एक बेट मंतरलेलं (भाग -१५) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -१५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
तिकडे श्वेता आणि अमन पुन्हा अपवित्र होण्याच्या विधींवर लक्ष देऊन त्यात व्यस्त झाले होते. मुलं कधीच त्यांनी निर्माण केलेल्या जाळ्यातून सुटून बाहेर पडली आहेत याची जराही कल्पना त्यांना नव्हती. आपण मुलांच्या राफ्ट ला भूल दिली आहे आणि त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर ते जाऊ शकणार नाहीत असाच त्यांचा गोड गैरसमज होता.

"लवकर आपले विधी पूर्ण करून त्या बळीच्या बकऱ्यांना आणायला गेलं पाहिजे... आपली भूल चुकवून पळाले तर ही अामावस्या हातची जाईल..." अमन दात ओठ खात थोडा रागावून म्हणाला.

"काहीही होणार नाही..... गेले तरी त्यांना कसं आणायचं हे मला माहितेय.... त्याची सोय सुद्धा करून ठेवली आहे.... पण, ती वेळ येणारच नाही.... हा... हा... हा...." श्वेता कर्णकर्कश्श किंचाळत म्हणाली.

संपूर्ण बेटावर त्या दोघांचा भयाण आवाज घुमत होता. सगळीकडे अंधाराचं, वाईट शक्तींचं राज्य पसरवायचं या असूरी इच्छेने त्या दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्यांच्या वरचढ कोणीही नाही आणि कोणी होऊ नये यासाठी त्यांचा सगळा खटाटोप सुरू होता. पुन्हा दोघं त्यांच्या विधिकडे वळले.

"हे रक्त पिशाच्च! आम्हाला तुमची अपवित्रता, कूविद्या आणि अघोरी शक्ती प्रदान करा!" श्वेता आणि अमन एका सुरात दोन्ही हात त्या मूर्ती पुढे करून जोरात किळसवाण्या आवाजात ओरडून म्हणाले.

लगेचच त्या रक्त पिशचाच्या तोंडातून जो रक्त स्त्रोत वाहत होता तो एखाद्या फवाऱ्या सारखा दोघांच्या अंगावर उडला! दोघंही अगदी पूर्णपणे त्या रक्ताने माखले होते. त्याच अवस्थेत दोघांनी एकमेकांना नखांनी ईजा करून भरपूर जखमा करून घेतल्या! इतके खोल आणि तीक्ष्ण वार ते होते की दोघंही खूप जोरात किंचाळत होते. रागाने पार लाल झालेले त्यांचे डोळे, अश्रुरुपी रक्त आणि नसानसात खूप क्रोध वाहत होता.

"तुमच्या दोघांचा एक टप्पा पार झाला आहे... स्वार्थासाठी काहीही करता येऊ शकतं, राग हे एक शस्त्र आहे हे तुम्ही दाखवून दिलं आहे..." त्या रक्त पिशाचाच्या मुर्तीतून एकदम भारदस्त आवाज आला.

त्यातून आवाज आला तसे दोघं एकमेकांना मारायचे थांबले. दोघांनी एकमेकांना एवढं जखमी केलं होतं की, जर त्या मूर्ती मधून आवाज आला नसता तर दोघांनी एकमेकांचे लचकेच तोडले असते!

"पुढचा टप्पा काय असेल रक्त पिशाच्च!" अमन ने किंचाळून विचारलं.

"आता पोटभर खाऊन घ्या आणि मग त्या राहिलेल्या कातड्या पूर्णपणे गरम करून तशाच जखमांवर लावून घ्या! मग तुम्ही दोघं अपवित्र व्हाल...." त्या मूर्ती ने सांगितलं आणि आवाज यायचा बंद झाला.

लगेचच दोघांनी तिथून सरपटणारे साप, पाली आणि विंचू खाल्ले... पोटभर खाऊन झाल्यावर त्या सगळ्या काताड्यांना पूर्ण गरम करून जखमांवर चीकटवलं! आधीच अर्धी जळलेली त्वचा, नखांच्या ओरबडण्याने झालेल्या खोल जखमा, त्यात सुकेलेलं रक्त आणि आता ही गरम गरम कातडी! यामुळे दोघांनाही या पिशाच्च जन्मात सुद्धा नरक यातना सहन कराव्या लागत होत्या.

"आपल्या या अवस्थेला ती नम्रता कारणीभूत आहे! आजवर आपण आपली अपवित्रता कायम जपली... पण, तिच्या मुळे हे भोगावं लागलं..... एकदा हाती लागुदे!..." श्वेता हाताच्या मुठी घट्ट आवळून जोरात म्हणाली.

यामुळे तिच्या मानेच्या नसा अजून ताणल्या जात होत्या, मुठ एवढी घट्ट केली होती की तळहातात नखं रुतत होती आणि डोक्यातून वाफा निघत होत्या!

"शांत हो.... तुला आता स्वतःला त्रास करून घेण्याची गरज नाहीये... त्या मुलांचे शेवटचे क्षण जगून घेऊदे त्यांना..." अमन तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला.

तरीही तिचा त्रास कमी होत नव्हता. रागाने तिचं शरीर पोखरून निघत होतं. अंगातून जाळ निघत होता, म्हणून लगेच अमन ने तिच्या डोक्यावर पाणी ओतलं! त्या पाण्याची वाफ बनली आणि ती थंड झाली.

"आपण पिशाच्च असलो तरी एवढा राग बरा नाही.... चल आता पुढच्या कामाला लागू." अमन थोडा रागावून तिला म्हणाला.

लगेचच दोघं पुन्हा बळीची तयारी करण्यासाठी गेले.
*************************
दुसरीकडे मुलं हरीश आणि मंगेश च्या घराबाहेर बसली होती. अजून सूर्य उगवायचा होता तरीही कोळी बांधवांची गडबड सुरू झाली होती. बोटी परतीच्या वाटेला लागून पोहोचत आल्या असणार आणि म्हणूनच ते मासे विकायला घेऊन जाण्याची घाई सगळीकडे दिसत होती. एवढ्यात हरीश ची बायको गंगा चटणी, भाकरी घेऊन आली.

"हे घ्या... आव ही पोरं कोन?" तिने हरिशच्या हातात चटणी भाकरी देत मुलांना बघून विचारलं.

"सांगतो... पोरांनो तुम्ही समद्यांनी खाऊन घ्या आधी..." हरीश म्हणाला आणि त्याने आधी मुलांना खायला दिलं.

खूप दमल्यामुळे आणि दिवसभर काहीही न खाल्ल्यामुळे सगळ्यांना भूक लागली होतीच. लगेचच सगळ्यांनी खायला सुरुवात केली. हरीश ने गंगा ला बाजूला घेऊन जाऊन जे काही घडलं ते सगळं सांगितलं.

"आर देवा! बरं झालं बघा इथं आणलत पोरांना.. बिचारी किती भुकेली हायत अन् घाबरली बी हायत!" गंगा म्हणाली.

"व्हय! आता समद्यांना जरा इथं पडू दे... सकाळच्या ला त्यांच्या त्यांच्या घरला सोडून येऊ मी अन् मंगेश!" हरीश म्हणाला.

"बरं..." गंगा म्हणाली.

ते दोघं पुन्हा मुलांपाशी आले. तोवर मुलांचं खाऊन झालं होतं.

"पोरांनो अजून काही हवं आहे का? लाजू नका.. आपलंच घर समजा.." मंगेश ने विचारलं.

"नाही काका! झालं... आमचं पोट भरलं... थँक्यू..." मयुर म्हणाला.

"बरं पोरांनो आता समदे थोडावेळ जरा पडा!... मंगेश भाऊजी जरा ती मागची खाट इथं घ्या ना..." गंगा म्हणाली.

मंगेश ने कोपऱ्यात ठेवलेली खाट तिथे घेतली. लगेच गंगा ने घरीच जुन्या साडी आणि कपड्यांपासून बनवलेली उशी आणि गोधडी आणून दिली.

"पोरांनो तुमी इथं झोपा... पोरींनो चला तुमी..." गंगा म्हणाली आणि नम्रता, समृध्दी ला घेऊन घरात घेऊन गेली.

चौघे खूपच दमले होते पडल्या पडल्या लगेचच त्यांचा डोळा लागला. दिवसभराची धावपळ, जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढणं आणि सोबतच एकमेकांना सावरणं या सगळ्यात त्यांच्या शरीरा बरोबर मेंदू सुद्धा दमला होता. म्हणूनच मुलांना जरा शांत झोप मिळावी या विचाराने गंगा आणि हरीश बाहेर अंगणात येऊन बसले होते. तर मंगेश दुसऱ्या कोळी बांधवांकडून मासे घेऊन बाजारात जावं या विचाराने गेला.

"एकविरा आईची पण कमाल हाय बघ... आमी कधी त्या बेटाच्या बाजूनं फिरकत न्हाई.. पर आज काय बुध्दी झाली अन् तिकडे गेलो तर ही पोरं भेटली... आमी गेलो म्हणून न्हाई तर अजून बिचारे तिथंच अडकले असते..." हरीश थोडा भावूक होत म्हणाला.

"व्हय! बरं केलंत तुमी यांना आपल्या घरला आणलं.... किती निरागस हायत! अगदी आपल्या गौरी वानी... थोडावेळ तर मला या पोरांच्या जागी आपली गौरी असती तर काय झालं असतं या विचारानं कापरच भरलं व्हतं बघा..." गंगा म्हणाली.

"होय... त्योच विचार करून समद्यांना इथं आणलं बघ..." मंगेश म्हणाला.

"बरं ते नव्हं पर ही पोरं राहायला कुठं अन् त्या शापित बेटा कडं का गेलती?" गंगा ने विचारलं.

"एवढं काही बोलणं झालं नाही बघ... पोरं घाबरली व्हती म्हणून कुठं राहायला ते काही विचारलं नाही... पर फिरायला काय म्हणत्यात ते कांप का काय ते करायला गेलति तिकडं..." हरीश म्हणाला.

एवढ्यात त्या दोघांनी मयुर खाटेवरून कुठेतरी चालत चालला आहे हे बघितलं.

"आव हा काय झोपेत चालतोय का काय.. जरा बघा..." गंगा म्हणाली.

हरीश लगेच पळत त्याच्या जवळ गेला. मयुर चे डोळे बंदच होते... झोपेत तो काहीतरी पुटपुटत होता... पण, स्पष्ट ऐकू येत नव्हतं.

"आर पोरा... कुठं चाललास?" हरीश ने त्याला धरून विचारलं.

पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. मयुर ला काहीही जाणवत नव्हतं की त्याला कशाचं भान सुद्धा नव्हतं.

"गंगे! एक काम कर जा पाणी घेऊन ये..." हरीश म्हणाला.

गंगा ने लगेच तिथल्या माठातून पाणी आणलं. हरीश ने त्याच्या तोंडावर पाणी मारलं तसा मयुर खडबडून जागा झाला.

"काय झालं काका? मी... मी तिथे झोपलो होतो ना.. इथे कसा आलो? माझं डोकं जड होतंय..." मयुर दोन्ही हाताने डोकं दाबून गोंधळून म्हणाला.

"चल आधी बस... शांत हो.." हरीश त्याला आधार देत खाटे जवळ घेऊन जात म्हणाला.

गंगा ने त्याला पाणी प्यायला आणून दिलं. पूर्ण ग्लास त्याने घटाघटा पाणी पिल. अचानक त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती, घामाच्या धारा लागल्या होत्या आणि एक अनामिक भीती त्याला वाटत होती.

"काय झालं? तुला असं झोपेत चालायची सवय हाय का?" हरीश ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं.

"नाही काका! आजच असं का झालं माहीत नाही... मला खूप भीती वाटतेय... काय होतंय कळत नाहीये... सतत ते बेट डोळ्यासमोर येतंय.. तिथे जे काही बघितलं ते मला तिथे बोलवतंय.... खूप भीती वाटतेय मला..." मयुर रडकुंडीला येऊन म्हणाला.

"अरे अरे... शांत हो... इथं आमी समदे हाओत की! तुला कुणी कुठं बी घेऊन न्हाई जाणार..." हरीश ने त्याला कसंबसं समजावलं.

मयुर च्या सगळ्या गोंधळात प्रवीण ला सुद्धा जाग आली होती. एव्हाना साधारण पहाटेचे  साडेचार होऊन गेले होते.

"काय झालं मयुर? अरे किती घाबरला आहेस तू..." प्रवीण त्याच्या बाजूला खांद्यावर हात ठेवून बसून म्हणाला.

"अरे मला नाही माहित... पण, आपण त्या बेटा वरून पळून आलो असलो तरी वाचलो नाहीये असंच वाटतंय... कोणीतरी आहे जे आपल्याला पुन्हा तिकडे बोलवून घेणार... श्वेता, अमन आपला पिच्छा असा सोडणार नाहीत!" मयुर काळजीने म्हणाला.

एवढं बोलताना सुद्धा त्याला खूप धाप लागली होती आणि संपूर्ण अंगं घामाने भिजलं होतं. हात गार पडू लागले होते. त्याच्या अश्या वागण्याची काळजी प्रवीण ला लागली होती. त्याने कसंबसं त्याला शांत केलं... तो जर असाच काळजी करत राहिला असता किंवा त्याला अशीच भीती वाटत राहिली असती तर त्याचं बी.पी. शूट झालं असतं म्हणून त्याने मयुर ला हरीश च्या मदतीने व्यवस्थित खाटेवर झोपवलं. त्याचा हात चोळून, त्याला धीर देऊन त्याला झोपवलं.

"काकू प्लीज नम्रता ला उठवा ना... तीच आता काहीतरी करु शकते... याचे हात अजून थंड पडतायत..." प्रवीण काळजीने म्हणाला.

गंगा ने लगेच जाऊन नम्रता ला उठवलं. तिच्या सोबत समृध्दी सुद्धा उठून बाहेर आली. प्रवीण ने तिला मयुर बद्दल सगळं सांगितलं.

"थांब तू सरक... मी बघते..." नम्रता म्हणाली.

प्रवीण तिथून उठला आणि नम्रता त्याच्या बाजूला बसली. मयुर ला धड झोप लागली नव्हतीच! तो अर्धवट झोपेत काहीतरी बडबडत होता पण ते काही समजत नव्हतं.

"मयुर! मयुर उठ..." नम्रता ने त्याचा हात हातात घेऊन त्याला उठवलं.

तो सावकाश उठून बसला आणि तो घाबरलेला आहे हे बघून प्रवीण त्याचा एक हात हातात घेऊन त्याच्या बाजूला बसला.

"नम्रता! अगं माझं डोकं खूप जड झालंय ग! मला झोप लागत नाहीये नीट... सतत काहीतरी दिसतंय... नीट पुर्ण आठवत नाही पण ते बेटच आहे ते..." मयुर घाबरून न थांबता बोलत होता.

"हो... हो... तू आधी श्वास घे... काही नाही होणार तुला!" नम्रता ने त्याला शांत केलं.

तो शांत बसला होता तेवढ्या वेळात तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवून जप केला. मयुर चा एक हात प्रवीण च्या हातात होताच!

"नमु! आता याचा हात गार नाहीये... झाला नॉर्मल." प्रवीण आनंदाने म्हणाला.

"मयुर... आता बरं वाटतंय का?" समृध्दी ने विचारलं.

क्रमशः....
**************************
मयुर ला असं अचानक काय झालं असेल? त्याला आता बरं वाटत असेल ना? श्वेता, अमन ला समजलं असेल का हे सगळे तिकडून सुटले आहेत म्हणून तर हा त्रास झाला नसेल ना? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all