देवळातून घरी जाण्यासाठी निघाली. त्यांच्या मागे दीपा येऊन कशी पडली होती, तिच्यापासून आता काही धोका निर्माण होणार आहे का या सगळ्या विचारात पूर्ण रस्ताभर कोणीही काहीही बोललं नाही. सरळ सगळे आपापल्या घरी गेले. दीपा ला वाईट शक्ती काबू करू पाहत आहेत म्हणून नम्रता जरा अस्वस्थच होती. कसेबसे चार घास पोटात ढकलून ती सकाळ पासून जे काही घडत गेलं त्याचा विचार करत होती. 

"दीपा तू ठीक आहेस ना? आम्ही सगळे करतोय प्रयत्न पण तू सुद्धा तुझी शक्ती कमी होऊ देऊ नकोस..." ती दीपा ला हातात घेऊन तिच्याशी बोलत होती. 

थोडा वेळ असाच गेला आणि दीपा ची शक्ती कमी होऊ नये म्हणून नम्रता तिच्यासाठी प्रार्थना करत बसली. घरात एकटीच असून सुद्धा कोणीतरी आहे असं तिला जाणवत होतं पण, त्याकडे ती दुर्लक्ष करत होती. कदाचित आपल्या प्रार्थनेमुळे दीपा ला शक्ती मिळत असतील आणि तिचंच अस्तित्व जाणवत असेल असं तिला वाटत होतं. कारण, तिच्या घरात एवढी आध्यामिक ऊर्जा होती की ती कोणत्याही वाईट शक्तींना सहन होणार नाही हे तिला माहीत होतं. म्हणूनच दीपा आता आपल्याशी बोलू शकेल या विश्वासाने ती तिला मांडीवर घेऊनच जप करत होती. काही आवर्तनं झाल्यावर दीपा च्या गळ्यात माळ म्हणून जे ब्रेसलेट घातलं होतं ते सुद्धा गळून पडलं. बाहेर आता वाऱ्याने चांगलाच जोर धरला होता आणि काहीतरी खूप मोठं घडतंय असं वातावरण तयार झालं होतं. नम्रता ने एकदा खिडकीतून बाहेर बघितलं आणि दीपा च्या गळ्यातून पडलेली माळ उचलून एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवली. तिच्याकडे गुरुजींनी बनवलेली माळ होतीच! लगेचच तिने ती माळ तिला घातली. या सगळ्यात साधारण संध्याकाळचे चार वाजून गेले होते. एवढ्यात तिचा मोबाईल वाजला... प्रवीण चा फोन आला होता. 

"हॅलो... बोल प्रवीण.. काय झालं?" नम्रता ने बाहेरचं गढूळ झालेलं वातावरण बघून विचारलं. 

"मला अचानक खूप भीती वाटतेय.. घरात मी एकटाच आहे पण सतत माझ्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असं वाटतंय..." त्याने आजूबाजूला सगळीकडे नजर फिरवली आणि हळू आवाजात नम्रता ला सांगितलं. 

"नको घाबरुस... खूपच भीती वाटत असेल तर ये इकडे...." ती म्हणाली. 

प्रवीण काही बोलणार एवढ्यात कोणाचा तरी फोन येतोय हे तिला समजलं. 

"एक मिनिट हा प्रवीण! समृध्दी चा फोन येतोय." ती म्हणाली आणि तिने प्रवीण चा फोन होल्ड वर टाकून तिचा फोन घेतला. 

"बोल ग काय झालं?" तिने विचारलं. 

समृध्दी ने सुद्धा तेच सांगितलं. तिला सुद्धा भीती वाटत होती. हे ऐकुन नम्रता ने प्रवीण आणि मयुर ला सुद्धा कॉन्फरन्स मध्ये घेतलं. 

"अगं नमु मी आत्ता तुलाच फोन करणार होतो.. इथे मी घरात एकटा आहे तरीही मला भीती वाटतेय... बाहेरचं वातावरण बघ ना किती विचित्र झालं आहे." मयुर ने फोन उचलल्या उचलल्या बोलणं सुरु केलं. 

"तुला पण भीती वाटतेय ना.. बघ मला आणि प्रवीण ला सुद्धा..." समृध्दी म्हणाली. 

"सगळे आधी शांत व्हा. इथे माझ्या घरी या सगळे पटकन... तुम्हाला एक गुड न्यूज सांगते म्हणजे सगळी भीती जाईल तुमची." नम्रता म्हणाली. 

सगळे हो म्हणाले आणि फोन ठेवला. या सगळ्यांना समजवता समजावता ५ वाजले होते. सगळे आता अनायसे येतातच आहेत तर मस्त पैकी चहा करुया म्हणून ती किचन मध्ये गेली आणि चहा करत ठेवला. तेवढ्यात सगळे आले. 

"नमु यार खरं सांग तुला भीती वाटत नव्हती का?" समृध्दी ने दारातूनच प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

"आत तरी ये... बोलूया आपण.." नम्रता हसून म्हणाली आणि सगळ्यांना आत घेतलं. 

"आत्ता कुठे जरा बरं वाटतंय..." प्रवीण आत येत येत म्हणाला. 

सगळे येऊन बसले आणि नम्रता ने सगळ्यांसाठी चहा, बिस्किटं आणली. सगळ्यांच्या हातात चहाचे कप देऊन ती सुद्धा तिथे बसली. 

"सांग ना नमु काय गुड न्यूज आहे." समृध्दी ने आनंदाने विचारलं. 

"हो.. हो.. एक मिनिट.." ती म्हणाली आणि टीव्ही च्या बाजूला असणाऱ्या टेबल वरून दीपा ला आणलं आणि सगळ्यांना दाखवलं. 

"अगं ही तर दीपा आहे.. सांग ना काय ते..." मयुर म्हणाला. 

"नीट बघ ना... ही माळ गुरुजींनी दिली आहे ती घातली दीपाला... मगाशी जप करता करता आधीची माळ तुटून पडली." नम्रता ने सगळ्यांचं लक्ष त्या माळे कडे वेधून घेतलं. 

"अरे हो की! चला बरं झालं.. म्हणजे उद्या देवळात गुरुजी जी काही पूजा करतील त्याने दीपा ला शक्ती मिळायला सुरुवात होईल... नाहीतर ही माळ काढेपर्यंत अजून वेळ गेला असता..." प्रवीण म्हणाला. 

"हो... बाप्पाची च कृपा. बरं चला आता चहा घ्या.. नाहीतर गार होईल..." नम्रता म्हणाली आणि पुन्हा त्यांच्यात बसली. 

सगळे निवांत गप्पा मारत होते. बाहेरचं वातावरण सुद्धा नॉर्मल होऊ लागलं होतं. कोणालाच आता भीती वाटत नव्हती. एवढ्यात दीपा ची काहीतरी हालचाल झाली. 

"नमु! दीपा!" समृध्दी च लक्ष गेल्याने ती एकदम ओरडली. 

सगळे सावध झाले आणि हा नक्की काय प्रकार आहे म्हणून तिच्या जवळ गेले. नम्रता ने तिला उचलून घेतलं. 

"दीपा! बोल... तुला कशी मुक्ती देऊ.. काहीतरी हिंट दे.." ती म्हणाली. 

दिपाचे फक्त डोळे हलत होते आणि ती डोळ्याने नाही अशी काहीतरी खूण करत होती. बराच वेळाने तिच्या तोंडून शब्द फुटले! 

"सैतान... सावध..." आणि ती पुन्हा साधी बाहुली झाली. 

याचा काय अर्थ असेल? या विचारात सगळे होते एवढ्यात दारावरची बेल वाजली. 

"स्वप्न! अरे देवा! दुपारी जी झोपले ती आत्ता उठतेय...." नम्रता उठून बसली आणि स्वतःशीच म्हणाली. 

तोवर तिचे आई - बाबा चावीने दार उघडून आत आले होते. 

"काय ग? बरं वाटत नाहीये का? एवढ्या उशीर पर्यंत झोपली आहेस ती... सहा वाजलेत.." तिची आई म्हणाली. 

"नाही आई.... मी बरी आहे... चार नंतर कधी झोप लागली समजलंच नाही." नम्रता म्हणाली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. 

तोवर तिच्या आई ने चहा केला होता. चहा घेण्याआधी तिचं लक्ष दीपा कडे गेलं तर तिच्या गळ्यात त्या मुलीने माळ म्हणून जे ब्रेसलेट दिलं होतं तेच होतं. 

"काय झालंय आज तुला? अगं चहा घे..." तिची आई म्हणाली. 

" अं? हो.. तू का केलास मी आलेच होते ना.. बरं बस तू मी घेऊन येते बाहेर..." नम्रता म्हणाली. 

तिने चहा चे कप बाहेर आणले आणि चहा घेऊन ती तिच्या खोलीत गेली. 

"ते जर स्वप्न होतं तर मला असं का वाटतंय की दीपा ला हेच सांगायचं होतं! सैतान आणि सावध असे दोन शब्द! काय अर्थ असेल याचा? गुरुजींना उद्या विचारलं पाहिजे..." ती स्वतःच्याच विचारात होती. 

विचारा विचारात तिने कधी हे सगळं टाईप करून प्रवीण ला पाठवलं तिला सुद्धा माहीत नव्हतं. जसा तिचा मेसेज वाचला तसा प्रवीण ने तिला फोन केला. 

"हॅलो.. बोल प्रवीण काय झालं?" तिला काहीच माहीत नसल्याने तिने विचारलं. 

"हे तर मी विचारायला हवं ना... तूच काय विचारतेस..." तो म्हणाला. 

त्याच्या या वाक्याने ती पूर्णपणे भानावर आली. 

"म्हणजे? मला समजलं नाही." तिने काहीही न समजल्यामुळे विचारलं. 

"काय स्वप्न पडलं तुला नक्की? तू ठीक आहेस ना?" त्याने काळजीने विचारलं. 

"तुला कसं समजलं मला काहीतरी स्वप्न पडलं आहे..." तिने पुन्हा गोंधळून विचारलं. 

"स्वप्नाचा डोक्यावर परिणाम झाला की मस्करी करतेस?" त्याने हसुन विचारलं. 

तिला काहीच न समजल्याने ती काहीच बोलली नाही. काही क्षण असाच शांततेत गेला. 

"सॉरी... राग आला का.. अगं पण तूच मला मेसेज केलास आणि तूच असं म्हणालीस तर मी दुसरं काय बोलणार..." प्रवीण म्हणाला. 

"एक एक मिनिट.. काय म्हणलास? मेसेज? मी केला?" ती म्हणाली आणि लगेच तिने मोबाईल मध्ये चेक केलं तर खरचं तिने त्याला मेसेज केला होता. 

"अरे सॉरी यार! आता तुझ्याशी सगळं शेअर करायची एवढी सवय झाली आहे ना की आपोआप तुला मेसेज कधी करते ते माझं मला कळत नाही." ती थोडी लाजून म्हणाली. 

"सॉरी वैगरे राहुदे... तू बोल... नक्की काय झालं?" त्याने आता काळजीने विचारलं. 

"अरे आपण देवळातून आलो मग जेवून मी दीपा सोबतच होते... नंतर मला कधी झोप लागली समजलं नाही आणि मग...." तिने जे काही घडलं ते त्याला सविस्तर सांगितलं. 

"बरं... एक काम करुया उद्या गुरुजींना याबद्दल सांगू. बघूया ते काय सांगतात... तू आत्ता कसलीच काळजी करू नकोस.." त्याने तिला समजावलं. त्याच्या बोलण्याने तिला जरा बरं वाटलं आणि तिने हो म्हणून फोन ठेवला. 

क्रमशः...... 
************************
नम्रता ने जे स्वप्न बघितलं आहे त्याचा अर्थ तिला लागेल का? दीपा ने तिच्या शक्तींचा कस लावून तिच्या मुक्ती ऐवजी मुलांना सावध करणारे दोन शब्द सांगितले आहेत... त्याचा अर्थ जर या चौघांना समजला नाही तर? फक्त स्वप्न म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तर? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all