एक बेट मंतरलेलं (भाग -१४) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -१४) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
बरीच रात्र झाली होती आणि संध्याकाळचा  छान दिसणारा समुद्र आत्ता खूप भयानक वाटत होता. आकाशात धुकं दाटून आलं होतं. आपण बरोबर चाललो आहोत का हेच कळायला मार्ग नव्हता. 

"नमु यार जाम भीती वाटतेय... एकतर काही दिसत नाहीये.. त्यात आपण बरोबर चाललो आहोत की नाही हे कसं समजणार?" समृध्दी ने घाबरून विचारलं. 

"समजेल... नको काळजी करुस.. मोबाईल ला रेंज आली की त्यातून आपण दिशा बघू... किंवा निसर्ग आहे की मदत करायला! आत्ता आकाशात धुकं दिसतंय पण, एकदा ते बाजूला झालं की ध्रुव ताऱ्याच्या मदतीने आपण दिशेचा अंदाज लावू." नम्रता म्हणाली. 

तिच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता नव्हती. एकदम शांत मुद्रा, टॉर्च मुळे पाण्यावर पडणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर अजून लकाकी आणत होता. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. फक्त पाण्याचा आवाज येत होता. मागाचपासून वाटणारी भीती कमी झाली होती आणि सगळे शांत झाले होते. 

"सॉरी नम्रता!" मयुर अचानक म्हणाला. 

"का?" नम्रता ने काही न समजल्यामुळे विचारलं. 

"आपण इथे येण्याआधी आम्ही सगळ्यांनी तुझं ऐकायला हवं होतं. म्हणजे तू डायरेक्ट बोलली नव्हतीस पण, मनातून तुला यायचं नाहीये हे आम्ही ओळखून पण दुर्लक्ष केलं होतं. ते करायला नको होतं." मयुर अपराधी असल्या सारखा हळू आवाजात म्हणाला. 

त्याच्या अावजात खूप मोठा काहीतरी गुन्हा केला आहे अशी भावना जाणवत होती. हे संकटच एवढं मोठं होतं की, नम्रता ला समजून घेऊन आपण तिचं मत विचारात घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती या विचाराने मयुरच मन त्याला खात होतं. 

"गप रे... दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यू! असा रूल आहे ना... मग? आणि बरं झालं ना आपण इथे आलो... आपण कित्येक वर्ष ज्याला अंधश्रद्धा समजत होतो ते सत्य आहे हे समजलं आपल्याला. शिवाय आता आपणच त्या अमन, श्वेता चा विषय संपवायचा आहे, जेणेकरून अजून कोणाला त्रास होणार नाही." नम्रता म्हणाली. 

ती जराही रागावली नाहीये किंवा त्यांच्या मैत्रीत जराही तेढ निर्माण झाली नाहीये हे जाणून मयुर ला हायसं वाटलं. 

"नमु यार तु कितीही समजूतदार असलीस तरी मला पण ही गोष्ट आयुष्यभर खात राहणार आहे." प्रवीण म्हणाला. 

"आता काय? अरे आत्ताच सांगितलं ना मी आपण इथे आलो ते एका अर्थी बरं झालं." नम्रता थोडी रागावून म्हणाली. 

"हो ग! पण, हे ठिकाण मीच सुचवलं होतं. कुठेतरी लांब जिथे कोणी गेलं नसेल असं ठिकाण आणि तिथे तुला माझ्या मनातलं सांगणं हा माझा प्लॅन अंगलट आला. मला माझ्या मनातलं तुला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा सांगता आलं असतं पण याच जागेचा हट्ट केला आणि सगळं फसलं! आज आपण आपला जीव मुठीत घेऊन आहोत." प्रवीण म्हणाला. 

त्याच्या बोलण्यात सुद्धा खूप अपराधीपणा जाणवत होता. आधी मयुर च असं बोलणं आणि आता प्रवीण च म्हणून नम्रता ला यांना कसं समजावू हेच कळत नव्हतं. 

"प्रवीण! अरे असं का म्हणतोय? ही ट्रिप आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील.. आणि मला आवडलं तुझं असं वेगळ्या ठिकाणी येऊन मनातलं सांगणं! ते बघ आकाशात! आत्ता किती धुकं दाटून आलं होतं पण, बघ आता कसं छान निरभ्र झालं आहे आकाश... तसंच आपल्या आयुष्यात हे संकट धुक्या सारखं होतं ते आता गेलं आहे... खूप विरळ झालं आहे. लवकरच आपल्या सगळ्यांचं आयुष्य या आकाशा सारखं छान शांत आणि निरभ्र होईल. आणि आता तुम्ही दोघं असं काही म्हणालात ना तर मलाच अपराधी वाटेल हा.. मी तुम्हाला स्पष्ट काही सांगितलं नाही म्हणून... कोणीही काही बोलायचं नाही... जे झालं ते आता आपण कोणीच बदलू शकणार नाहीये..." नम्रता ने त्याला समजावलं. 

त्या दोघांना आणि समृध्दी ला पण जरा बरं वाटलं. कितीही घनिष्ट मैत्री असली तरी एक चूक आणि त्या मैत्रीवर तडा येऊ शकतो म्हणून सगळे आपापल्या परीने व्यक्त झाले होते. इथे कोणालाच स्वतःचा इगो महत्वाचा नव्हता फक्त त्यांचं एकमेकांशी असणारं नातं आयुष्यभर जपायचं होतं. 

"ए नमु! तू आत्ता काय म्हणालीस?" समृध्दी अचानक ओरडली. 

"काय? आणि असं मध्येच ओरडतेस का?" नम्रता एकदम दचकून म्हणाली. 

"हेच की प्रवीण ने तुला दिलेलं सरप्राइज आवडलं. याचा अर्थ..... आ... आ..." समृध्दी तिला गुदगुल्या करून चिडवत होती. 

"ए गप ना... आपण राफ्ट वर आहोत... जास्त हालचाल नको करुस..." नम्रता तिचे हात धरून म्हणाली. 

तिचं हे असं बोलणं लगेचच मयुर ला पण क्लिक झालं! त्याने सुद्धा लगेच नम्रता आणि प्रवीण ला चिडवायला सुरुवात केली. खूप वेळाने सगळे एवढे मनसोक्त हसत होते. या सगळ्या प्रकारात जणू ते हसणं विसरले होते ते पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर आलं. 

"ए बास.. बास... प्रवीण! ते बघ तिकडे एक बोट आहे वाटतं! आपण सिग्नल दिला पाहिजे.. लवकर मदत मिळाली तर बरं होईल..." नम्रता दूरवर बोट दाखवून म्हणाली. 

रात्रीचे साधारण बारा वाजून गेले होते. एवढ्या रात्री मदत मिळणे अशक्य वाटत असताना दूरवर एक बोट दिसणे सगळ्यांसाठी आशा होती. लगेचच प्रवीण ने त्याचं घड्याळ हातातून काढलं आणि त्यावर टॉर्च मारून ते चमकवलं! त्या उजेडात नम्रता ने दोन बोटांच्या मदतीने V शेप केला होता. 

"तिकडं कोणालातरी मदत हवी आहे..." बोटीवरचा एक माणूस चमकणाऱ्या घड्याळ आणि v शेप कडे बोट दाखवून म्हणाला. 

"आर! पन एवढ्या रातच्याला कोन असल?" दुसरा माणूस म्हणाला. 

"जाऊन बघू तरी... बिचारे आशेने मदत मागतायत!" आधीचा माणूस म्हणाला. 

लगेचच त्या दोघांनी बोट या मुलांच्या दिशेने वळवली. एवढ्या रात्री कोण असेल आणि नक्की काय झालं असेल या विचारात त्या दोघांनी बोट फिरवली. 

"बोट आपल्याच दिशेने येतेय! आता आपण वाचू...." मयुर आनंदाने म्हणाला. 

सगळ्यांच्या मनात आता आशा निर्माण झाली होती. जर त्या बोटीतल्या लोकांनी दुर्लक्ष करायचं ठरवलं असतं तर ते करू शकले असते पण, यांना लगेच मदत मिळत होती म्हणून नम्रता ने मनोमन बाप्पाचे आभार मानले. ती बोट मुलांसमोर येऊन थांबली. 

"अरे पोरांनो! एवढ्या रात्री काय करताय? या लवकर बोटीत..." बोटीतला माणूस म्हणाला. 

सगळे लगेच राफ्ट सोडून बोटीत गेले. आनंद आणि कृतज्ञता सगळ्यांच्या नजरेत दिसत होती. सगळे त्या बोटीवर चढले आणि बोट सुरू झाली. 

"थँक्यू काका! तुम्ही आमच्या मदतीला आलात म्हणून आम्ही घरी जाऊ शकू.." प्रवीण हात जोडून म्हणाला. 

"अरे पोरा! कशाला हात जोडतोस.. माणूस माणसाच्या कामी येणार नाही तर कोण येणार?" तो माणूस म्हणाला. 

"हो ना... कुनाची मदत करून आपल्या गाठीशी बी पुण्य जमा होतंच की!" दुसरा माणूस म्हणाला. 

सगळ्यांनी एक स्मित केलं आणि थोडा वेळ शांततेत गेला. 

"बरं! मी हरीश अन् हा मंगेश! तुमची नावं काय? एवढ्या रातच्याला समुद्रात काय करत होतात? दिसायला तर बारकी पोरं दिसताय..." हरीश म्हणाला. 

"मी सांगतो! ही समृध्दी, ही नम्रता, हा मयुर आणि मी प्रवीण! आम्ही इथे बेटावर फिरायला आलो होतो पण...." प्रवीण बोलता बोलता थांबला. 

"कळलं! अरे पोरांनो ते बेट आहेच शापित. काहीतरी वाईट अनुभव आला असेल म्हणून पळून आलात ना?" मंगेश म्हणाला. 

"हम्म!" प्रवीण म्हणाला. आणि त्याने तिथे जे काही घडलं ते सगळं त्या दोघांना सांगितलं. 

"तुमच्या समद्यांचं नशीब बलवत्तर हाय! नाहीतर आजवर तिथं जे कोनी बी गेलं ते परत आलं न्हाई." हरीश म्हणाला. 

"दोन - तीन दिवसांपूर्वी आमचा मित्र त्या बेटा कडे वाट चुकून गेला होता तो सुद्धा परत आला नाही. खूप शोध घेतला पण काही पत्ता लागला नाही बघा... त्याची बोट तिथं बेटाच्या झाडीत तुटलेली मिळाली! फार भयानक आहे ते बेट! बरं झालं तुम्ही सगळे आधीच सुटून आलात." मंगेश म्हणाला. 

सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं. आपण खूप मोठ्या संकटातून वाचलोय हे सगळ्यांनाच जाणवलं. थोडावेळ शांत गेला आणि नंतर सहज गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता बराच वेळ होऊन गेला होता. साधारण रात्रीचा १ वाजला असेल. सगळेच या धावपळीत दमले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. 

"तुम्ही सगळे शांत डोळे मिटून बसा... आपण किनाऱ्यावर पोहोचलो की मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळे फार दमलेले दिसताय." मंगेश म्हणाला. 

मुलांच्यात तर आता काही बोलण्याचा सुद्धा त्राण नव्हता. सगळे डोळे मिटून एकमेकांचा हात धरून बसले होते. एक सुरक्षित पणा त्यांना त्या बोटीत जाणवत होता. बसल्या बसल्या सगळ्यांचा डोळा लागला. 

"बघ बरं झालं ना आपण गेलो... निदान पोरांना मदत तरी मिळाली." मंगेश म्हणाला. 

"हो रं... बिचारी किती घाबरली हायत. एकदा यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडलं की आपण मोकळं बघ. या समद्यांच्या घरचे सुद्धा काळजीत असतील की!" हरीश म्हणाला. 

"काही खाल्लं असेल की नाही देव जाणे... किती थकली आहेत सगळी. एक काम करू सगळ्यांना आधी आपल्या घरी घेऊन जाऊ.. जरा पोटभर खाऊदे, रात्री आराम करू दे आणि मग सकाळी आपण जाऊ सगळ्यांना सोडायला." मंगेश सगळ्या मुलांकडे बघून म्हणाला. 

"हो.. चालल... तसं बी एवढ्या रातच्याला उगा यांच्या आई - बापाला पण घोर नको.. काय व्हायचं ते सकाळी होऊ दे..." हरीश म्हणाला. 

मोटार बोट असल्यामुळे साधारण दोन - सव्वा दोन च्या आसपास सगळे किनाऱ्यावर पोहोचले. 

"पोरांनो! उठा चला... किनाऱ्यावर आलो आपन..." हरीश म्हणाला. 

सगळ्यांनी डोळे उघडले. खरंच किनाऱ्यावर आपण पोहोचलो याचा आनंद त्यांना झाला होता. बऱ्याच कोळी बांधवांच्या बोटी मासे पकडून आल्या होत्या आणि ते मासे विकायला घेऊन जाण्याची गडबड सुरू होती. सगळ्यांची झोप केव्हाच उडाली होती. एवढा वेळ निस्तेज दिसणारे चेहरे आता आपण घरी जाऊ या आनंदाने खुलून आले होते. 

"आधी सगळे आमच्या घरी चला.. आम्ही सकाळी तुम्हाला तुमच्या तुमच्या घरी सोडतो." मंगेश म्हणाला. 

"अहो काका तुम्ही आधीच आमची खूप मदत केली आहे. तुम्हाला अजून त्रास देणं..." नम्रता संकोचून म्हणाली. 

"अगं पोरी! तुझ्यापेक्षा बी लहान माझी पोरगी हाय! ती जर अशी संकटात तुम्हाला कोणाला दिसली असती तर केली असती ना मदत? तसंच हाय हे... एवढ्या रातच्याला कुठं जाणं बरं नाही बाळा... चला समदे..." हरीश म्हणाला. 

त्या दोघांच्या आग्रहाखातर या कोणाचं काही चाललं नाही आणि सगळे त्यांच्या मागून चालू लागले. 

"आम्ही दोघं सख्खे चुलत भाऊ... आमचं लहनसं घर आहे इथून पुढे गेल्यावर! सगळे एकत्र गुण्यागोविंदानं राहतो बघा... घर लहान असलं तरी सगळी माणसं मोठ्या मनाची आहेत......" मंगेश त्याच्या घराबद्दल आणि कुटुंबाबद्दल सांगत होता. 

आजही अशी माणुसकी जपणारी माणसं आहेत आणि देव सुद्धा अश्याच माणसांच्या रूपात धावून येतो हे आज मुलांना कळून चुकलं होतं. छान गप्पा मारता मारता हरीश आणि मंगेश च घर आलं. कौलारू, बसकं आणि समोर लहानसं अंगण असलेलं जुनं घर होतं ते! 

"या पोरांनो! इथं बसा...." हरीश तिथे असणाऱ्या खाटेकडे हात दाखवून म्हणाला. आणि लगेच त्याने त्याच्या बायकोला हाक मारली; "गंगे! ए गंगे! ऐकलं का.. जरा चार भाकरी अन् चटणी घेऊन ये..." 

"आले... आले..." आतून आवाज आला. 

"काका! अहो एवढ्या रात्री कशाला? असुदे.. आम्ही उजाडलं की निघू..." प्रवीण म्हणाला. 

"अरे! आम्ही कोळी माणसं! आत्ता आमची सकाळ झालेली असते. ते बघ तिकडे... सगळे मासे घेऊन आता बाजारात जातील..." मंगेश म्हणाला.  

क्रमशः.....
**************************
या मुलांच्या नशिबी नक्की काय लिहून ठेवलं आहे? श्वेता ने अगदी आत्मविश्वासाने मुलं इथे परत येतील, आपलं सैन्य त्यांना खेचून आणेल असं का सांगितलं असेल? सगळ्यांची सुटका खरंच झाली आहे का? आणि दीपा! तिचं काय? तिला कशी मुक्ती देणार सगळे? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all