एक बेट मंतरलेलं (भाग -१) #मराठी_कादंबरी

Horror story of island. Horror Marathi kadambari. College friends story.

एक बेट मंतरलेलं (भाग -१) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
********************************
"नाही यार.... काय तेच तेच प्लॅन करायचे आहेत... काहीतरी वेगळं हवं..." समृध्दी वैतागून म्हणाली. 

"आता अजून काय वेगळं ग... रिसॉर्ट, म्युझियम, बीच, हायकिंग सगळे पर्याय आपण डिस्कस केले... आता अजून काही बाकी पण राहिलं नाहीये..." मयुर म्हणाला. 

"हो रे... सगळं मान्य पण समृध्दी च मला पटतंय... काहीतरी वेगळं हवं... दरवर्षी आपण इथेच फिरतो.. वैताग आला आहे आता.." नम्रता म्हणाली. 

नम्रता च बोलणं ऐकून आता प्रवीण सुद्धा हेच म्हणायला लागला. समृध्दी, नम्रता, मयुर आणि प्रवीण खूप चांगले मित्र! त्यांची चौकडी सगळ्या कॉलेज मध्ये प्रसिद्ध होती. नुकतीच त्यांनी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती आणि आता सगळे सुट्टीच्या मूड मध्ये होते. ११ वी पासून झालेली ओळख आता त्यांच्या घट्ट मैत्रीत परावर्तित झाली होती. सतत एकत्रच फिरायचे, मजा करायची, एकमेकांच्या सुख दुःखात सामील व्हायचे आणि मजेबरोबरच तेवढाच अभ्यास करून चांगल्या ग्रेड नी पास व्हायचं हे त्यांच्या ग्रुपच एक वैशिष्टय होतं. दरवेळी काहीतरी नवीन शिकता येईल आणि सोबत मजा करता येईल अश्या जागा शोधून सगळे फिरायला जात असत. एक समर कॅम्प चौघचं करायचे. घरातूनही सगळे एकत्र जाणार म्हणजे बिनविरोध परवानगी मिळायची. एकमेकांच्या घरी येऊन जाऊन असल्याने एक हक्काचं दुसरं घर चौघांकडे होतं! सगळ्यांमध्ये पारदर्शकता आणि निखळ मैत्री होती. कोणी चुकलं तर हक्काने रागावणं पण, तेवढ्याच आपुलकीने समजावून पुन्हा एकमेकांना सावरणं, भांडण असं कधी नाहीच! मैत्रीत असलेले रुसवे फुगवे व्हायचे पण ते फक्त काही क्षण! मैत्रीपुढे कोणालाही स्वतःचा इगो महत्वाचा नव्हता... हेच या चौघांना इतर सगळ्यांपेक्षा वेगळं करायचे. कॉलेज मध्ये असणाऱ्या इतर ग्रुप्स ना सुद्धा या चौकडीचा हेवा वाटायचा. आजूबाजूच्या बिल्डिंग मध्येच राहत असल्याने सगळे कॉलेज नंतर पण एकत्र असायचे! आत्ता सुद्धा परीक्षा झाली होती म्हणून त्यांच्या प्रथेप्रमाणे फिरण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. 

"ए मला एक जागा माहितेय... जिथे आपण कधी गेलो नाहीये.... एक वेगळा अनुभव मिळेल आणि एक थरार करायला मिळेल. सांगू का?" प्रवीण एकदम उत्साहात म्हणाला. 

"काय? सांग ना..." समृध्दी म्हणाली. 

"सांगतो! पण, बघा हा घरून तिथे जायला कितपत परवानगी मिळेल सांगता येत नाही." तो थोडा हताश होत म्हणाला. 

"अरे! मिळेल रे! अशी कोणती जागा आहे जिथे आपल्याला घरचे सोडणार नाहीत... बोल तर आधी." मयुर म्हणाला. 

सगळे आता कान टवकारून बसले होते. साधारण तासभर तरी त्यांनी कुठे जायचं यावर चर्चा केली होती. आता काहीतरी नवीन सुचलं आहे तर इथे काहीही करून जायचं हाच विचार सगळे करत होते. 

"मी परवा कुठेतरी वाचलं होतं की टीव्ही वर बघितलं आठवत नाही पण, मुंबई बाहेर एक छोटंसं बेट आहे. जिथे अजून पर्यंत कोणी कॅम्प केला नाहीये... आपण तिथे जाऊया.." प्रवीण म्हणाला. 

"ओके.. मग त्यात आपल्या घरून परवानगी न मिळण्या सारखं काय आहे? याआधी सुद्धा आपण कॅम्प केले आहेत!" नम्रता म्हणाली. 

"हो... पण, हे बेट जरा वेगळं आहे... म्हणजे तिथे मानवी वस्ती नाहीये... कोणतेही प्राणी सुद्धा नाहीयेत... फक्त..." प्रवीण बोलता बोलता थांबला. 

"फक्त काय? नक्की असं बेट आहे ना? की काहीतरी उगाच फेकतोयस?" समृध्दी त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत म्हणाली. 

"अरे आहे... फक्त असं ऐकलं आहे की तिथे पॅरा नॉर्मल अॅक्टिविटी होत असतात." प्रवीण थोड्या दबक्या आवाजात म्हणाला. 

"अरे... असं काही नसतं... आपण जाऊया ना.. एकटं कुठे जायचं आहे आपल्याला! आपण चौघं सतत बरोबर असणार आहोत.... बघूया कोणत्या भुतात हिम्मत आहे आपल्याला घाबरवायची." समृध्दी एकदम उत्साहात म्हणाली. 

"हो.. चालेल.. आपण जाऊ... समृध्दी बरोबर बोलतेय.." नम्रता ने सुद्धा सहमती दर्शवली. 

आता सगळ्यांचं एकमत झालंच होतं! फक्त घरी सगळ्यांना सांगून त्यांची परवानगी मिळवायची बाकी राहिलं होतं. तसं घरून जास्त काही विरोध येईल असं वाटत तरी नव्हतं कारण, सगळे उच्च शिक्षित घरातले! अफवा आणि अश्या भुता खेताच्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे! फक्त आता ती जागा सामसूम म्हणून परवानगी मिळेल की नाही याची पूर्ण खात्री वाटत नव्हती. पण, घरच्यांकडून परवानगी कशी मिळवायची हे चौघांना चांगलंच माहीत होतं. त्यांच्या या चर्चेत बराच वेळ गेला होता. आता घरी जाऊन पालकांना विचारून उद्या पुन्हा एकत्र भेटून पुढचा प्लॅन करायचा असं ठरवून सगळे आपापल्या घरी निघाले. ही चौकडी म्हणजे सगळ्यात युनिक होती. चौघांचे चार वेगळे स्वभाव! पण, कोणीही भित्र नाही. समृध्दी एखाद्या टॉम बॉय सारखी! एकदम बिनधास्त! काळे भोर डोळे, लहान केस, नेहमी शर्ट, आणि जीन्स घालणारी आणि कधीही अन्याय ना सहन करणारी ना कोणाला करायला देणारी! नम्रता साधी, भोळी.. लांब सडक केस, मॉडर्न विचार पण संस्कृतीला सुद्धा जपणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी, नेहमी इतरांची भांडणं सोडवणारी, मनाच्या जखमेवर अलगद मधाळ शब्दांनी फुंकर घालणारी! एकदम निरागस आणि लाघवी. मयुर म्हणजे त्यांच्या ग्रुप चा ऑक्सीजन! सतत वातावरण हलकं फुलकं ठेवण्यात पटाईत, जोक्स करून सगळ्यांना दिलखुलास हसवणारा पण, कोणाला वाईट वाटणार याची काळजी सुद्धा घेणारा, छान उंचपुरा, नाकी डोळी नीटस असा! आणि प्रवीण म्हणजे काय! तो तर ग्रुप मधल्या सगळ्यांचा फायर ब्रिगेड! डोळ्यावर चष्मा, मध्यम उंची, थोडा हेल्दी पण दिसायला गोड! त्याला सतत काही ना काही अभ्यास करायची, रिसर्च करायची सवय! म्हणून ऐनवेळी या तिघांना काहीतरी वेगळ्या विषयावर प्रोजेक्ट साठी मदत करणारा, परीक्षेच्या वेळी ज्या कॉन्सेप्ट समजल्या नसतील त्या त्यांच्या भाषेत पेपरच्या १० मिनिटं आधी समजावून सांगणारा! त्यांच्या ग्रुप मधला सगळ्यात हुशार असा प्रवीण! सगळ्यांचे घरचे सुद्धा आपापल्या मुलांना सगळ्यात पाठिंबा देणारे! उच्च मध्यम घराण्यातले... त्यामुळे मुलांना कसलीही कमी नाही. पण, शिस्त सुद्धा तेवढीच कडक! स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करायचा हे संस्कार! उगाच उधळपट्टी करायची नाही, कोणाला दुखवायचं नाही हे लहानपणापासून मनावर कोरलं होतं! सगळे हट्ट घरचे पूर्ण करायचे पण फाजील लाड व्हायचे नाहीत. मुलं सुद्धा कधी पालकांच्या शब्दाबाहेर जायची नाहीत. जे काही असेल ते आपल्या आई - वडिलांशी स्पष्ट बोलून त्यांना विश्वासात घेऊन सगळं करायचे आणि म्हणूनच आज सुद्धा खोटं न बोलता जे आहे ते खरं सांगून मगच कॅम्प ला जायचं हे ठरलं होतं. रात्री जेवताना हा विषय काढायचा आणि मग घरचे काय म्हणाले हे एकमेकांना फोन करून सांगायचं हे सगळ्यांनी ठरवलं होतं. प्रवीण ने त्यांना जी माहिती दिली होती ती नीट ऐकून घेऊन आता सगळ्यांना  आपापल्या घरी कधी एकदा आई - बाबांना सांगतो असं झालं होतं. 

"आई, बाबा! पेपर खूप छान गेले आणि आता तर काय मस्त सुट्टी आहे..." समृध्दी जेवताना एकदम जरा आडून विषय काढत म्हणाली. 

"हो... आणि तुम्ही चौघांनी मिळून अभ्यास केला आहे त्यात प्रवीण ने मदत केली आहे म्हणजे आम्हाला सुद्धा काही काळजी नाही." समृध्दी ची आई कामिनी म्हणाली. 

"हो ना.. बरं काय मग यंदा कुठे फिरायचा प्लॅन केला आहे?" समृद्धीच्या बाबांनी लगेच विचारलं. 

"काय सॉलिड आहात बाबा तुम्ही! मी आत्ता तेच सांगणार होते... तुम्हीच विचारलं बरं झालं.. लव्ह यू..." समृध्दी एकदम लाडात येऊन म्हणाली. 

"मग बाप आहे तुझा! बोल बोल..." ते म्हणाले. 

"यावेळी आम्ही कुठेतरी दुसरीकडे जाण्याचा विचार करतोय... त्याच त्याच ठिकाणी जाऊन वैताग आला आहे." ती आधी आई - बाबांचा मूड बघण्यासाठी म्हणाली. 

"वेगळ्या ठिकाणी जायलाच हवं.. आणि प्रवीण ने जागा शोधली आहे म्हणजे चांगली असेल... त्याचा या रिसर्च प्रकरणात चांगला हातखंडा आहे." समृद्धीची आई म्हणाली. 

"हो आई... पण, पण.... यावेळी त्याने मुंबई बाहेर एक बेट आहे त्याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणत होता की, तिथे मानवी वस्ती नाहीये... पॅरा नॉर्मल अॅक्टीविटी तिथे होत असतात असं म्हणणं आहे त्याचं... पण, आपल्या कोणाचा यावर विश्वास नाहीये की नाही... मग द्याल ना तुम्ही दोघं परवानगी तिथे फिरायला जायला." समृध्दी ने एका दमात सगळं सांगितलं आणि निरागसपणे विचारलं. 

"आम्हाला विचार करायला वेळ हवा आहे. उद्या संध्याकाळ पर्यंत तुला सांगू... तू आत्ता जेव आणि कोणतं बेट आहे ते सांगून ठेव.. आई आणि मी स्वतः एकदा रिसर्च करून बघू.. विचार करू आणि सांगू..." समृध्दी चे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाले. 

"ओके.. पण, आई, बाबा मी तुमच्या हो ची अपेक्षा करतेय... त्यातूनही आजवर तुम्ही म्हणाल ते केलं आहे.. यापुढेही करेन.. आणि मीच नाहीतर नम्रता, प्रवीण आणि मयुर सुद्धा! हवंतर तुम्ही सगळे मोठे मिळून ठरवा आणि सांगा... पण, यातून आम्हाला नवीन अनुभव मिळेल म्हणून तरी हो म्हणाल ना?" समृध्दी ने पुन्हा एकदा त्यांना आधीच तयार करायचा प्रयत्न केला. 

"समृध्दी! बाबांनी आत्ता तुला जेव आणि झोपायला जा सांगितलं ना... आम्ही बघतो.. आजवर तुला निराश केलं आहे का?" तिची आई तिला समजावत म्हणाली. 

समृध्दी ने स्मित केलं आणि सगळे जेवायला लागले. 
***************************
दुसरीकडे नम्रता सुद्धा घरच्यांशी बोलत होती. तिचं तिच्या आई बाबांना याविषयी सांगून झालं होतं. 

"नम्रता! बघ, आम्ही आजवर तुला जे हवं ते दिलं आहे... पण, बाळा यावेळी हे बेट काही ठीक नाही वाटत ग..." नम्रता ची आई सानिका काळजीने म्हणाली. 

"अगं आई... असं काय ग करतेस... तिथे आम्ही चौघेही असणार आहोत ना... तू आणि बाबांनी च शिकवलं आहे ना  विश्वास असावा पण अंधविश्वास नाही. मग आता?" ती म्हणाली. 

"हो.. बरोबर आहे... पण, आई बरोबर बोलतेय... मान्य तिथे भूत बीत काही नसेलही... पण, ती एक सामसूम जागा आहे. अजून तुम्ही सगळे लहान आहात... अश्या जागा चोर, दरोडेखोर यांचा अड्डा असतात बाळा! देव न करो उद्या तुमच्यावर हल्ला झाला तर काय कराल?" नम्रता चे बाबा तिला समजावत म्हणाले. 

नम्रता ने फक्त ऐकुन घेतलं पण, काहीही बोलली नाही. तिला फार वाईट वाटतंय हे तिच्या पडलेल्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला सगळं समजत तर होतं पण, चौघांना सुद्धा आता त्या बेटाची ओढ लागली होती. नवीन काहीतरी करण्याची, सिनेमात दाखवतात तसा थरार करण्यासाठी त्यांचं तरुण रक्त सळसळत होतं. नेहमी सुरक्षित वातावरणात राहिलेली ही मुलं! त्यांना कुठे बाहेरच्या जगाच्या झळा माहीत होत्या! सगळीकडे कशी छान रंगीत दुनिया दिसत होती. पण, त्यांच्या पालकांना याचं गांभीर्य माहीत होतं. नम्रता चा पडलेला चेहरा पाहून तिच्या आई - बाबांनी बाकीच्या पालकांशी बोलायचं आणि मग काही सुवर्णमध्य काढता येतोय का बघायचं असं ठरवलं तेव्हा कुठे या मॅडम ची कळी खुलली. 
******************************
इथे मयुर सुद्धा घरच्यांना या कॅम्प साठी तयार करायच्या प्रयत्नात होता. 

"आई... बघ, मी आता प्रवीण, नम्रता आणि समृध्दी सोबत राहून हुशार होत चाललोय ना.. म्हणजे बघ ना माझं मला जाणवतंय, शाळेत असताना मी कसा होतो... फक्त मजा करायची, जेमतेम पास व्हायचं, कोणत्याही गोष्टीचा सिरियली विचार करायचा नाही.... हो ना?" तो म्हणाला. 

"हो.. पण, आज हे सगळं का बोलतोयस?" मयुर चे बाबा म्हणाले. 

"ते.. दरवर्षी आम्ही फिरायला जातो तसं यावेळी सुद्धा प्लॅन केला आहे... त्यासाठी...." मयुर म्हणाला. 

"मग एवढे आढेवेढे का घेत होतास? आम्ही काय तुला जाऊ देत नाही का..." मयुर ची आई म्हणाली. 

ते ऐकून मयुर ने त्या दोघांना यंदा त्यांनी कुठे फिरायचा प्लॅन केला आहे ते सांगितलं. 

क्रमशः.... 
****************************
या सगळ्यांचे पालक त्यांना त्या बेटावर जाऊ देतील? काय असेल असं तिथे? यातून काही अघटीत तर घडणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all