एक बेट मंतरलेलं (भाग -१८) #मराठी_कादंबरी

Story of college friends. Horror island story. Horror Marathi kadambari. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -१८) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
असं एवढ्या रात्री राफ्ट वरून मुलं समुद्रात प्रवास करत होती आणि हा माणूस त्यांनी जे केलं ते बरं केलं असा म्हणतोय म्हणून सगळे पालक आपापसात बोलू लागले. 

"सांगतो... सांगतो...." हरीश त्यांना शांत करत म्हणाला. 

सगळे गप्प बसले. अजूनही मुलं घाबरलेली होती. ग्राउंड मध्ये असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाच्या पारावर सगळे बसले! मुलं काही केल्या आई - बाबांचा हात सोडायला तयार नव्हती. एवढी धीट आणि हुशार मुलं असं वागतायत म्हणून त्यांच्या पालकांना अजूनच टेंशन आलं होतं. 

"ही पोरं ज्या बेटावर गेली व्हती ते बेट शापित हाय! या पोरास्नी ते जाणवलं तवा ते तिकडून पळून आले बघा.." हरीश बोलत होता. 

त्याला मध्येच तोडत प्रवीण ची आई बोलू लागली; "म्हणजे? नक्की काय घडलं आहे तिथे? अहो असं शापित वैगरे असं काही नसतं." 

"नाही काकू! खरं! ते अमन दादा आणि श्वेता ताई माणूस नाहीयेत... ती दोघं पिशाच्च आहेत! आम्हाला बळी देणार होते ते तिकडे..." नम्रता ने कसाबसा धीर एकवटून सांगितलं. 

"अरे मुलांनो! तसं काही नसेल... त्या दोघांनी तुमची मस्करी केली असेल... थांबा आपण त्यांना फोन लावुया..." मयुर चे बाबा म्हणाले. 

"नाही... नाही बाबा! त्यांना फोन नका लावू.. आम्ही तिकडून कसे पळून आलो आहोत आमचं आम्हाला माहितेय..." मयुर त्यांचा हात धरत म्हणाला. 

"हो... हो... एक मिनिट शांत हो तू आधी... नाही करत फोन..." मयुर चे बाबा त्याला शांत करत म्हणाले. 

आत्ता मुलं एवढी घाबरलेली असताना त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करायला नको असं ठरवून सगळे पालक त्यांचं मत विचारात घेत होते. 

"मला वाटतंय आपण इथे नको बोलायला.. आमच्या घरी चला सगळे. घरी गेलं की मुलं पण जरा शांत होतील..." नम्रता चे बाबा म्हणाले. 

"हो चालेल... तसंच करुया..." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

लगेचच सगळे पालक आणि हरीश नम्रता च्या घरी जायला निघाले.

"या.. बसा..." नम्रता ची आई सगळ्यांना आत घेत म्हणाली. 

सगळे खुर्च्या आणि सोफ्यावर बसले. नम्रता च्या आई नी सगळ्यांना पाणी आणून दिलं आणि ती सुद्धा तिथेच बसली. 

"बोला हरीश भाऊ! तुम्ही काय म्हणत होतात?" प्रवीण च्या बाबांनी विषयाला हात घातला. 

हरीश ने त्यांना मुलांनी जे काही सांगितलं होतं आणि त्यांचा मित्र कसा त्या बेटा वरून गायब झाला ते सगळं सांगितलं. 

"खरंतर हे सगळं अविश्वसनीय आहे!" मयुर ची आई म्हणाली. 

"मला काहीतरी सांगायचं आहे." नम्रता ची आई हे सगळं बोलणं ऐकून आपल्याला काय वाटलं होतं हे सांगावं असा विचार करून म्हणाली. 

सगळे आता तिच्याकडे बघत होते. नम्रता ला वाटलं आई चा आपल्यावर विश्वास बसला आहे आणि ती यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल म्हणून तीही खूप आशेने आईकडे बघत होती. 

"म्हणजे, हे सगळे ट्रिप ला जाणार तेव्हा अमन, श्वेता सगळ्यांच्या घरी गेले होते.. बरोबर?" नम्रता ची आई म्हणाली. 

सगळ्यांनी होकारार्थी मान डोलावली. 

"कुणाला काही आठवतंय का? म्हणजे त्यावेळी त्या दोघांनी डोळ्यात बघितल्यावर कुठेतरी हरवल्या सारखं व्हायचं... सगळे शून्यात जायचे..." नम्रता ची आई पुढे म्हणाली. 

"हो... तुम्हीच मला भानावर आणलं होतं." समृध्दी ची आई म्हणाली. 

"हा तेच! मला वाटतंय ती दोघं कोणत्यातरी टोळीची माणसं असावीत... संमोहित करून आपलं काम साध्य करणारी." नम्रता च्या आई ने तिला जी शंका होती ती बोलून दाखवली. 

मुलांना तर आता हसावं की रडावं हेच कळत नव्हतं! आधी नम्रता ला सुद्धा हेच वाटलं होतं पण तिथे जे डोळ्याने बघितलं आहे त्याचं काय हा प्रश्न तिला सुद्धा सतावत होता. 

"अगं आई नाही... आपल्याला आधी असं वाटलं होतं पण, तसं नाहीये.. तिथे आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी ते भयानक रूप बघितलं आहे ग!" नम्रता एकदम पोटतिडकीने सांगत होती. 

"बरं... आम्ही सगळे बघतो काय करायचं.... जा तुम्ही सगळे आत बसा..." नम्रता चे बाबा म्हणाले. 

"बाबा पण..." नम्रता बोलत होती तिला मध्येच तोडत तिचे बाबा म्हणाले; "विश्वास ठेव! काहीही नाही होणार... तुम्ही सगळे दमला आहात थोडावेळ आत बसा आराम करा.." 

पुढे काही बोलण्यात अर्थच नव्हता म्हणून सगळे आतल्या खोलीत गेले. इथे सगळ्यांच्या पालकांना ही मुलं असं का बोलतायत म्हणून काळजी वाटत होती. 

"पोरांची काळजी वाटत असल समद्यांना पर ती पोरं जे काय सांगत व्हती ते खरं हाय.. त्या बेटाच्या खूप गोष्टी ऐकुन आहोत आमी समदे... एकदा विश्वास ठेवा..." हरीश ने पुन्हा समजावलं. 

"पण हे असं काही असेल यावर कसा विश्वास ठेवायचा? आणि एक क्षण असं मानलं की ते दोघं होते पिशाच्च मग त्यांनी मुलांना आधी कशी ईजा पोहोचवली नाही? ते दोघं आम्हाला सुद्धा काहीतरी करु शकले असते ना.." नम्रता चे बाबा म्हणाले. 

"तसं न्हाई... पिशाच्च आमावस्या अन् पौर्णिमेला जास्त शक्तिशाली असतं बघा.... पोरं म्हणत नव्हती का त्यांचा बळी देणार होते.. एकदा विश्वास ठेवा पोरांवर.." हरीश ने पुन्हा समजावलं. 

हा सगळा प्रकार ऐकून तर सगळे पूर्णपणे गोंधळून गेले होते. जी मुलं आधी एकदम खणखर होती, बिनधास्त होती ती अचानक एवढी घाबरायला लागली आहेत! भूत प्रेत न मानणारी मुलं अचानक आम्ही ते सगळं अनुभवून आलो असं सांगतायत शिवाय हा हरीश! तो सुद्धा मुलांची स्थिती कशी होती हे एवढ्या पोटतिडकीने सांगतोय यामुळे सगळ्यांच्या काळजीत अजूनच वाढ झाली होती. 

"मला वाटतंय आपण पहिल्या पासून हे जे घडत गेलं ते एकदा आठवून बघूया आणि अमन किंवा श्वेता ला फोन लावू... मला तरी एकतर त्या दोघांनी मुलांची मस्करी केली असेल असं वाटतंय... जर त्या दोघांनी फोन उचलला नाहीच तर पोलिसांची मदत घेऊ..." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"हो.. तुमचं बरोबर आहे..." नम्रता च्या बाबांनी सुद्धा सहमती दर्शवली. 

"मी सांगते पहिल्या पासून काय झालं.... नम्रता आणि माझं बोलणं झालं होतं त्यामुळे सगळं माहितेय मला..." नम्रता ची आई म्हणाली. 

आणि लगेच तिने सांगायला सुरुवात केली; "सगळ्यात आधी मुलांनी आपल्याला त्या बेटावर जायचं आहे असं सांगितलं पण आपण नकार दिला.. दुसऱ्या दिवशी मुलं नाराज होती आणि नेहमी प्रमाणे त्यांच्या कट्टयावर भेटली. तेव्हा तिथे अमन, श्वेता आले. त्यांच्या सांगण्या नुसार ते प्रवीण च्या गावचे आहेत, दरवर्षी समर कॅम्प अरेंज करतात आणि लहान असताना प्रवीण त्यांच्या सोबत कॅम्प ला जायचा असं ते दोघं मुलांना म्हणाले होते. म्हणून मुलं त्यांना आपल्याकडे घेऊन आली. आपल्याला सुद्धा त्यांनी हेच सांगितलं आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण हा ते दोघं बोलताना कुठेतरी हरवल्या सारखे सगळे शून्यात नजर लावून बसायचे. म्हणजे मला आणि नम्रता ला तसं जाणवलं होतं." नम्रता च्या आई ने सगळं सांगितलं. 

"हो.. बरोबर असंच झालं होतं. ते दोघं बोलायचे तेव्हा आपला आपल्या विचारांवर ताबा नाही असंच वाटायचं." समृध्दी ची आई म्हणाली. 

हे जे काही त्यांचं बोलणं चालू होतं ते हरीश शांतपणे ऐकत होता. त्याला कळून चुकलं होतं त्या अमन, श्वेता ने त्यांची शिकार आधीच ओळखून खूप आधी पासून खेळी सुरू केली होती. 

"बरं सुमन वहिनी मला सांगा तुमचं गाव कोणतं?" नम्रता च्या आई नी विचारलं. 

"आमचं गाव?" सुमन ने गोंधळून विचारलं. 

"हो... अहो श्वेता, अमन तर तुमच्या गावचे आहेत असं म्हणाले होते ना म्हणून तर आपण मुलांना पाठवलं तिकडे... असं काय करता..." नम्रता ची आई काळजीने म्हणाली. 

"नाही... आम्हाला तर कोणतंच गाव नाहीये..." प्रवीण चे बाबा अचानक म्हणाले. 

इतक्यात मुलं सुद्धा काहीतरी बोलायचं आहे म्हणून आतल्या खोलीतून बाहेर येत होती तेव्हा त्यांनी पण हे बोलणं ऐकलं. 

"हो... मला पण तेच सांगायचं होतं! आम्हाला अमन, श्वेता इथे असताना खरंच आपलं गाव आहे आणि हे दोघं आपल्या गावचे आहेत असं वाटत होतं पण आम्हाला गावच नाहीये... आम्ही मूळचे मुंबईचेच आहोत!" प्रवीण म्हणाला. 

हा सगळा गोंधळ काही समजण्या पलीकडे चालला होता. अचानक प्रवीण आणि त्याच्या आई - बाबांना आपलं गावच नाहीये हे आत्ता कसं आठवतंय? एवढा वेळ हे कोणी काहीच कसे बोलले नाहीत हे प्रश्न सगळ्यांना सतावत होते. 

"तुम्ही हे आधी का नाही बोललात?" नम्रता च्या बाबांनी विचारलं. 

"खरंतर जेव्हा अमन, श्वेता पहिल्यांदा भेटले तेव्हा काहीतरी वेगळंच जाणवत होतं पण, नंतर आम्हाला गावच नाहीये हे आमच्या डोक्यातून कोणीतरी पुसून टाकल्या सारखं झालं... म्हणजे आपल्या विचारांवर आपलाच ताबा नाही, आपल्याला काहीतरी बोलायचं आहे पण बोलता येत नाही असं काहीतरी झालं होतं. मुलं चालली होती तेव्हा पण हे सांगायचं होतं पण तेव्हा पण काही बोलता आलं नाही आणि मग तो भाग डोक्यातून कधी पुसला गेला आणि आत्ता कसं पुन्हा आठवलं हे काही कळत नाहीये..." प्रवीण ची आई म्हणाली. 

"हो.. मला पण असंच काहीतरी होत होतं." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"बघा.. आता तरी विश्वास ठेवा.. त्या दोन्ही पिशाच्यांनी आधी पासनं त्यांच्या शिकारीची तयारी केली व्हती." हरीश म्हणाला. 

"असं पण असू शकतं ना ते लोक कोणत्यातरी मोठ्या टोळी साठी काम करतात आणि माणसं पळवून न्यायचं त्यांचं काम असेल... सगळ्यांनी आपापल्या घरी सगळं समान नीट आहे ना बघून घ्या आणि मग आपण पोलिसांची मदत घेऊ." समृध्दी चे बाबा म्हणाले. 

"नाही बाबा! आता कसं सांगू तुम्हाला? प्लीज विश्वास ठेवा ना..." समृध्दी रडकुंडीला येऊन बोलत होती. 

"एक मिनिट हे बघा... आम्ही बेटावर काही फोटो काढले आहेत ते तुम्हाला दाखवते.. तिथे खूप भयानक गोष्ट आम्ही बघितली आहे... आणि अजून काहीतरी दाखवते..." नम्रता म्हणाली आणि तिने प्रवीण ला काहीतरी खूण केली. 

प्रवीण आतल्या खोलीत गेला आणि नम्रता तोवर बेटावर ज्या विचित्र बाहुल्या वैगरे बघितलं होतं ते फोटो दाखवत होती. 

"हे सगळं काय आहे?" समृध्दी ची आई गोंधळून म्हणाली. 

"काकू! अहो त्या बेटावर अश्याच खूप बाहुल्या आहेत... खूप किळस येईल अश्या पण आहेत.. आणि या फक्त बाहुल्या नाहीत तर त्यांच्यात जीव सुद्धा आहे... याच बाहुल्या अमन, श्वेता च्या अपरोक्ष आमच्यावर नजर ठेवून असायच्या!" नम्रता ने सगळं सांगितलं. 

एवढ्यात प्रवीण आतल्या खोलीतून आला आणि नम्रता च्या हातात बाहुली दिली. 

"ही बाहुली! ही पण त्याच बेटावर होती. जिने आमची तिथून पळून यायला मदत केली. दीपा नाव ठेवलं आहे आम्ही..." नम्रता ती बाहुली सगळ्यांना दाखवत म्हणाली. 

"बघा आता पोरं पुरवा बी द्यायला लागली.. आता तर विश्वास ठेवा." हरीश म्हणाला. 

"एक मिनिट.. मी आलोच..." समृध्दी चे बाबा म्हणाले आणि ते थोडे बाजूला गेले. 

त्यांनी अमन, श्वेता ला फोन लावण्यासाठी मोबाईल बाहेर काढला... त्यांना फोन करण्यासाठी ते त्यांचा नंबर शोधू लागले... तर मोबाईल मध्ये असा कोणता नंबर नव्हताच! 

"हे कसं शक्य आहे? नाव सेव्ह आहे आणि नंबर? असा फक्त नंबर च कसा डिलीट होईल?" ते स्वतःशीच पुटपुटले. 

क्रमशः....
**************************
आता तरी मुलांच्या घरी हे सगळं खरं आहे हे पटेल का? मोबाईल नंबर डिलीट झाला असेल की ते नंबर शिवाय फोनवर बोलत होते? श्वेता ने जी बाहुली मुलांच्या राफ्ट वर फेकली होती ती अजुनही त्यांना मिळाली नाहीये... जेव्हा ती दिसेल तेव्हा काय होईल? मुलं पुन्हा बेटा कडे ओढली जाणार नाहीत ना? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all