एक बेट मंतरलेलं (भाग -१९) #मराठी_कादंबरी

Horror island story. Ira blogging horror stories. Story of college friends. Horror Marathi kadambari.

एक बेट मंतरलेलं (भाग -१९) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
तिकडे त्या दोन्ही पिशाच्यांनी विधी ला सुरुवात केली होती. त्या पडीक घरात असलेली धूळ, जळमटे मेलेल्या पाली आणि साप गोळा करून त्याचा एक सैतान तयार केला होता. धूळ आणि जळमटं ओली करायला त्या रक्त पिशाच्याच्या तोंडातून जे रक्त वाहत होतं ते वापरलं होतं आणि त्याची एकदम भयानक मूर्ती तयार केली होती. धुळीमुळे सगळी काळी कुट्ट होती ती! डोळ्यांसाठी मेलेल्या सापाचे लाल लाल डोळे, विषारी दात, पालीची शेपूट असा काहीसा वापर करून ती कुमुर्ती तयार केली होती. 

"आपला सैतान तयार आहे..." अमन ती मूर्ती एका दगडावर ठेवत म्हणाला. 

"आता स्थापना झाली की आपल्या शक्ती वाढीस लागतील आणि चार दिवसात त्याचा प्रभाव दिसायला लागेल... हा.. हा.. हा.." श्वेता एकदम किळसवाणी हसत म्हणाली. 

"बघूया आता त्या नम्रता ची शक्ती जिंकते की आपली... हा.. हा.. हा..." अमन सुद्धा तिच्यात सामील होऊन म्हणाला. 

लगेच दोघांनी मिळून स्वतःच्या रक्ताचे चार थेंब त्या दगडावर टाकले आणि मूर्ती त्यावर ठेवली. नंतर दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि उठून उभे राहिले. चित्रविचित्र प्रकारे नाचत त्यांचा कुमंत्रांचा जप सुरू झाला.. एकदम अघोरी आणि भयानक नाचत असताना ते दोघं आधी पेक्षा खूपच जास्त भीतीदायक दिसायला लागले होते. 
***********************
इथे नम्रता च्या घरी मात्र सगळे गोंधळातच होते. समृध्दी च्या बाबांच्या मोबाईल मध्ये दोघांचेही नंबर नव्हते! त्यांना असं वाटत होतं की काहीतरी मोबाईल मध्येच प्रॉब्लेम झाला असेल. 

"समृध्दी! अगं जरा तुझा मोबाईल दे मला.." तिचे बाबा म्हणाले. 

"देते.. पण, चार्जिंग नाहीये... फोन केव्हाच बंद पडला आहे..." समृध्दी मोबाईल पुढे करत म्हणाली. 

"बरं राहुदे..." ते म्हणाले आणि नम्रता च्या बाबांच्या कानाजवळ जाऊन त्यांना हळू आवाजात अमन, श्वेता चा फोन नंबर मागितला. 

त्यांनी लगेच त्यांचा मोबाईल बाहेर काढला तर यांच्या फोन मध्ये सुद्धा तसंच! फक्त नाव सेव्ह होतं पण, नंबर नव्हता. आता एकाचवेळी दोघांच्या मोबाईल मध्ये हे असं होणं म्हणजे नक्की काय हे काही केल्या दोघांना समजत नव्हतं. 

"नमु! तू मोबाईल चार्जिंग ला लावला होतास ना? आण जरा तुझा मोबाईल..." तिच्या बाबांनी तिचा मोबाईल मागितला. 

नम्रता ने लगेच आणून दिला. तिच्याही मोबाईल मध्ये तेच! 

"जरा प्रत्येकाने आपले मोबाईल बघा... अमन, श्वेता चा नंबर आहे का त्यात?" नम्रता च्या बाबांनी सगळ्यांनाच सांगितलं. 

कोणाच्याच मोबाईल मध्ये त्यांचा नंबर नव्हता! फक्त नावच होतं! त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला होता. 

"पण, हे कसं शक्य आहे? एकवेळ दोन जणांच्या, तीन जणांच्या मोबाईल मधून नंबर उडेल पण सगळ्यांच्या?" समृद्धीची आई गोंधळून म्हणाली. 

सगळ्याच पालकांनी तिला सहमती दर्शवली. 

"बघा.. आता तरी विश्वास ठेवा! पोरं अन् म्या खरं सांगतोय... ती मानस न्हाईत! पिशाच्च हायत ती..." हरीश पुन्हा म्हणाला. 

एवढं होऊनही अजून काहीतरी आहे जे आपल्या नजरेतून सुटलं आहे असं वाटत होतं. त्यांचा या भुताच्या गोष्टीवर काही केल्या विश्वास बसत नव्हता. विचारा विचारात असाच थोडा वेळ शांततेत गेला. 

"चला आता.. म्या निघतो.. पोरांची काळजी घ्या.. पोरांना त्यांच्या त्यांच्या आई - बापा पाशी सोडलं.. आता माझं काम झालं.. काय बी मदत लागली तर सांगा.. यो माझा नंबर हाय.." हरीश त्याचा कागदावर लिहिलेला नंबर त्यांना देत म्हणाला. 

"बरं... थँक्यू तुम्ही आमच्या मुलांची काळजी घेतली आणि त्यांना इथपर्यंत आणून सोडलं... मी तुम्हाला मिस कॉल देतो म्हणजे माझा नंबर पण येईल तुमच्याकडे..." नम्रता चे बाबा हात जोडून म्हणाले. 

हरीश सुद्धा सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघाला. 

"प्रवीण! जरा ती बाहुली बघू..." प्रवीण च्या बाबांनी तिथे ठेवलेली बाहुली त्याच्याकडे मागितली. 

प्रवीण ने ती बाहुली त्यांना दिली. नक्की ती बाहुली सेल वर चालणारी रोबोटिक बाहुली नाहीये ना हेच ते बघत होते. पण, ती पूर्णतः सामान्य बाहुली होती. 

"मला एकतर कळतच नाहीये ही साधी बाहुली तुमच्याशी बोलली कशी!" ते गोंधळून म्हणाले. 

"खरंच बाबा! आम्ही का खोटं बोलू? तिथून आम्ही कसे परत आलो आमचं आम्हाला माहीत.. त्यातूनही पुन्हा आम्ही हरीश काकांच्या घरी होतो तेव्हा मयुर ला त्रास झाला होता... त्याला सतत ते बेट दिसत होतं.. त्याची हालत बघवत नव्हती एवढा त्याला त्रास होत होता.. नम्रता मुळे आज आम्ही सगळे तिथून वाचलो... मयुर ला सुद्धा तिनेच बरं केलं आहे..." प्रवीण रडकुंडीला येऊन म्हणाला. 

"बरं... बरं... आत्ता असुदे ते सगळं... तुम्ही सगळे सुखरूप आलात तेच खूप आहे... तुम्ही पण आता बास करा... मुलं आधीच घाबरली आहेत... थोडा वेळ जाऊदे आणि त्यांना आता आराम करू दे..." प्रवीण च्या आई ने प्रवीण ला जवळ घेऊन शांत केलं आणि त्याच्या बाबांना पण याविषयी आत्ता काही नको चर्चा करायला म्हणून सांगितलं. 

सगळ्याच पालकांना ते पटलं... मुलं घरी आली आहेत आणि नंतर वेळ जाईल तशी मुलांची भीती जाईल असं त्यांना वाटू लागलं. सगळे नम्रता च्या घरून स्वतःच्या घरी जायला निघाले. 

"एक मिनिट! मयुर! हे बघ हा अंगारा घेऊन जा.. रोज लाव आणि भीती वाटली तर बाप्पाचं नाव घे..." नम्रता ने त्याच्या हातात अंगाऱ्याची पुडी दिली आणि त्याला धीर देत म्हणाली. 

त्याचा चेहरा अजूनही उतरला होता. का कोण जाणे पण आपण यातून वाचणार नाही, आपल्याला त्या बेटावर कोणीतरी घेऊन जाणार असं सतत त्याला वाटत होतं पण, आपल्या बोलण्याने बाकीच्यांना टेंशन नको म्हणून तो काहीही न बोलता फक्त स्मित करून पुडी घेऊन निघाला... आपल्याला पालकांसोबत असल्यामुळे सगळ्यांना सुरक्षित वाटत होतं आणि हळूहळू सगळेच स्वतःला सावरत होते.
**************************
अमन आणि श्वेता इथे त्यांच्या विधिंमध्ये पूर्णपणे गढून गेले होते. जसे जसे त्यांचे कुमंत्रांचे जप वाढत होते तस तशी ती सैतानाची मूर्ती सुद्धा वाढत होती... त्या दोघांचा सतत स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्यावर सुरू होताच! आपली शक्ती आता वाढणार, आपण बळी देऊ शकणार या आनंदात त्यांचा उत्साह अजून वाढत होता आणि आता त्यांना त्यांचं शरीर गळून पडणार आहे याबद्दल काहीही वाटत नव्हतं. त्या दोघांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं. त्या दोघांच्या अवती भोवती बऱ्याच बाहुल्या सुद्धा जमल्या होत्या ज्या हे सगळं दृश्य पाहत होत्या. त्या बाहुल्यां ना पण आता कळून चुकलं होतं ही दोन्ही पिशाच्च सर्वशक्तीमान झाली की त्या सगळ्यांचे अजूनच हाल होणार आहेत! 

"आता आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाहीये..." अमन टेलेपथी करून श्वेता ला म्हणाला. 

"हो.... आता आपण सगळ्यात वाईट पिशाच्च असू! ज्यांच्या तावडीत सगळेच आत्मे कैद राहतील.... कोणाच्या आत्म्याचा कसा वापर करायचा हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असेल...." श्वेता सुद्धा त्याच्याशी त्याच पद्धतीने आनंदी होऊन म्हणाली. 

त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा हा असूरी आनंद सगळ्या बाहूल्यांनी पाहिला होता! आता हेच अंतिम सत्य आहे असं मानून आणि लगेचच हे सत्य स्वीकारून अमन, श्वेता च्या मर्जीत राहायचं असं ठरवून त्या सुद्धा त्यांच्या आनंदात सामील झाल्या होत्या. 
**************************
इथे मयुर च्या घरी तो इतरांपेक्षा जास्त दुःखी आहे आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे असं त्याच्या आई - बाबांना वाटत होतं. पण, आत्ता लगेचच हा विषय नको म्हणून ते काही बोलले नाहीत. तो काहीही न बोलता एकदम शांतपणे सोफ्यावर रिमोटशी खेळत बसला होता. समोर टीव्ही सुरू असून सुद्धा त्याचं त्याकडे लक्ष नव्हतं! एरवी "अरे आता गप्प बस" म्हणून कानी कपाळी ओरडावं लागणाऱ्या मुलाला त्यांना असं गप्प बघवत नव्हतं. त्याची आई त्याच्याशी बोलायला जातच होती की त्याच्या बाबांनी तिला अडवलं आणि नजरेनेच जरा बाजूला बोलावलं. ते दोघं स्वयंपाकघरात गेले. 

"आत्ता त्याच्याशी नको काही बोलायला जाऊ.. त्याला जरा शांत बसुदे... सगळे घाबरले आहेत त्यात मयुर ला जास्त त्रास होतोय... आपण आत्ता काही नको बोलायला.. जरा वेळ गेला की तोच बोलेल आणि आता आपण पण नॉर्मल राहूया... तू चेहऱ्यावर काही टेंशन नको दाखवू.." ते त्याच्या आईला समजावत म्हणाले. 

"हम्म! आज मयुर च्या आवडीचा सगळा स्वयंपाक करते... तोवर तुम्ही त्याचं मन दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करा." त्याची आई म्हणाली. 

मयुर चे बाबा त्याच्यापाशी आले. अजूनही तो त्याच्याच तंद्रीत होता! ते त्याच्या बाजूला येऊन बसलेले सुद्धा याला जाणवलं नव्हतं. 

"असं तिथे नक्की काय घडत होतं? अमन दादा आणि श्वेता ताई खरंच पिशाच्च आहेत? हे स्वप्न तर नाहीये ना? खरंच बाहुल्या एवढ्या जीवघेण्या होत्या का तिथे? आम्ही सगळे नक्की वाचलो आहोत का?" मयुर च मन त्यालाच खूप प्रश्न विचारून खात होतं. 

अंगठ्याचं नख खात तो कुठेतरी शून्यात नजर लावून हा सगळा विचार करत होता. त्याचे बाबा त्याला हाक मारत होते तरीही ते त्याला जाणवलं नव्हतं! 

"मयुर! अरे कुठे हरवला आहेस? ते बघ टीव्ही वर तुझी आवडती टीम खेळायला आली आहे आणि तुझं लक्ष नाही?" मयुर च्या बाबांनी त्याला हाताने हलवलं आणि टीव्ही वर सुरू असलेल्या मॅच कडे त्याचं लक्ष जावं म्हणून ते म्हणाले. 

" अं? काय झालं?" तो विचाराच्या गर्दीतून बाहेर आला आणि म्हणाला. 

"अरे! मी म्हणत होतो तुझी आवडती टीम खेळायला आली आहे... बघ..." ते पुन्हा टीव्ही कडे बोट दाखवून म्हणाले. 

"आ! हो.. हो.. बघतोय..." तो कसनुसं टीव्ही कडे बघत म्हणाला. 

अजूनही त्याचं लक्ष त्या घटांनामधून बाहेर आलेलं नाही हे त्याच्या बाबांनी ओळखलं होतं. म्हणून लगेचच त्यांनी टीव्ही बंद केला आणि ते थोडे मयुरच्या बाजूला सरकले. त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक हात त्याच्या हातावर ठेवला. त्यांच्या प्रेमळ आणि आशवस्थ स्पर्शाने एवढा वेळ त्याच्या मनात ज्या घटनांनी, विचारांनी काहूर निर्माण केलं होतं ते एका क्षणात धूसर झालं आणि तो काही न बोलताच त्यांच्या कुशीत शिरला. त्याचे बाबा सुद्धा काही बोलले नाहीत. त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्यांनी त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला. थोडावेळ असाच गेला आणि मयुर त्यांच्याच मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून कधी झोपला हे त्याचं त्याला सुद्धा समजलं नाही. या सगळ्यात जवळ जवळ पाऊण तास होऊन गेला होता आणि मयुर च्या आईचा स्वयंपाक तयार झाला म्हणून ती त्या दोघांना बोलवायला बाहेर येत होती. 

"मयुर!..." ती हाक मारत होतीच की त्याच्या बाबांनी तिला खुणेनेच गप्प राहायला सांगितलं. 

त्याला असं लहान मुला सारखं झोपेलं बघून ती हळूच त्या दोघांच्या जवळ आली आणि मयुर च्या पायथ्याशी बसली. 

"अहो! एवढा दंगा, मस्ती करणारा पोरगा असा गप्प गप्प बघवत नाहीये... नक्की काय झालं असेल? त्याची ही अवस्था बघवत नाहीये आता.." मयुर ची आई हळू आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं! 

"अगं नको काळजी करू... आता हळूहळू त्याला उठवू आपण आणि जेवायला घालू... आज तर सगळं त्याच्या आवडीचं आहे मग बघ कसा ठीक व्हायला लागतो ते.... आणि मुलं जे काही सांगतायत त्यावरून तरी त्यांची मनस्थिती ठीक नाही वाटत... जरा दोन दिवस जातील पण होईल ठीक तो!" ते त्याच्या आईला समजावत म्हणाले. 

दोघांनी मिळून त्याला लाडीगोडीत उठवलं आणि जेवायला घेऊन गेले. जेवणात त्याच्या आवडीची फ्लॉवर वाटाण्याची ची भाजी, पोळी आणि आमरस बघून त्याला आनंद झाला. बेटा वरून परत आल्यापासून आत्ता कुठे त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्याला असं आनंदी पाहून त्याच्या आई - बाबांना पण बरं वाटलं. कदाचित मुलं घाबरून तिथून पळून आली आणि त्यांची दगदग झाली असेल म्हणून मन नको नको ते विचार करत असेल असं त्यांना वाटलं! आत्ता एक डुलकी झाली आता मयुर पुन्हा आधी सारखा होईल म्हणून त्याचे आई - बाबा एकमेकांकडे बघून स्मित करत होते. 

"चल आता मस्त पोटभर जेवून घे... आपण संध्याकाळी आईसक्रीम खायला जाऊ..." त्याचे बाबा त्याच्या डोक्यातून हात फिरवून म्हणाले. 

क्रमशः..... 
*************************
अजूनही या कोणाला मुलं जे काही सांगत आहेत त्यावर विश्वास बसत नाहीये... जर वेळीच त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि काही वेगळंच घडलं तर? तिथे अमन, श्वेता जे विधी करतायत त्यांचा प्रभाव या चौघांवर पडायला लागला तर? आणि ती श्वेता ने फेकलेली बाहुली? ती कोणाच्या घरी गेली असेल? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all