एक बेट मंतरलेलं (भाग -१०) #मराठी_कादंबरी

Horror Marathi story. Horror island story. Marathi kadambari.

एक बेट मंतरलेलं (भाग -१०) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
*****************************
श्वेता आणि अमन तिथून गेले असले तरी बाहुल्यांना या सगळ्यांवर लक्ष ठेवायला ठवून गेले होते. आता इथून जायचं कसं, या जादुई बाहुल्या आहेत तर त्यांना चकवा द्यायचा कसा हाच विचार सगळे करत होते. 

"नम्रता! अगं आपण या बाहुल्यांना हलक्यात घेऊन चालणार नाहीये... त्या सगळं त्या अमन, श्वेता ला सांगतील." मयुर म्हणाला. 

मयुर च हे बोलणं त्या बाहुल्यांनी ऐकलं होतं. 

"ही.. ही... ही... तुम्ही कोणी हे बेट सोडून काय हा टेंट सोडून पण जाऊ शकणार नाही." नम्रता ला प्रवीण ने जी बाहुली दिली होती ती बोलली. 

सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे बघितलं. ती बाहुली टेंट च्या बाहेर इतर बाहुल्यांसोबत पहारा देत उभी होती आणि सारखं हेच बोलत होती. त्या बाहुलीच्या पाठोपाठ बाकी बाहुल्या सुद्धा त्यांना धमकावत होत्या! दर मिनिटाला तेच तेच वाक्य येत होतं. 

"तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट बघितली का? या सगळ्या बाहुल्या फक्त एकच वाक्य बोलतायत... जसं की त्यांना ते ठरवून दिलेलं आहे. अरे शेवटी काहीही झालं तरी खेळणीच आहेत ती! हेच मला मगाशी म्हणायचं होतं." नम्रता हळू आवाजात म्हणाली. 

"अगं हो पण ही साधी खेळणी नाहीत ना... आपण काय करू शकतो आता?" प्रवीण म्हणाला. 

"एक मिनिट... आधी मला हा कोणता डाव नाहीये ना तपासू दे... मग ठरवू..." ती म्हणाली. 

तिने थोडावेळ डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेऊन टेंट च्या बाहेर आली. तिला जसं त्या बाहुल्यांनी बाहेर बघितलं तसा त्यांचा आरडाओरडा सुरू झाला. 

"ए... आत बस... नाहीतर आजच बळी जाईल..." 

"हो.. हो... मी कुठेही जात नाहीये... तुम्ही सगळ्या कितीही झालात तरी बाहुल्या आहात ना.. मला तुमच्याशी खेळायचं आहे." नम्रता म्हणाली. 

सगळ्या बाहुल्या तरीही आरडा ओरडा करत होत्याच! जेव्हा नम्रता ने टेंट च्या आत बसून बोलायला सुरुवात केली तेव्हा त्या शांत झाल्या. आणि पुन्हा पहारा देण्यासाठी सज्ज झाल्या. 

"बघा... मला हेच म्हणायचं होतं. या बाहुल्या आहेत शेवटी! त्यांना आपल्या सारखा मेंदू नाहीये... अरे फक्त निरागस खेळण्यांची त्या अमन, श्वेता ने वाट लावली आहे बाकी काही नाही..." नम्रता म्हणाली. 

"हो... अगदी असंच झालं आहे... मला यातून बाहेर पडायचं आहे.. प्लीज तुम्ही मदत कराल का? मी तुम्हाला हवी ती मदत करेन..." टेंट च्या मागच्या बाजूने एक बाहुली आत डोकवत म्हणाली. 

सगळे घाबरून एकमेकांना चिकटून बसले होते. ही बाहुली स्वतःचे विचार मांडतेय, आपल्याशी बोलतेय म्हणजे हा अमन, श्वेता चा डाव तर नसेल ना म्हणून सगळे घाबरले होते. थोडा मळकटलेला फ्रॉक, छान निळे पाणीदार डोळे, सोनेरी केस पण त्या जंगलात राहून राहून थोडे काळवंडलेले, गुंतलेले! दिसायला एकदम गोड अशी ती बाहुली होती. 

"नका घाबरु... मला त्या दोन्ही पिशाच्यांच्या तावडीतून मुक्तता हवी आहे... मी तुम्हाला काही नाही करणार." ती बाहुली एकदम निरागसपणे नाजूक आवाजात म्हणाली. 

सगळ्यांची भीती आता जरा कमी झाली होती. एकमेकांकडे बघून हा नक्की काय प्रकार आहे हे डोळ्यांनी सगळे एकमेकांना विचारत होते.

"मी काय सांगते ते नीट ऐका! त्या बाहुल्या नाटक करायत त्यांना काही कळत नसल्याचं. पण, तुम्ही काय बोलाल, काय काय कराल हे सगळं त्या दोन्ही पिशाचांकडे जाईल.. सावध व्हा." ती बाहुली म्हणाली. 

"नमु... मला पण तसंच वाटतंय हा... त्या बाहुल्या बघ झाडावर चढून बसल्या आहेत. आपल्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहेत त्या. आणि ही बाहुली काय म्हणतेय त्यावर विश्वास ठेवूया आपण! कारण, आपण आत्ता जिथे बाहुल्या घेऊन खेळत होतो ना तिथे होती ही बाहुली. मला खूप आवडली म्हणून आपण याच बाहुली सोबत पासींग द पास खेळलो." समृध्दी म्हणाली. 

"हो... तुम्ही कोणीही हलू नका नाहीतर त्यांना मी दिसेन...." ती बाहुली हळू आवाजात म्हणाली. 

सगळे तिथेच अजून एकमेकांना चिकटून बसले होते. वर पारदर्शक शीट असल्यामुळे कोणत्याही प्रकारे ती चांगली बाहुली त्या वाईट बाहुल्यांच्या नजरेस पडणार नाही याची काळजी सगळे घेत होते. 

"एक मिनिट.. मला काहीतरी विचारायचं आहे... आम्ही तुझ्यावर तरी कसा विश्वास ठेवू? तू नक्की आमची मदत करशील हे आम्ही खरं कसं मानू?" नम्रता म्हणाली. 

"बरोबर आहे तुझं... हा देवाचा धागा आहे ना तुझ्या हातात? मला पण हा बांध.. बघ, मी सुरक्षित राहिले तर ठेव माझ्यावर विश्वास... नाहीतर मग त्या बाहुलीचा वार कसा उलट फिरला होता तसाच मलाही काहीतरी त्रास होईल." ती बाहुली नम्रता च्या हाताकडे बोट दाखवून म्हणाली. 

नम्रता ने लगेच त्या बाहुलीला धागा बांधला. खरंच त्या बाहुलीला काहीही झालं नाही. हे बघून नम्रता चा आणि सगळ्यांचाच आता त्या बाहुली वर विश्वास बसला. 

"आता हा धागा सोड... मी थोड्यावेळाने त्या बाहुल्यांचे लक्ष दुसरीकडे वळवते तेव्हा तुम्ही इथून पळायचा प्रयत्न करा. एकदा तुम्ही या सगळ्या बाहुल्यांच्या प्रांतातून बाहेर पडलात की मग या बाहुल्या तुमचा पाठलाग नाही करू शकणार. साधारण पाच मिनिटाच्या परिसरात हे बाहुल्यांचे राज्य आहे. इथून बाहेर पडणं सगळ्यात कठीण काम आहे. पुढे मग समुद्र आहे बोट लगेच मिळाली तर नशीब बलवत्तर नाहीतर काही खरं नाही." त्या बाहुली ने सगळं सविस्तर सांगितलं. 

"ओके... पण, ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. तू या बाहुल्यांना दुसरीकडे भरकटव आम्ही काहीतरी प्लॅन करून बघतो.. तू सुद्धा आमच्या सोबतच येशील... आता तुझ्या मुक्तीची पण जबाबदारी आमच्यावर!" नम्रता म्हणाली. 

तिचं हे बोलणं ऐकून त्या बाहुली ला सुद्धा इतक्या वर्षाने आपली मुक्तता होणार म्हणून आनंद झाला होता. ती बाहुली माघारी फिरून बाहेर जाऊ लागली एवढ्यात नम्रता ने तिला थांबवलं! 

"ऐक ना.. तू आमची एवढी मदत करतेय पण, तुझं नाव काय आहे? म्हणजे आधी तू कोणाची तरी असशीलच ना? तिने तुला नाव दिलं असेल ना?" नम्रता ने विचारलं. 

"नाव... कसलं काय... मला काहीही नाव नाहीये." ती बाहुली थोडी उदास होऊन म्हणाली. 

"अरे मग त्यात काय? उदास नको होऊ.. आपण देऊया तुला नाव... तुझं नाव आजपासून असेल.... दीपा!" समृध्दी म्हणाली. 

त्या बाहुलीच्या सुद्धा डोळ्यात आनंदाश्रु तरळले. आधी निर्जीव असली तरी तिला भावना होत्याच! तिला ही आपुलकी आवडली आणि तिचं नवीन नाव सुद्धा! 

"समृध्दी! अगं खूप छान नाव दिलंस... आपल्यासाठी दीपा तर एका दिपस्तंभाचच काम करतेय..." प्रवीण म्हणाला. 

सगळ्यांनाच ते पटलं होतं. दीपा आता हळूच टेंट च्या बाहेर आली होती. ही सगळी चौकडी गोल करून बसली होती. चेहरा तर एकदम टेंशन मध्ये असल्यासारखा केला होता. पण, त्यांचं इथून पळून कसं जायचं याचं प्लॅनिंग सुरू होतं. 

"मला वाटतंय आपण रात्री सगळे एकत्र जाऊया..." समृध्दी म्हणाली. 

"नाही... आपण एकत्र बाहेर नको पडायला. एक एक करून जाऊ.. म्हणजे एकजण जरी इथून सुटू शकला तरी तो बाहेर जाऊन मदत घेऊन येऊ शकेल." प्रवीण म्हणाला. 

"हो... मला पटतंय... आपण खूप विचार करून पावलं उचलायला हवी आहेत." नम्रता म्हणाली. 

एवढ्यात त्यांच्या टेंट वरच्या बाजूला कोणीतरी काहीतरी फेकलं असं सगळ्यांना वाटलं म्हणून त्यांनी वर बघितलं तर झाडावर बसून दीपा ने त्या झाडाला लागलेलं फळ टाकलं होतं. चौघांना काहीही कळत नव्हतं पण, तिचं हे असं करण्याचं कारण त्यांना लवकरच समजलं! बाहेरून अमन आणि श्वेता त्यांच्या टेंट मध्ये डोकावले होते. 

"काय? हे सगळे उंदीर त्रास देत नाहीयेत ना?" अमन ने त्यातल्या एका बाहुलीला विचारलं. 

"नाही... सगळे घाबरून आतच बसले आहेत!" ती म्हणाली. 

"हा... हा... हा.... शेवटी आपल्या शक्तीचा अंदाज आला... पण, तरीही आपण कानाडोळा करून चालणार नाही.... आता इथे तुमच्या पैकी पाच - सहा जण थांबा... बाकी चला.. आम्हाला तुमची मदत हवी आहे..." श्वेता म्हणाली. 

लगेच ते दोघं आणि बऱ्याच बाहुल्या त्या दोघांच्या मागे जाऊ लागल्या. या चौकडीचं अर्ध काम तर झालं होतं. आता फक्त ज्या काही पाच - सहा बाहुल्या आहेत त्यांना भुलवून पळायचं होतं. 

"बोला आता काय करायचं?" मयुर ने हळू आवाजात विचारलं. 

नम्रता ने प्रवीण ला नोटपॅड आणि पेन द्यायची खूण केली. त्याची आधी पासून ची ही सवय आज त्यांचा जीव वाचवण्यासाठी कामी येणार होती. ज्या नवीन ठिकाणी आपण जातो तिथे काय काय विशेष आहे हे लिहायला म्हणून त्याच्याकडे नेहमीच नोटपॅड आणि पेन असायचं. लगेच त्याने त्याच्या खिशातून पेन आणि लहान नोटपॅड काढून नम्रता च्या हातात दिलं! 

"सगळ्यात आधी प्रवीण बाहेर पडून किनाऱ्या लगत जाऊन राफ्ट बांधायची तयारी करेल. प्रवीण गेल्यावर साधारण अर्ध्या अर्ध्या तासाने आपण एक एक जण इथून बाहेर पडू." तिने लिहून ते सगळ्यांना दाखवलं. 

सगळ्यांनी अंगठे उंचावून होकार दर्शवला. 

"दुसरी समृध्दी बाहेर पडेल. मग मयुर आणि शेवटी मी! मी येताना दीपा ला सुद्धा घेऊन येईन." तिने लिहिलं. 

मयुर ने खुणेने तिच्याकडून नोटपॅड मागून घेतलं. 

"शेवटी मी येतो... आधी तुम्ही तिघे निघा." त्याने लिहिलं. 

"नाही.... समृध्दी आणि तू प्रवीण ला राफ्ट बनवायला मदत करू शकता. मला जमत नाही ते काम... तुम्हाला माहितेय..." तिने लिहिलं. 

त्याचे लिहून लिहून वाद होऊ लागले होते. म्हणून प्रवीण ने नोटपॅड घेतलं आणि लिहू लागला; "नम्रता बोलतेय ते बरोबर आहे. ती शेवटी राहिली तरी ते श्वेता आणि अमन तिला हातही लावू शकत नाहीयेत. ती सुखरूप येऊ शकेल." 

आता त्याचं बोलणं सगळ्यांना पटलं. बाहेर संध्याकाळ होत आली होती. सूर्य मावळतीला जाऊ लागला होता. लाल भडक आगीचा गोळा आज जरा जास्तच चमकताना दिसत होता! आशेचा एक नवीन किरण सगळ्यांना मिळाला होता आणि त्या आधारेच सगळे तिथून निसटण्याची तयारी करत होते. एवढ्यात पुन्हा टेंट च्या मागच्या बाजूने दीपा आली. 

"तुम्हाला जे काही करायचं आहे ते आज रात्रीत करावं लागेल. त्या दोघांना तुमचा संशय आला असणार म्हणून रात्रीत सगळी तयारी करून तुम्हाला उद्या कैद करण्याचा डाव असू शकतो." ती येऊन म्हणाली. 

"ओके... आम्ही आज रात्रीच इथून निघण्याचा प्रयत्न करू... तू नम्रता बरोबर ये.... ती सगळ्यात शेवटी इथून निघेल. तुला काही छोटे रस्ते माहीत असतील तर तिला मदत पण होईल." मयुर म्हणाला. 

"हो... इथून निघायच्या आधी मी सांगेन... एकदा हे बाहुल्यांचे राज्य सोडलं की मी पुन्हा सामान्य बाहुली होईन... तेव्हा मला काहीही बोलता येणार नाही की हालचाल करता येणार नाही." दीपा म्हणाली. 

सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे बघितलं. प्रवीण ने लगेच त्याच्या नोटपॅड मधले चार कागद आणि एक extra पेन नम्रता ला देऊन ठेवलं. आता सगळ्यांना वाट बघायची होती ती अंधार होण्याची. 

"जाण्याआधी सगळ्यांनी हा अंगारा लावून घ्या. सध्या आपण ज्या परिस्थितीत अडकलो आहोत त्यातून बाप्पाच आपलं रक्षण करू शकतो." नम्रता तिच्या पर्स मधून अंगारा काढत म्हणाली. 

सगळ्यांनी अंगारा लावून घेतला. सगळ्यांच्या मनाची चलबिचल होत होतीच! नाही म्हणलं तरी हे जगावेगळं संकट त्यांच्यावर आलं होतं. 

क्रमशः.....
***************************
आपली ही चौकडी तिथून पळू शकेल का? श्वेता आणि अमन कुठे गेले असतील? असे सहजा सहजी पहारा कमी करून ते का गेले असतील? काहीतरी वेगळंच नसेल ना त्यांच्या डोक्यात? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all