एक अपूर्व भेट

पाचही तीर्थांमध्ये स्नान करून ती पायऱ्या चढून वर येत होती. सारं शरीर पाण्यानं निथळत होतं. साडी ?


       पाचव्या तिर्थामध्ये स्नान करून ती पायऱ्या चढून वर येत होती. सारं शरीर पाण्यानं निथळत होतं. साडी चोळी अंगाला अगदी घट्ट चिटकून बसली होती. पायऱ्या चढताना तिच्या पैंजनांचा छम छम् असा मंजुळ आवाज होत होता. तिची भिरभिरती नजर कुणाचा तरी शोध घेत होती. आज ती त्याला वीस पंचवीस वर्षांनी भेटणार होती. पण तिचं मन अजूनही त्याला त्या किशोर रूपातच शोधत होतं. अन् अचानक समोर त्याला पाहून ती थबकलीच. एक दोन क्षण दोघांची नजरानजर झाली.

'हा तोच आहे का? पण किती प्रौढ वाटतोय? आणि याचा रंग...? छे? पण याचा चेहरा, डोळे, नाक, केस अगदी हुबेहूब त्याच्यासारखं! कदाचित हाच तर नसेल?'

        त्याच्याकडे पाहून तिने स्मित केलं. तिच्या गोबऱ्या गालांवर किंचित खळी पडली. त्यानेही तिच्याकडे पाहिलं. किंचित हसला. त्याची पांढरीशुभ्र दंतपंक्ती उठून दिसली. पण ओळख नसल्यासारखा तो पायऱ्या उतरून तिच्या जवळून गेला. तिला काहीसा धक्काच बसला. आधीच पाणीदार डोळे. त्याच्या अशा वागण्यानं त्यांत टचकन पाणी तरळलं. काळजात एक दुःखाची कळ उठली. तिने मनाला समजावलं. 'हा नाहीचे तो.' विचार झटकून ती झपझप पायऱ्या चढून वर आली. पाहावं तिकडं माणसांची गर्दी उसळलेली. ब्रह्मसरोवराच्या आजुबाजुला कुणी पिंडदान करत होतं. कुणाचे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पूजा, यज्ञ चालू होते. तिची भिरभिरती नजर त्याला शोधत होती. पण एवढ्या माणसांच्या गर्दीत त्याला शोधायचं म्हणजे सागरातून मोती काढण्यासारखंच होतं!


        कुरुक्षेत्र. हेच ते स्थान जिथं भगवान परशुरामाने वडिलांच्या हत्येच्या प्रतिशोधात साऱ्या पृथ्वीला क्षत्रियांपासून मुक्त केल्यावर पापक्षालन केलं. परशुरामाने संहार केलेल्या सर्व क्षत्रियांच्या रक्ताने इथं पाच कुंड भरले. कालांतराने ते पाचही कुंड जलकुंडांमध्ये बदलले. इथं पाच तीर्थ आहेत. म्हणजे पाच जलकुंड. ज्याला स्यमंतपंचक म्हणतात. आमावस्येला येणाऱ्या सूर्यग्रहण कालामध्ये कुरुक्षेत्राची तीर्थयात्रा केल्यास ती पुण्यकारक गणली जाते. या पाचही कुंडांमध्ये स्नान करून पूजा, यज्ञ, दानधर्म केल्यास आजवर केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते असे म्हणतात. सारा आर्यावर्त या ठिकाणी लोटला होता. कुरु, कोसल, विदर्भ, अंग, वंग, मगध, काशी, चेदी, मद्र, कंबोज आणि इतर खूप राज्यांतून राजे, योद्धे, ऋषी, मुनी, सामान्य जनता केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी, पुण्य पदरात पाडण्यातही आले होते.

        निराशेनं ती आपल्या शिबिराकडे वळली. तोच मागून एक ओळखीचा आवाज कानी पडला.

"राधे..."

ती शहारली. तो आवाज तिच्या काळजात जाऊन भिडला. ती सगळी वर्षे, वर्षांचे महिने, महिन्यांचे दिवस, दिवसांचे प्रहर, घटिका, पळे, सारा काळ एका क्षणात मागे गेला. त्या गोड लडिवाळ आवाजानं तिला वीस पंचवीस वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटलं.

         ती टिंगल, ती थट्टा - मस्करी, तो रुसवा - फुगवा, ती चोरी, ते बहाणे, ती रास क्रीडा, ते साहस, ते गान, ते वादन, ते नृत्य, ती रंगबहार, आणि हृदयापासून छेडलेली आणि थेट हृदयापर्यंत जाऊन भिडणारी मुरलीची अलौकिक, अद्भुत, अवीट गोडीची सुमधुर ताण. सारं सारं स्मृती पटलांवरून झरझर सरकू लागलं.

        तिनं झर्रकन मागे वळून पाहिलं. काही पळांपूर्वी पाहिलेला तोच पुरुष तिच्या समोर उभा होता. ती विस्मयकारक नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. पण याचा रंग, उजवी भुवई वर घेऊन मिश्किल हसणं, मस्तकावरचं सोनेरी मुगुटात हवेनं काहीसं डुलणारं मोरपंख. दोघांच्याही चेहऱ्यात किती साम्य होतं. पण याचे डोळे मात्र तिच्या परिचयाचे होते. तिने ओळखलं. हा तोच आहे. ती एक दोन पावलं पुढे आली. म्हणाली,

"कृष्णा?"

ती कान्हा न म्हणता कृष्ण म्हणाली. तो अचंभित झाला. अडखळत म्हणाला,

"राधे. मी तुझ्यासाठी केव्हा कृष्ण झालो? मी तर तुझा कान्हा. मग... हे...?"

"नाही कृष्णा. तू आता माझा कान्हा नाही राहिलेलास. तू आता कृष्ण आहेस. सारा आर्यावर्त तुला श्रीकृष्ण म्हणून ओळखतं. खूप बदलला आहेस तू."

काहीसं जवळ येत तो म्हणाला, "शरीरावरच्या वयाच्या खुणा सोडल्या तर मी तोच आहे. तुझा कान्हा."

"नाही कृष्णा. तू जर कान्हा असतास तर तू स्वतः सुदामाला भेटायला गेला असतास. त्याला तुला भेटायला यावं लागलं नसतं. तू रानफुलांची माळ गळ्यात घालायचास. तुला शोभून दिसायचं ते. आज तुझ्या गळ्यात हिऱ्या मोत्यांच्या माळा आहेत. सुवर्णालंकार आहेत. आधी तुझ्या मस्तकावर साधा शेला बांधलेला असायचा. त्यात पानं, फुलं, डोलणारं मोरपिस होतं."

"राधे. ते मोरपिस तर आजही मी माझ्या मस्तकावर धारण करतो."

"हो. पण ते रत्न आणि सुवर्णांनी मढलेल्या मुगुटात."

"अं?", काय बोलावं? गोंधळून तो गप्प राहिला.

"ज्या हातांमध्ये बासरी शोभून दिसायची. आज त्याच हातात सुदर्शन चक्र आहे. जेव्हा तू बासरीमधून मधुर ताण छेडायचास, तेव्हा सारा गोकुळ, गाई - गुरंच काय तर रानावनातील पशु पक्षीही देहभान विसरून ऐकायचे. आज त्याच हातांनी संहार चालवला आहेस. सारा आर्यवर्त तुला श्रीकृष्ण म्हणतं. देव समजतं. पण आमचं काय? आमच्यासाठी तर तू नंदकाकांचा आणि साऱ्या गोकुळाचा लाडका नंदलाल, सुमधुर मुरली वाजवणारा मुरलीधर, रंगानं काळा सावळा असला तरी मनानं अल्लड, अवखळ, निरागस, निष्पाप असा श्याम, एका सामान्य गवळ्याचं पोरं."

"राधे. मी आजही तोच आहे गं.", कृष्ण तिला काकुळतीला येऊन समजावत म्हणाला.

"खूप ऐकलं होतं; तुझ्या या रूपाबद्दल. आज प्रत्यक्ष पाहिलं."

"राधे. नियतीच माझ्या हातून ते कर्म करवून घेणार असेल तर तिथं तू काय नि मी काय? ते कर्म करावंच लागतं. कधी कधी..."

"नको सांगुस तुझं ते कर्माचं तत्वज्ञान.", त्याच वाक्य अर्धवट तोडत त्याला थांबवत राधा म्हणाली.

"पण राधे. जन्मगाव सुटलं असेल कदाचित. पण त्या मातीशी, माणसांशी बांधलेली घट्ट नाळ कधीच तुटणार नाही. विसरणार नाही. सगळ्यांची आठवण सदा स्मरणात आहे. आजही तुझी आठवण आली कि, डोळ्यांतून नकळत अश्रू येतात."

"पण मला नाही येत कधी तुझी आठवण. आठवण त्यांची केली जाते जे दूर गेलेले आहेत. आणि तू तर आमच्या काळजात कायमचा सामावलेला आहेस. राहिली गोष्ट तुझ्या आठवणीत रडण्याची, तर न जाणे तुझ्या आठवणी अश्रूंच्या रूपात वाहून जातील म्हणून आजवर अश्रूचा एकही थेम्ब येऊ दिला नाही."

"राधे. मला मान्य आहे. गोकुळ सोडून गेल्यावर वीस पंचवीस वर्षांत मी एकदाही तिकडे आलो नाही. पण वेळोवेळी दूत, उद्धवाला पाठवून तुमच्या सर्वांची हालहवाल, विचारपूस करायचो. चुकलोही असेल कदाचित मी. माफ कर मला."

"कृष्णा. माफ त्याला करतात, जो एखादी चूक केल्यावर मनापासून माफी मागतो. आणि तुझ्या माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे?"

कृष्णाचे डोळे नकळत पाणावले. पुढे काय नि कसं बोलावं कळेना. साऱ्या जगाला धर्माचं, कर्माचं तत्वज्ञान सांगणारा कृष्ण, राधेच्या बोलण्यासमोर मात्र नेहमीच नतमस्तक होतो.

"कृष्णा. धर्मासाठी तू आपली माणसं सोडून गेलास. माती सोडलीस. गोकुळ सोडलंस. सारं जग तुला पूर्णपुरुष म्हणतं. पुरुषोत्तम म्हणतं. खूप मोठा राजा झालास. आम्ही मात्र अजून आहे तिथंच आहोत. तुझ्या आठवणीत, तुझी वाट पाहत."

तिचा स्निग्ध हात हातात घेत कृष्ण म्हणाला, "राधे, मनुष्य जन्माने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो. वृक्ष कितीही मोठा झाला तरी तो त्याच्या खोडाला, मुळाला कधी अंतर देत नाही. तू आणि मी वेगळे कुठे आहोत? शरीरं वेगळी असली तरी मनानं, आत्म्याने एकच आहोत."

"तुझ्या गोड बोलण्याला भुलणारी नाही मी."


"राधे..."

"कृष्णा. तुझी पुन्हा भेट होईल कि नाही माहित नाही. गोकुळात असताना बासरी वाजवून जसं आम्हाला मंत्रमुग्ध करायचास, तीच धून पुन्हा एकदा तुझ्या बासरीतून छेडशील का रे?"

राधेचे ते बोल एकताच कृष्ण गहिवरल्या स्वरात म्हणाला, "राधे. तू काही म्हणालीस आणि मी त्याला नाही म्हटलो असे कधी झाले आहे काय? संध्याकाळी ब्रह्म सरोवराकाठी भेटशील?"

"तू आता मोठा राजा झालास. साताठ बायका आहेत म्हणे तुला! जमेल नं तुला यायला?"

"येईन मी. वाट पाहशील न माझी?"

"कान्हा. आजपर्यंत तर तुझी वाट पाहण्यातच दिवस गेले. त्यात आणखी एक दोन प्रहरांची भर..."

        राधेने कान्हा म्हणून हाक देताच कृष्ण गहिवरला. डोळ्यांनीच एकमेकांना निरोप देत दोघेही आपापल्या शिबीराकडे निघाले.

--- oxo ---

        सूर्यनारायणाचा सोनेरी सुर्यरथ अस्ताला निघाला होता. सूर्याची तांबूस सोनेरी किरणं ब्रह्मसरोवराच्या पसरलेल्या अथांग पृष्ठभागावर नानाविध रंगांच्या छटांची मुक्त हस्ताने उधळण करत होती. सरत्या नारायणाला नमन करत जलाशयाच्या घाटावरील तुरळक गर्दी हळू हळू पांगु लागली.

        सरोवरात पांढऱ्याशुभ्र बदकांचा मुक्तपणे जलविहार चालू होता. काठावर उगवलेल्या चाफ्याच्या झाडावर मोरपंखी निळ्या पंखाचा, तांबूस अंगाचा, पांढऱ्या पोटाचा नि लांब चोचीचा खंड्या पाण्यातल्या माशांवर नजर ठेऊन बसला होता. एखादा मासा पृष्ठभागावर आला रे आला, कि तो झपकन पाण्यावर सूर मारायचा. चोचीत लहानसा मासा पकडून पुन्हा फांदीवर यायचा. चोचीतला मासा सरळ होई पर्यंत मानेला झटके देत राहायचा. एकदा का मासा सरळ चोचीत आला कि, पूर्ण गिळून इकडे तिकडे मान फिरवत शांत बसायचा. दगडी पायऱ्यांच्या बाजूबाजूने दाटीवाटीने लावलेल्या जाई, जुई, मोगरा यांचा सुगंध जिकडेतिकडे दरवळत होता. मधेच मधमाशांची गुणगुण कानावर पडत होती. एखादं पानगळतीला आलेलं पान वाऱ्याविना डुलायचं.

        सर्व राजालंकार उतरवून कृष्ण साध्याच वेशात आला होता. काहीवेळ पायऱ्यांवर थांबून तो पाण्यात उतरला. थंडगार स्पर्श पायाला झाला. पाचदहा पावलांच्या अंतरावर खडकांचा उंचवटा होता. त्यावर बसून सरत्या सूर्यनारायणाचं प्रतिबिंब पाहू लागला. सरोवरावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्यानं त्याच्या मस्तकावर बांधलेल्या शेल्यातलं मोरपंख डुलत होतं.

"कान्हा"

        राधेच्या आवाजाने कृष्ण भानावर आला. ती त्याच्या शेजारी बसली. दोन्ही हातांची ओंजळ त्याच्या समोर धरली. तिच्या ओंजळीत वैजयंतीची फुलं होती. कृष्णानं तिचे दोन्ही हात हातात घेत फुलांचा गंध हृदयात भरून घेतला.

"कुठे मिळाली तुला?"

"इथेच सरोवराच्या पलीकडे. खूप वृक्ष आहेत. शिबिरापासून जवळच होती. म्हटलं येताना मोकळ्या हातानं कसं जायचं.

अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत तो म्हणाला," राधे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं दर्शन घ्यायचं नसतं म्हणतात."

"हो. पण तोच येणारा उद्याचा दिवस नव्या उमेदीनं, उत्साहानं घेऊन येत असतो. नाहीतर मनुष्याला दिवसाचं महत्वच राहिलं नसतं. एकाच दिवसाचे दोन भाग. रात्र नि दिवस. वेगळे असूनही कायम एकच."

"राधे."

"हं. बोल ना!"

"तुला सांगायचं राहिलं. येताना मी बासरी..."

"हि घे.", ती त्याने गोकुळ सोडताना दिलेली बासरी समोर करत म्हणाली.

नकळत त्याच्या नेत्रांत अश्रू तरळले. तिच्या मस्तकावर हात ठेवत तो म्हणाला,

"राधे... तू अजूनही जपून ठेवलं आहेस."

"माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे कान्हा. हिच्या रूपात तर तू सदैव स्मरणात असतोस. कायम माझ्या हृदयाच्या जवळ असतोस."

        कृष्णाने बासरी एकवार मस्तकाला भिडवून ओठांना लावली. त्याने त्यातून मधुर ताण छेडायला सुरुवात केली. मधेच थांबून तिच्याशी त्या सुरावटीशी निगडित आठवणींच्या गप्पा मारत तो एक एक धून वाजवत होता.

       प्रहर उलटून गेला. चंद्राचा दुधाळ प्रकाश सरोवराच्या अथांग पृष्टभागावर पसरला होता. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. कृष्णाच्या बासरीतून निघणारं अवीट गोडीचं संगीत राधा देहभान हरपून ऐकत होती.


"कृष्णा. एक विचारू?"

"परवानगी कसली मागतेस. विचार."

"सकाळी पंच कुंडांमध्ये मला भेटलेला तो तरुण?"


जरासं मिश्किल हसत तो म्हणाला, "फसलीस ना?"


"हो रे! पण काहीच क्षण."

"हं. तो तर पार्थ. कुंती आतेचा अर्जुन."

"किती साम्य आहे ना तुम्हां दोघांत. एक रंग सोडला तर तुम्हा दोघांना ओळखणं कठीण आहे."

"शूरसेन आजोबांवर गेलाय ना आमचा तोंडावळा! म्हणूनही असेल कदाचित."

"हं. असेलही!"

"राधे. या आयुष्यात पुन्हा तुझी माझी भेट कधी होईल न होईल माहित नाही. म्हणून आज तू माझ्याकडे काहीतरी मागावंस असं मला वाटतं."

त्याच्या गालांना स्पर्श करत राधा म्हणाली,

"कान्हा. काही नको रे मला. सगळंच तर आहे. गोकुळात जेवढा तुझा सहवास लाभला, त्यात आयुष्यभर पुरेल एवढं भरभरून मिळालं रे. तुझ्या भेटीची आस होती, तीही आज पूर्ण झाली. सारं जग तुला श्रीकृष्ण भगवान म्हणतं. चिरंतन काळासाठी तू लोकांच्या मनात राज्य करशील. पण माझी आठवण ठेवशील ना रे?"

"राधे. खरं सांगू. तू अशीच बोलत राहा. ऐकत राहावं वाटतं. तुझं  बोलणं काळजापर्यंत जाऊन भिडतं."


"गप रे...!"

"राधे. जसं भक्तशिवाय देवाला पूर्णत्व मिळत नाही, त्याचप्रमाणे  राधे शिवाय कृष्ण अपूर्णच राहील. जो पर्यंत सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाश, हवा, पाणी आहेत; तो पर्यंत माझ्या नावाबरोबर तुझं नाव घेतलं जाईल."


        निरोपाची वेळ झाली होती. दोघेही सरोवरातून पायऱ्या चढून बाहेर आले. आपल्या शिबिराकडे जाण्यासाठी निघाले. समोर बासरी धरत कृष्ण म्हणाला,

"राधे. हि बासरी ठेव."

"असू दे. पुन्हा कधी भेट झाली तर होईल तेव्हा."

"मी विसरेन राधे. त्यापेक्षा तुझ्याचकडे ठेव. माझी आठवण म्हणून."

"तू तर कायम हृदयात वसला आहेस."

        तिने तिच्या स्निग्ध ओलसर हातानं कितीतरी प्रेमानं त्याचा हात दाबला. दोघांचेही डोळे भरून आले होते. उशीरही झाला होता. कृष्णाच्या हातातून हात सोडवत राधा जाण्यासाठी वळली. तिची दृष्टीआड होणारी धूसर आकृती कृष्ण बघत राहिला.

--- oxo ---

        राधा आणि कृष्ण काय होतं यांच्यातलं नातं? बरीच मत मतांतरे आहेत. वाद आहेत. राधा केवळ कृष्णाची भक्त होती? प्रेयसी होती? कि पत्नी होती? कृष्णाला तसं पाहायला गेलं तर आठ बायका होत्या. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, लक्ष्मणा, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा आणि नग्नजिता. पण मग राधा अन कृष्ण यांचं नेमकं नातं काय? कि नात्यांच्याही पलीकडचे जन्मोजन्मतारीचे ऋणानुबंध? असो! जे काही असले ते! पण जे काही होतं ते पवित्र होतं. अलौकिक होतं. अद्भुत होतं. अविस्मरणीय होतं.

        काही नाती हि जन्मानं मिळतात तर काही परिस्थितीनुसार, गरजेनुसार निर्माण झालेली असतात. नाती कुठलीही असोत! त्यात बंधनं आली, नियम आले, जबाबदारी आली, इच्छा-आकांक्षा आल्या, गरजा आल्या, सवयी आल्या, शिस्त आली, मानसिक आणि शारीरिक आकर्षण आलं. मग ते एक व्यक्ती म्हणून असेल किंवा व्यक्तिमत्त्व म्हणून असेल. थोडक्यात गरज, सवय, आकर्षण आणि या सगळ्यांना मिळालेली भावनांची जोड जिथं असते तिथं नातं निर्माण होतं. आणि जिथं नातं असतं, तिथं प्रेम हे आपसूकच येतं. मग कुठे गरज म्हणून, फायदा म्हणून, तर कुठे स्वार्थ म्हणूनही केलं जातं. पण जे निर्व्याज, निर्लेप, निस्वार्थी असतं; ते पवित्र असतं.

        राधा आणि श्रीकृष्ण, महाभारतातल्या दोन व्यक्तिरेखा. दोन वेगळ्या व्यक्ती पण, आत्म्याने मात्र एकत्र जोडलेल्या. त्यांच्यामध्ये जे नातं होतं, अतूट बंधन होतं, पवित्र प्रेम होतं. ते मात्र आजतागायत जिवंत आहे. कदाचित राधा आणि कृष्ण जगाला प्रेमाचा अर्थ सांगण्यासाठी तर एकत्र आले नसावेत?


~ धन्यवाद 


संदर्भ ग्रंथ 

श्रीकृष्णायन - गो. नि. दांडेकर 
हस्तिनापूर - मनोहर शिरवाडकर
महाभारत कथासार - चि. वि. वैद्य 
कथारूप महाभारत - मंगेश पाडगांवकर 
युगंधर - शिवाजी सावंत 
मृत्युंजय - शिवाजी सावंत 
यदुराणा - लीला गोळे
पुरुषोत्तम - म. वि. गोविलकर
गोकुळी - प्रफुल्लता जाधव 
कृष्णकिनारा - अरुणा ढेरे 
कलमनामा ( राधा कृष्ण ) - शिरीष फडके