एक बेट मंतरलेलं (भाग -२४) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Ira blogging horror stories. Horror dall story.

एक बेट मंतरलेलं (भाग -२४) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
नम्रता ने तिच्या हातात असलेल्या दीपा ला समृध्दी कडे दिलं आणि ती तिच्या क्लच मध्ये काहीतरी शोधू लागली. 

"काय शोधतेस?" समृध्दी ने विचारलं. 

"कळेल.. एक मिनिट..." नम्रता म्हणाली. 

ती काय शोधतेय या प्रश्नार्थक नजरेने सगळे तिच्याकडे बघत होते. लगेचच तिने क्लच मध्यून काहीतरी काढलं. 

"हे बघा! ती मुलगी एवढी गोड होती ना तिने माझ्या हातात दीपा ला बघितलं आणि मी तिची मदत केली म्हणून दीपा साठी तिने तिच्या हातात मोत्याचं ब्रेसलेट होतं ते काढून दिलं. दीपा ला नेकलेस म्हणून घालायला." नम्रता ने ते रंगीबेरंगी मोती ओवलेलं ब्रेसलेट सगळ्यांना दाखवलं. 

"किती मस्त... मग तू घातलं का नाहीस दीपा ला?" प्रवीण ने विचारलं. 

"अरे घालत होते पण ती म्हणाली ताई आत्ता नको घालू... नंतर घाल... हे जर खाली पडलं तर मी दुसरं कुठून आणू... तुझ्या पर्स मध्ये ठेव.. म्हणून मग मी ठेवलं... अरे बिचारी खूप घाबरली होती..." ती म्हणाली. 

"बरं... चल आता देवळात जायचं आहे ना... तिकडे जाता जाता बोलूया..." प्रवीण म्हणाला. 

सगळे देवळात जायला निघाले आणि रस्त्याने सुद्धा त्याच मुलीबद्दल सगळे बोलत होते. 

"तिचं नाव काय ग?" समृध्दी ने विचारलं. 

"बघ! गडबडीत मी तिला नावच विचारलं नाही. पूर्ण रस्ताभर मी तिला सोनू सोनू केलं... पण, नाव विचारायचं लक्षात नाही आलं..." नम्रता डोक्यावर हात मारून म्हणाली. 

"जाऊदे आता.. पुन्हा कधी योगायोगाने भेट झाली तर विचारू नाव..." समृध्दी हसून म्हणाली. 

नम्रता ने सुद्धा हसून मान डोलावली. अजूनही तिच्या हातात ते ब्रेसलेट तसंच होतं. सतत तिला त्या गोड मुलीचाच चेहरा डोळ्या समोर येत होता. छान पैकी लाल रंगाचा फ्रॉक, डोक्यावर मस्तपैकी नारळाच्या झाडा सारखा छोटूसा बो आणि गोड गोड गोबरे गोबरे गाल! नम्रता त्याच मुलीच्या विचारत चालत होती. सगळे गप्पांमध्ये रंगले होते तरी तिला याचं भान नव्हतं. 

"काय नम्रता! कुठे हरवली आहेस? केव्हाच आम्हीच तिघे बोलतोय... बोल की काहीतरी." मयुर ने तिला हलवून भानावर आणलं. 

"अं? हो.. हो.." नम्रता फक्त एवढंच म्हणाली. 

"काय हो हो? कसल्या विचारात आहेस?" समृध्दी ने विचारलं. 

"अगं ती मगाशी भेटलेली मुलगी! खूप गोड होती ग... पण, मी तिला घरी सोडून यायला हवं होतं... गेली असेल का ती घरी? ती दुकानातून निघाली आणि हे दीपा साठी देऊन पळून गेली सुद्धा... मला तेव्हा काहीच सुचलं नाही ग तिला आपण घरी सोडलं पाहिजे.." नम्रता म्हणाली. 

"अगं! का टेंशन घेतेस? पोहोचली असेल ती एव्हाना घरी. तिच्या हातातून पैसे पडले म्हणून ती घाबरली होती बाकी काही नाही... तू नको जास्त विचार करुस..." प्रवीण तिला समजावत म्हणाला. 

"हम्म! बरं... आधी दीपा च्या गळयात तिच्यासाठी दिलेली माळ घालुया..." नम्रता म्हणाली. 
*************************
बेटावर आता तो सैतान पूर्णपणे जागृत झाला होता. त्याची मूर्ती जिथे प्रस्थापित केली होती तो दगड हलू लागला होता कारण, तो सैतान आता तिथून उठून हालचाल करू शकत होता. अगदी छोटासा भूकंप आल्या सारखा कंप तिथे जाणवत होता आणि त्या दगडाला तडे गेले होते. चवताळून तो सैतान तिथे उभा राहिला. बळींसाठी तो चांगलाच चवताळला होता! जे काही आजू बाजूला दिसेल ते उध्वस्त करत होता तो! 

"सैतान! तुम्ही आता पूर्णपणे जागृत झालात! तुमचे बळी येत्या काही दिवसात येतीलच.... तुम्ही शांत व्हा... सगळी व्यवस्था झाली आहे.." अमन सैतानाला शांत करत म्हणाला. 

"पौर्णिमेपर्यंत जर बळी मिळाले नाहीत तर तुमच्या दोघांची काही खैर नाही..." सैतान त्याचे मोठे मोठे दात विचकवून म्हणाला.  

अमन, श्वेता ने त्या रक्त पिशाच्या कडे बघितलं. जेव्हा रक्त पिशाच्याने त्या सैतानाला शांत केलं तेव्हा तो सैतान तिकडून बाहेर पडला. 

"हे रक्त पिशाच्च! आपले बळी येतील ही खात्री आहे... पण, त्यात काही अडसर नाही ना तेवढं सांगा..." श्वेता म्हणाली. 

रक्त पिशाच्च डोळे बंद करून काहीतरी पुटपुटायला लागलं. आणि थोड्याच वेळात एकदम डोळे उघडून पुन्हा बंद केले. अमन, श्वेता फक्त एकमेकांकडे बघत होते... 

"आपल्यातलं कोणीतरी त्या बळींना मिळालेलं आहे.... ते त्यांना इथे येण्यापासून अडवेल.... आपलं  सैन्य लवकरात लवकर तिथे गेलं पाहिजे...." रक्त पिशाच्च डोळे बंद करूनच  एकदम भयाण आवाजात म्हणाला. 

"आपल्या सैन्यातील एक बाहुली आहे तिकडे.. सगळे बळी नक्की इथे येतील..." श्वेता म्हणाली. 

"कोणती बाहुली... तिचे केस, कपड्याचा तुकडा काहीतरी दे.... कोणती तरी शक्ती आहे जी आपल्या बळींना इथे येण्यापासून थांबवते आहे." रक्त पिशाच्च म्हणालं.

श्वेता ने आधीच त्या बाहुली चे अर्धे केस स्वतः जवळ उपटून ठेवले होते ते तिने त्या अर्ध्या मूर्तीच्या समोर ठेवले. प्रवीण ने जी बाहुली नम्रता ला दिली होती आणि जी आत्ता त्याच्याच घरात होती पण, त्याला याची काहीच कल्पना नव्हती त्याच बाहुली चे ते केस होते. रक्त पिशाच्याने डोळे चमकवून त्या केसांकडे बघितलं आणि त्याच शक्तीने ते हवेत उचलून धरले. पुन्हा डोळे बंद करून त्याने काहीतरी केलं. 

"आपलं काम चोख होतंय.... जो अडसर आहे तो लवकरच दूर होणार आहे...." रक्त पिशाच्च म्हणालं. 

"पण, कोणता अडसर? ती नम्रता या सगळ्याच्या आड येतेय का?" श्वेता ओरडून म्हणाली. 

"नाही.... याच बेटावरून एक बाहुली त्यांच्याकडे गेली आहे.... ती त्यांना इथे येण्या पासून अडवू शकते.... आपल्याला लवकरात लवकर पुढची पावलं उचलावी लागणार आहेत!" त्या अर्ध मूर्तीतून पुन्हा आवाज आला. 

"पण मी तर फक्त एकच बाहुली त्यांच्या राफ्ट वर भिरकावली होती." श्वेता गोंधळून म्हणाली. 

"त्याच बाहुलीच्या डोक्यात जे काही होतं ते मी बघितलं आहे. त्या नम्रता च्या हातात मी इथली एक बाहुली बघितली आहे जिच्यामुळे आपले बळी पळून गेले तर आता तीच यात अडसर आणेल..." रक्त पिशाच्च म्हणालं. 

"कोण असेल ती... एकदा सांगा... त्या आत्म्याची आता काही खैर नसेल...." श्वेता चवताळून म्हणाली. 

"अजून काही लक्षात आलेलं नाहीये... थोडा वेळ जाईल...." रक्त पिशाच्च म्हणालं. 

"बरं... आम्ही तोवर काय करायचं आहे?" अमन ने विचारलं. 

"सैतानाला खुश ठेवा!" रक्त पिशाच्च म्हणालं. 
**************************
मुलांना इथे जराही कल्पना नव्हती त्यांच्या बद्दल बरीचशी माहिती अमन, श्वेता ला मिळतेय. सगळे आपले दीपा ला मुक्ती द्यायची म्हणून देवळात नम्रता ला सकाळी जी मुलगी भेटली होती तिच्याच बद्दल बोलत चालले होते. 

"अगं नमु! बघ तू अजून ते ब्रेसलेट दीपा ला घातलं नाहीस.... घाल ना.." समृध्दी म्हणाली. 

"हो... अगं दीपा ला मुक्ती म्हणजे ती आता आपल्या पासून दूर जाईल हा विचारच करवत नाहीये ग... किती लळा लागला आहे आपल्याला तिचा." नम्रता ने दीपा ला समोर धरलं आणि तिच्या गळ्यात ते ब्रेसलेट माळे सारखं घालून म्हणाली. 

"हो पण आपण तिला वचन दिलं आहे. आणि तिची मुक्ती होईल या सगळ्यातून हे चांगलं नाही का?" प्रवीण तिला समजावत म्हणाला. 

"हो... ते ही आहेच! बरं चला... देवळाजवळ तर पोहोचलो! आता गुरुजी बघूया कुठे आहेत." नम्रता म्हणाली. 

सगळे देवळाबाहेर असलेल्या चप्पल स्टँड मध्ये व्यवस्थित चप्पल ठेवून आत गेले. फार जुनं बाप्पाच मंदिर अगदी भव्य, दिव्य होतं. देवळाच्या परिसरात भरपूर झाडं, पक्षी, प्रसन्नता आणि शांतता होती. या परिसरात कोणी आलं की अगदी छान प्रसन्न होऊन जात असे. आत गेल्यावर बाहेर पेक्षा जास्त गारवा, उदबत्ती आणि धुपाचे सुवास, फुलांचे गंध आणि अगदी बोलकी, सुबक मूर्ती सगळ्यांच्या काळजाचा ठाव घ्यायची. कोणी कितीही संकटात असला तरी तो त्याची दुःख, काळजी सगळं विसरून जाईल एवढी ताकद त्यात होती. सर्व भक्तगण अगदी मनोभावे तिथे सेवा करायला सुद्धा यायचे. 

"किती शांत आणि प्रसन्न वाटतंय..." मयुर हात जोडूनच म्हणाला. 

"हम्म! इथे खूप छान वाटेल आपल्याला... चला आधी दर्शन घेऊ मग गुरुजींना भेटू..." नम्रता म्हणाली. 

सगळे मूर्ती जवळ आले. मनोभावे सगळ्यांनी हात जोडले. प्रत्येक जण प्रार्थना करताना दीपा साठी प्रार्थना करत होता. शिवाय अमन, श्वेता चा त्यांना आणि इतर कोणालाही त्रास होऊ नये म्हणून सुद्धा सगळ्यांनी प्रार्थना केली. नंतर सगळे तिथेच मूर्ती न्याहाळत मनाला शांत करत थोडावेळ तिथेच बसले. 

"खरंच! खूप छान वाटतंय इथे. आता सगळं एकदम सुरळीत होईल..." समृध्दी म्हणाली. 

"हो... आता बाप्पाच आपल्या पाठीशी आहे म्हणल्यावर सगळं एकदम छान होईल... बरं! चला गुरुजींशी बोलून घेऊ..." नम्रता म्हणाली. 

सगळे गुरुजींना भेटायला गेले. देवळाच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात ते गरीब लोकांना फळं, अन्न सगळं देत होते. त्यांचं काम झाल्यावर ते मुलांजवळ आले. नम्रता ने त्यांना नमस्कार केला आणि मग बाकीच्यांनी. 

"सुखी रहा. नम्रता! काय ग आज आई - बाबा कुठे आहेत?" गुरुजींनी आशीर्वाद दिला आणि तिला विचारलं.

"ते कामाला गेले. आज मी या सगळ्या माझ्या मित्रांबरोबर आली आहे. तुमच्याकडे जरा काम होतं." नम्रता म्हणाली. 

"बरं.... मी आलोच... तुम्ही सगळे तोवर इथेच बसा..." गुरुजी म्हणाले आणि ते देवळात गेले. 

एकदम तजेलदार चेहरा, साधारण साठी पार केलेले तरीही एकदम भक्कम शरीर, कमालीचा आत्मविश्वास आणि तेवढीच देवावरची श्रद्धा त्यांच्या डोळ्यात झळकत होती. अंगावर घेतलेलं पांढर शुभ्र, लाल आणि हिरवे काठ असलेलं उपर्ण आणि सोवळं! असा त्यांचा वेष. सगळे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. चालण्यात सुद्धा एक वेगळाच करारी पणा सगळ्यांना जाणवला होता. 

"हे गुरुजी खूप भारी वाटतात ग!" मयुर म्हणाला. 

"त्यांच्या सगळ्या पिढ्या इथेच बाप्पाच्या सेवेत वाढल्या आहेत. हे देऊळ जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि हे गुरुजी आहेत ना त्यांना सुद्धा बऱ्याच विद्या प्राप्त आहेत." नम्रता ने सगळं सांगितलं. 

तिचं बोलणं ऐकत ऐकत सगळे तिथल्या चौथऱ्यावर बसले होते. दुपार होत आली होती तरीही उन्हाची झळ तिथे नव्हती. वातावरणात छान गारवा आणि पक्ष्यांचे बोल मिसळले होते. ते दृश्य न्याहाळत सगळे बसले होते आणि एक दहाच मिनिटात गुरुजी आले. 

"बोल बाळा! काय झालं?" त्यांनी आल्या आल्या विचारलं. 

त्यांना आलेलं पाहून सगळे उभे राहिले. त्यांनी हातानीच बसायची खुण केली आणि ते सुद्धा तिथे बसले. 

"गुरुजी! आम्हाला काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं हवी आहेत." नम्रता ने सांगितलं. 

"बोल.... बाप्पाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल.. मी फक्त निमित्त मात्र..." ते म्हणाले. 

सगळ्यांनी एकदा गुरुजीं कडे बघितलं आणि एकदा आत देवळातल्या मूर्तीकडे बघितलं आणि नमस्कार केला. काही क्षण शांततेत गेले. 

"आम्ही सगळे काही दिवसांपूर्वी एका बेटावर फिरायला गेलो होतो.. तिथे जे काही बघितलं ते खूप अविश्वसनीय होतं. आमच्या घरच्यांना काही ते पटलं नाही म्हणून आम्ही इथे आलो." प्रवीण ने सांगायला सुरुवात केली. 

त्यानंतर सगळ्यांनी हळू हळू तिथे नक्की काय काय बघितलं, काय घडलं आणि त्या चौघांना वाचवण्यात कसा दीपा चा फार मोठा वाटा आहे हे सर्व त्यांनी गुरुजींना सांगितलं.

"बरं.. बघा मुलांनो, जश्या चांगल्या शक्ती या जगात आहेत तश्याच वाईट शक्ती सुद्धा आहेत. त्याचा प्रभाव प्रत्येक वेळी जाणवेल असं नाही. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर कधी कधी मूड चांगला असतो, असं वाटत असतं सगळं कसं छान होणार काहीही वाईट होणार नाही... काय म्हणता बरं त्याला..." गुरुजी बोलत होते. 

"Positive फिलिंग!" मयुर म्हणाला. 

"हा.. बरोबर... तर कधी कधी उगाच उदास वाटतं, सगळं जग आपल्या विरोधात आहे असं वाटतं बरोबर?" गुरुजींनी विचारलं. 

सगळ्यांनी माना डोलवल्या.

"हाच असतो आपल्या वरचा चांगल्या, वाईट शक्तींचा प्रभाव. बघा तुम्ही विज्ञानात शिकता ऊर्जा कधी नष्ट होत नाही... ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात परावर्तित करता येते..." ते म्हणाले आणि एकदा सगळ्यांकडे बघितलं. 

क्रमशः.... 
**************************
गुरुजींनी सगळ्यांचं मनापासून ऐकुन घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. मुलांना याचा कसा उपयोग होईल? गुरुजी सांगू शकतील का त्यांच्या विरूद्ध खूप मोठं कारस्थान काळया शक्ती करत आहेत? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all