एक बेट मंतरलेलं (भाग -२३) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Ira blogging horror stories. Dolls island story.

एक बेट मंतरलेलं (भाग -२३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
नम्रता नुकतीच उठली होती आणि डोळे चोळतच बाहेर आली होती.

"काय ग? अजून झोप झाली नाही का?" तिच्या आई ने विचारलं.

"झाली तशी... आई! आम्ही सगळे कट्टयावर भेटणार आहोत तर मला बाहेर जायचं आहे... मी पटकन आवरून येते.... मग पूजा करून मग चहा घेईन! तुम्ही दोघं आवरा... पुन्हा तुम्हाला दोघांना ऑफिस ला जायला उशीर नको." नम्रता म्हणाली.

"नाही होत ग उशीर! जा तू आवर... आपण एकत्र चहा घेऊ..." तिचे बाबा म्हणाले.

ती लगेचच आवरायला गेली आणि अर्ध्यातासात आवरून आली. छान साधासा गुलाबी रंगाचा कुर्ता, ऑफ व्हाईट लेगिंस आणि गुलाबी, ऑफ व्हाईट शेड असलेली ओढणी तिने घातली होती. थोडी सैलसर हेअर स्टाईल करून वेणी, कानात ऑफ व्हाईट आणि गुलाबी कॉम्बिनेशन असलेले छोटे क्विलींग पेपर चे फुलपाखरू आकाराचे कानातले आणि हातात नाजूक ब्रेसलेट घालून ती तयार झाली होती.

"अरे वा! छान दिसतेस.... काय आज कुठे बाहेर फिरायचा प्लॅन केला आहे वाटतं सगळ्यांनी?" तिची आई म्हणाली.

"हो... आम्ही सगळे आज देवळात जाणार आहोत. बरं! मी आलेच पूजा करून..." नम्रता म्हणाली आणि पूजा करायला गेली.

आता सगळे जरा नॉर्मल व्हायला लागले आहेत आणि आधी सारखे कट्टयावर भेटायला जाणार आहेत म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात होईल. जे काही मुलं आल्यापासून बडबडत होते त्याला कुठेतरी विराम लागेल म्हणून पालक सुद्धा सुखावले होते. नम्रता च्या आईने सुद्धा असाच विचार केला आणि आता तिचं टेंशन सुद्धा डोक्यावरचं खांद्यावर झालं होतं. तिने सुद्धा सगळी कामं आवरत आवरत ऑफिस ला जायची तयारी सुरू केली. थोड्याच वेळात नम्रता पूजा करून आई - बाबांसाठी प्रसाद घेऊन आली आणि सगळे चहा नाश्ता करायला बसले.

"काय मग! आज दिवसभराचा काय प्लॅन आहे?" नम्रता च्या बाबांनी चहा पिता पिता विचारलं.

"काही विशेष नाही. आता सगळं आवरलं की आम्ही सगळे कट्टयावर भेटू... मग देवळात जाऊ आणि मग घरी!" नम्रता म्हणाली.

"बरं! पण, जास्त वेळ बाहेर फिरू नका. ऊन खूप वाढलं आहे.... हवं तर आपल्या किंवा कोणाच्यातरी घरी जा.... पण, बाहेर जास्त वेळ भटकायचं नाही!" नम्रता ची आई म्हणाली.

"हो ग आई! नको काळजी करुस... तुम्ही दोघं निश्चिंत मनाने ऑफिसला जा...." नम्रता म्हणाली.

ती आता एवढ्या आत्मविश्वासाने बोलतेय, कसलं टेंशन तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही हे बघून तिचे आई - बाबा चिंतेतून मुक्त झाले होते. गप्पा मारता मारता सगळ्यांनी चहा नाश्ता करून घेतला. या सगळ्यात नऊ वाजून गेले होते. नम्रता चे आई - बाबा ऑफिस ला गेले आणि नम्रता ने बाकी आवरून घेतलं.

"हॅलो! आज दहा वाजता कट्टयावर भेटायचं आहे लक्षात आहे ना?" तिने सगळ्यांना कॉन्फरन्स कॉल करून विचारलं.

"हो.... भेटूया... मला काहीतरी सांगायचं आहे." प्रवीण म्हणाला.

"बरं! मला पण जरा बोलायचं आहे. भेटून बोलू. मी दीपा ला घेऊन येते." नम्रता म्हणाली.

सगळ्यांनी सहमती दर्शवली आणि फोन ठेवला. नम्रता ला दीपा च्या मुक्ती सोबत काल रात्री अचानक तिला जी अस्वस्थता जाणवली होती त्याबद्दल बोलायचं होतं. नम्रता ने फोन ठेवल्यावर लगेच दीपा ला घेतलं आणि लाईट, फॅन बंद करून ती कट्टयावर जायला निघाली.
***************************
तिथे बेटावर श्वेता, अमन च्या विधिंनी चांगलाच जोर धरला होता. एकदम छोटीशी बनवलेली ती मूर्ती आता बरीच मोठी झाली होती आणि या दोघांची शरीरं गळून पडायला सुरुवात झाली होती. दोघं आता मूळ पिशाच्च रूपात येत होते त्या बरोबर त्यांची कुरूपता अजून वाढत होती. कुमंत्रांचे जप करत करत दोघं एकमेकांकडे बघून छद्मी हसत होते. काल आमावस्येची रात्र गेली असली तरी आता पुढच्या काही दिवसात त्यांची शिकार त्यांच्याकडे येणार होती आणि पौर्णिमेला दोघांचं स्वप्न पूर्ण होणार होतं म्हणून ते हास्य त्यांच्या अक्राळ, विक्राळ चेहऱ्यावर उमटलं होतं.

"बास! रक्ताचा अभिषेक थांबवा!" त्या सैतानाच्या मूर्तीतून आवाज आला.

तो आवाज ऐकून दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि जे रक्त पिशाच्च मूर्तीत परावर्तित झालं होतं त्या मूर्तीकडे बघितलं. ती रक्त पिशाच्याची पाषाणाची मूर्ती आता डोक्या पासून कमरेपर्यंत हालचाल करू शकत होती. त्या मूर्ती ने डोळे हलवून त्यांना इशारा केला आणि या दोघांनी त्या सैतानाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा थांबवला. त्या दोघांच्या चेहऱ्यावर ती पाषाणाची मूर्ती अर्धी मुक्त झालेली पाहून वेगळाच असूरी आनंद पसरला होता.

"तुमच्या सगळ्या कु इच्छा पूर्ण होणार आहेत! तुमच्या या प्रयत्नांनी मी खुश झालो आहे... हा.. हा... हा..." त्या सैनाताचे डोळे चमकले आणि त्यातून भारदस्त आवाज आला.

या दोघांनी लगेच त्या मूर्तीसमोर असूरी नाच केला. हे दृश्य फारच भयानक होतं. कारण, दोघांनी सुद्धा त्यांच्या अर्ध्या गळून पडलेल्या शरीराचे लचके तोडून त्या मूर्तीला अर्पण केले आणि तिथे एका कोपऱ्यात छोटीशी आग लावून त्यात गरम केलेली साप आणि पालिंची कातडी त्याला चिकटवून घेतली.

"बास! आता मी प्रसन्न झालो! तुमच्या सगळ्या कार्यात माझा तुम्हाला पाठिंबा असेल." ती सैतानाची मूर्ती बोलली.

दोघं लगेच त्या मूर्ती समोर आले आणि बसले.

"आम्हाला फक्त आपलं राज्य सगळीकडे पसरावयचं आहे. एकाही आत्म्याला या पिशाच्च योनीतून मुक्ती मिळवून द्यायची नाहीये... सर्वशक्तीमान व्हायचं आहे आम्हाला सैतान!" दोघं एकाच सुरात किंचाळून म्हणाले.

"होतील! तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील... पण मला चार बळी हवेत...." सैतान म्हणाला.

"हो... त्याचीच तयारी केली होती आम्ही! पण.... पण... ते सगळे पळून गेले.... आ...." श्वेता खूपच जोरात किंचाळून म्हणाली.

"म्हणजे? आता मला बळी न देता या सगळ्याची अपेक्षा करताय का? तुम्ही आता मला जागृत केलं आहे.... जर येत्या पौर्णिमेपर्यंत मला बळी मिळाले नाहीत तर तुमच्या दोघांची मी दगडाची मूर्ती करून टाकेन! जिला कधीच मुक्तता नाही...." तो सैतान चवताळून म्हणाला.

"नाही.... सैतान! असं काही होणार नाही... मी रक्त पिशाच्च! या दोघांच्या वतीने तुला हमी देतोय...." रक्त पिशाच्च म्हणाले.

तो सैतान काहीही न बोलता फक्त सगळीकडे नजर फिरवत होता. थोडा वेळ शांतेत गेला आणि सैतानाची मूर्ती ज्या दगडावर त्या दोघांनी स्थापन केला होता अचानक तो हलायला लागला. श्वेता आणि अमन हे काय होतंय हे न कळल्यामुळे एकमेकांकडे आणि रक्त पिशाचा कडे बघत होते.
****************************
या सगळ्याची काहीच खबर नसलेली सगळी मुलं त्यांच्या कट्टयावर जमली होती. सगळे आले होते फक्त नम्रता तेवढी यायची बाकी होती. खरंतर फोन झाल्यावर ती लगेच निघाली होती आणि सगळ्यात आधी तीच पोहोचायला हवी होती पण अजूनही ती आली नव्हती. सगळे तिचीच वाट बघत बसले होते.

"नमु एरवी कधी उशीर करत नाही.. आपल्या आधी हजर असते ती! आज काय झालं?" समृध्दी म्हणाली.

"हो ना! ओये प्रव्या फोन कर की तिला! कुठे राहिली बघ..." मयुर समृद्धीच्या बोलण्याचे समर्थन करून प्रवीण ला म्हणाला.

"अरे कशाला? येईल ना... एक दिवस जरा दहा मिनिटं उशीर झाला की लगेच तिला फोन करून त्रास द्यायचा का?" प्रवीण नम्रताची बाजू घेऊन म्हणाला.

तो हे म्हणाला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर तिची काळजी दिसत होती. दहाच मिनिटं उशीर झाला असला तरी त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्याचे डोळे नम्रता च्या वाटेवर लागले होते. हे समृध्दी आणि प्रवीण ने बघितलं होतं. दोघांनी एकमेकांना डोळ्यांनीच इशारा केला.

"हो का? मग तू का टेंशन मध्ये आहेस?" समृध्दी हाताची घडी घालून म्हणाली.

प्रवीण काही बोलणार एवढ्यात मयुर मध्येच म्हणाला; "तू सारवासारव नंतर कर... आधी नम्रता ला फोन लाव... बघ का उशीर होतोय.. आम्ही दोघांनी लावला असता पण काय आहे ना आता नम्रता आमच्यापेक्षा जास्त कोणाला तरी महत्त्व देते..."

प्रवीण ने सुद्धा जास्त न ताणता मोबाईल हातात घेतला आणि फोन करता करता बोलू लागला; "नम्रता ने आजवर आपल्या मैत्रीत कधीच दूजाभाव केला नाहीये... मयुर! माझ्या समोर बोललास पण तिच्या समोर नको बोलू... तिला त्रास होईल..."

समृध्दी ने सुद्धा त्याला सहमती दर्शवली. गमती गमतीत आपण आज कोणाचं तरी मन दुखावलं असतं याची जाणीव लगेचच मयुरला झाली.

"सॉरी! मला तसं म्हणायचं नव्हतं.." मयुर म्हणाला.

"हो रे... माहितेय आम्हाला... बरं थांब काही बोलू नकोस.. फोन वाजतोय..." प्रवीण म्हणाला.

बराच वेळ फोन ची रिंग वाजली पण नम्रता ने काही फोन उचलला नाही.

"अरे ती फोन उचलत नाहीये... आता मला खूप टेंशन येतंय.... आपण तिच्या घरी जाऊन बघूया का?" प्रवीण म्हणाला.

"हो चालेल..." समृध्दी म्हणाली.

तिघे लगेच तिथे बसलेल्या दगडा वरून उडी मारून उतरले आणि नम्रता च्या घरी जायला निघाले एवढ्यात त्यांना नम्रता च समोरून येताना दिसली.

तिचा आजचा लुक बघून सगळे तिच्याकडे बघत होते. तिला तो गुलाबी, ऑफ व्हाईट कुर्ता तिच्या वाढदिवसाला प्रवीण ने गिफ्ट केला होता आणि कानातले आणि ब्रेसलेट समृध्दी ने! तर ती त्यालाच मॅचिंग असलेले क्लच मयुर ने दिलं होतं. त्यात ती खूप सुंदर तर दिसत होती पण सगळ्यांच्या गिफ्टचा एकत्र वापर करून तिने सगळ्यांना छान सरप्राइज सुद्धा केलं होतं.

"अच्छा! म्हणून मॅडम ना यायला वेळ लागला वाटतं!" मयुर म्हणाला.

"म्हणून म्हणजे?" नम्रता ने गोंधळून विचारलं.

"आज क्या स्पेशल है? एवढी छान तयार होऊन आली आहेस..." समृध्दी म्हणाली.

"ते होय! अगं आपल्याला आज देवळात जायचं आहे ना म्हणून... आणि हा या तयारी मुळे वेळ लागला नाहीये... तर कारण वेगळं आहे..." नम्रता म्हणाली.

"मग? काय झालं? तुला बरं नव्हतं का? सगळं ठीक आहे ना?" प्रवीण ने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

"ऐक की जरा... बोलायला तरी दे..." नम्रता हसून म्हणाली.

सगळेच हसायला लागले. आणि थोड्याच वेळात शांत झाले.

"काही विशेष नाही.. इथे येताना एक लहान मुलगी मला रस्त्यात दिसली. बिचारी एका कोपऱ्यात उभी राहून खूप रडत होती. म्हणून उशीर झाला." नम्रता ने थोडक्यात सांगितलं.

"म्हणजे? अगं का रडत होती ती?" समृध्दी ने विचारलं.

"काही नाही ग! तिला तिच्या आईने दुकानात जाऊन काहीतरी सामान आणायला सांगितलं होतं आणि तिच्या हातातून पैसे खाली पडले ते सरळ गटाराच्या उघड्या फटीतून आत गेले. म्हणून ती घाबरून तिथेच रडत उभी होती. कसबसं तिला शांत करून विचारे पर्यंत वेळ गेला... मग तिला दुकानातून सामान घेऊन दिलं आणि मग मी आले." नम्रता म्हणाली.

"नशीब! तुला ती दिसली म्हणून... नाहीतर अजून तिथेच बसली असती ती आणि मग घरी का नाही आली म्हणून तिच्या घरच्यांना काळजी लागली असती..." प्रवीण म्हणाला.

"हो ना! खरंच आहेच आपली नमु ग्रेट आणि सगळ्यांसाठी देवदूत..." समृध्दी म्हणाली.

"गप ग! त्यात ग्रेट काहीच नाही... कोणीही तेच केलं असतं...." नम्रता म्हणाली.

"मग रस्त्यावरून बाकी लोक फिरत होते त्यांनी का नाही काही केलं... तू आहेस ग्रेट..." मयुर म्हणाला.

त्याच्या या बोलण्याने सगळेच एकच गोंधळ करून हेच म्हणत होते.

"अरे बास बास! किती कौतुक करणार.. झालं आता... आपण कोणाची मदत केली की या कानाची खबर त्या कानाला सुद्धा लागू द्यायची नसते पण तुम्ही सगळे इथे टेंशन मध्ये दिसलात म्हणून सांगितलं. बरं हा एक दाखवायचं राहिलं! एक मिनिट हा..." नम्रता म्हणाली.

क्रमशः....
**************************
सगळे आता देवळात जायला निघाले आहेत. दिपाची मुक्ती होईल का? सैतान स्थापन केलेला दगड का हलला असेल? ती मुलगी जी नम्रता ला भेटली ती कोण असेल? नम्रता ला काय दाखवायचं असेल? आणि प्रवीण ला काय स्वप्न पडलं असेल? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all