एक बेट मंतरलेलं (भाग -१७) #मराठी_कादंबरी

Horror island story. Marathi horror kadambari. Ira blogging horror stories. Story of college friends. Dalls island.

एक बेट मंतरलेलं (भाग -१७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
अमन आणि श्वेता कडे आता साधारण १५ दिवस तर होतेच मुलांना इथे पुन्हा बोलवून घ्यायला म्हणून दोघांना आता बरं वाटत होतं. श्वेता ला पूर्ण खात्री होती तिने मुलांच्या मागावर सोडलेली बाहुली नक्की तिचं काम करणार.

"हे रक्त पिशाच्च! आम्ही तोवर काय करायचं? बेटावरून आम्ही बाहेर पाऊल ठेवू शकू का या पंधरा दिवसात?" अमन ने विचारलं.

"नाही.... आता फक्त बळी देऊनच नाही तर अजून काही विधी या पंधरा दिवसात तुम्हाला दोघांना करावे लागतील तरच तुम्ही दोघं सर्वशक्तीमान व्हाल..." त्या मूर्तीतून आवाज आला.

"कसले विधी? आम्ही दोघं काहीही करायला तयार आहोत... तुम्ही सांगा..." श्वेता उतावीळ होत म्हणाली.

"हे सोपं नसेल एवढं लक्षात ठेवा... जर या विधी मध्ये चूक झाली तर तुम्ही दोघं सुद्धा माझ्यासारखे मूर्ती बनून राहाल... त्यामुळे सावध रहा.." रक्त पिशाच्च दोघांना सावध करत म्हणालं.

श्वेता आणि अमन नी एकमेकांकडे बघितलं आणि "आम्ही तयार आहोत..." असं एकाच सुरात म्हणाले.

"नीट ऐका... या पंधरा दिवसात तुम्हाला काहीही खाता - पिता येणार नाही आणि रक्त तर अजिबातच नाही! तुम्हा दोघांना सतत इथे दिवस रात्र जागून आपल्या कुमंत्रांचा जप करावा लागेल. इथल्याच प्राण्यांचा आणि धुळीचा वापर करून सैतान तयार करून जप करताना तुमच्या रक्ताचा अभिषेक त्यावर करावा लागेल." रक्त पिशाच्याने सगळं सांगितलं.

"ठीक आहे.. आम्ही करू..." दोघं एका सुरात म्हणाले.

"जेव्हा अभिषेक पूर्ण होईल तेव्हा तुम्ही ज्या माणसांचं शरीर धारण केलं आहे ते गळून पडेल आणि तुम्ही कायम फक्त आणि फक्त पिशाच्च अवतारात राहाल. जसं जसं शरिरातलं रक्त संपेल तसा तसा तुमचा अवतार पूर्ण पिशाच्च अवतार होईल..." त्या मूर्ती ने सांगितलं.

"ठीक आहे! नंतर आम्ही पुन्हा शरीराचा ताबा मिळवू... आत्ता सध्या आमच्यासाठी आणि तुमच्या मुक्ततेसाठी सर्वशक्तीमान होण्याची जास्त गरज आहे." अमन म्हणाला.

"हीच अपेक्षा होती. जा... लागा विधीच्या तयारी ला.... सगळीकडे अंधाराचं राज्य पसरलं पाहिजे... हा... हा.. हा..." त्या मूर्तीतून पुन्हा आवाज आला.

दोघांनी त्या मूर्तीला नमस्कार केला. विधी सुरू करण्याआधी त्या मूर्तीतून येणारं रक्त प्रसाद म्हणून घेतलं आणि लगेचच त्या विधीची तयारी करायला सुरुवात केली.
*************************
तिकडे मयुर ला आता बरं वाटत होतं आणि मुलांचा चहा, नाश्ता सुद्धा झाला होता. एव्हाना सकाळचे आठ - सव्वा आठ वाजले होते.

"काकू! आता आम्ही खरंच निघतो.... हे जे काही झालं आहे ते घरी लवकरात लवकर सांगितलं पाहिजे." नम्रता म्हणाली.

"व्हय... घरच्यांना नीट समदं सांगा.. अन् काळजी घ्या समदे..." गंगा म्हणाली.

"पोरांनो! तूमी एकटे जायाचं नाय मी येतोय सोडायला.." हरीश म्हणाला.

"काका! आम्ही जाऊ..." प्रवीण म्हणाला.

"ते काय नाय... एकदा तुमासनी घरला सोडलं की माझ्या जिवाला घोर नाय..." हरीश म्हणाला.

"बरं... चला तुम्ही..." प्रवीण म्हणाला.

मुलं आता घरी जायला निघाली. सगळं सामान घेऊन सगळे बाहेर आले... नम्रता ने गंगा ला नमस्कार केला.

"चला काकू... गौरी च आवरलं की हे द्या तिला माझ्याकडून भेट..." नम्रता गंगा च्या हातात चॉकलेट ठेवत म्हणाली.

सगळ्यांनी गंगा चा निरोप घेतला आणि  ते परतीच्या वाटेला लागले. आता फक्त ट्रेन चा प्रवास बाकी होता. कधी एकदा घरी पोहोचतोय असं सगळ्यांना झालं होतं. हे जे काही घडलं होतं ते एवढं वेगात आणि भयंकर पद्धतीने घडलं होतं की कोणाच्या घरी कळवावं हे डोक्यात सुद्धा आलं नव्हतं. कोणाच्या डोक्यात आलं असतं तरी उगाच आत्ता पासून आई - बाबांना डोक्याला त्रास नको म्हणून कोणी कळवलं नसतं! सगळे आपापल्या विचारात नुसते प्लॅटफॉर्म वर उभे होते... कोणीही काहीही बोलत नव्हतं. थोड्याच वेळात ट्रेन आली! लगेच सगळे समोर असलेल्या डब्यात चढले. त्यात सकाळची वेळ! जरा जास्तच गर्दी होती गाडीला. कसंबसं आत चढून एका कोपऱ्यात उभं राहायला जागा मिळाली होती. पण, मुलांना आज गर्दीचं असं काही विशेष वाटत नव्हतं. एरवी ट्रेन ला गर्दी असली की ट्रेन मध्येच उभ्या उभ्या झोपणारे लोक, ऑफिस चे कॉल घेणारे, वेब सीरिज किंवा यूट्यूब बघणारे लोक, ppt बनवताना होणारी कसरत सगळं मुलं बघत बघत प्रवास करायची. पण, आज या कोणत्याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सगळे आपापल्या विचारत उभे होते.

"नमु! घरी गेल्यावर आई - बाबा प्रश्नांचा भडिमार सुरू करतील. काय करायचं?" समृध्दी ने विचारलं.

"काही नाही... जे आहे ते खरं सांगायचं." नम्रता एकदम ठामपणे म्हणाली.

"अगं पण त्यांचा विश्वास बसायला हवा ना.." मयुर म्हणाला.

"हो! मान्य आहे हे विश्वास न बसण्यासारखं आहे. पण, आपण खरं सांगायचं. अरे शेवटी आपलेच आई - बाबा आहेत ते! त्यांना आपली काळजी आहे... ठेवतील ते विश्वास!" नम्रता म्हणाली.

"व्हय... ही बरोबर बोलतेय. मी बोलेन की तुमच्या आई - बापाशी!" हरीश म्हणाला.

"एक काम करुया... आपण स्टेशन ला उतरलो की आपापल्या आई - बाबांना आपल्या घराजवळ ग्राउंड आहे तिकडे बोलवूया." प्रवीण म्हणाला.

"हो चालेल.... अरे पण आपल्या कोणाच्याच मोबाईल ला चार्जिंग नाहीये... फोन चार्ज करायचं डोक्यात पण आलं नाही." समृध्दी म्हणाली.

"माझा फोन हाय की! त्यावरून फोन करून घ्या बोलवून..." हरीश म्हणाला.

"चालले... थँक्यू काका!" समृध्दी म्हणाली.

आता पुढच्या स्टेशन वर उतरायचं म्हणून दाराजवळ रांगेत जाऊन सगळे उभे राहिले. आपण घरी लवकर आलो आहोत तेही तिकडून पळून! श्वेता, अमन पिशाच्च आहेत हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. हे एक वाईट स्वप्न असावं आणि आपण खाडकन जागं व्हावं असं त्यांना वाटत होतं. या सगळ्या विचारातच स्टेशन आलं. गर्दीच्या आवाजाने आणि धक्क्यांमुळे सगळे भानावर आले आणि ट्रेन मधून उतरले. अजूनही तिथे बरीच गर्दी होती म्हणून सगळे स्थानकाबाहेर आले.

"हे घ्या पोरांनो! तुमच्या घरी फोन लावा." हरीश त्याचा मोबाईल मुलांपुढे करून म्हणाला.

"नम्रता! तू तुझ्या घरी सांग.... तुझ्याच आईला सगळ्यांना ग्राउंड जवळ घेऊन यायला सांग." प्रवीण म्हणाला.

नम्रता ने "बरं" म्हणून मोबाईल घेतला आणि घरी फोन लावला.

"हॅलो! आई..." नम्रता बोलताना थोडी भावूक झाली होती.

"नम्रता! अगं कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? तुझा आवाज का असा येतोय? हा नंबर? हा कोणाचा आहे?" तिच्या आई ने तिचा जड झालेला आवाज ओळखला होता आणि दोन दिवसांनी असा अचानक वेगळ्याच नंबर वरून फोन आल्यामुळे तिने काळजीने विचारलं.

"आई.. आई.. सगळं सांगते... आम्ही इथे स्टेशन ला आहोत... तू सगळ्यांच्या आई - बाबांना घेऊन ग्राउंड जवळ ये... आम्ही येतोय... काही काळजी करू नकोस.. येऊन सांगते सगळं..." नम्रता ने स्वतःला कसंबसं सावरत तिच्या आईला सांगितलं.

"बरं... या सगळे.... पण, नक्की काही काळजी करण्यासारखं...." तिची आई बोलत होती. तिचं बोलणं मध्येच तोडत नम्रता म्हणाली; "अगं आई नको टेंशन घेऊ... आम्ही येतोय... सगळे छान आहेत आणि सुखरूप आहेत... आता फोनवर नको तिकडे येऊनच बोलतो आम्ही सगळे."

"बरं या लवकर..." नम्रता ची आई म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

"काय ग? काय म्हणाली आई?" प्रवीण ने विचारलं.

"काही नाही... असं अचानक आपण परत आलो आहोत आणि वेगळ्या नंबर वरून फोन केला म्हणून तिला काळजी वाटत होती. येतेय ती सगळ्यांच्या आई - बाबांना घेऊन..." नम्रता ने सांगितलं.

सगळे आता घरी जायला निघाले. स्टेशन पासून पाच मिनिटं चालत गेल्यावर त्यांचं घर होतं म्हणून सगळे चालत निघाले. रस्त्याने सुद्धा कोणी काही बोलत नव्हतं.

"पोरांनो! अरे असं गप का? चेहरे बघा समद्यांचे पार उतरले हायत!" हरीश मुलांचे पार सुकून गेलेले चेहरे पाहून म्हणाला.

"नाही ओ काका... सतत आम्हाला तिकडे काय झालं ते आठवतंय... काही केल्या ते सगळं डोळ्या समोरून जातच नाहीये... काय करू?" मयुर म्हणाला.

"हो रे! पर असं तोंड पाडून कसं चालल? तिथं तुमचे आई - बाप वाट बघत उभे असतील.. त्यासनी तुमचं असं पडलेलं तोंड बघून अजून काळजी न्हाई वाटणार का?" हरीश ने मुलांना समजावलं.

"हो काका! तुमचं सगळं पटतंय... पण, तिथे आम्ही जे काही बघितलं आहे ना ते आठवलं तरी अंगावर काटा येतोय... उगाच तिथे गेलो असं वाटतंय..." समृध्दी म्हणाली.

"बघ पोरी, आता जे झालं ते झालं.. ते काही कुणी बदलू शकतं का? न्हाई ना? मग... आता नका जास्त विचार करू त्या गोष्टीचा... घरी गेलात की काही न्हाई होणार..." हरीश म्हणाला.

हरीश च्या बोलण्यात तथ्य तर होतं. कसंबसं मुलांनी स्वतःला जरा नॉर्मल केलं. आधी पेक्षा तरी जरा बरे वाटत होते सगळे. थोड्याच वेळात मुलं घराजवळ असलेल्या ग्राउंड पाशी पोहोचत आले. तिथे नम्रता च्या आई नी सगळ्यांना बोलवून घेतलं होतंच! सगळे मुलांचीच वाट बघत उभे होते. जसं सगळ्यांनी आपापल्या आई - बाबांना बघितलं तसे सगळे पळत जाऊन त्यांना बिलगले.

"अरे... काय झालं? अमन दादा आणि श्वेता ताई कुठे आहेत? तुम्ही सगळे परवा परत येणार होतात ना? काय झालं आहे?" समृद्धीच्या आई ने समृध्दी ला कुरवाळत विचारलं.

तिच्या प्रेमळ स्पर्शाने आणि मायेने विचारलेल्या शब्दांमुळे तिला रडू आलं.

"अगं काय झालं? अशी रडतेस काय? तू तर टॉम बॉय आहेस ना ग्रुपची?" तिचे बाबा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.

सगळीच मुलं घाबरलेली होती आणि नक्कीच तिथे काहीतरी भयानक झालं आहे असं पालकांच्या लक्षात आलं.

"एक एक मिनिट... चला आपण ग्राउंड मध्ये बसुया... तिथे शांतपणे बोलता येईल..." नम्रता चे बाबा म्हणाले.

सगळे ग्राउंड मध्ये गेले. यावेळी सगळ्या मुलांनी आपापल्या आई - बाबांचे हात घट्ट धरून ठेवले होते. रस्त्याने येताना आणलेलं त्यांचं उसनं अवसान आई - बाबांना बघून गळून पडलं होतं.

"मी सांगतो काय झालं..." हरीश ग्राउंड मध्ये गेल्यावर म्हणाला.

सगळ्या पालकांनी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. मुलं जाताना अमन, श्वेता सोबत गेली आणि आता हा तिसराच कोण माणूस हे प्रश्न त्यांच्या नजरेत दिसत होते.

"तुमच्या समद्यांचा गोंधळ झाला असल मी कोन असा.. सांगतो समदं!" हरीश म्हणाला.

हरीश ने बोलायला सुरुवात केली तेव्हा कुठे मुलांच्यात थोडं बळ आलं. सगळे पालक आता हरीश काय सांगतोय याकडे लक्ष देऊन होते आणि अजूनही सगळ्यांनी आपापल्या पालकांचे हात घट्ट धरून ठेवले होते.

"मी हरीश... कोळी हाय.. काल रातच्याला ही मुलं मोठ्या तराफावरून समुद्रात प्रवास करत व्हती. मुलांनीच आमचं ध्यान खेचून घेतल अन् मी आणि माझा भाऊ मदतीला गेलो." हरीश ने सगळं सांगायला सुरुवात केली.

"तराफ? अरे मुलांनो तुम्ही एकटे का निघालात तिकडून? भीती वाटत होती का? मग अमन दादा आणि श्वेता ताई ला सांगायचं ना घरी घेऊन यायला... समुद्रात ती राफ्ट तग धरून राहिली म्हणून आणि हे काका तुम्हाला भेटले म्हणून बरं... नाहीतर काय झालं असतं..." मयुर ची आई काळजीने म्हणाली.

"त्या पोरसनी काय बी नका बोलू... त्या समद्यांनी जे केलं ते बरं केलं..." हरीश म्हणाला.

त्याच्या या वाक्याने सगळ्यांनी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. नम्रता च्या आईला वाटलं आपल्याला जी शंका आली होती ती खरी ठरली की काय असा विचार तिच्या मनात एकदा चमकून गेला.

क्रमशः....
************************
मुलं त्यांच्या आई - बाबांना तर भेटली. पण, जेव्हा सत्य त्यांच्या घरी समजेल तेव्हा ते यावर विश्वास ठेवतील का? मयुर ला जसा हरीश च्या घरी त्रास झाला तसा पुन्हा झाला तर किंवा बाकी कोणाला तसं काही झालं तर? अमन, श्वेता ने जी बाहुली मुलांकडे सोडली आहे तिने तिचं काम केलं आणि मुलं पुन्हा त्या बेटावर गेली तर? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all