एक बेट मंतरलेलं (भाग -२०)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
मयुर ने सगळं त्याच्या आवडीचा स्वयंपाक बघून मस्त पैकी जेवून घेतलं. आता आपण घरी आहोत, सोबत आई - बाबा आहेत आणि नम्रता ने दिलेली बाप्पाच्या अंगाऱ्याची पुडी सुद्धा आहे म्हणून त्याची भीती आता हळूहळू का होईना कमी होत होती. मयुर चा मूड आत्ता जरा बरा वाटतोय आणि पुन्हा तो विषय काढून त्याचा मूड नको घालवायला म्हणून त्याचे आई - बाबा पण काही बोलले नाहीत.
"चल बाळा! आता तू झोप... मला मीटिंग आहे मी इथेच आहे.. काही लागलं तर सांग..." मयुर चे बाबा म्हणाले.
तो फक्त मानेने हो म्हणून बेडरूम मध्ये गेला.
"बरं झालं सगळं मयुर च्या आवडीच केलं.. निदान चार घास नीट खाल्ले..." मयुर ची आई सगळं आवरता आवरता म्हणाली.
"हो.. रात्री आपण बाहेर जाऊया जेवायला.. त्याच्या आवडत्या हॉटेल मध्ये गेलो आणि जरा फिरून आलो की त्याचं पण मन रमेल.." त्याचे बाबा सुद्धा तिथलं आवरायला मदत करत म्हणाले.
"हो चालेल.. मी एक काम करते सगळ्यांच्या आयांना सांगते! नमु, समू आणि प्रवीण सुद्धा सोबत असतील तर एक फॅमिली पिकनिक होईल..." त्याची आई उत्साहात म्हणाली.
"हो चालेल.. संध्याकाळी ५ वाजता बागेत जाऊ.. तिथे मस्तपैकी चाट खाऊ, बर्फाचा गोळा खाऊ मग छान पैकी मुवी बघू आणि मग जेवून घरी येऊ! काय वाटतं तुला?" त्याचे बाबा सगळा प्लॅन उत्साहात सांगून मोकळे झाले.
"हो चालेल.. खूप छान प्लॅन आहे... मी लगेच सगळ्यांना फोन करून सांगते... आपण मुलांना हे सरप्राइज देऊया... मयुर ला सुद्धा आत्ता काहीच नको सांगायला... त्याला आपण संध्याकाळी आईसक्रीम खायला जातोय असंच वाटू दे!" ती तिचा मोबाईल हातात घेत म्हणाली.
त्याच्या बाबांनी पण लगेच अंगठा उंचावून होकार दर्शवला. लगेचच सगळं आवरून मयुर च्या आई ने बाकीच्यांच्या घरी या प्लॅन बद्दल सांगितलं! सगळ्यांना ही कल्पना फार आवडली आणि यातून तरी मुलांना लवकर बाहेर पडायला मदत होईल म्हणून सगळ्यांना आशा होत्या. फोन झाला आणि ती तिच्या ऑफिसच्या कामाला लागली. सकाळी अचानकच सगळी मुलं घरी आल्याने सगळ्याच पालकांनी सुट्टी टाकली होती पण, मयुर च्या आईची नेमकी एका महत्त्वाच्या प्रोजेक्ट साठी निवड झाली होती त्यासाठी ती ऑफिस ला गेली नाही तरी तिला घरून काम करणं भाग होतंच! आता संध्याकाळी फिरायला जायचं तर काम पूर्ण करून जावं हा विचार करून ती तिथेच काम करत बसली होती. मयुर च्या बाबांची सुद्धा इंटरनॅशनल क्लायंट सोबत मीटिंग सुरू होती. मयुर आता जेवून आराम करत असेल म्हणून दोघं निश्चिंत होते.
"हॅलो! काय करताय सगळे?" मयुर ने बाकी सगळ्यांना ग्रुप व्हिडिओ कॉल लावला होता. थोडावेळ सगळे ठीक आहेत ना आता हे बघावं आणि आता तो पण ठीक आहे हे सांगावं म्हणून त्याने झोपायच्या आधी फोन करावा असा विचार करून फोन लावला होता.
"Hii... तू सांग आधी ठीक आहेस ना?" नम्रता ने विचारलं.
"हो.. मी ठीक आहे आता... जस्ट जेवण झालं.. मस्तपैकी सगळं माझ्या आवडीच होतं मग काय मारला ताव..." मयुर हसत हसत म्हणाला.
"हो.. पटलं तू बरा आहेस आता..." प्रवीण त्याची बोलण्याची पद्धत बघून हसून म्हणाला.
"मला पण आता काही वाटत नाहीये... घरी आल्या पासून छान वाटतंय..." समृध्दी पण खुश दिसत होती.
"Good! सगळ्यांमध्ये छान प्रगती आहे.. आता घाबरू नका कोणी... पण.. मला तुम्हाला सगळ्यांना एक विचारायचं होतं..." नम्रता थोडी कचरत म्हणाली.
"अरे! आता असं करशील? विचारतेस काय? सांग डायरेक्ट... एवढा कसला विचार करायचा त्यात?" प्रवीण म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून समृध्दी आणि मयुर ने एकमेकांना खूण केली आणि मयुर बोलू लागला; "नमु! लकी आहेस... बघ बघ कसा तुझा शब्द तोंडातून बाहेर पडत नाही तोवरच कसा झेलायला तयार आहे..."
हे ऐकुन समृध्दी मोठ्याने हसली. प्रवीण ने कसंबसं सगळं सावरून घेतलं.
"ए... बास की फाजीलपणा... मी सांगू की नको?" ती मुद्दाम रागावून म्हणाली.
"सॉरी सॉरी! बोल.." मयुर त्याचं हसू दाबत म्हणाला.
नम्रता ने त्याला एक बुक्की दाखवली आणि हसून विषय सोडून दिला. त्या सगळ्यांची हीच मस्ती तर त्या चौकडी मध्ये एक जिवंतपणा आणत होती.
"नमु... बोल..." समृध्दी थोडं सिरियस होत म्हणाली.
"हा.. मी म्हणत होते की, मगाशी सगळं आवरताना दीपा दिसली! आपण तिला मुक्त करू असं वचन दिलं आहे... तिला सुद्धा आशा असेलच ना... आपण काहीतरी करायला हवं हा विचार मगाच पासून खातोय मला..." नम्रता दीपा ला घेऊनच बसली होती.
"हो.. दीपा ने आपल्यासाठी खूप काही केलं आहे.. तिच्यामुळे आज आपण घरी आहोत... आपण आपला शब्द पाळायचा!" प्रवीण सुद्धा तिला साथ देत म्हणाला.
"पण आपल्याला समजणार कसं आहे तिला कशी मुक्ती मिळेल? काही ठरवलं आहेस का तु नमु?" समृध्दी ने विचारलं.
"ते तर आपल्या कोणालाच माहीत नाहीये.. आपण उद्या सकाळी आपल्या कट्टयावर भेटूया.. तिथेच काय ते ठरवू..." नम्रता म्हणाली.
"हो चालेल... दिपाच्या मुक्ती बरोबर आपण त्या अमन, श्वेता चा पण बंदोबस्त केला पाहिजे यार... जाम त्रास दिला आहे त्या दोघांनी! पुन्हा ते आपल्यालाच किंवा अजून कोणालाही त्रास देऊ शकतील..." मयुर थोडा त्रागा करत म्हणाला.
"शांत... शांत.... तू आधी स्वतःला त्रास करून घेणं बंद कर... उद्याच आपण सगळे मिळून ठरवू काय करायचं..." नम्रता त्याला शांत करत म्हणाली.
"हो मयुर! नमु बरोबर बोलतेय... तू त्रास करून नको घेऊ... आधीच तुला खूप त्रास झाला होता. आत्ता काहीही विचार करू नकोस.. आता आपणच सगळे जे करू ते... घरी आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीये..." समृध्दी सुद्धा त्याला समजावत म्हणाली.
मयुर ला पण ते पटलं होतं. नंतर थोडावेळ सगळ्यांनी सहज गप्पा मारल्या आणि फोन ठेवला. तिथून आल्या पासून आत्ता कुठे सगळे आधी सारखे मजा मस्ती करत बोलले होते. नम्रता ला सुद्धा आता दीपा बद्दल बोलून थोडं हलकं वाटत होतं. मयुर ची सुद्धा मनात जी चलबिचल होत होती ती कमी झाली होती आणि बाबांनी संध्याकाळी आईसक्रीम खायला जाऊया म्हणून सांगितलं आहे तर आत्ता थोडं झोपून घेऊया हा विचार करून तो झोपला.
"मयुर! अरे उठ... चल ना बाहेर जायचं आहे.. आवर पटकन..." त्याची आई त्याला संध्याकाळी चार वाजता हाक मारत म्हणाली.
"हो.. पाच मिनिटं..." तो कानावर उशी दाबत झोपेतच म्हणाला.
"असुदे.. थोड्यावेळात उठेल तो.. तोवर तू बाकीच्यांना फोन करून आठवण करून दे.." मयुर चे बाबा त्यांच्या कामाचा पसारा आवरत म्हणाले.
"हो.. त्याला मुद्दामच लवकर हाक मारली.. पाच मिनिटं पाच मिनिटं करत अजून अर्धा तास झोप काढेल हा पोरगा!" त्याची आई म्हणाली.
आणि लगेच तिने बाकीच्यांना कॉन्फरन्स मध्ये घेऊन फोन लावला. बाकीच्यांच्या घरी सुद्धा बाहेर जायचीच तयारी सुरू होती. अजून कोणी मुलांना सांगितलं नसलं तरी त्यांची आवरा आवरी सुरू झाली होती. मयुर चे आई - बाबा पण तयार झाले आणि ४:४५ झाले तरी हा पोरगा अजून उठलाच नव्हता!
"खूपच दमला आहे... एरवी एवढा वेळ नाही झोपत कधी... काय हाल करून घेतले आहेत.. असा झोपला आहे जसं की खूप दिवसांनी झोप मिळाली आहे." मयुर ची आई त्याला झोपलेलं बघून त्याच्या बाबांना म्हणाली.
"हम्म... त्याच्या शरीरा बरोबर मेंदू सुद्धा दमला आहे. पण, आता अजून झोपून दिलं तर रात्री नाही झोपणार आणि मग नको नको ते विचार डोक्यात येऊन त्याला अजून त्रास होईल.. चल उठवूया त्याला..." त्याचे बाबा म्हणाले.
दोघं मिळून मयुर ला उठवायला गेले. अगदी लहान मुलासारखा पालथा झोपला होता तो! दुपारची झोप असूनही रात्री सारखी गाढ झोप त्याला लागली होती. दोघांनी मिळून हळूहळू त्याला उठवलं आणि आवरायला पाठवलं. या सगळ्यात पाच वाजत आले होतेच! पाच वाजता घरा जवळच्या ग्राउंडच्या इथे भेटण्याचं सगळ्यांचं ठरलं होतं. प्रवीण च्या आई - बाबांनी त्याला आपण तुझ्यासाठी नवीन पुस्तकं आणायला जातोय असं सांगून, समृध्दी ला तिला खूप दिवसांपासून हवी असलेली गियर ची सायकल बघून येऊ म्हणून तर नम्रता ला जरा देवळात जाऊन मग सहज फेरफटका मारून येऊ असं सांगून बाहेर आणलं होतं. सगळे बरोबर एकाच वेळी तिथे येऊन पोहोचले. एकदम सगळे एकत्र बघून मुलांना खूपच आनंद झाला.
"आई - बाबा! हा सगळा तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेला प्लॅन आहे ना?" नम्रता ने विचारलं.
"हो... आपण आज एक छोटी फॅमिली पिकनिक करणार आहोत... तुम्हा सगळ्यांना आमच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून हे प्लॅनिंग! आता फक्त तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा..." मयुर चे बाबा उत्साहात म्हणाले.
सगळ्यांना खूप आनंद झाला होताच! मुलं सुद्धा एकमेकांसोबत वेळ घालवणार आणि सोबत पालकांसोबत पण म्हणून जास्तच खुश होती. रस्त्याने नेहमी प्रमाणे मयुर आणि समृध्दी ची दंगा, मस्ती सुरू होती तर नम्रता आणि प्रवीण सवई प्रमाणे त्या दोघांना आवरत होती, गाड्यांवर लक्ष ठेवून या दोघांना सावरत पण होती. पालक फक्त त्यांचा आनंद बघत होते.. सकाळी घरी परतलेले असताना त्यांचे चेहरे आणि आत्ताचे त्यांच्या चेहरे यात जमीन आस्मानाचा फरक होता! अशीच मजा करत करत सगळे गार्डन जवळ पोहोचले.
"चला... आता तुम्ही सगळे पुन्हा तुमचं बालपण जगा... इथे आता आपण मस्त खेळू, भेळ आणि गोळा खाऊ आणि मग पुढे काय करायचं हे सरप्राइज असेल..." मयुर चे बाबा म्हणाले.
"ये....." सगळी मुलं एका सुरात म्हणाली.
भव्य गार्डन च्या गेट मधून सगळ्यांनी प्रवेश केला. सगळीकडे छान वाढवलेलं हिरवं गार गवत, लहान मुलांसाठी वेगळी कडे असलेली लहान लहान खेळणी, छोटे झोके, गाड्या, घसरगुंडी तर मोठ्यांसाठी व्यायाम करण्यासाठी केलेली काही खेळणी, मोठी राऊंड राऊंड वाली घसरगुंडी, मोठे मोठे झोके, आणि आकाश पाळणा सुद्धा त्या बागेत होता! कडेने भेळीचे आणि गोळ्याचे स्टॉल पण लागलेले होतेच! मस्त मस्त फुलांनी आणि वेगवेगळ्या आकाराच्या डिजाइन मध्ये कापलेल्या झाडांनी ती बाग अजूनच खुलून दिसत होती. लहान मुलांबरोबरच मोठी मुलं सुद्धा तिथे पूर्णपणे मजा करू शकतील एवढी सुंदर होती ती बाग! लहान मुलांचा किलबिलाट, सोबतच पक्ष्यांचे आवाज, फोटो शूट साठी आलेल्या लोकांची गर्दी, गवतावर चालणारी आणि भेळ एन्जॉय करणारी लोकं, शांत झाडाच्या खाली बसून कविता करणारे कवी तर मस्त सूर्यास्त रेखाटणारे कलाकार सुद्धा तिथे होते.
"चला... आता तुम्हाला सगळ्यांना जेवढा दंगा करायचा असेल तेवढा करा... जा.. मस्त पोटभर खेळा!" समृध्दी चे बाबा म्हणाले.
सगळी मुलं चपला, बूट बाजूला काढून त्या हिरव्या गार गवतावरून पळत गेली.
"बरं झालं आपण इथे आलो... सगळे एकदम उत्साहात आले आहेत..." प्रवीण ची आई म्हणाली.
"हो.. थँक्यू तुम्ही हा प्लॅन केलात..." प्रवीण चे बाबा मयुर च्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
"अरे त्यात काय! आपल्याच मुलांसाठी केलं आहे.. सकाळ पासून मुलं जे काही सांगतायत त्यातून एकदा सगळे बाहेर पडले की मग काही काळजी नाही..." मयुर चे बाबा म्हणाले.
"बरं... मुलांना खेळू दे.. आपण तिकडे बसू.." मयुर ची आई एका कोपऱ्यात बोट दाखवून म्हणाली.
सगळे पालक तिथे जाऊ लागले... "अधून मधून इथे यायला हवं त्या निमित्ताने मुलांना वेळ देता येईल" असं बोलत बोलत सगळे तिथे येऊन बसले.
क्रमशः.....
**************************
सगळे छान आनंदात आहेत... पण, हा आनंद जर थोड्याच काळात मोडून पडणार असेल तर? श्वेता, अमन करत असलेल्या पूजेचा परिणाम व्हायला लागला तर? मुलं पुन्हा बेटा कडे ओढली जाणार का? ती बाहुली, जी श्वेता ने फेकली होती ती नक्की कोणाच्या घरी असेल? दीपा ला मुक्ती कशी मिळेल? पाहूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा