एक अनोखी मैत्री.

एका अनोख्या मैत्रीची छोटीशी गोष्ट!

नाते मैत्रीचे.

एक अनोखी मैत्री!


"हॅपी फ्रेंडशिप डे आज्जी." लहानगा भार्गव आजीला मिठी मारून म्हणाला तशी आजीच्या चेहऱ्यावर 'हे काय नवीन?' असे भाव उमटले.

"अगं आज्जी, आज फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीचा दिवस आहे ना, त्याच्या शुभेच्छा गं. चल हात पुढे कर बघू." हातातील फ्रेंडशिप बँड पुढे करत तो म्हणाला.

"शुभेच्छाबद्दल थँक यू. पण हे काय तुझ्या हातात?" आजीचा प्रश्न.

"अगं हा फ्रेंडशिप बँड आहे. हा बांधला की आपली मैत्री आणखी घट्ट होणार. बघ यावर काय लिहिलेय, फ्रेंड्स आर फॉरेव्हर." तिच्या हातात तो बँड बांधायला घेत भार्गव म्हणाला.

"अरे, पण मला म्हातारीला कशाला बांधतोस? कसे दिसेल हे? आता मी देवळात चाललेय. तिथल्या बायका हसतील ना माझ्या हाताकडे बघून." त्या सात वर्षांच्या चिमुरड्याच्या हरकतीने सत्तर वर्षांच्या आजीला कितीतरी प्रश्न पडले होते.

"तू मैत्रीण ना गं माझी? तरी हा बँड बांधणार नाहीस?" हिरमुसला चेहरा करून भार्गवने विचारले.

त्याच्या त्या प्रश्नाने आजी भूतकाळात गेली. लहानपणी चार वर्ग शिकलेली ती, तेव्हा तिच्या शाळेत असलेल्या तिच्या दोन तीन मैत्रिणी. लग्न झाले नी मग कोणाचा कुणाशी संबंधच उरला नाही. आजीचे लग्न झाले, तीही संसारात रमली. संसार, नवरा, मुलं हेच काय ते तिचे जग. मैत्रीचे निखळ नाते हळूहळू मागे पडले ते कायमचेच. आता संसार एके संसार हेच तिचे आयुष्य.


मुले मोठी झाली. त्यांचे लग्न, त्यांचा संसार सुरू झाला. कोविडमध्ये नवऱ्यानेही साथ सोडली. भरल्या घरात एक रितेपण आजीच्या वाट्याला आले होते. या रितेपणात तिला साथ लाभली होती ती तिच्या नाताची.


"काय गं आजी तुला इंग्लिश बोलता येत नाही? थांब मी तुला शिकवतो." असे म्हणून तिच्याशी छोटेमोठे संवाद तो करायचा. तीही त्याला मराठीतील छान छान गोष्टी सांगायची. कधी टीव्हीवरून दोघात खटके उडायचे. त्याला कार्टून बघायचे असायचे तर तिला सासूसुनांच्या मालिका. मग त्यावरून रिमोटचा खेचखेचीचा खेळ चालायचा. सत्तर वर्षांची आजी नातवाबरोबर तिचे दुसरे बालपण जगायला लागली होती. तिचा लहानसा चेहरा बघितला की, "घे रिमोट, बघ तुझी मालिका." म्हणून तो तिला चिडून रिमोट द्यायचा. मग तास तासभर दोघांची कट्टी, बोलणं बंद व्हायचे. काही वेळाने पुन्हा दोघे एकत्र यायचे.


"तू मैत्रीण ना गं माझी? तरी हा बँड बांधणार नाहीस?" त्याचा प्रश्न ऐकून आजीचा चेहरा फुलला.


"भार्गव, तूच तर माझा खरा मित्र आहे. रुक्ष झालेल्या माझ्या जीवनात तूच तर रंग भरलेस. मग तुझा फ्रेंडशिप बँड मी कसा नाही बांधणार?"

तिने आपला हात त्याच्यासमोर धरला.


"आणि मग तुझ्या मंदिरातील मैत्रिणी तुला चिडवतील तर?" त्याचा निरागस प्रश्न.


"चिडवू दे. मी त्यांना सांगणार की माझ्या बेस्ट फ्रेंडने हे बांधलंय. त्यांना तर मग माझा हेवाच वाटेल." आजी हसून म्हणाली.

आजीचे बोलणे भार्गवला पूर्णपणे कळले नाही पण ती बँड बांधायला तयार झाली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. आजी आणि नाताच्या मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले होते.

****समाप्त ****

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

साहित्यचोरी गुन्हा आहे.

फोटो गुगल साभार.

मैत्रीचे नाते हे सर्वात सुंदर असे नाते असते. त्यात वयाचे बंधन नसते. सत्तर आणि सात वर्षांच्या दोन बेस्ट फ्रेंड्सची ही छोटीशी कथा कशी वाटली, नक्की कळवा.