एक अनोखे रक्षाबंधन

रक्षाबंधनच्या सणासाठी इतिहासाचा आधार घेऊन लिहिलेली काल्पनिक कथा
राखी पौर्णिमेच्या सणासाठी लिहिलेली ही एक काल्पनिक कथा आहे.350-400र्षांपूर्वी मोघली अंमलाखाली भरडलेल्या माय भगिनींना रक्षणासाठी शिवबाच्या शिलेदारांनी प्राणांची बाजी लावली,त्याच प्रमाणे या बहिणींनी सुद्धा तशीच साथ दिली असणार.त्यावर आधारित ही काल्पनिक कथा.

आग ये रत्ने!आवर लवकर,निगाय होव.रत्ना नावाप्रमाणेच सुंदर,कुलीन,शालीन असलेली.जोत्याजी पाटलांची लेक आन मल्हारराव शिर्के पाटलांची थोरली सून.यंदा लग्नानंतर पहिल्या राखी पुनवला माह्यारी जायचं.रत्नाच काळीज सुपावाणी झालं व्हत.माहेरचा वाडा,आजी माय, बाप,बंधू सगळ्यांच्या आठवणीत मन पाकरू व्हवून कवाच पोचलं व्हत माह्यारी.आव रत्नक्का!!दुरपा ने।मोठ्यांदा हाक मारली.आवरा बिगी बिगी,रत्ना भानावर आली.सगळं आवरलं आणि सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन रत्ना पडद्यांच्या गाडीत बसली.गाडीवान काशीबा रत्नाला त्यानं लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलं होत.रत्नक्का कश्या हायेसा??मी बेस आहे,काका.रत्ना हसत म्हणाली.सर्जा-राजा वेगानं धावू लागले.माहेरची वाट लवकर संपावी असेच कोणत्याही स्त्रीला वाटत असते.रत्ना आणि दुरपा छान गप्पा मारत होत्या.तिन्हीसांजा झाल्या होत्या.गाडी एका लयीत धावत होती.

एवढ्यात.......थांबा!!थांबा!!पाणी....असा आवाज आला.काशीबा ने गाडी थांबवली.रस्त्यात एक शिपाई गडी पडलाय आक्का.काशीबा जवळ गेला.तर जय भवानी...असे क्षीण शब्द ऐकू आले...काशीबा आव हा राजांचा शिलेदार दिसतोय.उचला आन गाडीत घ्या.त्याला गाडीत ठेवलं इतक्यात...मागून चार गनीम आले.गाडी रोको!!काशीबाच्या अंगाच पाणी पाणी झालं!!तो हातापाया पडत म्हणू लागला,"हुजूर ,पाटलांची लेक माहेराला चाललीय जी!!बुड्डे ,जादा मत बोल ,हम खुद जांचेगे!इकडे रत्ना ने कमरेच्या खंजीराला हात घातला.गनीम समोर आला,पडदा उठाव, तशी दुरपा ओरडली,ये आर तुला आया भयनी न्हाईत का काय??तेवढ्यात एकाने पडदा फाडला,आत एक लुगडं पांघरून कोणीतरी झोपलं होत.ये कोण???रत्ना हळुवार आवाजात बोलली,म्हातारी आहे.झोपलीय.तेवढ्यात कुत्सित हसत तो गनीम म्हणाला,बघू!!तो पुढं झाला,एवढ्यात ....खासकन खंजीराचा वार झाला....दुरपाने।मसाला आणि भंडारा उधळला...काशीबाने सर्जा -राजाला हाळी दिली...गाडी वाऱ्याच्या वेगाने धावू लागली.गनीम मागे पाठलाग करत होताच.

इकडे जखमी शिलेदाराच्या जखमा दुरपा बांधत होती आणि दुसरीकडे रत्नाने एकेक गनीम गोफणीने लोळवायला सुरुवात केली.बैलांच्या तोंडाला फेस आला..तरीही ती इमानी जनावर धावत होती.काशीबा जोरानं हाळी मारत व्हता.एवढ्यात गावाची येस दिसायला लागली.आकासाब !!!!गाव आलं...काशीबाने जोरात हाळी दिली.तसे गनीम माग फिरले...गाडी विजेच्या वेगाने वाड्यात शिरली.रत्ना ओरडत खाली उतरली,वैद्यांना बोलवा...लवकर...भराभर जखमा बांधल्या....आणि मग रत्ना घरात गेली.....एवढ्यात जोत्याजी पाटील आलं.आबा!!!म्हणत रत्ना धावतच बाहेर आली.काशीबाने सगळे सांगितलं...जोत्याजी पाटलांची छाती अभिमानाने फुगली.भले शाब्बास!!!आग शिवबा राजा आपल्यासाठी लढतोय मग आपुन माग का राहायचं????

सगळे जेवले ...जोत्याजीने जखमी शिलेदारांना बोलावलं...मुजरा पाटील.म्या गणोजी!!!बहिर्जी नाईकांच्या हाताखाली हाय!!एक खबर गावली ,ती द्यायला जाताना गणिमान गाठलं बघा..पर या माझ्या भणीन वाघीण बनून रक्षण केले.आता रजा द्यावी पाटील!!खबर राजगडावर द्यायची हाय!!गणोजी ...आव आमचं ऐका... आमचा माणूस जाईल गडावर...आव पर ....एवढ्यात रत्ना पूड झाली,दादा,उद्या राखी पूणव हाय,मला भन म्हणालास ना!!मंग एवढ ऐक.... स्वराज्यासाठी लढणाऱ्या या तुझ्या हातात राखी बंधू दे मला!!!शिवबा राजाला प्राणाची साथ देणारे तुम्ही भाऊ आहात म्हणून आम्ही आहोत...गणोजी हसत म्हणाला,बर आक्का, पर एक सांगतो...तुम्ही बहिनीसुदीक वाघिणीवाणी आमच्या पाठीशी आहेच की.... आज खऱ्या अर्थाने पुनवेचा चांद पाटलांच्या वाड्यावर नव्या तेजाने झळाळत होता.

कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.इतिहासाच्या पार्श्वभूमीवर शिवबचरणी दंडवत घालत,भावा बहिणींचे नाते फुलवणारी कथा लिहायचा हा एक छोटासा प्रयत्न...

*प्रशांत कुंजीर*