एक अनोखं नातं (सेतू संबंध)

Story Of
एक अनोखं नातं, तुझं माझं (संबंध सेतू )

या आभासी जगाशी जसजशी माझी ओळख होत गेली. तसतशी माझ्या आयुष्यात जोडलेल्या नात्यांनी माझं आयुष्य खरंच सुखकर आणि आनंदी बनत गेले.आणि मी माझ्या आयुष्यातले दुःख जवळजवळ विसरूनच गेले.

" सांग देवा या भूतलावर
मी जोडू सख्य कुणाशी?
देव हसून बोलला मग
जोड मुली नातं, या आभासी
जगाशी."

माझ्या एकट्या दुकट्या दुःखी मनावर फुंकर घालून देवाने मला वळणावळणावर सुंदर नाती मिळवून दिली. रक्ताची नाती नाही पण मानलेल्या नात्यांनी थोडं कां असेना माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलत ठेवले हेच माझं खूप मोठ वैभव!

ईरा व्यासपीठाच्या गेटटुगेदर साठी पुण्यात पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्याने झालेली
आमची पहिली वहिली भेट.तशी मी या व्यासपीठावर लिहिणारी नवखी लेखिका.कोणाशी माझी फारशी ओळख नव्हती.पुण्यात संमेलनाला उपस्थित राहिले.अन् संमेलनासाठीच आलेल्या एका लेखिकेने माझे लक्ष वेधून घेतले.त्यांचं नाव होतं रेखा देशमुख. अंदाजे माझ्या आईच्या वयाच्या असलेल्या या लेखिकेकडे पाहून पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला. या वयात देखील यांना इतकी लेखनाची आवड कशी काय असेल बरं?थोडं आश्चर्य वाटलं.माझ्याशी कोणताही काँटॅक्ट नसताना देखील रेखाताई माझ्या शेजारी बसून माझी विचारपूस करू लागल्या.मी तशी अबोल. याचं कारण म्हणजे मी ऐकू शकत नाही.तरीही ताई माझ्याशी खूप आदरपूर्वक बोलत राहिल्या.याचं मला खर तर अप्रूप वाटलं.

संमेलनातील आमची ही पहिलीवहिली भेट अगदी काळजाला भिडली. मला वाटलं ही नव्हतं, की रेखाताई माझ्या सोबत बोलतील. योगायोगाने ईराने चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जाहीर केली.आणि लकी ड्रॉ काढण्यात आला. एकूण आठ संघ. आठ ग्रुप. प्रत्येक संघात एकूण दहा स्पर्धक. अशी चॅम्पियन ट्रॉफी ची सुरुवात झाली. मला ग्रुप सहा मध्ये स्थान मिळालं. या संघात अनुक्रमे रेखाताई, नीता ताई, गीतांजली ताई,सारिका,रुपाली, शुभांगी ताई, कॅप्टन तृप्ती,अंजली, वेदांत आणि मी.अशी दहा स्पर्धकांची एक टीम तयार झाली.अन् योगा योगाने रेखाताई माझ्याच संघात असल्याने त्याच्याशी बोलण्याचा योग आला. संमेलनात सारिका,आणि रेखाताई याची जवळून भेट झाली होतीच. बाकीच्यांची देखील ओळख टप्याटप्याने होत गेली.

पहिल्या फेरीला सुरुवात झाली.अन् थोडं बोलता बोलता रेखाताई आणि माझं मस्त ट्यूनिंग जमलं.आम्ही रोज सकाळी माॅर्निंग विश करू लागलो. एकमेकांची खुशाली विचारू लागलो.आणि बघता बघता आमच्यात एक सुंदर नातं तयार झालं. माझ्या मनात आलं, रेखाताईंशी आणखी जवळचं नातं कसं निर्माण करता येईल.मोठ्यांशी आदराने बोलायचं, हा आईचा शब्द मी कधीच मोडला नाही.म्हणून मी रेखाताईंना विचारलं "ताई तुम्हाला ताई म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला मावशी म्हटलं तर चालेल का?" आणि काय आश्चर्य एका क्षणात त्याच्याकडून होकार आला.त्या बोलल्या "चालेल गं सविता, तसेही मला एक मुलगी आहे. पण मावशी म्हणून हाक मारायला बहिणीला मुलगी नाही.आज ती तुझ्या रूपाने मला मिळाली."
खरंच डोळ्यात आसवं आली माझ्या.आज खऱ्या अर्थाने कोणालातरी मी मावशी म्हणून त्याच्या आयुष्यात एका नात्याचं सुख मी भरलं होतं. अन् त्या दिवसापासून एका मैत्रिणीची मी एक लेक झाली.
उच्चशिक्षित असूनसुद्धा रेखाताई कशात मागे नाहीत. या वयातही त्यांची लिखाणाची गोडी अजुनही सरली नाही.डोळ्यांना त्रास होतो तरीही ही माऊली लेखनावर असलेलं प्रेम अजिबात कमी करत नाही.
रेखाताईंकडे पाहून खरंतर मला आश्चर्य वाटतं.मला सख्ख्या तीन मावशी आहेत. त्यातील एक पदवीधर आहे. पण लिखाणात अजिबात रस नाही. रेखाताईंकडे पाहिलं की वाटून जातं, अजूनही ती तरुण आहे.आपल्या आयुष्यातील असंख्य वेदना सोसून, आपले शिक्षण पूर्ण करून,मुलांना उच्चशिक्षित करून,एक आदर्शवत शिक्षिका म्हणून नोकरीतून सेवानिवृत्त होऊन, ईरा च्या व्यासपीठावर आपल्या लेखणीने हळुवार फुंकर घालणाऱ्या माझ्या रेखाताईला आगामी काळात लेखणी चे बळ मिळू दे, शांत, संयमी असलेल्या माझ्या या ताईला निरोगी आयुष्य लाभू दे, तिच्या साहित्य निर्मितीची भरभराट होऊ दे,इतकीच माझी आई जगदंबेकडे प्रार्थना.

आज मी खूप खूश आहे की,एका मैत्रिणीपासून एका सुंदर नात्यांत आम्ही दोघी अगदी प्रेमाने बांधले गेलो आहोत. आमचं हे प्रेमळ नातं कायम अबाधित राहील यात शंका नाहीच.

वयाच अंतर नको गं
थोडं लहान होऊन जग
आयुष्यातल खरं सुख
तू आज डोळ्यांनी बघ….!

अजुन खूप लिहायचं आहे पणं एवढ्यावरच थांबते.

तुझीच या अआभासी जगातली लेक
सविता (साऊ)

🎭 Series Post

View all