एक बेट मंतरलेलं (भाग -१३) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -१३) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
प्रवीण आणि मयुर ने मिळून पटापट झाडाच्या झावळ्या काढून आणल्या! 

"आता काय करायचं?" समृध्दी ने विचारलं. 

"आता यातून पानं काढायची आणि मग चटई सारखं विणायचं! मग आपण ते या बांबूला बांधू. यामुळे हवा अडली जाईल आणि हवेच्या मदतीने आपल्याला स्पीड पण मिळेल." प्रवीण ने सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. 

सगळ्यांनी मिळून पटापट चटई सारखं विणायला घेतलं. मयुर एक एक पान काढून देत होता तर हे तिघे विणत होते! त्यामुळे पटकन काम झालं. लगेचच प्रवीण ने ते राफ्ट ला जोडून टाकलं आणि चार बांबुंचे तुकडे सोबत घेतले. 

"चला.. आपलं काम झालं आहे.. आता फक्त ही राफ्ट पाण्यात घेऊन जायची आहे आणि मग त्यात आपण बसू शकतो." प्रवीण ने एकदा पूर्ण राफ्ट बघितली आणि म्हणाला. 

लगेचच "गणपती बाप्पा मोरया....." असं म्हणून चौघांनी धक्का देऊन ती राफ्ट पाण्यात नेली. मयुर, समृध्दी, नम्रता त्यात चढले! प्रवीण चढत होता तोवर श्वेता आणि अमन तिथे झाडावरून झोके घेत तिथे येताना बाकीच्यांना दिसले. 

"प्रवीण! लवकर चल... ते बघ तिकडून श्वेता, अमन येतायत..." समृध्दी म्हणाली. 

प्रवीण कसाबसा पटकन त्यावर चढला आणि लगेचच मयुर आणि त्याने मिळून बांबूच्या मदतीने राफ्ट ला स्पीड दिला. 

"तुम्हाला काय वाटतंय इथून तुम्ही पळून जाऊ शकाल? हा... हा.. हा..." श्वेता ओरडून किळसवाणी हसत म्हणाली. 

अमन ने लगेच जादूच्या मदतीने समुद्रात भोवरा निर्माण केला. 

"प्रवीण... आपली राफ्ट त्या भोवऱ्यात अडकू देऊ नकोस... या श्वेता, अमन च काय करायचं ते मी बघते..." नम्रता म्हणाली. 

प्रवीण आणि मयुर राफ्ट दुसऱ्या दिशेला वळवायचा प्रयत्न करत होते. तर नम्रता ने तिच्या पर्स मधून अंगारा काढून स्वतःला आणि सगळ्यांना लावला आणि जोरजोरात जप करू लागली. तिच्या सोबत समृध्दी सुद्धा मोठ्याने जप करत होती. नम्रता ने हवेची दिशा बघून हवेत सुद्धा अंगारा उधळला! त्या दोघींच्या आवाजामुळे आणि नम्रता ने उधळलेल्या अंगाऱ्या मुळे या दोघांना त्रास होऊ लागला. तरीही श्वेता ने काहीतरी त्यांच्या राफ्ट वर  फेकलंच! पण, नंतर त्रास सहन न झाल्यामुळे ते दोघं तिथून पळाले. 

"प्रवीण! ते दोघं पळाले आहेत. पण, आपण अजून अडकलो आहोत! काहीतरी कर..." समृध्दी घाबरून म्हणाली. 

ते दोघंही प्रयत्न करत होतेच. यात नम्रता एकदम शांत होती. तिला माहित होतं आपल्याला काहीही होणार नाही. एवढ्यात एखादा चमत्कार घडवा तसा तो भोवरा नाहीसा झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 

"नशीब आपण वाचलो... ते दोघं पुन्हा यायच्या आधी इथून जाऊ..." मयुर म्हणाला. 

"मला नाही वाटत ते दोघं परत येतील. पण, हा ते लोक एवढ्या सहजपणे आपल्याला जाऊ देणार नाहीत!" नम्रता काहीतरी विचार करून म्हणाली. 

"म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचं आहे? आणि आता आपण काय करायचं मग?" समृध्दी ने विचारलं. 

"आत्ता सध्या तरी आपण काहीच नाही करू शकत. आणि मी हे असं म्हणतेय म्हणजे मगाशी त्या श्वेता नी आपल्या राफ्ट वर काहीतरी टाकलं आहे... पण, काय हे अजून समजलं नाही आणि सापडलं पण नाहीये." नम्रता ने सांगितलं. 

"नमु यार मला आता जाम भीती वाटतेय... आपण घरी पोहोचू ना?" समृध्दी ने घाबरून विचारलं.

सगळेच काळजीत होते त्यात श्वेता ने त्यांच्याकडे काय फेकलं आहे हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. नम्रता ने कसंबसं समृध्दी ला शांत केलं. 

"आत्ता आपण तो विचार नको करायला. इथून जेवढ्या लवकर आपल्याला जाता येईल तेवढं बरं आहे... प्रवीण! एखादी बोट दिसली तर सिग्नल देऊया... निदान लवकर पोहोचू..." नम्रता म्हणाली. 

प्रवीण सुद्धा हो म्हणाला. बराच वेळ झाला होता त्यांना समुद्रात उतरून. पण, त्यांना सतत असंच वाटत होतं की, आपण पुढे जातच नाहीये... त्याच जागी आहे. सगळे काय करायचं आणि या संकटातून कसं बाहेर निघायचं याचा विचार करत होते. 
*************************
तिथे श्वेता आणि अमन त्या पडीक घरात गेले होते. 

"कोणीही इथून जाऊ शकणार नाहीये... मी त्यांना कसं थोपवून ठेवायचं याचा बंदोबस्त करून आले आहे." श्वेता कुत्सित हसत म्हणाली. 

"म्हणजे? नक्की काय केलं आहेस तू?" अमन ने काहीही न समजल्यामुळे विचारलं. 

"कळेल... कळेल.. लवकरच कळेल. कोणीही समुद्र पार करून जाऊ शकणार नाही एवढं मात्र नक्की." श्वेता आत्मविश्वासाने म्हणाली. 

"ते सगळं ठीक आहे पण, तरीही ते गेले तर? आता आपल्याला बेट सोडून जाता सुद्धा येणार नाहीये... आपण बळीच्या तयारी ला लागलो आहोत." अमन म्हणाला. 

"हम्म... तरीही गेले तरी आपण त्यांना पुन्हा खेचून आणू... आपलं सैन्य येईल तेव्हा कामी." श्वेता विचार करून म्हणाली. 

तिचं बोलणं ऐकून दोघंही मोठ्याने हसले. त्यांना विश्वास होता ते चौघे कुठेही जाऊ शकणार नाहीत म्हणून त्यांनी पुढची तयारी करायला घेतली. श्वेता ने जी सापाची कातडी झाडांना टांगून ठेवली होती ती घेतली आणि मुलांना बांधण्यासाठी ती सिद्ध करू लागली. त्यासाठी चारही कातड्या तिने त्या मूर्ती रुपी पिशाच्यासमोर नेल्या! 

"रक्त पिशाच्च! यानेच आम्ही तुमचे बळी बांधणार आहोत... तुमचा कुआशिर्वाद असू द्या." श्वेता त्या कातड्या पिशाच्याच्या समोर धरत म्हणाली. 

लगेचच त्या मूर्ती च्या डोळ्यांतून चमक निघाली आणि कातड्यांवर पडली! थोडी भाजून निघल्यासारखी अवस्था त्या चारही कातड्यांची झाली. त्यांनतर लगेचच श्वेता ने त्या मूर्तीच्या मुखातून जो रक्तस्त्राव होत होता त्यात ती कातडी पूर्णपणे भिजवून घेतली आणि पुन्हा झाडावर लटकवून ठेवली. थेंब थेंब रक्त खाली टपकत होतं! ते रक्त साठवायला अमन ने मेलेल्या पालींपासून वाटी सारखं काहीतरी केलं होतं ते ठेवलं. 

"हे रक्त आपल्याला त्या मुलांच्या अंघोळीच्या रक्तात मिसळायचं आहे. यामुळे आपसूक त्यांची शक्ती कमी होईल आणि आपली वाढेल." अमन म्हणाला. 

"हो.... त्या सगळ्यांच्या अंघोळीच्या रक्तासाठी मी कालच एका माणसाचा बळी घेऊन ठेवला आहे. त्याच्या शरीरातून रक्त काढ..." श्वेता म्हणाली. 

अमन लगेचच रक्त आणायला गेला. त्या माणसाच्या कवटीची पिशवीच या क्रूर पिशाच्यांनी केली होती! त्यात थोडं रक्त भरून तो घेऊन आला. 

"आता इथलं आपलं काम झाल्यात जमा आहे... फक्त थोडे विषारी विंचू पकडून त्यांना आगीत टाकायचं आहे... ते मुलांना बांधल्यावर करता येईल... मग उद्या रात्री या आपल्या नखांनी त्या मुलांच्या नरडीचा घोट घेतलेला असेल... हा... हा... हा...." श्वेता जोर जोरात हसत म्हणाली. 

"एवढी हसू नकोस... आपल्याला आधी स्वतःला अपवित्र करून घ्यावं लागेल. त्या नम्रता ने केलेले जप आणि फेकलेला अंगारा यामुळे आपली अपवित्रतात खंडित झाली आहे." अमन म्हणाला. 

"अरे हो की... हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता आपण ही जी तयारी केली ती सुद्धा पुन्हा करावी लागेल." श्वेता नाराजीने म्हणाली. 
**************************
इथे या चौघांना यातली काहीच कल्पना नव्हती. तिथे अमन, श्वेता ने त्यांच्या बळीची तयारी सुरू असेल याचा जराही विचार यांनी केला नव्हता. नम्रता ला राहून राहून अस्वस्थ वाटत होतं! असं का होतंय हे तिला समजत नसलं तरी काहीतरी वाईट होणार आहे हे नक्की असं तिचं मन तिला सतत सांगत होतं. 

"प्रवीण, मयुर, समु! तुम्हाला कोणाला अस्वस्थ वाटतंय का? काहीतरी होणार आहे... मला सतत असं वाटतंय..." नम्रता काळजीने म्हणाली. 

"तसं काही वाटत नाहीये... एक काम कर तू थोडा आराम कर... शांत डोळे मिटून बस... बरं वाटेल." प्रवीण म्हणाला. 

"अरे नाही रे.... आपण सतत एकाच जागी आहे असं वाटणं, अमन आणि श्वेता एवढ्या लगेच माघारी जाणं हे मला पटत नाहीये... लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे... नाहीतर आपण घरी कधीच जाऊ शकणार नाही." नम्रता म्हणाली. 

तिच्या बोलण्याने सगळेच एकदम गप्प झाले. ती म्हणत होती त्यात तथ्य होतं. मयुर आणि समृध्दी ने तो अनुभव घेतला होता. त्या दोघांनाही त्यांना झालेला त्रास आठवला. 

"नम्रता बरोबर बोलतेय. अमन, श्वेता ने तिकडे तयारी करायला घेतली होती तेव्हा मला आणि समृध्दी ला खूप त्रास झाला. ते दोघं येऊन बघून गेले होते आणि नम्रता ने जप केल्यामुळे त्यांना त्रास झाला म्हणून ते पळून गेले... मग, दीपा ने सांगितलं की सगळे एकत्र जा.. नाहीतर काही खरं नाही म्हणून आम्ही एकत्र दुसऱ्या रस्त्याने आलो..." मयुर ते सगळं आठवून म्हणाला. 

"Actually मला पण त्रास झाला होता! म्हणजे चक्कर आल्या सारखं होत होतं तरी आलो मी कसाबसा किनाऱ्यापर्यंत! आणि मला त्या दोघांचा ओरडण्याचा आवाज पण आला होता." प्रवीण ने सुद्धा त्याचा अनुभव सांगितला. 

असं का होतंय हे काही कोणाला कळत नव्हतं. नम्रता च सहज बोलता बोलता प्रवीण च्या हाताकडे लक्ष गेलं तर तिने त्याला बांधलेला धागा हातात नव्हता! 

"प्रवीण! अरे मी बांधला होता तो धागा?" तिने त्याचा हात हातात घेऊन विचारलं. 

तिच्या असं विचारण्या बरोबर समृध्दी आणि मयुर ने पण आपापले हात बघितले तर त्यांच्याही हातात धागा नव्हता! 

"नमु! आमच्या पण हातात धागा नाहीये..." समृध्दी म्हणाली. 

"काय? अरे पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना काहीही झालं तरी धागा काढू नका. मग?" नम्रता ने  काळजीने विचारलं. 

"अगं रिलॅक्स! काही नाही होणार... तू आहेस ना? आणि मला कळलं पण नाही धागा हातात नाहीये... मी काढला नाही." प्रवीण म्हणाला. 

समृध्दी आणि मयुर पण तेच म्हणाले. हे असं अचानक धागा हातातून पडणं, त्या तिघांच्या तब्येती मध्येच खराब होणं म्हणजे त्या अमन, श्वेता चा डाव हे तिने ओळखलं होतं. 

"मयुर! प्रवीण! तुम्ही दोघं सरका... ते बांबू माझ्याकडे द्या... मी राफ्ट ला दिशा देते..." नम्रता काहीतरी विचार करून म्हणाली. 

"का? काय झालं?" प्रवीण ने गोंधळून विचारलं. 

"अरे आधी दे! सांगते नंतर... आपल्या हातात वेळ कमी आहे." नम्रता काळजीने म्हणाली. 

लगेचच दोघांनी बांबू नम्रता च्या हातात दिले. तिने फक्त एकदा राफ्ट ला दिशा दिली आणि राफ्ट आता पुढे जातेय आणि आपण वाचू असं जाणवायला लागलं. 

"नमु! काय केलंस? अगं आम्ही इतका वेळ हाच प्रयत्न करत होतो तरी काही झालं नाही आणि तू फक्त एक धक्का काय दिला आपण पुढे जायला लागलो." प्रवीण आश्चर्याने म्हणाला. 

"थोड्या अंशी का होईना तुमच्या तिघांवर श्वेता, अमन चा प्रभाव पडला आहे आणि म्हणून हे असं होत होतं." नम्रता म्हणाली. 

सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. थोडं टेंशन तर सगळ्यांना होतंच! पण, आपण आता घरी जाऊ शकू म्हणून सगळे खुश होते. 

"नम्रता! एक विचारायचं होतं..." मयुर म्हणाला.

"अरे विचार की!" नम्रता म्हणाली. 

"जर आमच्या तिघांवर श्वेता, अमन चा प्रभाव असेल आणि आम्ही तुझ्यावर हल्ला केला तर?" त्याने थोडं कचरत विचारलं. 

"वेडा आहेस का? असं काही नाही होणार. मी तुम्हाला अंगारा लावला आहे ना.. त्यामुळे ते लोक तुमच्या मेंदूशी खेळ नाही करू शकणार. आपण घरी गेलो ना की आपापल्या घरी हे सांगू आणि मग करुया उपाय..." नम्रता म्हणाली. 

त्याचं डोक्यावरचं मोठं ओझं कमी झालं. हवेच्या मदतीने राफ्ट आता बरोबर चालत होती. आणि नम्रता दिशा बदलायला होतीच! सगळे थोडे निश्चिंत झाले होते. या सगळ्यात घरी सगळं कळवायच आहे हे कोणाच्या डोक्यात सुद्धा आलं नव्हतं. 

क्रमशः.... 
***************************
मुलं जाऊ शकतील का घरी सुखरूप? अमन, श्वेता ने जी तयारी केली आहे त्यावरून तरी ते दोघं यांचा बळी दिल्याशिवाय राहणार नाहीत असं वाटतंय ते खरं होईल का? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all