एक आगळेवेगळे लग्न भाग ७० ( अंतिम)

Maithili And Ketan Happily Married

मागील भागाचा सारांश: राधिका शेखरला घेऊन मैथिलीच्या घरी आली होती, इतक्या दिवस मनात साचून ठेवलेलं राधिकाने शेखर व मैथिली समोर बोलून मन मोकळं केलं. केतनच्या आईची अँजिओग्राफी केली असता त्यात त्यांना दोन ब्लॉकेज आढळून आले. केतनने आईची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. निलिमा ताईंची अशी इच्छा होती की त्यांची अँजिओप्लास्टी होण्याआधी केतन व मैथिलीचे लग्न व्हावे, त्यांनी तसं मैथिली कडे बोलून सुद्धा दाखवलं.

आता बघूया पुढे....

मैथिली हॉस्पिटल मधून थेट आपल्या घरी गेली, तिची आई एकटीच हॉल मध्ये बसलेली होती. राधिका व शेखर माहीला घेऊन त्यांच्या घरी निघून गेले होते. आईने मैथिलीकडे निलिमा ताईंच्या तब्येतीची चौकशी केली तेव्हा मैथिलीने आईला निलिमा ताईंच्या इच्छेबद्दल सांगितले. यावर आईने मैथिलीला विचारले, "तु या अश्या वातावरणात लगेच केतनसोबत लग्न करायला तयार आहेस का?"

मैथिली म्हणाली," आई मला एक सांग की सौरभ घरी परत येईपर्यंत लग्नानंतर तु माझ्यासोबत केतनच्या घरी रहायला येशील का?"

आई म्हणाली," मैथिली मी तुझ्यासोबत तुझ्या सासरी येऊन कशी राहू शकेल, तु माझी काळजी करु नकोस, मी माझ्या सोबतीला रमाला बोलावून घेईल. अशी किती दिवस माझी काळजी करत बसणार आहेस आणि स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणार आहेस. माझ्यामुळे तु तुझं आयुष्य थांबवू नये असं मला वाटतं."

मैथिली म्हणाली," आई खरंतर आता सध्याच्या काळात लग्न करणे हे माझ्यासाठी खूप कठीण आहे पण आई केतन व त्याच्या आईने आपल्या कठीण काळात आपली अनमोल साथ दिली आहे. जेव्हा माझ्या सोबत माझी सख्खी बहीण सुद्धा नव्हती तेव्हा केतन माझ्यासोबत माझा आधार म्हणून उभा होता. मला ही खात्री आहे की लग्नानंतर मी तुझी व सौरभची काळजी घेतल्यावर केतनला याबद्दल अजिबात आक्षेप असणार नाही. ज्या मुलाने माझ्या घरच्यांसाठी एवढं केलं आहे तर आता त्याच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला लग्न तर करावे लागेल की नाही? आई तुझी काय इच्छा आहे?"

आई म्हणाली," निलिमा ताईंनी व केतनने जे आपल्यासाठी केलं आहे, त्यांचे उपकार आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. सौरभ कधी बरा होईल आणि तो घरी कधी येईल हे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही आणि घरी आल्यावर तो पुन्हा कसा वागेल? याची मी त्याची आई असून सुद्धा खात्री देऊ शकत नाही त्यामुळे तु या गोष्टींमुळे अडून राहू नकोस आणि तसंही तु माझ्यापासून खूप लांब जाणार तर नाहीयेस ना, इथे पंधरा मिनिटांच्या अंतरावर तर तुझं घर आहे. मला आठवण आली की मी तुला भेटायला येत जाईल."

मैथिली म्हणाली," आई मी लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन माझा निर्णय केतनच्या आईला कळवते म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल."

मैथिली लगेच हॉस्पिटलमध्ये गेली, ती निलिमा ताईंच्या रुममध्ये गेली तर केतन त्यांच्या सोबत गप्पा मारत होता. केतन मैथिलीला बघून म्हणाला," तु तर काही वेळापूर्वी घरी गेली होतीस ना? मग लगेच परत का आलीस?"

मैथिली निलिमा ताईंकडे बघून म्हणाली, "आई मी तयार आहे, तुम्ही पुढील तयारी करु शकतात."

मैथिलीचं बोलणं ऐकून निलिमा ताई किती खुष झाल्या असतील हे त्यांच्या चेहऱ्यावरील स्माईल बघूनच कळत होतं. केतन म्हणाला, "मैथिली तु कशासाठी तयार आहेस आणि तु आईला कसली तयारी करायला लावली आहे?"

मैथिली म्हणाली," केतन आईंची अशी इच्छा आहे की त्यांची अँजिओप्लास्टी होण्याआधी आपल्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून."

केतन म्हणाला," काय? आई तर मला काहीच बोलली नाही."

मैथिली म्हणाली," कारण त्यांना माहीत होतं की तु नाही म्हणशील म्हणून. आता मी हो म्हटले आहे तर तुलाही तयार व्हावेच लागेल."

निलिमा ताई म्हणाल्या," मी गुरुजींना फोन करुन मुहूर्ताची तारीख काढते आणि आपण एखादा छोटा हॉल बघून आपल्या जवळपासच्या नातेवाईकांना बोलावून लग्न उरकून घेऊयात."

केतन म्हणाला," मैथिली माझ्या केबिनमध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे."

मैथिली निलिमा ताईंची परवानगी घेऊन केतनच्या पाठोपाठ त्याच्या केबिनमध्ये गेली. केतन म्हणाला," मैथिली तु सिरिअसली आता सध्या लग्नाला तयार आहेस?"

मैथिली म्हणाली," केतन ज्या स्त्रीने तिचा मुलगा इतका छान घडवला आहे, त्याला चांगले संस्कार दिले आहेत आणि तिच्यामुळेच मला एक परफेक्ट लाईफ पार्टनर मिळणार आहे तर त्या स्त्रीसाठी मी एवढं तर करुच शकते ना. केतन मला माहित आहे की आपल्या दोघांना हे लग्न धुमधडाक्यात करायचं होतं पण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला आईंचं मन जपणं आवश्यक आहे. आपण लग्न केलं तर त्यांच्या मनाला बरं वाटेल आणि त्या लवकर बऱ्या होतील. केतन तु माझ्या मनाचा विचार करु नकोस, आता सध्या आईच्या मनाचा विचार करणे आवश्यक आहे. आईंना खुश ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे."

केतन म्हणाला," मैथिली मी खरंच नशीबवान असेल की तु माझी लाईफ पार्टनर होणार आहेस. एखादी दुसरी मुलगी तुझ्याजागी असते तर ती म्हणाली असते की माझे वडील एक्सपायर झाले आहेत, आई आजारी आहे आणि या लोकांना लग्नाचं पडलं आहे पण तु माझ्या आईला समजून घेतलंस त्याबद्दल खरंच थँक्स."

मैथिली म्हणाली," असं तर मला तुला खूप गोष्टींसाठी थँक्स म्हणावं लागेल, थँक्स म्हणता म्हणता एक महिना पूर्ण होईल पण तुझ्यासाठी थँक्स म्हणणं संपणार नाही."

केतन मैथिलीच्या बोलण्यावर खळखळून हसला. निलिमा ताई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या तरी त्यांनी लग्नाची सर्व अरेंजमेंट केली होती, त्यांच्याकडे दोन तीन दिवसांचाच अवधी होता त्यात त्यांनी लग्न प्रॉपर अरेंज केले होते, खूप मोठंही नव्हतं आणि खूपच छोटंही नव्हतं. मैथिलीच्या आईने जवळपासच्या नातेवाईकांना लग्नासाठी आमंत्रित केले होते. कपड्यांची शॉपिंग आधी झाली असल्याने तयारी करायला फार वेळ लागला नाही. लग्नाचे सर्व विधी एकाच दिवशी करण्याचे योजिले होते. लग्नाचा सर्व खर्च निलिमा ताई करणार होत्या. लग्नाचे विधी एकाच दिवशी असल्याने आदल्या दिवशी कोणीच पाहुणे मैथिलीच्या घरी आलेले नव्हते. घरी आई व मैथिली दोघीच होत्या. मैथिलीचा नाराज चेहरा बघून आई म्हणाली," मैथिली बाळा अशी उदास का बसली आहेस?"

मैथिली म्हणाली," आई आज बाबांची खूप आठवण येत आहे ग. ते आज असते तर किती बरे झाले असते ना."

आई म्हणाली," अग बाळा देवाच्या मर्जीसमोर आपलं काही चालत नाही. तुझे बाबा असायला हवे होते पण ते नाहीयेत हे दुःखदायकच आहे. पण जास्त दुःखी होऊ नकोस नाहीतर तुझ्या बाबांना ते आवडणार नाही."

मैथिली बाबांच्या आठवणीने आईच्या कुशीत घुसून खूप रडली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मैथिली व तिची आई लग्नासाठी आवश्यक असणारं सामान घेऊन गाडीत बसत होत्या तोच सौरभ येऊन म्हणाला," दीदी माझे कपडे घेतलेस का?"

सौरभला असं अचानक बघून मैथिली व आई दोघीही आश्चर्यचकीत झाल्या. 

"सौरभ तु इथे कसा?" मैथिलीने विचारले

सौरभ म्हणाला," माझ्या दीदीचं लग्न आहे आणि मी त्या लग्नाला नसेल असं कसं होईल? आज मी जर माझ्या पायांवर उभा आहे तो माझ्या दीदीमुळेच."

मैथिली म्हणाली," अरे पण तु कोणासोबत आलास?"

मैथिली हे बोलताच शेखर समोर येऊन म्हणाला," मी सौरभला घेऊन आलो आहे. मैथिली मला माफ कर, गेल्या काही महिन्यांत मी खूप चुकीचे वागलो आहे.त्याचे प्रायश्चित्त म्हणून समज किंवा माझे कर्तव्य म्हणून समज मी सौरभला घेऊन आलो आहे. राधिका व माही लग्नाच्या हॉलवर पोहोचल्या आहेत. मी बॅग पटपट गाडीत ठेवतो, तुम्ही आवरुन या पटकन."

सौरभ घरात गेल्यावर बाबांच्या फोटोसमोर जाऊन म्हणाला,"बाबा मला माफ करा. मी खूप चुकीचा वागलो होतो, मैथिली दीदी व केतन जिजूंनी वेळच्या वेळी माझी कान उघडणी केली होती पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि बघा आता काय घडून बसलं होतं. बाबा मी जर व्यसनाधीन झालो नसतो तर तुम्हाला पुण्याला यावं लागलं नसतं आणि तुमचा अपघात झाला नसता, माझ्या एका चुकीमुळे तुम्ही आम्हाला सर्वांना सोडून गेलात. बाबा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता त्यासाठी खरंच सॉरी. बाबा इथून पुढे मी आईला, या घरातील प्रत्येक व्यक्तीला सांभाळेल, त्यांची काळजी घेईल. तुम्हाला माझा अभिमान वाटेल असंच काहीतरी करुन दाखवेल."

सौरभ हे बोलून रडायला लागला तर आई म्हणाली,"सौरभ झालं गेलं विसरुन जा. तुझ्यामुळे बाबा गेले नाहीत तर ती त्यांची जाण्याची वेळ होती आणि कारण तु ठरला एवढंच झालं. तु पटकन तुझं आवरुन घे, हॉल वर पोहोचायला उशीर व्हायला नको."

मैथिली आईला म्हणाली," आई आत्ता कुठे मला या घरातून जाताना बरं वाटत आहे, नाहीतर घरातून माझा पायचं निघत नव्हता."

मैथिली, सौरभ व त्यांची आई शेखरसोबत त्याच्या गाडीतून हॉलवर गेले. राधिकाने स्वतः मैथिलीला लग्नाच्या विधींसाठी सजवले होते. सर्वांत आधी मैथिली व केतनचा साखरपुडा पार पडला, त्यानंतर त्यांना हळद लागली. लग्नाला ठरविक नातेवाईकच हजर होते, मैथिलीची मैत्रीण गौरी काही कारणास्तव लग्नाला येऊ शकली नव्हती. डॉ पुजा लग्नाला आलेली होती. हळद लागल्यानंतर मैथिली व केतन वरमाला विधीसाठी तयार झाले. मैथिली मरुन कलरच्या शालूमध्ये उठून दिसत होती. केतन तर तिच्याकडे बघतच राहिला होता. मंगलाष्टके झालीत, मैथिलीने केतनच्या गळयात हार घातला, केतनने मैथिलीच्या गळ्यात हार घालून वरमाला विधी पूर्ण झाली होती. सप्तपदीच्या वेळी मैथिलीने नऊवारी साडी घातली होती तर केतनने कुर्ता व धोतर घातले होते. केतन व मैथिलीने एकमेकांना सात वचनं देत सप्तपदी पूर्ण केली होती. 

आता वेळ होती ती कन्यादानाची. गुरुजी म्हणाले,"कन्यादानाच्या विधीसाठी मुलीच्या आई वडिलांना बोलवा."

यावर केतन म्हणाला," मैथिलीला वडील नाहीयेत"

गुरुजी म्हणाले," काका काकू किंवा मावशी काकाही चालतील, अगदी ते नसतीलच तर तिचे बहीण मेव्हणे पण चालतील."

तेव्हा मैथिलीच्या आईने राधिका व शेखरला कन्यादान करण्यासाठी यायला सांगितले. राधिका व शेखर कन्यादान करण्यासाठी खाली बसणार तोच मैथिली म्हणाली," राधिका ताई एक मिनिटं थांब. गुरुजी कन्यादान म्हणजे काय? ही विधी का करतात? "

गुरुजी म्हणाले," अग मुली कन्यादान म्हणजे आई वडील आपली कन्या तिच्या जोडीदाराला देऊन एक प्रकारचे दानच करतात. ज्या मुलीला त्यांनी लहानाचे मोठे केले, वाढवले, तिच्यावर संस्कार केले, तिला शिक्षण दिलं, ती मुलगी ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात देऊन टाकतात. हा विधी करण्यामागे एकच हेतू असतो की वडील आपल्या जावयाला सांगू इच्छितात की मी जस माझ्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं तसंच तुम्हीही तिला जपा."

मैथिली म्हणाली," गुरुजी कन्यादान आई वडील करतात बरोबर, आता माझे बाबा नाहीयेत पण माझी आई तर आहे ना? मग ती कन्यादान करुच शकते ना?"

मैथिली असं बोलल्यावर उपस्थित असलेले सर्व लोकं कुजबुज करायला लागले. मैथिलीच्या बोलण्यावर गुरुजी म्हणाले," एका विधवा बाईने हे सर्व विधी करावेत याला आपल्याकडे मान्यता देता येत नाही, कुठल्याही पुजेला बसायचं असेल तर स्त्री एकटी बसू शकत नाही."

मैथिली म्हणाली," सत्यनारायण किंवा इतर पुजेला पुरुष एकटा बसू शकतो मग स्त्री का नाही? मला आपल्या रूढी परंपरांचा आदर आहे, मी पण त्या मानते परंतु माझे वडील नाहीत म्हणून माझ्या आईला कन्यादान करता येऊ नये हे मला मान्य नाही. ज्या आईने मला जन्म दिला, तिने मला वाढवले, माझ्यासाठी तिने इतके कष्ट केलेत त्या माझ्या आईनेच माझे कन्यादान करावे अशी माझी इच्छा आहे."

आई म्हणाली," मैथिली असा हट्ट करु नये, राधिका व शेखरराव तुझं कन्यादान करतील, तेही आपल्या घरातीलच आहेत की नाही आणि तसंही मोठी बहीण ही आईसमान असते."

मैथिली म्हणाली," मोठी बहीण ही आईसमान असते आई नसते. मला राधिका ताई व जिजूंना दुखवायचं नाहीये पण त्यांनी माझं कन्यादान करणे मला मान्य नाही."

गुरुजी म्हणाले," मुली याला शास्त्र मान्यता देत नाही."

केतन म्हणाला," एक मिनिटं गुरुजी, हे बघा तिचं दान होणार आहे आणि मला ते स्विकारायचं आहे. तिच्या आईने कन्यादान करावे अस जर आम्हा दोघांनाही वाटत असेल तर तिसऱ्या व्यक्तीला त्यात बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. काकू मैथिलीने बाबांना अग्निडाग दिलेला तुम्हाला चालला पण तुम्ही मैथिलीचे कन्यादान करु शकत नाही, असे कसे होईल."

राधिका म्हणाली," आई मैथिली व केतन जे बोलत आहेत ते एकदम खरं आहे, तु मैथिलीचं कन्यादान कर."

सगळ्यांचीच इच्छा असल्याने गुरुजीही काहीच बोलू शकले नाही. मैथिलीच्या आईने मैथिलीचे कन्यादान केले. अश्या प्रकारे हे एक आगळेवेगळे लग्न पार पडले.

आता माझ्या सर्व वाचक मित्र मैत्रिणींना प्रश्न पडला होता की कथेचे नाव एक आगळेवेगळे लग्न का असेल? असं या लग्नात काय आगळंवेगळं घडलं असेल? तर मी त्या सर्वांना सांगू इच्छिते की केतन व मैथिलीचं लग्न झालेलं नसताना सुद्धा त्यांनी एकमेकांना सुख दुःखात कायम साथ दिली, दोघांनीही एकमेकांप्रती असलेली आपापली कर्तव्ये निभावली. कन्यादानाच्या विधीच्या वेळी सुद्धा केतनने मैथिलीची साथ दिली.

इथेच माझ्या या कथेचा मी शेवट करत आहे. माझ्या या कथेला सर्व वाचकांनी भरभरुन प्रेम दिले त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all