एक बेट मंतरलेलं (भाग -३२) #मराठी_कादंबरी

Horror island story. Horror dalls island story. Marathi kadambari. Horror Marathi kadambari. Ira blogging horror stories.

एक बेट मंतरलेलं (भाग -३२) 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व पात्रे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणत्याही रुढी परंपरांचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
****************************
प्रवीण च्या बाबांना गुरुजींनी त्या दिवशीच्या रात्री प्रवीण सोबत काय घडलं हे विचारलं होतं. प्रवीण चे बाबा त्या रात्री काय घडलं या विचारात गेले. 

"नम्रता च्या बाबांना फोन आला म्हणून आम्ही दोघं हरीश भाऊंच्या घरी गेलो. तिथे प्रवीण शून्यात नजर लावून बसला होता. हरीश भाऊंनी कसंबसं त्याला भानावर आणलं! त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्या कडे एक बाहुली होती. पण, जेव्हा आम्ही दोघं तिथे पोहोचलो तेव्हा तिथे बाहुली वैगरे आम्हाला दिसली नाही. प्रवीण सुखरूप होता हेच खूप होतं. त्या दिवशी त्याला खूप अशक्तपणा जाणवत होता, त्याचं डोकं दुखत होतं आणि नंतर तो म्हणत होता खूप भयंकर बाहुली आमच्या घरात आहे जी मुलांनी बेटावर असताना बघितली होती." प्रवीण च्या बाबांनी सगळं सविस्तर सांगितलं. 

"मुलांनो! काय बघितलं होतं बेटावर? कोणती बाहुली असेल ती काही कल्पना आहे का तुम्हाला?" गुरुजींनी मुलांना विचारलं. 

"हो... ती बाहुली प्रवीण ने नम्रता ला गिफ्ट दिली होती. पण, जेव्हा श्वेता, अमन पिशाच्च रूपात आले तेव्हा ती बाहुली आमच्यावर वार करायला लागली पण, नम्रता ला ती साधा स्पर्श सुद्धा करू शकली नाही. मग आम्हाला दीपा भेटली आणि तिच्या मदतीने आम्ही सगळे पळून आलो. तरीही त्या दोघांना हे समजलं आणि आम्ही जी राफ्ट केली होती त्यावर श्वेता ने काहीतरी फेकलं. बहुदा ती बाहुली च असावी." मयुर ने सगळं सांगितलं. 

"आणि एक महत्त्वाची गोष्ट! रात्री दीपा माझ्या खोलीत होती ती आम्हाला अचानक दारात बाहेर पडलेली सापडली होती. तेव्हाच तिच्या गळ्यात जी आधीची माळ होती ती तुटून पडली होती." नम्रता ने रात्री जे घडलं होतं ते सुद्धा सांगितलं. 

"बरं! आला सगळा प्रकार लक्षात. आत्ता आपण पूजा करुया... दीपा वर वाईट शक्तींचा प्रभाव आहे. तिला यातून सोडवलं पाहिजे.. उद्या मी प्रवीण ला भेटायला येतो.. त्याला आराम करुद्या. बाप्पाचा प्रसाद घेऊन मीच येईन तुमच्या घरी. तेव्हा ती बाहुली सुद्धा सापडली तर तिला आपण बंदिस्त करू शकतो." गुरुजी म्हणाले. 

सगळ्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. साधारण अर्धा, पाऊण तास पूजा सुरू होती. अगदी निर्विघ्नपणे पूजा पार पडली. गुरुजींनी दीपा च्या गळ्यात त्यांनी बाप्पाच्या कंठी पासून केलेली माळ घातली. 

"नम्रता! आता दिपावर वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही... ती स्वतः आता तिच्या मुक्तीसाठी काय हवं हे सांगू शकेल." गुरुजी म्हणाले. 

हे ऐकुन सगळ्यांना आनंद झाला. दीपाची आता त्यांना खूप मदत होणार होती. एक पाऊल विजयाकडे पडल्याचे संकेत सगळ्यांना जाणवत होते. 

"सगळ्यात महत्त्वाचं! दीपा वर एवढा वाईट शक्तींचा प्रभाव असून सुद्धा तिच्या मुळे तुम्हाला कोणालाही काही त्रास झाला नाही. हा निव्वळ एक चमत्कार आहे. बाप्पा पाठीशी आहे आणि तोच सगळं काही निभावून नेतोय..." गुरुजी म्हणाले. 

त्यांच्या या बोलण्याने सगळ्यांचा बाप्पावरचा विश्वास अजून वाढला होता. मुलांनी गुरुजींना नमस्कार केला आणि पुन्हा बाप्पाच्या पाया पडून सगळे प्रसाद घेऊन हॉस्पिटल मध्ये जायला निघाले. 

"आज खूप बरं वाटतंय... असं वाटतंय आता सगळं काही ठीक होणार..." मयुर ची आई म्हणाली. 

"हो... खरंच आज खूप बरं वाटतंय.. आपण आधीच मुलांवर विश्वास ठेवला असता तर ही वेळ आलीच नसती." नम्रता ची आई म्हणाली. 

"जाऊदे आता तो विषय... वेळ काही आपल्याला मागे घेऊन जाता येणार नाहीये... आता दीपा ला मुक्ती मिळवून दिली आणि पौर्णिमेपर्यंत काळजी घेतली की काही नाही होणार.... बाप्पा आहे..." नम्रता स्मित करत म्हणाली. 

"हो ते तर झालंच. बरं मी म्हणत होते तुम्ही सगळ्या मुलांनी घरी जा... हॉस्पिटल मध्ये गर्दी नको... संध्याकाळी या पुन्हा.... तसंही उद्या प्रवीण येईल घरी..." नम्रता ची आई म्हणाली. 

"हो काकू! आम्ही फक्त प्रवीण ला एकदा भेटून जाऊ घरी..." समृध्दी म्हणाली. 

बोलता बोलता सगळे हॉस्पिटल बाहेर आले. प्रवीण ला सध्या आरामाची गरज तर आहेच शिवाय त्याला जेवढं सकारात्मक सांगता येईल, त्याच्याशी सकारात्मक बोलता येईल तेवढा तो लवकर बरा होईल म्हणून जे काही आज गुरुजींनी चांगलं चांगलं सांगितलं ते त्याला सांगायचं असं ठरवून सगळे आत गेले. 

"प्रवीण! कसा आहेस आता?" मयुर ने त्याला गेल्या गेल्या विचारलं. 

"खूप मस्त... आता काही त्रास होत नाहीये.." तो सावकाश उठून बसत म्हणाला. 

बोलता बोलता मयुर ने त्याला बसायला मदत केली. तो बेड ला टेकून बसला होता. तो कितीही आता खूप बरं वाटतंय म्हणत असला तरी त्याच्या चेहऱ्यावर अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. 

"घे प्रवीण प्रसाद!" समृध्दी त्याच्या हातावर प्रसाद ठेवत म्हणाली. 

त्याने प्रसाद घेऊन त्याला नमस्कार केला आणि खाल्ला. थोडा वेळ शांततेत गेला. 

"नमु! गुरुजी काय म्हणाले ग?" त्याने काळजीने विचारलं. 

"अरे काही नाही... आता आपल्याला काळजी करायची गरज नाहीये. गुरुजींनी सांगितलं आहे की बाप्पा आपल्या सोबत आहे. दीपा वर वाईट शक्तींचा प्रभाव पडला होता पण, आपल्या पाठीशी बाप्पा आहे म्हणून तो त्रास आपल्याला जाणवला नाही. गुरुजी सांगत होते की, हा निव्वळ चमत्कार आहे. दीपा आपल्याला त्या वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असून सुद्धा काही इजा करू शकली नाही." नम्रता ने आनंदात त्याच्या बेड च्या कोपऱ्यावर बसत त्याला सगळं सांगितलं. 

"अरे... मस्तच! चला आता दीपा ला मुक्ती मिळेल. आपण आपला दिलेला शब्द खरा करू शकू!" तो म्हणाला. 

प्रवीण त्या सगळ्यांशी बोलत होता पण न कळत त्याचे डोळे मिटले जात होते. अशक्तपणा मुळे त्याला जास्त वेळ बसवत नव्हतं हे नम्रता च्या लक्षात आलं होतं. 

"प्रवीण! तू झोप! आता आम्ही सगळे घरी जातोय... तू जरा आराम कर... संध्याकाळी आम्ही पुन्हा येऊ..." नम्रता त्याला बेडवर झोपायला आधार देत म्हणाली. 

त्याला लगेचच पडल्या पडल्या झोप लागली. सगळे बाहेर आले. नम्रता चा चेहरा पडला होता. तिला त्याची अशी अवस्था बघवत नव्हती. 

"नमु! काय झालं?" समृध्दी ने विचारलं. 

तिने विचारलं आणि अचानक बांध फुटवा तसं तिला रडू आलं. 

"अगं! असं अचानक काय झालं? आता तर सगळं छान होणार आहे... मग?" तिने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसून विचारलं. 

"काही नाही... मला प्रवीण ला असं बघवत नाहिये... बघ ना त्याची हालत... किती अशक्त झाला आहे तो... बघ ना त्याच्या चेहऱ्याकडे! किती तेजस्वी आणि डोळ्यात एक वेगळीच चमक असलेला त्याचा चेहरा किती निस्तेज झाला आहे..." ती म्हणाली. 

"अरे यार! बस एवढंच! अगं तो होईल बरा.. त्याला आत्ता अशक्तपणा आहे ना? डॉक्टर त्याला औषधं देतायत ना? असं समज की तो आराम करतोय... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जर हे समजलं की तू असा स्वतःला त्रास करून घेतेय तर तो लवकर कसा बरा होईल?" समृध्दी ने तिला समजवलं. 

एरवी नम्रता पूर्ण ग्रुप ला समजवणारी, समंजसपणे सगळं निभावून नेणारी आज फक्त प्रवीण ला असं बघून खचल्या सारखी झाली होती आणि समृध्दी जी सगळं मस्तीत घेणारी टॉम गर्ल आज तिला समजावत होती. नम्रता ने सगळं ऐकुन घेतलं आणि आपणच असं खचून चालणार नाही म्हणून डोळे पुसले, पुन्हा एकदा मागे वळून बघितलं काचेतून प्रवीण शांतपणे झोपलेला दिसला आणि ती पुढे चालू लागली. तिच्या मागोमाग सगळे गेले. 

"आई... आम्ही आता आपल्याच घरी जातोय.. संध्याकाळी पुन्हा येऊ..." नम्रता म्हणाली. 

"हो! Infact तुम्ही सगळे आता जा घरी... सगळे खूप दमला असाल... प्रवीण आता बरा आहे... आम्ही दोघं आहोत इथे..." प्रवीण ची आई बाकीच्यांना म्हणाली. 

"नाही वहिनी... आम्ही आहोत इथे. उलट तुम्हीच थोडावेळ घरी जाऊन आराम करा.. सकाळी तुम्हाला चक्कर आली होती..." नम्रता ची आई म्हणाली. 

एवढ्यात तिथे नर्स आल्या. त्यांच्या कानावर या सगळ्यांचं थोडं बोलणं पडलं होतंच! 

"तुम्ही सगळे आता घरी जा.. फक्त एक जण थांबा! इथे गर्दी करून काही उपयोग नाही.. पेशंट आता स्टेबल आहे आणि उद्या डिस्चार्ज सुद्धा देणार आहेत..." नर्स ने त्यांना सांगितलं. 

"ओके... मी थांबतो.. तुम्ही सगळे जा.." प्रवीण चे बाबा म्हणाले. 

"सगळे जण आमच्या घरीच चला... प्रवीण ला हॉस्पिटल मधून जेवण दिलं आहे पण बाकी कोणीच अजून जेवलं नाहीये... मी पटकन स्वयंपाक करते मग नम्रता चे बाबा प्रवीण च्या बाबांसाठी पण डबा घेऊन येतील." नम्रता ची आई म्हणाली. 

"वहिनी नका पाठवू डबा! मी काहीतरी इथेच कॅन्टीन मध्ये खातो.. तसंही भूक नाहीये.." ते म्हणाले. 

"असं करून कसं चालेल! तुम्ही दोघांनी तुमची काळजी घेतली तर प्रवीण ची काळजी घ्यायला ताकद उरेल ना? ते काही नाही मी डबा पाठवते." नम्रता ची आई ठामपणे म्हणाली. 

सगळे नम्रता च्या घरी गेले. सगळ्यांनी मिळून साधासा स्वयंपाक केला आणि नम्रता चे बाबा डबा घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले सुद्धा! जेवणं झाली आणि सगळ्यांना जरा आराम मिळावा म्हणून नम्रता च्या आईने त्यांच्यासाठी वामकुक्षी ची व्यवस्था पण केली. 

"थँक्यू वहिनी! आम्हाला सगळ्यांना खरंतर स्वतःच्याच घरात जायची भीती वाटत होती." समृध्दी ची आई म्हणाली. 

"थँक्यू काय त्यात! मी तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात ती भीती बघितली होती.. म्हणूनच म्हणलं आपण एकत्र आमच्या घरी जाऊया.. पण, असं घाबरून चालणार नाहीये... गुरुजींनी आज पूजा केली आहे आणि बाप्पा आहे. कोणाला काहीही होणार नाही." नम्रता च्या आईने सगळ्यांना धीर दिला. 

आजचा पूर्ण दिवस तर सगळ्यांचा नम्रता च्याच घरी गेला. संध्याकाळी पुन्हा सगळे एकदा प्रवीण ला बघून आले आणि थोडे घाबरत घाबरत च स्वतःच्या घरी गेले. प्रवीण ची आई फक्त नम्रता च्या घरी थांबणार होती. कारण, रात्रभर प्रवीण चे बाबा हॉस्पिटल मध्ये असणार तर तिला घरी एकटीला भीती वाटायला नको म्हणून नम्रता च्या आईने बळेच तिला थांबवून घेतलं होतं. प्रवीण च्या बाबांना सोबत म्हणून नम्रता चे बाबा सुद्धा रात्री हॉस्पिटल मध्ये गेले होते. रात्री प्रवीण ला त्या वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून नम्रता ने आठवणीने तिच्या बाबांकडे अंगारा दिला होता आणि सोबत एक बाप्पाचा लहान फोटो सुद्धा त्याच्या उशाशी ठेवायला म्हणून दिला होता. घरात आता या तिघीच होत्या म्हणून सगळे एकत्र हॉल मध्येच झोपू असं ठरवून त्यांनी तिथेच झोपायची तयारी केली होती. रात्रीचे साधारण १०:३० वाजून गेले होते. दिवस भराच्या थकव्यामुळे आणि आधीच बी.पी. चा त्रास झाल्यामुळे प्रवीण च्या आईला झोप लागली होती. नम्रता ची आई सुद्धा आता सगळं ठीक होणार आहे म्हणून झोपली होती पण, नम्रता मात्र जागीच होती. तिला सतत प्रवीण सोबत घालवलेले क्षण आठवत होते. तो ठीक असला आणि उद्या पुन्हा घरी येणार असला तरी एवढा मोठा accident आणि त्याचं हे असं विचित्र कारण तिच्यासाठी नवीनच होतं. या सगळ्यासाठी अजूनही तिचं मन लहान होतं. 

क्रमशः...... 
*****************************
आता रात्र झाली आहे! त्या वाईट शक्तींच्या प्रभावाखाली प्रवीण पुन्हा जाईल का? की, आता हे संकट दुसऱ्या कोणावर येणार असेल? गुरुजी सकाळी प्रवीण च्या घरी जातील तेव्हा त्यांना त्याच्या घरात असलेली बाहुली मिळेल का? की ती बाहुली आता तिथे नसेलच? आणि गुरुजींनी दीपा अशी अचानक दाराबाहेर पडली होती त्याबद्दल काहीच सांगितलं नाहीये.. असं का घडलं असेल? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all