एक बेट मंतरलेलं (भाग -१२) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends. Ira blogging. Ira blogging stories. Horror.

एक बेट मंतरलेलं (भाग -१२) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
प्रवीण ला झाडं तोडावी लागणार म्हणून मनोमन खूप वाईट वाटत होतं. कितीही झालं तरी त्यांना सुद्धा जीव आहेच की! पण, आत्ता तिथून सगळ्यांची सुटका पण तेवढीच महत्त्वाची होती. त्याने दोन मिनिटं तसाच डोळे बंद करून काहीतरी विचार केला आणि त्याला अचानक काहीतरी आठवले. घाई घाईत त्याने त्याच्या ट्राऊझर च्या खिशातून कसलीतरी पिशवी काढली. 

"आत्ता कमीत कामी चार ते पाच झाडं कापावी लागतील तेव्हा मोठी राफ्ट होईल... पण, त्या बदल्यात या बिया इथे पेरतो!" तो स्वतःशीच पुटपुटला. 

त्याची लहानपणा पासून सवय होती, कोणतंही फळ खाल्लं तरी त्याच्या बिया जपून ठेवायच्या आणि कुठे फिरायला गेलं की रस्त्याने जाताना मातीत त्या टाकायच्या! हीच सवय आज त्याच्या मनावरचं दडपण कमी करणार होती. लहान असताना फिरायला जाताना त्याचे आई - बाबा अश्या बिया रस्त्याने टाकायचे आणि हाच वारसा त्यांनी प्रवीण ला दिला होता. त्यांच्यामुळेच तो न चुकता बिया साठवून सगळीकडे घेऊन जायचा. आत्ता सुद्धा जाम, सीताफळ आणि फणसाच्या बिया त्याच्या कडच्या पिशवीतून निघाल्या. १० ते १२ बिया होत्या! त्याने लगेच त्या तिथे पेरल्या आणि त्याच्या कामाला लागला. 

"निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो! आपण फक्त त्याला लुटतो... झाडं आहेत, ही सगळी सृष्टी आहे म्हणून तर आपण जगतोय.. एवढं तरी करायलाच हवं... आपण जंगलाच्या रस्त्यात किंवा मातीत जिथे भरपूर झाडं असतील तिथे बिया टाकल्या की पुढचं काम निसर्ग करतोच!" त्याच्या आई - बाबांचे शब्द त्याला आठवले आणि त्याने मनोमन त्यांचे आभार मानले. 

झाड कापण्या आधी प्रत्येक वेळी त्याने झाडावरून हात फिरवला, त्या झाडाला त्याने विश्वासात घेतलं होतं. अगदी मित्रासारखा तो झाडाशी बोलत होता. त्याच्या मनातली खंत त्याच्या बोलण्यातून जाणवत होती. गच्च डोळे मिटून त्याने झाडावर हात ठेवला आणि बोलू लागला; "मला माहितेय हे करणं चुकीचं आहे पण... पण आज दुसरा पर्याय नाहीये... खूप वाईट तर वाटतंय मला तुम्हाला ईजा पोहोचवायला पण काय करू मी? सॉरी..." 

हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. लगेचच त्याने स्वतःला सावरलं आणि झाडावर पहिला वार केला! झाडाशी बोलल्या मुळेच की काय कमी मेहनती मध्ये त्याचं झाडं तोडण्याचं काम झालं. त्याने त्या झाडांचे व्यवस्थित समान लांबीचे तुकडे केले. एका झाडाचे दोन भाग केल्यामुळे पाच झाडांचे दहा तुकडे जोडून तिथल्याच वेली दोरी म्हणून वापरण्यासाठी घेऊन राफ्ट बनवायला सुरुवात केली. 
*****************************
नम्रता ने समृध्दी आणि मयुर ला थोडावेळ झोपवलं होतं. ती त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना सुद्धा करत होती. या सगळ्यात अर्धा तास होत आला होता आणि श्वेता, अमन कधीही येऊ शकतील मग इथून पळून जाणं अवघड होईल हे तिला चांगलंच माहीत होतं. 

"दीपा! आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये.. शॉर्टकट रस्ता आहे का इथून?" नम्रता ने घाईत विचारलं. 

"हो... आपण रस्त्याने जाता जाता सांगते.. तेव्हा लिहून घे! आत्ता या दोघांना उठव... आपण निघालं पाहिजे..." दीपा म्हणाली. 

नम्रता ने लगेच समृध्दी आणि मयुर ला हळू हळू हलवून उठवलं. त्यांची चक्कर आता जरा कमी झाली होती पण त्यांना पूर्ण बरं वाटत नव्हतं. नम्रता ने दोघांना आधार देऊन बसवलं आणि त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून पाच मिनिटं देवाचा जप केला. आता आधी पेक्षा त्यांना खूप बरं वाटत होतं आणि दोघंही चालण्याच्या स्थितीत आले होते. 

"समृध्दी, मयुर बरं वाटतंय ना आता? चालू शकाल ना?" नम्रता ने त्या दोघांना विचारलं. 

"हो... चला निघुया." समृध्दी म्हणाली आणि आधार घेत घेत उभी राहिली. 

मयुर पण तयार झाला. नम्रता ने लगेच एका बॅगेत पाण्याच्या दोन बाटल्या, टॉर्च आणि तिची पर्स घेतली. सोबत दीपा ला सुद्धा घेतलं आणि ते सगळे तिथून निघाले. 

"प्रवीण या सरळ रस्त्याने गेला आहे जिथून तुम्ही आला होतात! हा लांब रस्ता आहे... आपण इथल्या डाव्या बाजूच्या रस्त्याने जाऊया. तो रस्ता पंधरा मिनिटात किनाऱ्याकडे घेऊन जाईल. पण, या रस्त्याने जाताना खूप भास होतील त्या कडे दुर्लक्ष करता आलं तरच हा शॉर्टकट सिद्ध होईल नाहीतर अजून वेळ लागेल." दीपा ने आधीच सगळं बजावलं. 

"ओके... भासापासून वाचायचं म्हणजे मनावर ताबा हवा! बाप्पा आहे... आपण याच रस्त्याने जाऊ." नम्रता म्हणाली. 

 दीपा ने लगेच कुठून कसं जायचं हे सगळं सांगितलं आणि नम्रता ने सगळं नीट लिहून घेतलं. समृध्दी आणि मयुर च लक्ष ते आजारी होते यावरून हटावे म्हणून ती सतत त्यांच्याशी गप्पा मारत होती. काही मिनिटात ते त्या भुल देणाऱ्या रस्त्यापाशी येऊन पोहोचले. 

"नम्रता! आता इथून थोडं अंतर पुढे जाई पर्यंत मी तुम्हाला साथ देऊ शकेन नंतर माझी सामान्य बाहुली होईल... पुढची लढाई तुम्ही लढाईची आहे." दीपा म्हणाली. 

"ओके... थँक्यू दीपा! आज तू होतीस म्हणून आम्ही सुखरुप इथून जाऊ शकतोय.. अगं पण तुला मुक्त कसं करायचं?" नम्रता ने विचारलं. 

"ते सांगण्यासाठी आता वेळ नाही... नंतर नक्की सांगेन! तसंही आता आपण एकत्र राहणार आहोत तेव्हा मी कधीही सांगू शकेन आणि मला खात्री आहे तुला ते नक्की समजेल. तुम्ही सगळे पुढे व्हा! त्या पिशाच्यांना समजलं तर इथेच अडकाल." दीपा म्हणाली. 

नम्रता, समृध्दी आणि मयुर ने एकमेकांकडे बघितलं आणि मनावर दगड ठेवून सगळे पुढे चालू लागले. थोडं अंतर चालून झालं आणि भूल येणं सुरू झालं! 

"नमु! बघ तिकडे.... तिकडे ते अमन, श्वेता आहेत..." समृध्दी समोरच्या बाजूला बोट दाखवून म्हणाली. 

"अगं कुठे आहे? काही नाहीये तिकडे..." नम्रता म्हणाली. 

"भूल यायला सुरुवात झाली आहे... सावध राहा." दीपा म्हणाली. 

नम्रता ला जे समजायचं ते समजलं. मयुर आणि समृद्धीच मन कमकुवत आहे आणि म्हणूनच त्यांना हे भास होत असणार हे तिला कळलं होतं. लगेचच तिने तिच्या पर्स मधून आईनी दिलेला अंगारा काढला आणि दोघांना लावला. 

"आता बघा तिकडे... कोणी दिसतंय का?" नम्रता ने विचारलं. 

"नाही..." दोघं एकदम म्हणाले. 

नम्रता ने दोघांना बाप्पाचा जप करत करत चला काहीही होणार नाही असं सांगितलं आणि पुन्हा सगळे चालू लागले. थोडं अंतर पार झालं असेल तेवढ्यात दीपा सुद्धा आता सामान्य बाहुली बनली. नम्रता ने लगेच तिला उचलून बॅगेत ठेवलं. 

"नमु यार मला जाम भीती वाटतेय... सतत कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटतंय.." समृध्दी घाबरत घाबरत म्हणाली. 

"नको घाबरु... माझा हात दोघांनी घट्ट धरा! आपल्याला काहीही होणार नाही. साधारण पाच मिनिटांचा रस्ता पार झाला असावा. दहा मिनिटं फक्त मनावर ताबा ठेवा." नम्रता दोघांपुढे हात करत त्यांना समजावत म्हणाली. 

तिघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि ते पुढे जाऊ लागले. डाव्या बाजूला समृध्दी, मधे नम्रता आणि उजव्या बाजूला मयुर! दोघांच्या मध्ये नम्रता असल्यामुळे ती जप करत होती त्याचं बळ या दोघांना पण मिळत होतं आणि आता कसलेच भास त्यांना होत नव्हते. पटापट पावलं टाकत त्यांनी तो रस्ता पार केला. समोर प्रवीण राफ्ट बनवण्यात व्यस्त होता.... त्याचं या तिघांकडेही लक्ष गेलं नव्हतं! त्याचं काम होतंच आलं होतं आणि फायनल काही पार्टस जोडायचे बाकी होते. नम्रता, समृध्दी आणि मयुर त्याच्याकडे पळत गेले. 

"तुम्ही तिघे एकदम? सगळं ठीक आहे ना?" प्रवीण ने विचारलं. 

"आत्ता वेळ नाहीये.. नंतर सगळं सांगते... अजून किती काम बाकी आहे राफ्ट च? आम्ही काय करू पटकन सांग!" नम्रता घाईत म्हणाली. 

ती असं म्हणतेय म्हणजे नक्की त्या अमन, श्वेता ला काहीतरी सुगावा लागला असेल असं त्याला वाटलं आणि लगेच त्याने सगळं काम समजावून सांगितलं! राफ्ट चा बेस तयार होता पण ती पुढे जाण्यासाठी हवेची मदत घ्यायची असं प्रवीण ने ठरवलं होतं त्यासाठी त्याने एक उंच बांबू घेतला होता त्याला अजून दोन लहान बांबू जोडले होते! ज्यामुळे त्रिकोणी आकार तयार झाला होता. हवेच्या दाबाने आता राफ्ट पुढे जावी म्हणून नारळाच्या झावळ्या घेऊन त्याचा वापर कापडासारखा करायचा असं त्याने ठरवलं होतं! 

"मयुर! तुला झाडावर लवकर चढता येतं! तू माझ्यासोबत ये... आपल्याला एक नारळाची झावळी लागणार आहे." प्रवीण म्हणाला आणि मयुर ला घेऊन तिथे असणाऱ्या नारळाच्या झाडाजवळ गेला. 
**************************
तिथे श्वेता आणि अमन ला आता बरं वाटत होतं. त्यांनी कानात कोंबलेल्या पाली काढून टाकल्या होत्या! त्या पालीं मुळे त्यांच्या कानातला रक्तस्त्राव थांबला होता. 

"चल आता त्या चौघांना आत्ताच इथे आणून बांधूया.... पळून जायला पण कमी नाही करणार ते...." श्वेता रागात म्हणाली. 

"हो... चल... आपल्या सैन्याला बरोबर घेऊ.. त्या नम्रता सोबत लढायचं म्हणजे जरा जपून खेळी करावी लागेल..." अमन म्हणाला. 

दोघंही त्या बाहुल्यांच्या सैन्याला घेऊन कॅम्प च्या ठिकाणी निघाले. कधी एकदा सगळ्यांना कैद करून पुढच्या तयारीला लागतो असं दोघांना झालं होतं. झपाझप पावलं टाकत ते कॅम्प जवळ आले. 

"सगळे टेंट मध्ये दडून बसले आहेत वाटतं..." अमन म्हणाला. 

त्या दोघांना जराही कल्पना नव्हती पोरांनी त्यांच्या हातावर कधीच तुरी दिली आहे. हळूच टेंट चा पडदा सरकवून दोघं आत डोकावले. समृध्दी ने प्रवीण गेला होता तेव्हा पांघरूण तिथे सेट करून ठेवलं होतं तेवढंच त्यांना दिसलं. 

"इथे एकच कोणीतरी झोपलं आहे... बाकी कुठे गेले?" अमन चवताळून म्हणाला. 

"एक आहे म्हणजे सगळे असतील... उठव त्याला! जे कोणी असेल त्याला माहित असेलच बाकी कुठे आहेत." श्वेता म्हणाली. 

अमन ने जोरात ते पांघरूण ओढून काढलं तर आत कोणीही नाही पाहून त्याने जोरात किंचाळी फोडली! 

"सगळे पळाले.... ती नम्रता! नम्रता शिवाय कोणाची हिम्मत झाली नसती... तिलाच आता आधी संपवायची!" श्वेता मोठ्याने ओरडून म्हणाली. 

ती ओरडून बोलताना तिचा रक्त येणारा डोळा अजून बाहेर आला होता आणि त्यातून रक्तस्त्राव सुद्धा वाढला होता. दोघांच्याही नसा आता फुटून सगळीकडे रक्ताचं कारंजं उडतं की काय अशी स्थिती झाली होती. 

"सगळे इथेच कुठेतरी लपले असतील नाहीतर आल्या रस्त्याने च परत गेले असणार.. आणि गेले असले तरी अजून पोहोचले नसतील... आपण शोधूया... इतक्या वर्षांनी आलेली संधी वाया घालवायची नाही..." अमन हाताच्या मुठी घट्ट आवळून म्हणाला. 

बाहेर येऊन दोघांनी रागात ते टेंट उध्वस्त केले. जर तिथेच कुठेतरी मुलं लपून बसली असतील तर निदान भीतीने काहीतरी हालचाल होईल आणि त्यांना समजेल म्हणून हा कट होता. कुठूनही काही हालचाल जाणवली नाही हे बघून दोघं अजून चवताळले आणि बाहुल्यां ना झाडावर चढून आजूबाजूला कुठे लपले आहेत का याचा शोध घ्यायला सांगितला. बाहुल्या सुद्धा लगेच त्यांच्या आदेशानुसार इकडे तिकडे गेल्या आणि मुलांचा शोध सुरू झाला. 

"आपण त्या लहान रस्त्याने जाऊन बघूया किनाऱ्याकडे गेले आहेत का सगळे. जर त्यांचा तो प्लॅन असेल तर आधीच आपण तिथे हजर असू आणि त्यांना पकडणं सोपं होईल." अमन म्हणाला. 

"तिथून नको... लहान रस्ता असला तरी त्या रस्त्यात भूल आहे. आपण त्या मोठ्या रस्त्याने झाडावर झोके घेत घेत जाऊ... लवकर पोहोचू." श्वेता म्हणाली. 

"ठीक आहे. तसंही आपण तिकडे तयारी सुरू केली आहे त्यामुळे नम्रता सोडून सगळ्यांवर प्रभाव पडला असेल..." अमन म्हणाला.  

क्रमशः.....
*****************************
दोन्ही पिशाच्च कॅम्प पर्यंत येऊन पोहोचली आहेत. मुलं लपली आहेत किंवा पळून गेली आहेत याचा संशय तर त्यांना आला आहे.. तिकडे अजून राफ्ट तयार होतेय... सगळ्यांनी पळून जायचा प्लॅन तर केला आहे पण ते बाहेर पडू शकतील का? या दोघांनी जर मुलांना आधीच गाठलं तर सगळे कसे वाचतील? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all