एक बेट मंतरलेलं (भाग -१६) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -१६) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
मयुर ची ही अवस्था बघून सगळेच थोडे घाबरले होते पण, त्याच्या समोर आपण सुद्धा घाबरलो आहोत हे दाखवून चालणार नव्हतं. मयुर च्या हे जरा जरी लक्षात आलं असतं तरी त्याचा होता नव्हता तो धीर संपला असता म्हणून सगळे काळजी घेत होते. मयुर डोळे मिटून बसला होता. नक्की त्याला काय होतंय हेच त्याला कळत नव्हतं. नम्रता त्याला बरं वाटतंय का विचारत होती पण, त्याचा काहीही रिस्पॉन्स येत नव्हता. 

"नम्रता! यार हा काहीही बोलत नाहीये.... काय झालं असेल?" समृध्दी काळजीने म्हणाली. 

"थांब बोलेल... त्याला बरं वाटेल आता.. काकू मला देव्हारा दाखवता का?" नम्रता ने समृध्दी ला समजावलं आणि काहीतरी विचार करून गंगा ला देव्हारा दाखवायला सांगितला.

"व्हय.. चल..." गंगा म्हणाली. 

दोघी पटकन घरात गेल्या. एका कोपऱ्यात छोटासा लाकडी देव्हारा होता. त्यात एकविरा आईची प्रतिमा, बाळ कृष्ण आणि एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती. लहान बल्ब, अखंड दिवा आणि उदबत्तीच्या सुवासाने देव्हारा दरवळून निघाला होता. नम्रता तिथे गेली. मनोभावे हात जोडून प्रार्थना करून तिथलं गंध घेऊन ती बाहेर आली. 

"मयुर... आता काही काळजी करू नकोस हा.. बरं वाटेल आता तुला..." ती त्याच्या बाजूला बसत म्हणाली. 

तिने लगेच त्याच्या कपाळाला गंध लावलं आणि थोडावेळ जप केला. आता मयुर च्या प्रकृतीत सुधारणा होतेय हे सगळ्यांना जाणवत होतं. 

"मला आता बरं वाटतंय... मगाशी खूप भीती वाटत होती आणि मनावर दडपण आल्यासारखं वाटत होतं! असं वाटत होतं की आपला आपल्या विचारांवर ताबा नाहीये... पण, आता जरा ठीक वाटतंय..." मयुर म्हणाला. 

"चला तुला बरं वाटतंय ना मग झालं.." प्रवीण रिलॅक्स होत म्हणाला. 

या सगळ्या गडबडीत साधारण सव्वा सहा वाजून गेले होते. हळूहळू सूर्य उगवायला लागला होता आणि त्याची किरणं मुलांच्या आयुष्यात नवीन उमेद निर्माण करत होती. मयुर ला खरंच आपल्याला एवढा त्रास झाला होता हे आता खरं वाटत नव्हतं. तो आधी सारखा नॉर्मल मजा मस्ती करणारा कधी झाला हे त्याचं त्याला समजलं सुद्धा नाही. 

"पोरी.. तुझ्या हातात जादू हाय बघ... आज तुमी समदे फक्त तुझा देवावरचा विश्वास हाय त्या बळावरच इथवर आलात...." गंगा हा सगळा प्रकार पाहून नम्रता ला म्हणाली. 

"असं काही नाही काकू! सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रयत्न केले म्हणून आम्ही तिथून पळू शकलो... आणि बाप्पाचं म्हणाल तर तो तर आपल्या सगळ्यांना मदत करतच असतो.. फक्त आपण ती ओळखण्याची गरज असते. एकदा का त्याच्यावर विश्वास टाकला की काहीही शंका मनात आणायची नाही... मग हाक न मारता सुद्धा तो येतो मदतीला..." नम्रता एकदम भरभरून बोलत होती. 

"एवढ्या कमी वयात किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस... तुझे आई - बाप नशीबवान हायत! त्यांना अशी गोड मुलगी मिळाली." हरीश म्हणाला. 

स्तुती नम्रता ची होत असली तरी आनंद सगळ्यांना होत होता विशेषतः प्रवीण ला जास्त! तो सतत तिच्याच चेहऱ्याकडे बघत होता. रात्रीचा एवढा थकवा आणि अर्धवट झोप झाली असली तरी नम्रता चा चेहरा मात्र एकदम प्रसन्न, टवटवीत आणि नेहमी सारखा सात्विक दिसत होता. तिच्या नजरेत असणारा बाप्पा विषयी चा विश्वास, सगळ्यांची काळजी आणि प्रेम लगेच दिसून येत होतं. तिच्या याच साधेपणा च्या प्रेमात तर प्रवीण पडला होता! आणि आता तिला असं एकदम तजेलदार पाहून तर त्याची विकेटच पडली होती. समृध्दी आणि मयुर च्या नजरेतून हे सुटलं नव्हतं. त्या दोघांनी एकमेकांना इशारा करून दोघांनी एकदम त्याला कोपाराने हळूच ठोसा दिला. तिथे गंगा आणि हरीश होते म्हणून त्यांची तोंडं बंद आहेत नंतर मात्र आपल्याला हे चिडवणारच! हे प्रवीण ला चांगलंच समजलं होतं. तो आता नम्रता वरून नजर हटवून खाली मान घालून बसला होता. सगळे असेच बसले होते एवढ्यात गंगा म्हणाली; "बघा.. मी बोलत काय बसले... आता सकाळ झालीच हाय तर पोरांच्या चा पाण्याचं बघते...." असं म्हणत ती उठून घराकडे निघाली. 

"काकू.. काकू... राहुदे... आता आम्ही निघतो आहोत. तुम्ही आमच्यासाठी खूप केलत... एवढ्या रात्री काकांनी बोटीतून इथपर्यंत आणलं, रात्री राहायला ओसरी दिली, खाऊ दिला आणि सकाळी मयुर ला त्रास होत होता तेव्हा पण त्याला सावरायला मदत केलीत. खरंच धन्यवाद. आता आम्ही येतो..." प्रवीण एकदम कृतज्ञतेने त्या दोघांना म्हणाला. 

"न्हाई... न्हाई... असं कसं... असं उपाशी पोटी घराबाहेर जायचं नसतं... बसा गुमान... चा अन् चपाती आणते.. खाऊन घ्या.. अंघोळी करा अन् मग निवांत जा घरला..." गंगा म्हणाली आणि मुलांचं काहीही न ऐकता आत गेली. 

सगळे तिथे अंगणातच बसले होते. नाही म्हणलं तरी अजूनही सगळ्यांना मयुर ची काळजी वाटत होतीच! 

"अरे सगळे असे का बसला आहात... मी आता बरा आहे..." मयुर सगळ्यांना शांत पाहून म्हणाला. 

"तू बरा आहेस हे चांगलंच आहे.. पण, काही त्रास होत असेल, डोकं दुखत असेल तर सांग.." नम्रता म्हणाली. 

"अगं नाही... खरं मी एकदम ठणठणीत आहे. आधी तुम्ही सगळ्यांनी जे टेंशन घेतलं आहे ना ते सोडून द्या..." मयुर म्हणाला. 

"व्हय पोरांनो... त्याला आता काय बी व्हत नसल... नका काळजी करू..." हरीश ने सुद्धा सगळ्यांना समजावलं. 

एवढ्यात गंगा ने त्याला हाक मारली म्हणून तो घरात गेला. आता अंगणात फक्त हे चौघेच होते. 

"समृध्दी... तुला एक गोष्ट माहितेय?" मयुर अचानक खोड काढण्याच्या स्वरात म्हणाला. 

"काय रे काय?" समृध्दी सुद्धा त्याला साथ देत म्हणाली. 

नम्रता ला हे दोघं अचानक असे काय बोलायला लागले हे समजलं नाही... ती त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. पण, प्रवीण ला मात्र कळून चुकलं होतं मगाशी आपण नम्रता ला निरखून पाहत होतो त्यावरून आता आपल्याला हे दोघं चिडवणार आहेत. 

"मी... मी सांगतो..." प्रवीण मयुर काही बोलायच्या आधीच पटकन म्हणाला. 

समृध्दी आणि मयुर गालातल्या गालात हसत होते आणि नम्रता मात्र गोंधळून गेली होती. मयुर काही पचकायच्या आत आपणच काहीतरी बोलावं म्हणून तो बोलू लागला; "एक होता कावळा, एक होती चिमणी पण दोघांचा कॉमन बेस्ट फ्रेंड होता पोपट!... म्हणून, त्यांनी पाऊस येण्याआधीच पोपटाच्या ढोलीत स्वतःचं घर शिफ्ट केलं होतं... झाली गोष्ट..." प्रवीण काहीतरी बडबडला आणि हसायला लागला. 

सगळे त्याच्या तोंडाकडे बघत होते.. नक्कीच आपण अती फालतू विनोद केला आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो हसायचा थांबला. तसे बाकीचे हसायला लागले.. 

"गप रे... काहीही काय? पोपट कॉमन बेस्ट फ्रेंड म्हणे.." नम्रता तिचं हसू दाबत म्हणाली. 

"आता झाले असतील फालतू विनोद तर एेका जरा... समृध्दी अगं तुला माहितेय! मगाशी ना कोणीतरी कोणाकडे तरी एकदम टक लावून बघत होतं..." मयुर एकदा प्रवीण कडे आणि एकदा नम्रता कडे बघत दोघांना चिडवण्याच्या सुरात म्हणाला. 

"हो.. हो... मी पण बघितलं होतं..." समृध्दी त्याला साथ देत होती. 

एवढ्यात गंगा आणि हरीश बाहेर येताना त्यांना दिसले म्हणून ते दोघं गप्प बसले. नम्रता ला अजूनही हे नक्की काय चालू आहे समजलं नव्हतं. तर प्रवीण ने एक सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण, मयुर ची बोलण्याची पद्धत बघून तो आता खरंच बरा आहे याची सगळ्यांना खात्री पटली होती. 

"पोरांनो.. हे घ्या... चार घास खाऊन घ्या.. काही लागलं तर सांगा.. लाजू नका.." गंगा सगळ्यांच्या पुढ्यात चहा, पोळी ठेवत म्हणाली. 

हरीश सुद्धा मुलांच्यात बसला आणि गंगा घरात जायला निघाली. 

"काकू.. तुम्ही पण घ्या ना चहा... चला मी येते तुमच्या मदतीला..." नम्रता म्हणाली. 

"अगं नग.. आधी गौरी ला उठवते... सात वाजून गेले... बाकी कामं बी हातासरशी उरकून घेते.. तू बैस.. निवांत चा पी!" गंगा नम्रता ला समजावत म्हणाली. 

"एक काम करा आज तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा आणते... रोज तुम्हीच करता ना.. एक तरी दिवस आयाता चहा प्या.." नम्रता म्हणाली. 

"बरं बाई... चल चा पत्ती अन् साखरेचा डबा दावते तुला..." गंगा म्हणाली आणि नम्रता सोबत आत गेली. 
*************************
तिकडे श्वेता आणि अमन ला मुलं त्यांच्या जाळ्यातून पळाली आहेत हे समजलं होतं आणि म्हणून त्यांचा अकांड तांडव सुरू होता. अमन तर अक्षरशः झाडं मुळापासून उपटून फेकत होता. श्वेता चा सुद्धा राग प्रचंड अनावर झाला होता! ती सुद्धा तिथे असणाऱ्या दगडावर जोर जोरात हात आपटून त्याचे बारीक तुकडे करत होती. एवढ्यात तिथे अर्धी फाटलेली, एक हात आणि एक पाय नसलेली, एक डोळा नसलेली आणि तोंडातून रक्त येणारी अशी एकदम किळसवाणी बाहुली आली. 

"तुला अजुन फाडून टाकेन... बाजूला हो..." श्वेता किंचाळून म्हणाली. 

ती किंचाळून बोलल्यामुळे तिच्या मानेच्या नसा खूपच फुगल्या होत्या, डोळे रक्ताने भरले होते आणि सुळे बाहेर आले होते. 

"नाही.. नको... पण, तुम्ही दोघं असा त्रास करून घेऊ नका... मुलं इथे पुन्हा येतील.. तुम्हीच तर ती व्यवस्था करून ठेवली आहे..." ती बाहुली कचरत म्हणाली. 

तिच्या या बोलण्याने श्वेता ला आपण हे कसं विसरलो म्हणून आश्चर्य वाटलं. इतकावेळ रागात आरडा ओरडा करणारी ती आता खूप भयानक हसू लागली होती. 

"वेड लागलं आहे का तुला? आपली सर्वशक्तीमान होण्याची स्वप्न इथे धुळीला मिळतायत आणि तू हसतेस..." अमन रागावून म्हणाला. 

"तसं काहीही होणार नाहीये.... आपलं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार.... हा.. हा.. हा..." श्वेता पुन्हा एकदम भकास हसत म्हणाली. 

"कसं? ती पोरं काही परत स्वतः हुन येणार आहेत का? आपण आता बेटाच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही ठेवू शकत...." अमन पुन्हा रागावून  म्हणाला. 

"आपण नाही ठेवू शकत पण आपलं सैन्य? ते तर ठेवू शकतं ना?" श्वेता म्हणाली. 

"म्हणजे? नक्की काय म्हणायचं आहे तुला?" अमन आता थोडा शांत झाला होता. 

"म्हणजे आपलं काम झालच आहे... जेव्हा आपण मुलाच्या राफ्ट पाशी होतो तेव्हा नम्रता ने अंगारा आपल्या अंगावर टाकण्या आधी मी एक बाहुली त्यांच्याकडे भिरकावली होती. ती नक्कीच आपलं काम करेल... त्या बाहुली मध्ये विशिष्ट शक्ती आहेत! ज्या त्या मुलांना इथे खेचून आणतील... हा.... हा... हा..." श्वेता खुश होत म्हणाली. 

आता अमन ला सुद्धा खूप आनंद झाला होता. त्यांचा खूप मोठा डाव यशस्वी झाला आहे आणि आता त्यांना सर्वशक्तीमान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही या आनंदात दोघं असूरी हसत होते. 

"ती मुलं येतील का पण एवढ्या लगेच? त्या तूझ्या बाहुली ला जर काम जमलं नाही तर?" अमन हसायचा मध्येच थांबला आणि त्याने त्याच्या शंका विचारल्या. 

"ती बाहुली काम तर नक्की करेल पण... पण, मुलं कधी येतील सांगता येत नाही..." श्वेता पण आता काळजीत पडली. 

"रक्त पिशाच्च!" दोघं एका सुरात म्हणाले आणि त्या पडीक घराकडे जायला वळले. 

त्यांच्या डोळ्यावर तर फक्त शक्तीमान होण्याची पट्टी बांधली होती. त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी होती. दोघं झपाझप पावलं टाकत तिथे पोहोचले. 

"हे रक्त पिशाच्च! आम्ही बळीची पूर्ण तयारी केली होती पण, बकरे पळून गेले आहेत... जर ते वेळेत परत नाही आले तर?" श्वेता ने विचारलं. 

"ही आमावस्या हातातून गेली तरी चालेल.. पण, येणारी पौर्णिमा हातातून जाता कामा नये.. नाहीतर अजून एक सहस्त्र वर्ष वाट पाहावी लागेल..." त्या मुर्तितून भारदस्त आवाज आला.  

क्रमशः...... 
****************************
मुलांना या संकटाची चाहूल जराही नाहीये... कसा बचाव होईल आता त्यांचा? मुलं घरी गेल्यावर जेव्हा घडला प्रकार सांगतील तेव्हा त्यांच्या घरचे विश्वास ठेवतील का? मुलं पुन्हा तिकडे ओढली जाणार नाहीत ना? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all