Dec 01, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ६९

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ६९

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: मैथिलीच्या बाबांचा अंत्यविधी उरकल्यावर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले होते. राधिका राख सावडल्यानंतर शेखरच्या सांगण्यावरुन आपल्या घरी परत गेली. राधिका व मैथिली मध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा सुद्धा झाली. राधिकाची इच्छा असताना सुद्धा तिला आपल्या आई व बहिणी सोबत थांबता आले नाही. डॉ पुजा मैथिलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आली होती, तिने मैथिलीला थोडी शांतता घ्यायला सांगितली.

आता बघूया पुढे....

मैथिलीच्या बाबांचे सर्व विधी म्हणजेच दहावा, तेरावा व्यवस्थित रित्या पार पडले. राधिका व शेखर सर्व विधींना पाहुण्यासारखे आले व निघून गेलेत. मैथिलीने हॉस्पिटल पुन्हा जॉईन केले. मैथिलीच्या आईच्या पायाचे प्लास्टर निघाले होते, ती वॉकरच्या साहाय्याने चालायला लागली होती. मैथिलीच्या आईला घरातील कामे करायला जमत होतं मग रमा तिच्या घरी निघून गेली. आईने सुचविल्याप्रमाणे मैथिलीने सौरभच्या ट्रीटमेंट साठी पैश्यांची जुळवाजुळव केली होती. सौरभच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली होती. डॉक्टरांचं म्हणणं होतं मी येत्या दोन ते तीन महिन्यांत सौरभ पूर्ण बरा होऊन घरी जाऊ शकेल. नात्यांची खरी परीक्षा ही आपल्या कठीण काळात होते ते मैथिलीला कमी वयातच अनुभवायला मिळाले होते.

राधिका मैथिलीला अधून अधून फोन करायची पण मैथिली तिच्या सोबत फारसं बोलायची नाही, राधिकाला मैथिलीचं असं वागणं खटकत होतं म्हणून एका रविवारी राधिका शेखर व माहीला घेऊन मैथिलीच्या घरी आली. मैथिली त्यांच्या सोबत एक फॉर्मलिटी म्हणून वागत होती, तिने शेखरकडे बघितले सुद्धा नाही. शेखर पण मैथिली सोबत एकही शब्द बोलला नाही. हे बघून राधिकाला खूप वाईट वाटले, तिच्या डोळयात पाणी आले. तिच्या डोळ्यातील पाणी बघून आई म्हणाली, "राधिका तुझ्या डोळयात पाणी का आले आहे? काय झालं?"

यावर राधिका म्हणाली," आई हे शेखर व मैथिली मध्ये जे कोल्ड वॉर चालू आहे ते कधी संपेल. आमचं बाळ हे आमच्या नशिबाने गेले त्यात कोणाचा काही दोष आहे का? एक आई म्हणून मलाही बाळ गेल्यामुळे खूप दुःख झालं होतं पण म्हणून मी यासाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे योग्य आहे का? शेखरला राग आलाही असेल पण तो राग किती दिवस टिकवून ठेवावा यालाही काही लिमिट आहे की नाही. आतापर्यंत झालं ते झालं पण यापुढे तरी हा डोक्यातील राग यांनी काढून टाकणे गरजेचे आहे की नाही. शेखरमुळे माझं व माहीचं नातं मैथिली सोबत खराब होत आहे. मैथिली पहिल्यासारखं काहीच बोलत नाही आणि जे काही थोडं फार बोलते त्यात फक्त टोमणेच असतात. मैथिली माही सोबत सुद्धा जास्त बोलत नाही की तिचे लाड करत नाही. हे सगळं किती दिवस चालणार.मैथिली एका कठीण काळात एकटी होती तिला आमची काहीच मदत लाभली नाही, ही आमची खूप मोठी चूक झाले आहे हेही मला मान्य आहे. बाबा आपल्याला सोडून गेल्यावर माझ्या इतकं तर लक्षात आलं आहे की कोणी कधीही हे जग सोडून जाऊ शकतं. हा फुकटचा इगो सांभाळून काय करायचं आहे हेच मला कळत नाहीये. "

यावर मैथिली म्हणाली," राधिका ताई तुला जे माझे टोमणे वाटत आहेत ते माझ्या मनातील दुःख आहे. माही सोबत मी पहिल्या सारखं का बोलत नाही किंवा तिचा लाड का करत नाही? याचं उत्तर मी तुला आपल्यात मागे एकदा चर्चा झाली होती तेव्हा मी तुला सांगितलं होतं."

मैथिली बोलत असतानाच तिला हॉस्पिटल मधून फोन येतो व तिला असं सांगितलं जातं की निलिमा ताईंच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. मैथिली आईला सांगून लगेच हॉस्पिटलला गेली, तिथे पोहोचल्यावर मैथिलीला समजले की निलिमा ताईंना अँजिओग्राफी करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले आहे.केतन निलिमा ताईंसोबत ऑपरेशन थिएटर मधेच होता. मैथिली देवाकडे निलिमा ताईंसाठी प्रार्थना करत होती. थोड्या वेळाने केतन बाहेर आल्यावर मैथिलीला समजले की निलिमा ताईंना दोन ब्लॉकेज आहेत आणि त्यांना मायनर हार्ट अटॅक येऊन गेला आहे. केतनने डॉक्टरांसोबत चर्चा करुन ठरवले की निलिमा ताईंची अँजिओप्लास्टी पुढच्या आठवड्यात करुन टाकायची.

निलिमा ताईंना ऑपरेशन थिएटर मधून स्पेशल रुममध्ये शिफ्ट केल्यावर मैथिली त्यांना भेटायला गेली होती तेव्हा त्या म्हणाल्या, "मैथिली मला तुझ्या सोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे."

यावर मैथिली म्हणाली," आई तुम्ही पहिले बऱ्या व्हा मग आपण बोलू, आत्ता तुम्हाला आराम करणे गरजेचे आहे."

निलिमा ताई म्हणाल्या," नाही, आत्ता जर मी या विषयावर बोलले नाही तर माझ्या डोक्यात तेच चालू राहील आणि याचा मला जास्त त्रास होईल. Actually हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये पण मला माझी खात्री राहिली नाहीये. मला हार्ट अटॅक येईल असेही मला वाटले नव्हते. अँजिओप्लास्टी झाल्यावर मी पूर्णपणे बरी होईल की नाही याची मला खात्री वाटतं नाहीये. तुझ्या सध्याच्या परिस्थितीची मला पूर्ण कल्पना आहे, तुझे वडील एक्सपायर झाले, तुझा भाऊ व्यसनमुक्ती केंद्रात आहे तर तुझी आई आजारी आहे. तुझ्यावर या सर्वांची जबाबदारी आहे हेही मला माहीत आहे पण या सगळयात तुझं व केतनचे लग्न ठरलेल्या वेळेत होऊ शकलं नाही. मला जर हार्ट अटॅक आला नसता तर मी इतकी घाई पण करु शकत नव्हते. माझी अशी इच्छा आहे की माझी अँजिओप्लास्टी होण्याआधी तुमच्या दोघांचं लग्न माझ्या डोळयासमोर होऊन जावं. प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलाचं लग्न आपण असताना होऊन जावं. तुमचं लग्न जर झालं तर मला केतनची काळजी राहणार नाही, मी गेल्यानंतर त्याची काळजी घ्यायला कोणीतरी आहे हे समाधान मला मिळेल. अगदी सध्या पद्धतीने आपण तुमचं लग्न करुयात. तुला भारतीची काळजी वाटत असेल तर लग्नानंतर सौरभ घरी येईपर्यंत तु तिला आपल्या घरी घेऊन येऊ शकते. लग्न झाल्यावर सुद्धा तुझ्या भावा व आई प्रति असलेलं कर्तव्य तु निभावू शकतेस. मी व केतन तुला याबाबत अडवणार नाही. मी या विषयावर केतन सोबत बोलले नाहीये कारण तो तुझ्या मनाचा विचार करुन नाहीच म्हणाला असता याची मला खात्री आहे म्हणून मी पहिले तुझ्या सोबत बोलायचं ठरवलं आणि मग मी या विषयावर केतन सोबत बोलायचं ठरवलं आहे. उद्यापर्यंत यावर विचार कर आणि मग तुझा निर्णय मला कळव. मला माझ्या मुलाचं लग्न अगदी थाटामाटात करायचं होतं पण समोर परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की सध्या त्याच लग्न होणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही म्हणालात की अँजिओप्लास्टी झाल्यावर मी बरी होईल किंवा त्यानंतर आपण लग्न करु पण हे माझ्या मनाला पटत नाहीये. मला तुझा निर्णय लवकरात लवकर सांग म्हणजे आपल्याला पुढील तयारीला लागता येईल."

मैथिली म्हणाली," आई तुम्ही आराम करा, मी थोडा विचार करुन माझा निर्णय कळवते. मी येते."

मैथिली निलिमा ताईंना विचार करुन निर्णय कळवते हे सांगून तर गेली होती पण या अश्या मनस्थितीत लग्न करणे तिच्या मनाला पटत नव्हते. एक मन म्हणत होत की केतन व त्याच्या आईने आपल्यासाठी खूप काही केलं आहे त्यांच्या साठी आपण लग्न लगेच करण्याचा निर्णय घेऊयात पण दुसरं मन म्हणत होतं की लग्नानंतर आई आपल्या सोबत केतनच्या घरी राहण्यासाठी यायला तयार होईल का? तिला असं एकटीला सोडून जाणं बरोबर वाटत नाहीये. मैथिलीच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला होता,तिला एक ठोस निर्णय घेणे खूप जड जात होते.

मैथिली लगेच केतन सोबत लग्न करुन निलिमा ताईंची इच्छा पूर्ण करेल का? बघूया पुढील भागात....

©®Dr Supriya Dighe
❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now