एक अनोळखी मुलगा

एक अनोळखी मुलगा

जीवनात अनेक असे प्रसंग येतात जे , कधी गोड कधी कडू आठवणी देऊन जातात.....

काळाच्या ओघात आपण मागच्या गोष्टी विसरत जातो पण कधीतरी असं काही घडून जातं जे आपल्या मनावर कोरल्या जातं.....त्यालाच आपण म्हणू शकतो आंबट-गोड आठवणी.....

९वीत असतांना मी NCC मध्ये प्रवेश घेतला.....तशी मी यष्टीने बळकट होती, पण याआधी मी कोणत्या खेळात किवां अश्या ग्रुप मध्ये सामील झाली नव्हती.....

जुलाई महिन्यात शाळा सुरु झाली...आणि त्यानंतर ४ महिन्यांनी आम्हाला केम्प ला जायचं आहे असं कळल,

 मी फार आनंदी होते, या पूर्वी मी अशी एकटी कुठेही बाहेर गेलेली नव्हती....कधी पण बाहेर जायचं झालं कि कोणी तरी मोठी व्यक्ती सोबत असायचीच, पण आता आमचा ग्रुप केम्प ला जाणार म्हणजे फार धमाल होणार होती....तरी मनात धाक-धुक सुरु होती....
 
बाबा काय म्हणतील ???परवानगी मिळेल कि नाही???
कारण असं....कि या आधी आम्ही बहिणी कधीच असे बाहेर गेलेलो नव्हतो....

पण देवाची कृपा झाली आणि बाबा तयार झाले.....मी आधी शाळेत येऊन सरांना सगळं व्यवस्थित विचारेन मगच तयारी करायची.......असं बोलून त्यांनी एकदाची होकार दिला.....मीही मान डोलावली.....

दुसऱ्या दिवशी बाबा शाळेत आले आणि सरांना अगदी विस्तारपूर्वक विचारलं, सरांनी पण सगळी उत्तरं दिली ज्यांनी बाबा समाधानी झाले, मग जातांना मला म्हणे आज बाजारात जाऊन आवश्यक वस्तू घेऊन ये, परवा ला निघायचं आहे ना??? सगळं सोबत असलं पाहिजे......
मी आज गगनात ही मावत नव्हते, मनात उकळ्या फुटत होत्या, जीवनात पहिल्यांदाच अशी स्वतंत्र यात्रा करणार होती, 
सगळी तयारी झाली, ५ दिवसाची ट्रिप होती, आणि आम्ही जाणार ते ठंड हवेचं ठिकाण होतं, आमच्या गावापासून जेमतेम ४ तासाचा प्रवास होता, पण त्यात एकदा ट्रेन आणि मग बस असं करायचं होतं, सकाळी ९ ची ट्रेन होती, आई-बाबांनी माझी अशी तयारी करून दिली होती जणू मी काश्मीर किवां मनाली ला जातेय.....इतके कपडे, इतक्या स्वेटर-शाली कि ते सगळं पाहून मला राग येत होता पण काही पर्याय नव्हता.

मला एक माहिती होतं कि जर असं एकट्याने जायची परवानगी मिळाली आहे तर ते जे काही बोलतील ते सगळं मान्य करावच लागणार.......

तर असं सगळं झालं आणि मी एकदाची घरून निघाली, आईचा सूचना सुरूच होत्या, असं कर तसं करू नको.... फायनली सगळ्यांना टाटा करत मी ट्रेन मध्ये बसले.....गाडी सुटली.......
आमचा शाळेतर्फे आम्ही २५ मैत्रिणी होतो, बाकी इतरही बरेचं मुलं-मुली आमच्या सोबत होते, प्रवास फार मोठा नव्हताच.....पण त्या दिवशी गाडी इतकी माणसांनी भरलेली होती कि पाय द्यायला पण जागा नव्हती,
 इतकी माणसं पाहून मला घाबरल्या सारखं होऊ लागलं, कसे-बसे आम्ही जागा मिळवायचा प्रयत्न करत होतो, शेवटी आमच्यातल्या दोन-तीन बळकट मुलींनी अक्षरशः धक्का-मुक्की केली आणि सर्व मुलिंना आत बसण्याची जागा करून दिली.
 
 एक किलो च्या पिशवीत ३ किलो भाजी भरली कि काय होतं??? तसच आमचं झालं होतं.....एकीमेकींचा मांडीत बसून आम्ही तो प्रवास केला.....
 
हाय-हुश्श करत आमचं स्टेशन आलं.......लाल-हिट टाकल्या वर मुंग्या कश्या जीव वाचवून पाळतात ना? तसे आम्ही सगळे जी दिशा दिसेल तिकडून खाली उतरायचा प्रयत्न करू लागलो....कारण सरांनी सांगितलं होतं कि इथे फक्त ४ मिनटे गाडी थांबते, २५ पैकी एकही मागे राहिली तर आमची फजिती  होणार होती......आता खरी भीती वाटत होती.
आई- वडील या विशाल वटवृक्ष्याच्या सावलीत आज पर्यंत आपण कसे वाढलो....कसं त्यांनी आजपर्यंत आपल्याला जपलं, कोणतंही संकट आपल्या पर्यंत कधीही येऊ दिलं नाही, मी मनोमन त्याचं स्मरण करून खाली उतरली, आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं.....पण मी लगेच स्वताला सावरलं.....आपल्या दोन्ही बैग्स घेऊन चालू लागली......
आता मला भूक लागली होती.....सकाळी घरून अगदी दोन घास खाऊन निघाली होती, आम्ही ठरवलं होतं कि गाण्याच्या भेंड्या खेळत-खेळत ट्रेन मधेच नाश्ता करायचां ......ते तर राहिलं एकीकडे.....बूड टेकायला जागा मिळाली हेच भाग्य.....

आता घसाही कोरडा पडत चालला होता, मी माझ्या एका मैत्रिणी ला खुणेने थांबायला म्हंटल, आम्ही दोघी जरा हळू झालो आणि एका जागी थांबून पानी प्यायला बाटली काढली......या सगळ्याला फक्त ५ मिनट लागले असतील......पण तितक्यातच घोळ झाला......

आमची टीम त्या गर्दीत कुठे गायब झाली काही कळलच नाही, बऱ्याच शाळांचे मुलं-मुली होते.....
सगळे भराभर चालत होते.....आता आम्ही दोघीजणी घाबरलो......
नवीन जागा......पहिलाच प्रवास.....
त्यात आम्ही हरवलो होतो......आम्ही ठरवलं कि घाबरायचं नाही.....बरेचं माणसं त्याच दिशेनी जाऊन राहिली आहेत....त्यांचा सोबत चालू म्हणजे आम्हाला पण बाहेर पडता येईल......
आम्ही एका ग्रुप सोबत चालू लागलो.....खरं सांगू काळीज धडधडत होतं, पण एकीमेकींचा हात घट्ट धरून आम्ही चालत होतो.......

पण हे काहीतरी वेगळच घडत होतं, बाहेर आलो तर आमच्या ओळखीचं कोणीच दिसेना.....आमचा ग्रुप, सर कुठे गायब झाले होते, काय माहित.....आणि सगळ्यात मोठ्ठा मूर्खपणा असा झाला होता कि आम्ही ज्या ग्रुप सोबत बाहेर पडलो तो बॉयज स्कूल चा ग्रुप होता....

आता गम्मत अशी झाली कि एक तर त्या गर्दीत ओळखीचं कोणीच नाही, वरतून ते सगळे मुलं......

काय करणार होतो आम्ही??.....तरी त्या जागी आम्ही तश्याच उभ्या राहिलो.....इतर प्रवासियांना कळू दिलं नाही कि आम्ही दोघीच आहोत कारण एकट्या मुलिंना पाहून लोकं कसा त्रास देतात हे आईनी बरेचदा सांगितलं होतं.

 आता पुढे काय हा विचार करत असतांनाच मला चक्कर आली, मी सरळ खालीच कोसळले......
 
हा दृश्य पाहून सगळे गोळा झाले.....पण तेवढ्यात त्या बॉयज ग्रुप मध्यल्या एका उंच-धिप्पाड मुलाने सगळ्यांना बाजूला केलं, तो पाणी घेऊन आला.......

आता मात्र माझी मैत्रीण रडू लागली.....त्यांनी तिलाही शांत केलं, पाणी दिलं, तितक्यात माझेही डोळे उघडलेच......त्याने माझा कडे एकदा पाहिलं.....आणि म्हणाला “सकाळपासून काही खाल्लेलं दिसत नाही”
मी उभी राहून स्वताला सावरलं, आणि रागा-रागा ने त्याचा कडे पाहिलं......काही ना बोलता फक्त मान डोलावली.....तो पुन्हा म्हणे....”काहीतरी खाऊन घ्या बरं वाटेल”......
पण मी काय त्याचं ऐकणार होती का?? मी उत्तरले.....इतकी गर्दी पहायची सवय नाही मला, त्यामुळे अंधारी आली बाकी काही नाही.......

आता तो हसला.....तो वयाने मोठा दिसत होता आणि त्याला हे कळल कि मला स्वीकार करायचं नाहीये कि मी उपाशी आहे.......
तेवढ्यात त्याचे सर आले, त्यांनी आम्हा दोघींना पाहून विचारलं कि तुम्ही कोण आणि कुठे चालल्या आहे??? 

त्यांना सगळी माहिती दिल्यावर ते म्हणे कि आमच्या सोबतच चला, एकट्याने जाऊ नका, जागा नवीन आहे आणि इथून तास भर पोहचायला लागेल....
आम्हीही मान्य केलं....
आता आम्ही बाहेर पडलो, सगळे बस मध्ये समान ठेवू लागले....

एक मुलगा आमच्या दोघींकडून समान घ्यायला आला तेंव्हा लक्षात आलं कि खाण्याचा डबा असलेली बैग तर एका मैत्रिणी कडे दिली होती आम्ही.....

मी कचकन जीभ चावली.....आता मरण होतं न राव.....
मी हुशारी मारत त्या मुलाला नाही तर म्हंटल पण आमचा कडे खायला काहीच नव्हतं......
आता भुकेने जीव जाणार......माझी मैत्रीण तर मला फार बोलू लागली....
अजून बन स्मार्ट.....चांगलं तो खायला विचारत होता तेंव्हा माना डोलावल्या आता बसा....राम....राम करत......

आम्ही बस मध्ये बसलो.....फार विचित्र वाटत होतं कारण संपूर्ण बस मध्ये फक्त आम्ही दोघीच मुली......हसू कि रडू अशी अवस्था झाली होती.....त्यात पोटात कावळे काय उंदीर काय सगळेच प्राणी कबड्डी करत होते.....असं वाटू लागलं होतं कि काही खायला नाही मिळालं तर पुन्हा चक्कर येऊन पडेन.......

तेवढ्यात तोच पुन्हा समोर आला......या वेळी त्याचा हातात एक स्टील चा डबा होतां, त्यांनी डबा पुढे करत म्हंटल “तुम्हाला गर्दी पाहून चक्कर येते न???
 मग या बस मध्ये पण फार गर्दी आहे....
 
हे खाऊन घ्या म्हणजे गर्दीची भीती निघून जाईल.....

माझी स्थिती “काटो तो खून नही” अशी झाली होती.....

त्यांनी परफेक्ट शॉट मारला होता, माझी विकेट पडली होती....
मी काही नं बोलता तो डबा त्याचा हातातून घेतला.....

त्यात पराठे आणि लोणचं होतं......
मला त्याचा वासाने स्वर्गीय अनुभूती होत होती.......असं वाटलं कि माझे  प्राण जाणार होते तेवढ्यात कोणी तरी अमृत आणून समोर ठेवलं......
एकच मिनट संकोच वाटला पण नंतर लगेच मी खायला सुरुवात केली.....
एक पराठा खाऊन झाल्यावर मला लक्षात आलं कि माझी बिचारी मैत्रीण पण सोबत आहे.

ती रागाने माझा कडे बघतच होती पण तो मुलगा समोर उभा होता म्हणून स्वताला रोकून ठेवलं होतं तिने 

आता मी तो डबा तिचा पुढे केला आणि दोघींना प्राण परत आल्याच फीलिंग आलं...

आणि तो मुलगा......तो काय माहित कोण होता....पण नक्कीच मागच्या जन्मीचा कोणीतरी असणार....असं म्हणतात ना प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कोणत्या न कोणत्या कारणानीच येतो......त्या दिवशी तो आमची मदत करायला आला होता......

पुढे काही वेळानी आम्ही कॅम्प ला पोहचलो, ५ दिवस धम्माल केली, आमची ट्रीप मस्तच झाली....पण त्या अनोळखी मुलाची आठवण आजही कधी-कधी येत असते.......