एक बेट मंतरलेलं (भाग -११) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror Marathi kadambari. Story of college friends.

एक बेट मंतरलेलं (भाग -११) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
दुसरीकडे बाहुल्यांच्या सैन्याकडून श्वेता आणि अमन बरीच कामं करून घेत होते. सगळ्या मुलांचा बळी द्यायचा त्याच्या विधींची तयारी सुरू होती. नम्रता ने जे पडीक घर बघितलं होतं तिथेच हे सगळे प्रकार सुरू होते! श्वेता आणि अमन त्या घरात गेले होते. संपूर्ण जळमटांनी माखलेलं ते घर या पिशाच्यांचं मंदिर होतं! पडलेल्या भिंती, त्यातून उगवलेली झाडं, त्या झाडांच्या मुळांमुळे गेलेले तडे, पूर्ण बेटावर प्राणी वस्ती नसली तरी इथे पाली, साप हे होतेच! सगळीकडे मिट्ट अंधार आणि त्या अंधारातून पायावरून फिरणारे साप! या दोघांचा खुराकच तो होता त्यामुळे त्याची कमी इथे नव्हती. शिवाय मधोमध उंच चमकणाऱ्या डोळ्यांची, मोठे सुळे बाहेर आलेली, तोंड उघडं असलेली आणि ज्यातून रक्त वाहत होतं अशी  एकदम भयानक मूर्ती होती. मूर्ती असली तरी ते पण एक पिशाच्च होतं जे मूर्ती मध्ये परावर्तित झालं होतं. 

"या आमवस्येला आम्ही सर्वशक्तीमान होऊ.... आणि त्याबरोबर तुमच्या शक्ती सुद्धा वाढतील रक्त पिशाच्च! हा... हा... हा..." अमन किळसवाण्या आवजात ओरडून म्हणाला. 

"आता तुमच्या मुक्तते बरोबर सगळीकडे फक्त आपलं राज्य! आपलं.... अंधाराचं राज्य... फक्त रक्त आणि रक्त.... हा... हा... हा...." श्वेता तिच्या ओठांवरून सापासारखी लांब लचक जीभ फिरवत म्हणाली. 

त्या दोघांचं हे बोलणं ऐकून त्या पिशाचाने तोंडातून वाहणारा रक्त प्रवाह थोडा वेगाने करून स्वतःचा आनंद दर्शवला. या दोघांनी सुद्धा लगेच प्रसाद म्हणून ओंजळीत ते रक्त घेऊन पिलं. दोघांच्याही कोपरा पर्यंत त्या रक्ताचा ओघळ आला होता आणि तोंड लाल भडक झालं होतं. त्याच अवतारात आता मुलांना तिथे कैद करण्याची तयारी सुरू झाली होती. 

"चार सापांच्या कातड्या लागतील त्या मुलांना बांधायला." श्वेता भयाण आवाजात म्हणाली. 

"एवढंच ना.. थांब..." अमन म्हणाला. 

लगेच त्याने तिथून फिरणारे चार विषारी साप पकडले आणि एकदमच त्यांची कातडी सोलून काढली! मांस लगेच त्याच्या पोटात गेलं. 

"हे घे..." त्याने त्या सगळ्या कातड्या श्वेता च्या हातात दिल्या. 

तिने तिथेच असणाऱ्या झाडांवर त्या टांगून ठेवल्या आणि बाहुल्यां ना पुढच्या कामाचे हुकुम सोडले. 
**************************
इथे आता बऱ्यापैकी अंधारून आलं होतं म्हणून प्रवीण निघायची तयारी करत होता. पाण्याची बाटली, टॉर्च, धार केलेले दगड, सुरा, नकाशा  आणि त्याने आणलेली दोरी घेऊन तो आता जायला कधी मिळतंय या संधीच्या शोधात होता. समृध्दी ने तो तिथे नाहीये हा संशय येऊ नये म्हणून बॅगेतून पांघरूण काढून एका पिशवीत माणूस झोपला आहे असं वाटावं असं फुगवून तिथे ठेवलं आणि त्यावर दुसरं पांघरूण घातलं. टेंट च्या बाहेर दीपा ने सगळ्या बाहुल्यांना पुढच्या बाजूला थोड्या अंतरावर खिळवून ठेवलं होतं. मयुर ने हळूच बाहेर  बघितलं आणि प्रवीण ला जाण्यासाठी खूण केली. 

"All the best प्रवीण! कोणत्याही परिस्थितीत धागा काढू नकोस... आम्ही येतोच आहोत. तू जाताना झाडावर खुणा करत जा.." नम्रता म्हणाली. 

प्रवीण भरलेल्या डोळ्यांनी तिथून निघाला. सगळ्यांना त्याच संकटात ठेवून त्याचा पाय तिथून निघत नव्हता पण, तो गेला नसता तर राफ्ट बनली नसती म्हणून मनावर दगड ठेवून तो टेंट च्या मागच्या बाजूने दबक्या पावलांनी निघाला. सगळे मनोमन तो सुखरूप किनाऱ्या पर्यंत पोहोचावा यासाठी प्रार्थना करत होते. दीपा ने तो गेलेला पाहून पुन्हा पहारा द्यायला सगळ्यांना जागेवर आणलं. सगळे व्यवस्थित घड्याळावर लक्ष देऊन होते. प्रवीण जाऊन साधारण १० मिनिटं झाली असतील तोवर समृध्दी आणि मयुर ला अचानक त्रास व्हायला लागला. 

"नम्रता! अगं खूप चक्कर येतेय... डोकं खूप जड झालं आहे...." समृध्दी डोक्याला दोन्ही हाताने पकडून कळवळून म्हणाली. 

मयुर सुद्धा तेच म्हणत होता. त्या दोघांची ही अवस्था बघून ती घाबरली. "प्रवीण सुद्धा जवळ जवळ तिथून पळत गेला असेल निम्मा रस्ता तरी त्याचा पार झाला असेल आणि आता या दोघांना हे असं व्हावं? मी एकटी आता काय करू?" तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं आणि डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 

"पाणी... पाणी...." समृध्दी एकदम मलूल पणे म्हणाली. 

नम्रता ने पटकन तिला पाणी पाजलं आणि मयुर ला सुद्धा दिलं. ऐनवेळी हे असं होणं त्यांना परवडणारं तर नव्हतंच पण, याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती. एवढ्यात कोणीतरी तिथे चालत येत असल्याची चाहूल तिला लागली. तिने पटकन डोळे पुसले आणि त्या दोघांना तिथे खाली व्यवस्थित आडवं केलं. 

"हे बघ.... आपलं अर्ध काम झालं... तिथे आपण तयारी काय सुरू केली यातल्या तीन विकेट गेल्या! हा... हा... हा...." अमन टेंट मध्ये डोकावून म्हणाला. 

"काय केलंय तुम्ही? का यांना हा त्रास होतोय?" नम्रता ने रडत रडत विचारलं. 

"अगं... आम्ही तर अजून काही केलंच नाहीये... फक्त थोडी तयारी करून आलोय... तरी यांची ही अवस्था आहे... मग उद्या संध्याकाळी जेव्हा खऱ्या विधिंना सुरुवात होईल तेव्हा काय होईल? हा... हा... हा...." श्वेता तिचा रक्त येणारा डोळा अजून बाहेर काढत म्हणाली. 

तिचं ते रूप एकदम भयानक होतं. ते बघून नम्रता लटलट कापत होती आणि तिच्या तोंडून बाप्पाचे मंत्र निघायला लागले. 

"ए.... चूप.... चूप......" अमन आणि श्वेता स्वतःच्या कानावर हात ठेवून ओरडू लागले. त्यांचं ओरडणं एवढं मोठं होतं की पूर्ण बेटावर तो आवाज घुमू लागला. 

नम्रता च्या लक्षात आलं यांना जराही देवाचं नाव सहन होत नाहीये. म्हणून ती अजून जप करू लागली तसे ते दोघे आणि राहिलेल्या पाच - सहा बाहुल्या सुद्धा त्यांच्या मागे गेल्या! 

"नम्रता... आता थोडावेळ तरी कोणी इथे येणार नाही... हीच संधी आहे पळण्याची." दीपा ने तिला येऊन सांगितलं. 

"अगं पण या दोघांना बरं वाटत नाहीये... मी कशी सांभाळू यांना?" तिने विचारलं. 

"ते आता तुलाच बघावं लागेल. दोन्ही पिशाच्च आता खूप खवळले आहेत... ते दोघं आजच तुम्हाला पकडायला येण्याची शक्यता आहे. त्यातूनही जर प्रवीण आधीच इथून गेला आहे समजलं तर ते अजून चवताळतील." दीपा घाईत काळजीने म्हणाली. 

"ओके.. मी बघते काय करायचं..." नम्रता स्वतःला सावरत डोळे पुसत म्हणाली. 
**************************
प्रवीण ने निम्मा रस्ता कधीच पार केला होता. त्या बाहुल्यांच्या प्रांतात असताना साधारण मिनिट भरासाठी त्याला सुद्धा समृध्दी आणि मयुर ला जसा त्रास झाला होता तसा झाला होता. अक्षरशः चक्कर येत असताना होलपडत होलपडत तो चालत पुढे आला होता. 

"अर्धा तास होऊन गेला आहे... आता तिथून  समृध्दी निघाली असेल... मला लवकरात लवकर जाऊन तयारी करायला घ्यायला हवी." तो एका झाडाजवळ आधार घेऊन घड्याळ बघून विचार करत होता. 

आधीच थोडं बरं वाटलं नसल्याने आणि एवढं पळत आल्यामुळे त्याला धाप सुद्धा लागली होती. तिथल्याच एका दगडावर बसून सावकाश त्याने दोन घोट पाणी पीलं आणि एका मिनिटात उठून पुन्हा पळत पुढे निघाला. त्याला जराही कल्पना नव्हती त्याला हा त्रास का झाला आणि समृध्दी, मयुर सुद्धा आता आजारी आहेत. 
*************************
दुसरीकडे श्वेता आणि अमन पळत त्या घराजवळच गेले होते. त्यांच्या कानातून रक्त यायला लागलं होतं. नम्रता ने जे काही मंत्र उच्चार केले ते त्यांच्या कानात अजून घुमत होते आणि डोकं चक्रावत होतं. 

"त्या नम्रता ला बरोबर आपली दुखरी नस समजली आहे. ती मुद्दाम असं करतेय आणि आपल्याला त्रास झाला की बाहुल्या पण काही करू शकत नाहीत... सगळ्या आपल्या मागे आल्या आहेत!" श्वेता चिडून पण विव्हळत  म्हणाली. 

"हो... मला समजतंय... आपल्याला थोड्यावेळात बरं वाटेल... एकदा आपण त्या चौघांना इथे आणून डांबलं की तिच्या मंत्रांचा अर्धाच प्रभाव आपल्यावर होईल.... आपण उद्या संध्याकाळी नाही तर आजच आपल्याला बरं वाटलं की त्या चौघांना घेऊन येऊ..." अमन सुद्धा विव्हळत म्हणाला. 

ते दोघं त्या अंधाऱ्या घरात जाऊन बसले. नम्रता ने मोठ्यांदा मंत्र म्हणल्यामुळे त्यांना साधारण तास भर तरी बरं व्हायला लागणार होता. दोघांनी तिथून सरपटत जाणाऱ्या पाली कानात कोंबल्या! त्या पालींची शेपूट कानाबाहेर लटकत होती आणि जोरात कानात दाबल्यामुळे त्या पालींचा जीव जाण्यात जमा होता. त्या पिशाच्च्यां साठी त्या पाली औषधां सारखं काम करणार होत्या. त्या कानात कोंबल्यामुळे त्यांच्या कानातून येणारं रक्त कमी झालं होतं. 

"आपण बाकी सगळ्यांना वश करून ते धागे काढून टाकायला लावू शकतो पण त्या नम्रता ला वश करणं सोपं काम नाहीये.... काय करायचं?" श्वेता ने चडफडत विचारलं. 

"काट्याने काटा काढायचा!" अमन काहीतरी विचार करून म्हणाला.  

"म्हणजे? अरे आपण तिला हात सुद्धा लावू शकत नाहीये...." श्वेता म्हणाली. 

"आपण तिच्या बाकी साथीदारांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि दोन चार वार केले की आपणहून आपल्या मागे येईल..." अमन वाकडी मान करून एकदम क्रूर पणे म्हणाला. 

त्याचं हे बोलणं ऐकून श्वेता हसायला लागली आणि तो भयाण आवाज पूर्ण आसमंतात गुंजत राहिला. 
****************************
"हा आवाज? हा आवाज नक्कीच त्या अमन, श्वेता चा आहे! काय झालं असेल तिथे नक्की?" प्रवीण ने तो आवाज ऐकला आणि तो जागीच थबकला. 

तो किनाऱ्या जवळ पोहोचत आलाच होता पण या आवाजामुळे त्याला आता भीती वाटायला लागली होती. त्याच्या बाकी मित्रांना काही झालं नाही ना याची काळजी त्याला सतावत होती. एक क्षण तर आपण पुन्हा माघारी जावं असं त्याच्या मनात आलं आणि आपसूकच त्याची पावलं मागे वळली. पण, नंतर बाकी सगळ्यांचं बोलणं त्याला आठवलं आणि त्याने स्वतःला सावरलं. 

"नाही प्रवीण! आत्ता इमोशनल होऊन निर्णय घ्यायचा नाहीये... तिथे नम्रता आहे! ती घेईल सगळ्यांची काळजी. आपल्यावर सगळ्यांना सुखरूप इथून बाहेर काढण्याची जबाबदारी आहे. चल प्रवीण पुढे..." तो स्वतःशीच म्हणाला. 

त्याने एक दीर्घ श्वास घेऊन नम्रता ने सांगितल्या प्रमाणे बाप्पाचं नाव घेऊन पुढे चालायला सुरुवात केली आणि काही मिनिटात तो किनाऱ्या जवळ पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने एक सुटकेचा निःश्वास टाकला आणि दोन घोट पाणी पिऊन लगेच कामाला लागला. एव्हाना आता रात्र व्हायला लागली होती त्यामुळे आधीच काही धड दिसत नव्हतं. टॉर्च आणि मोबाईल च्या फ्लॅश लाईट चा वापर करून त्याने शक्य तेवढा उजेड केला होता. सगळ्यात आधी सुक्या काड्या आणि पाला पाचोळा गोळा करून त्याने आग लावली. 

"खरंच माणसाच्या आयुष्यात उजेड किती महत्वाचा असतो ना! म्हणजे आत्ता इथे किती अंधार होता पण, या छोट्याश्या आगीमुळे तो कुठच्या कुठे गेला. एक आशेचा नवीन किरण, ऊब आणि नवीन मार्गावर प्रकाश टाकण्याचं काम ही अग्नी करते! फक्त इथे आगीची गरज होती. आता शंभर हत्तींचं बळ एकवटल्या सारखी ताकद आली आहे... लगेच कामाला लागलं पाहिजे." प्रवीण ने आग लावली तेव्हा त्याच्या मनात सकारात्मकता तयार होऊ लागली आणि तो स्वतःशीच म्हणाला. 

त्या बेटावर आजूबाजूला बरीच बांबू ची झाडं होती. त्यापासून राफ्ट तयार करायची हे त्याने ठरवलं. बांबू एक असं झाड जे कापायला सोपं, मजबूत आणि हलकं! पाण्यावर सहज याची राफ्ट तरंगेल आणि आम्ही चौघे इथून व्यवस्थित बाहेर पडू हा त्याला विश्वास होता. त्याच्या सुऱ्याला त्याने दगडावर घासुन धार करून घेतली आणि उभा राहिला. 

"खरंतर झाडं तोडायची नसतात आणि संध्याकाळ नंतर तर नाहीच नाही पण आज ही परिस्थिती अशी आहे की..." तो एका बांबू च्या झाडाला हात धरून उभा राहून नाखुशीने म्हणाला. 

क्रमशः......
***************************
श्वेता आणि अमन ला समजेल का या चौकडी ने पळून जाण्याचा प्लॅन केला आहे? नम्रता समृध्दी आणि मयुर ला कसं सांभाळून घेईल? ते तिघे बाहेर पडू शकतील? प्रवीण ला यातलं काही समजलं तर? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all