एक बेट मंतरलेलं (भाग -२५) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Ira blogging horror stories. Horror dalls island story.

एक बेट मंतरलेलं (भाग -२५) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
गुरुजी मुलांना विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून व्यवस्थित समजावत होते. सगळे अगदी मन लावून ऐकत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून कोणीतरी त्यांना समजून घेतंय आणि आता आपण संकटातून बाहेर पडू या आशेची पालवी सगळ्यांच्याच मनात फुटली होती. 

"म्हणजे गुरुजी, खरंच चांगले आणि वाईट असे दोन प्रकारचे आत्मे असतात का?" मयुर ने विचारलं. 

"हो... जेव्हा माणूस पंचतत्वात विलीन होतो तेव्हा त्याची जी काही ऊर्जा असते ती शरीरातून बाहेर पडते. ज्या व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा तश्याच राहिलेल्या असतात किंवा ज्या व्यक्तीचा फार दयनीय पद्धतीने मृत्यू होतो त्याच्या आत्म्याला शांती लाभत नाही असं आपण म्हणतो. यात सुद्धा चांगल्या, वाईट प्रकारचे आत्मे असतात. चांगले आत्मे त्रास देत नाहीत तर वाईट आत्मे त्रास देतात... ते चांगल्या आत्म्यांना आपल्या कैदेत ठेवायचा प्रयत्न करतात..." गुरुजी बोलत होते. 

सगळी मुलं त्यांच्याकडे अगदी लक्ष देऊन ऐकत होती. दीपा एक चांगला आत्मा आहे आणि म्हणूनच तिने आपली मदत केली हे त्यांना जाणवलं. दीपा प्रमाणे अजूनही तिथे चांगले आत्मे असतील जे त्या अमन, श्वेता च्या कैदेत आहेत त्यांचं काय हा विचार सुद्धा मुलांच्या मनात येऊन गेला. 

"गुरुजी! म्हणजे दीपा ने आमची मदत केली म्हणजे तिचा चांगला आत्मा होता.. तिच्या सारखे अजूनही आत्मे तिथे अडकले असतील तर?" नम्रता ने विचारलं. 

"हो... पण, हे काम सोपं नसतं... दीपा चा आत्मा तुमची मदत करू शकला कारण, तुझी भक्ती! तुझी भक्ती, देवावरचा विश्वास आणि सकारात्मकता. यामुळे दीपा च्या आत्म्याला शक्ती मिळत गेली. जर हे काही झालं नसतं तर आज तुम्ही इथे नसता." ते म्हणाले. 

पुन्हा एकदा नम्रता च्या भक्तीने त्यांना तारलं होतं हे सिद्ध झालं. नम्रता सारखी छान मैत्रीण आपल्याला मिळाली आहे म्हणून त्या बद्दल वाटत असणारी कृतज्ञता, वाटणारा अभिमान सगळ्यांच्याच नजरेतून ओसंडून वाहत होता. 

"पण, मग गुरुजी दीपा ने असं का सांगितलं होतं मला मुक्ती हवी आहे आणि ती कशी मिळेल हे मी तुला नक्की सांगेन... त्याबद्दल तर अजून काहीही जाणवलं नाही... असं का झालं असेल?" नम्रता ने विचारलं. 

"बाळा त्याला बरीच कारणं असू शकतात. आत्म्याला एक विशिष्ट प्रकारची शक्ती लागते ती दिपाला मिळत नसावी किंवा तिच्यावर वाईट शक्ती काबू मिळवत असाव्यात म्हणून असू शकतं." त्यांनी समजावून सांगितलं. 

"काय? पण, हे कसं शक्य आहे? अमन, श्वेता तर बेटावर आहेत... मग?" मयुर ने गोंधळून विचारलं. 

"त्यांचं माध्यम असण्याची शक्यता आहे. मला सांगा या दोन दिवसात कोणाला काही वाईट स्वप्न पडलं किंवा अस्वस्थ वाटलं होतं का?" गुरुजींनी विचारलं. 

"हो गुरुजी!" नम्रता आणि प्रवीण एकदम म्हणाले. 

कोणीच एकमेकांना काहीही न सांगितल्यामुळे सगळे एकमेकांकडे बघत होते. आता पुन्हा कोणत्या नवीन संकटाला तोंड द्यायचं आहे याचे प्रश्न चिन्ह सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले होते. 

"तू सांग... काय असं जाणवलं?" गुरुजींनी प्रवीण कडे बघून विचारलं. 

प्रवीण ने बोलण्याआधी काही क्षण घेतले आणि डोक्यात कुठून काय सुरू करू या वाक्यांची जुळाजुळव केली. 

"काल रात्री मला खूप छान वाटत होतं पण, नंतर जेव्हा झोप लागली तेव्हा खूप भयंकर स्वप्न पडलं. असं वाटत होतं जसं की कोणीतरी आपल्या उरावर बसलं आहे... आता जीव जातोच! पण पुन्हा थोड्यावेळाने बरं वाटलं आणि नंतर स्वप्नात दिसलं की, नम्रता छान ड्रेस घालून तयार झाली आहे.... खूप छान दिसतेय ती... आम्ही सगळ्यांनी तिला वाढदिवसाला जे काही गिफ्ट दिले होते ते सगळे तिने आज एकदम वापरले. पण, रस्त्याने येताना तिला एक लहान मुलगी रडताना दिसली आणि नम्रता तिची मदत करायला गेली तर त्या मुलीचं रूप एकदम भयानक झालं होतं.... ते बघून मला जाग आली..." प्रवीण ने जे काही त्याने स्वप्नात बघितलं ते सांगितलं. 

"अरे नमु च्या बाबतीत आज तेच तर सगळं घडलं ना..." समृध्दी एकदम म्हणाली. 

"हो... बघ ना आपण तिला वाढदिवसाला दिलेला ड्रेस, पर्स, कानातले, ब्रेसलेट तेच सगळं तिने घातलं आहे... शिवाय तिला रस्त्यात एक लहान मुलगी पण भेटली नव्हती का.." मयुर ने सगळं आठवून सांगितलं. 

"एक मिनिट... मुलांनो शांत व्हा... नम्रता ला सहजासहजी कोणीच इजा करू शकत नाही.. तिची अध्यात्मिक वृत्ती आणि बाप्पा वरचा विश्वास तिचा कधीही घात होऊ देणार नाही. हा योगायोग असू शकतो.... नका काळजी करू." गुरुजींनी सगळ्यांना समजावलं. 

"गुरुजी पण हा एवढा मोठा योगायोग कसा? आज नम्रता ला यायला पण उशीर झाला... त्यात तिला एक लहान मुलगी रस्त्यात भेटली होती. नम्रता ने येऊन जेव्हा हे सागितलं तेव्हा मला टेंशन आलं होतं पण उगाच बाकी कोणाला टेंशन नको म्हणून तसं काहीही न दाखवता मी नॉर्मल वागत होतो... पण, गुरुजी आता तुम्हीच सांगा ना... काही वाईट घडणार नाही ना?" प्रवीण काळजीने म्हणाला. 

"नाही... चला आधी आत जाऊया... आता दुपारच्या आरतीची वेळ झाली आहे." गुरुजी फक्त एवढंच म्हणाले आणि आत जाऊ लागले. 

सगळी मुलं सुद्धा त्यांच्या मागे गेली. दुपारची वेळ असली तरी बराच भक्तगण आरती साठी आला होता. घंटा नाद, टाळ, टाळ्या आणि ढोलकीच्या सुरात आरतीला सुरुवात झाली. आरती ची सुरुवात होताच एक कमालीचा विश्वास सगळ्यांमध्ये संचारू लागला आणि एवढा वेळ जी काही भीती त्यांना वाटत होती ती नाहीशी होऊ लागली. विघ्नहर्त्या ने त्याच्या अस्तित्वाची खूण दिली होती. आरती पार पडली. गुरुजींनी सगळ्यांना आरती दिली आणि प्रसाद वाटप सुरू झाले. 

"खूप बरं वाटतंय आता.... मगाच पासून भीती वाटत होती पण आता गुरुजींचं म्हणणं पटतंय... बहुदा माझं स्वप्न आणि आज जे घडलं तो निव्वळ योगायोग असेल.." प्रवीण म्हणाला. 

एवढ्यात तिथे गुरुजी आले. 

"बोल नम्रता! तुला सुद्धा काहीतरी सांगायचं होतं ना." त्यांनी विचारलं. 

"हो.... काल रात्री साधारण दोन अडीच च्या सुमारास मला अचानक अस्वस्थ वाटत होतं. म्हणून मी खिडकी उघडली... तर बाहेर बघून फार विचित्र आणि भयाण वाटत होतं. कुत्र्यांचा रडण्याचा आवाज, मळभ दाटून आलेलं आणि खूप विचित्र वातावरण तयार झालं होतं... कशीबशी उशिराने झोप लागली. असं का झालं असेल?" तिने जे काही रात्री अनुभवलं होतं ते सगळं सांगितलं. 

"हा तुमच्या मनाचा खेळ आहे. आपलं मन जसा विचार करत असतं तशी आजू बाजूची परिस्थिती आपल्याला जाणवते. तुम्ही चौघे खूप छान मित्र आहात... प्रवीण ला जे स्वप्न पडलं त्यात तुझ्या सोबत काहीतरी वाईट घडत होतं म्हणून सुद्धा तुला असं वाटलं असेल... आणि राहता राहिला दीपा चा प्रश्न! तर तिला ती शक्ती मिळत नाहिये ज्या माध्यमातून ती तिच्या मुक्तीसाठी काय करावं लागेल हे सांगू शकेल. त्यासाठी आता आपल्याला तिला शक्ती कशी मिळत राहिल हे बघावं लागेल...." गुरुजी म्हणाले. 

"म्हणजे नक्की काय करायचं?" समृध्दी ने विचारलं. 

तसे गुरुजी मूर्ती जवळ गेले. बाप्पा ला घातलेल्या लहान कंठी मधून त्यांनी काही मोती आणि एक गोंडा आणला आणि त्याची माळ ओवून घेतली. 

"नम्रता! ही आधीची माळ दीपा च्या गळ्यातून काढ आणि ही घाल." गुरुजी तिच्या हातात त्यांनी केलेली माळ देऊन म्हणाले. 

नम्रता ने दीपा च्या गळ्यातून माळ काढायचा प्रयत्न केला पण ती काही केल्या निघतच नव्हती. 

"काय झालं? आपण गळ्यात घातली तेव्हा तर लगेच गेली होती..." समृध्दी म्हणाली. 

"बघू मला दे.. मी बघतो..." मयुर म्हणाला. 

नम्रता ने दीपा ला त्याच्या हातात दिलं. त्याने ती माळ तोडायचा सुद्धा प्रयत्न केला तरीही काही केल्या ती निघतच नव्हती. 

गुरुजींना मग मुलांनी कशी ती आज मुलगी नम्रता ला भेटली आणि तिनेच ती माळ दीपा साठी दिली हे सगळं सांगितलं. 

"आलं लक्षात...." गुरुजी म्हणाले. आणि त्यांनी नम्रता च्या हातातून दीपा ला घेऊन तिथल्या बाकावर ठेवलं आणि मुलांना खुणेनेच त्यांच्या मागे यायला सांगितलं. 

सगळे काहीही न समजल्या मुळे गोंधळून त्यांच्या मागे गेले. 

"आज नम्रता ला जी मुलगी भेटली ती कदाचित वाईट शक्तींना मिळालेली असू शकते. कारण, नम्रता पुढे प्रवीण ने जे स्वप्न बघितलं तश्या शक्ती तिला वापरता आल्या नसाव्यात आणि तुमच्यात काय बोलणं होतं ते ऐकण्यासाठी आणि दीपा ने तुम्हाला तिला मुक्ती कशी मिळेल हे न सांगण्यासाठी म्हणून ती माळ दिली. तुम्ही सगळे सावध रहा... प्रवीण! विशेषतः तू.... तुला स्वप्न पडलं होतं याचा अर्थ ती शक्ती तुझ्या घरात असू शकते." त्यांनी शांतपणे सगळं सांगितलं. 

त्यांचं सगळं बोलणं ऐकून सगळेच सुन्न झाले होते. आता कुठे सगळं काही ठीक होईल आणि पुन्हा आयुष्य पूर्वपदावर येईल ही आशा असताना पुन्हा हे घडणं म्हणजे एक धक्काच सगळ्यांना बसला होता. 

"काळजी करू नका. प्रवीण! हात पुढे कर.." गुरुजी म्हणाले. 

प्रवीण ने हात पुढे केला. गुरुजींनी काहीतरी मंत्र पठण करत त्याच्या हातात धागा बांधला आणि तसाच धागा सगळ्यांच्या हातात बांधला. 

"गुरुजी... आता दीपा च्या मुक्तीचं काय करायचं?" नम्रता ने विचारलं. 

"आपण जे सामान्य विधी असतात ते करुया... त्यामुळे जर दीपा ला शक्ती मिळत गेली तर तीच सांगू शकेल तिची मुक्ती कशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेपर्यंत तुम्ही सगळे सावध रहा. त्या दुष्ट शक्ती तुमच्यावर काबू मिळवू पाहत आहेत." गुरुजींनी सगळं सांगून त्यांना सावध केलं. 

"बरं... आम्ही सगळे काळजी घेतो... आणि कोणते विधी करायचे ते सुद्धा सांगा." नम्रता म्हणाली. 

"उद्या सकाळी या सगळे... मी पूजेची तयारी करून ठेवतो...." ते म्हणाले. 

"चालेल. आम्ही येतो उद्या सकाळी. गुरुजी! त्या अमन, श्वेता चा बाकी कोणाला त्रास होणार नाही असं सुद्धा काही करता येईल का?" नम्रता ने विचारलं. 

"आत्ता काहीच सांगता येणार नाही... तुम्ही सगळे उद्या या.. आपण बघूया..." ते म्हणाले. 

सगळे पुन्हा माघारी जायला वळले तर दीपा त्यांच्या मागे खाली जमिनीवर पडलेली त्यांना दिसली. 
*************************
तिथे बेटावर रक्त पिशाच्च काय सांगतंय हे ऐकत अमन, श्वेता थांबले होते. 

"तू जी बाहुली त्या चौघांच्या मागावर पाठवली आहेस तिने तिचं काम करायला सुरुवात केली. प्रवीण च्या मेंदूवर ताबा तिने मिळवला आहे. त्यामुळे त्याच्या मनात जे काही विचार सुरू असतील ते तिच्या मार्फत आपल्या पर्यंत येतील." एकदम भारदस्त आवाजात रक्त पिशाच्याने सांगितलं. 

"आणि मग इथून दुसरी कोणती बाहुली गेली आहे? जिच्यामुळे ते चौघे पळून गेले?" अमन ने विचारलं. 

"ते समजायला वेळ जाईल.... पण, ती जी कोणती शक्ती आहे ती आता आपल्या काबू येतेय..." त्या मूर्तीतून आवाज आला. 

अमन, श्वेता ने फक्त एकमेकांकडे बघितलं आणि एकदम छद्मी हसत हसत ते त्या पडीक घरातून बाहेर आले. बाहेरचं दृश्य एकदम भकास आणि वेगळंच झालं होतं. सैतानाने त्याचा प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती. या दोघांसाठी तर ते वातावरण अजूनच शक्ती पुरवणार ठरणार होतं.
 
क्रमशः..... 
**************************
नम्रता ला जी लहान मुलगी रस्त्यात भेटली होती ती वाईट शक्ती असल्याची शंका गुरुजींना आली आहे. दीपा ला मुक्ती मिळू नये म्हणून अमन, श्वेता ने केलेला हा कोणता कट असेल का? मुलं आणि गुरुजी जे बोलत होते ते दीपा ने ऐकलं आहे आणि तिच्या मार्फत ते अमन, श्वेता पर्यंत पोहोचलं तर? काय होईल पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all