एक बेट मंतरलेलं (भाग -२२) #मराठी_कादंबरी

Horror island story. Marathi horror kadambari. Ira blogging horror stories. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -२२) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
अमन, श्वेता त्यांच्या विधीमध्ये पार गढून गेले होते. जसे जसे त्यांच्या मंत्रांचे आवर्तन वाढत होते तसा तसा त्यांच्या रक्ताचा अभिषेक सुद्धा वाढत होता! आजच्या दिवस भरातच थेंब थेंब करत बरंच रक्त त्या दोघांनी तयार केलेल्या सैतानाच्या मूर्तीवर पडत होतं. धूळ वापरून ती मूर्ती तयार केली असली तरी रक्ताच्या अभिषेकाने ती अजूनच व्यवस्थित आकार पकडून घट्ट होत होती. ज्या दगडावर त्यांनी ती मूर्ती प्रस्थापित केली होती तो दगड सुद्धा रक्ताने माखत आला होता. बेटावर पसरलेल्या सगळ्या बाहुल्या सुद्धा हे अघोरी दृश्य बघून जरा बिथरल्याच होत्या! हे सगळं जर फळाला आलं तर सगळीकडे फक्त आणि फक्त हे दोघं राज्य करतील हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यातल्या काही बाहुल्यांना आपली मुक्तता होईल, आपल्या आत्म्याला शांती लाभेल ही आशा थोडीफार होती ती सुद्धा मावळली होती. कारण, आता या वाईट आत्म्यांचा प्रभाव आपल्यावर पडणार आणि कायम आपण यांचे गुलाम असणार हे त्यांनी ओळखलं होतं. 
***************************
या सगळ्या संकटापासून दूर सगळी मुलं आणि त्यांचे पालक छान मजा करत होते. बागेत खेळून, चाट आणि गोळा खाऊन सगळे फिरत होते. 

"नमु! उद्या आपण किती वाजता भेटायचं? तू काही ठरवलं आहेस का?" समृध्दी ने विचारलं. 

"उद्या आपण सकाळी १० वाजता भेटूया... दीपा च्या मुक्ततेसाठी आपण देवळात जाऊन गुरुजींना विचारू काय करता येईल.." नम्रता म्हणाली. 

"बरं... पण, घरी काय सांगून यायचं? म्हणजे मला तर वाटत नाहीये आपले आई - बाबा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतील..." मयुर म्हणाला. 

"काही नाही! आपण एरवी जसे कट्टयावर भेटायचो तसे भेटतो असंच वाटेल आई - बाबांना! सध्या तरी त्यांचा आपल्यावर विश्वास बसणार नाहीये... आपण दीपा ला मुक्ती मिळवून देऊ आणि त्या अमन, श्वेता चा सुद्धा काही बंदोबस्त करता येईल का बघूया... उद्या त्यांनी आपल्याला किंवा अजून कोणाला त्रास नको द्यायला..." नम्रता म्हणाली. 

"हो यार! ते दोघं खूप वाईट आहेत... कधी आणि कसे कोणाला टार्गेट करून स्वतःची शिकार बनवतील समजणार नाही." प्रवीण म्हणाला. 

एवढ्यात समृद्धीच्या आई ने सगळ्यांना हाक मारली म्हणून ते सगळे त्यांचा विषय बदलून गेले. 

"चला पोरांनो! आता ८:३० झालेच आहेत तर जेवून घेऊ... बोला कोणत्या हॉटेल मध्ये जाऊया?" नम्रता च्या बाबांनी विचारलं. 

"हॉटेल कशाला? इथे मस्त गाडीवर पाव भाजी खाऊया...." मयुर बाहेर रांगेत उभ्या असलेल्या पाव भाजी, दाबेली या सगळ्या गाड्यांकडे बोट दाखवून म्हणाला. 

"हो... इथेच खाऊया... तसंही जास्त भूक नाहीये...." समृध्दी सुद्धा त्याला सहमती देत म्हणाली. 

मुलं आता एवढं म्हणतायत तर ठीक आहे म्हणून सगळे पाव भाजी च्या गाडी जवळ गेले. पाव भाजी ची ऑर्डर देऊन तिथे मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर सगळे बसले. गप्पा मारता मारता त्यांची पाव भाजी आली सगळ्यांनी भूक नसताना सुद्धा चव छान होती म्हणून दणकून खाल्लं आणि घरी जाताना लांबच्या रस्त्याने जाऊ लागले. त्या निमित्ताने जरा चालणं होईल म्हणून सगळ्यांनी हे ठरवलं होतं. घरी पोहोचेपर्यंत साधारण ९:३० होऊन गेले होते आणि संध्याकाळ पासून एवढं फिरून मजा करून सगळेच दमले होते. घरी गेल्या गेल्या कधी एकदा अंथरुणात पडतो असं सगळ्यांना झालं होतं. सगळेच दमले असल्यामुळे लगेचच निद्रेच्या अधीन झाले. 

प्रवीण च्या घरी मात्र ती बाहुली लपून सगळं बघत होती. ती ज्या संधीची वाट बघत होती ती संधी आता तिला मिळणार होती. प्रवीण ला गाढ झोप लागायला लागली होती आणि यातच त्या बाहुलीला तिचा डाव साधायचा होता. प्रवीण त्याच्या खोलीत एकटाच होता! रूम ची खिडकी उघडी होती, त्याला डास येऊ नये म्हणून नेट होती तरीही बाहेर जोरात वारं सुटलं होतं त्यामुळे खोलीत सुद्धा छान वारं येत होतं! त्यात पंखा सुद्धा फुल स्पीड मध्ये सुरू होता. आमावस्या होती त्यामुळे चंद्र नव्हता! पण, छान लखलखणारे तारे होते! त्या ताऱ्यांचा सुद्धा मंद प्रकाश खिडकीवर पडत होता. प्रवीण चादरीतून एक पाय बाहेर काढून अगदी निरागस पणे पालथा झोपला होता... हवेने त्याचे केस उडत होते... आणि मध्येच तो थोडासा स्मित करत होता! बहुदा तो नम्रता ची स्वप्न बघत होता.... त्या बाहुली ने हे सगळं पाहिलं होतं.... वरून तिने खाली हळूच उडी मारली आणि ती प्रवीण च्या बेड वर आली होती. 

"आता तुझ्या स्वप्नांवर कसा ताबा मिळवते बघच.... त्या बेटावर नम्रता ने तुझं रक्षण केलं! आता? ही... ही.... ही...." ती बाहुली पुटपुटली. 

एवढ्यात हवेच्या येणाऱ्या झुळुके मुळे त्याची झोप थोडी चाळवली आणि कुस बदलली. त्याचे डोळे बंदच होते.... झोपते त्याने कुस बदलली होती आणि त्याचा हात बाजूला पडला तर ती बाहुली त्याच्या हाताखाली आली! त्याला ते काहीही जाणवलं नाही तो त्याच्याच स्वप्नात रममाण होता. 

"अरे.....! हे काय.... याला पण आत्ताच कुस बदलायची होती...." ती बाहुली चरफडत म्हणाली. 

तिने खूप प्रयत्न केले तिथून निघण्यासाठी पण तिला काही निघता येईना! एवढ्यात प्रवीण ने स्वतःहूनच कुस बदलली आणि ती बाहुली लगेच उडी मारून खाली उभी राहिली. सगळ्या खोलीत पुन्हा एकदा नजर फिरवून ती प्रवीण च तोंड ज्या दिशेला होतं त्या दिशेला गेली आणि त्याला एकदम भयानक नजरेने न्याहाळत होती. 

"आता कोण वाचवेल तुला? त्या नम्रता ची स्वप्न बघतोय का? थांब आता त्यात कसा ट्विस्ट आणते बघच...." ती बाहुली पुटपुटली. 

तिने लगेच स्वतःचे डोळे बंद केले. तिला आता प्रवीण च्या मेंदूचा, त्याच्या विचारांचा ताबा मिळवायचा होता.... काहीतरी कूमंत्र म्हणून तिने त्याच्याकडे एकदम भयानक पद्धतीने डोळे एकदम उघडून मोठे करून बघितलं आणि कुत्सित हसू लागली. तिचं काम झालं होतं..... ती पुन्हा लगेचच त्या शोकेस वर जाऊन बसली आणि तिकडून सगळी मजा बघत होती. एवढा वेळ शांत झोपलेला प्रवीण आता खूप चुळबुळ करू लागला! खोलीत छान वारा असून सुद्धा त्याला घाम फुटला होता आणि घशाला कोरड पडत होती. त्यामुळे लगेचच त्याला जाग आली! त्याने स्वतःला एकदम एवढं घामाने चिंब भिजलेलं पाहिलं आणि तो उठून बसला!

"हे काय होत होतं मला? असं कसं स्वप्न पडलं तेही अचानक?" तो बेड ला मागे टेकून बसत म्हणाला. 

त्याला असं घाबरलेलं पाहून त्या बाहुलीला खूप समाधान मिळत होतं. तिचा पहिला डाव तरी वर्मी लागला होता म्हणून तिला आनंद होत होता. ती प्रवीण आता पुढे काय करतो हे बघत बसली होती. प्रवीण ने बाजूलाच असलेल्या टेबल वरून पाण्याची बाटली घेतली आणि तोंडाला लावली. जवळ जवळ अर्धी बाटली त्याने घटाघटा पोटात ढकलली! 

"एवढी भीती, एवढी असहायता याआधी कधीच वाटली नव्हती! आजच का असं होतंय? एकदम जडपणा वाटतोय... एवढा गार, अंगाला बोचणारा वारा असूनही एवढा घाम? नक्की काय होतंय हे??" तो घड्याळ बघत स्वतःशीच म्हणाला. 

घड्याळात बरोबर दोन वाजले होते. एवढ्या रात्री उगाच आई - बाबांना उठवून त्यांना त्रास नको द्यायला म्हणून तो खिडकी पाशी गेला.. नेट उघडून तो बाहेरचं दृश्य बघत होता. इतकावेळ छान दिसणारं ते दृश्य आत्ता खूप भयानक आणि विचित्र दिसत होतं. आकाशात मळभ दाटून आलं होतं, बाहेर कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता आणि एक विचित्र प्रकारची अनामिक भीती त्या वातावरणात पसरली होती. हे सगळं बघून त्याने लगेच खिडकी बंद केली आणि पुन्हा बेडवर येऊन बसला. काही केल्या त्याला सतत त्याने जे स्वप्न बघितलं तेच आठवत होतं. 

"नमु ला निदान मेसेज तरी करू का?... नाही नको झोपली असेल... तिला आत्ता असा मेसेज करून टेंशन नको द्यायला..." तो वर छताकडे बघत विचार करत होता. 
**************************
नम्रता च्या घरी मात्र ती काही अजून शांत झोपली नव्हती. थोडावेळ झोप लागली की लगेच तिला जाग येत होती. आज बागेत तिने प्रवीण ला मनातलं सांगणं, सगळ्यांनी खूप दिवसांनी एवढं छान मजा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांच्या आई - बाबांनी सुद्धा न कळत जर त्यांचं पुढे असं नातं तयार झालं तरी त्याला संमती असेल हे सांगणं तिला सतत आठवत होतं आणि ती सुद्धा या सगळ्याचा विचार करत छताकडे बघत पडली होती. 

"खरंच किती गम्मत असते ना! काल पर्यंत आम्ही सगळे जिवंत राहू का म्हणून काळजी होती... पण, आज! आज किती छान दिवस गेला. सकाळी ताण असला तरी संध्याकाळी मजा आली! कसलीच काळजी नव्हती... ही  संध्याकाळ कधीच कोणी विसरू शकणार नाही. सगळ्या कुटुंबाचं मिळून एक गेट टू गेदर झालं! आता फक्त उद्या भेटून दीपा ला मुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत..." नम्रता मनातल्या मनात सगळं आठवून आणि सकाळी काय करायचं याचे प्लॅन करत मनातच बोलत होती. 

विचार करता करता तिने कुस बदलली. तिच्या बाजूलाच तिने दीपा ला ठेवलं होतं. तिने तिला हातात घेतलं. 

"दीपा! आता काळजी करू नकोस... उद्या आपण तुझ्या मुक्ततेसाठी काय करावं लागेल बघूया... आज तुझ्यामुळे आम्ही सुखरूप आहोत... खरंच खूप खूप थँक्यू...." ती हळु आवाजात तिच्याशी बोलली. 

तिच्या बोलण्याने दीपा चा चेहरा जरा खुलल्या सारखा झाला. नम्रता ने तिला पुन्हा खाली ठेवलं आणि मोबाईल बघितला तर अडीच वाजत आले होते. बराच वेळा प्रयत्न करूनही तिला झोप लागत नव्हती आणि आता जरा अस्वस्थ वाटायला लागलं होतं. 

"का असं होतंय आज? झोप का नीट लागत नाहीये.... आत्ता मगाच पर्यंत किती छान वाटत होतं सगळं! आता एवढं अस्वस्थ का वाटतंय? काही कळत नाहीये.... हा सगळा नक्की काय प्रकार आहे..." नम्रता ला अचानक खूपच अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे ती स्वतःशीच म्हणाली. 

जरा पाणी पिलं तर बरं वाटेल असा विचार करून ती उठली आणि बाजूला ठेवलेल्या तांब्या, भांड्यातून पाणी पिल! आता जरा तिला ठीक वाटत होतं पण जरा जास्तच उकडतंय असं वाटलं म्हणून ती तिच्या रूम च्या खिडकीपाशी गेली आणि खिडकी उघडून तिथे खुर्ची घेऊन बसली. बाहेर खूप जोरात वारा सुटला होता आणि फक्त कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता. 

"बाहेर बघून अजूनच त्रास होतोय.... हे असं ढगाळ वातावरण, एवढा वारा काय आहे हे नक्की? एकदम सुतकी वातावरण झालं आहे!" ती पटकन खिडकी लावून घेत स्वतःशीच म्हणाली. 

पुन्हा ती बेड वर आली आणि काहीतरी विचार करून मोबाईल हातात घेतला. 

"प्रवीण! मयुर, समु! तुम्ही सगळे बरे आहात ना? मला खूप काळजी वाटतेय.. काहीतरी घडतंय जे घडायला नको असं वाटतंय..." तिने मेसेज टाईप केला आणि सगळ्यांना पाठवणार एवढ्यात पुन्हा खोडून टाकला. 

"नाही... नको.. सगळे झोपले असतील.. उगाच मेसेज मुळे झोप मोड होईल आणि सगळेच काळजी करतील... उद्याच काय ते बघू... बाप्पा! आता तूच सांभाळून घे रे..." ती म्हणाली आणि पुन्हा बेडवर आडवी झाली. 

खूप उशिराने कशीबशी ती झोपली. दीपा तिच्या हातातच होती आणि लहान मुलं जशी त्यांची खेळणी कवटाळून झोपतात तशी ही दीपा ला कुशीत घेऊन झोपली होती. एव्हाना सकाळचे ७:३० वाजले होते. उशिरा झोप लागल्यामुळे तिला काही अजून जाग आली नव्हती. 

"अहो... नम्रता अजून उठली नाहीये... तिला जरा उठवा... मी चहा ठेवते..." नम्रता ची आई तिच्या बाबांना म्हणाली. 

"अगं नको आत्ता उठवायला तिला! बेटावरून सगळे घाईत आले आहेत शिवाय काल आपण फिरलो तर दमली असेल... झोपुदे एक दिवस.." तिचे बाबा म्हणाले. 

"लाख झोपू दे हो! पण, आपल्या मॅडम ना सकाळी उठून सगळ्यात आधी लाडक्या बाप्पाची पूजा करायची असते ना... मग पुन्हा चिडचिड करेल.." तिची आई म्हणाली. 

"हम्म... असुदे... आज एक दिवस मी करतो तिच्या लाडक्या बाप्पाची पूजा! आता लहान नाहीये आपली नमु! घेईल समजून.." ते म्हणाले आणि पूजा करायला उठले. 

एवढ्यात नम्रता बाहेर आली.... 

क्रमशः.... 
***************************
आज आता सगळे मिळून दीपा च्या मुक्तीसाठी काय करता येईल हे बघणार आहेत. शिवाय नम्रता म्हणाली होती श्वेता, अमन चा बंदोबस्त करायचा त्यासाठी तिने काही ठरवलं असेल की नाही? प्रवीण ला असं काय स्वप्न पडलं असेल? त्या प्रवीण च्या घरी जी बाहुली आहे तिने काय केलं असेल? पाहूया पुढच्या भागात.. 

🎭 Series Post

View all