एक आगळेवेगळे लग्न भाग ६८

Maithili Is In Emotional Trauma

मागील भागाचा सारांश: मैथिलीने हॉस्पिटल जॉईन केले होते. मैथिलीची आई हळूहळू बरी होत होती. सौरभ ट्रिटमेंटला रिस्पॉन्स द्यायला लागला होता. केतन मैथिलीला motivate करत होता. ज्या दिवशी केतन व मैथिलीचे लग्न होणार असते त्याच दिवशी मैथिलीचे बाबा एक्सपायर झाले होते. मैथिली खचली होती पण तिला केतनने सावरले. मैथिलीने बाबा गेल्याचं राधिकाला फोन करुन सांगितलं. सौरभची तब्येत बिघडल्याने तो बाबांच्या अंत्यविधीला येऊ शकला नव्हता. आईने सांगितल्या प्रमाणे मैथिलीने बाबांना अग्निडाग दिला होता.

आता बघूया पुढे....

बाबांना अग्निडाग देऊन झाल्यावर मैथिली केतनच्या गळयात पडून खूप जास्त रडली. मैथिलीला अश्रू अनावर झाले होते. केतन तिला समजावून सांगत होता, तिला धीर देत होता. वडिलांच्या जाण्याने किती मोठी पोकळी निर्माण होते याची कल्पना केतनला असून सुद्धा तो मैथिलीला सावरत होता. अंत्यविधी उरकल्यावर केतनने मैथिलीला स्मशानभूमीतून घरी आणून सोडले. निलिमा ताईंनी मैथिली, राधिका व त्यांच्या आईला दोन घास का होईना जेवायला घातले. शेखर माहीला घेऊन आपल्या घरी निघून गेला होता. केतन मात्र त्या रात्री मैथिलीच्या घरीच थांबला होता. मैथिलीचे काही नातेवाईक त्यांच्या घरीच थांबले होते. दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर उरलेले नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले होते. केतन हॉस्पिटलमध्ये निघून गेला होता. मैथिलीच्या आईजवळ रमा ताई सतत बसून होत्या. मैथिली तिच्या रुममध्ये डोळे मिटून शांत बसलेली होती. रात्री नीट झोप न झाल्याने तिचे डोळे, डोकं खूप दुखत होते. मैथिलीला असं शांत बसलेलं बघून राधिका तिच्या जवळ गेली, तिने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला, मैथिलीच्या डोळयात लगेच पाणी आलं, ती राधिकाच्या गळयात पडून रडायला लागली. राधिकाला आपले अश्रू अनावर झाले होते. राधिका स्वतःला शांत करत रडक्या आवाजातच म्हणाली," मैथिली बाळा तु जेवढी जास्त रडशील तेवढा तुला जास्त त्रास होईल, त्याचा तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. तुच जर अशी खचली तर आईला कोण सांभाळेल बरं. मैथिली तु खूप धीराची आहेस ना."

मैथिली शांत झाली होती, ती पुढे म्हणाली, "राधिका ताई आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे, एकामागून एक संकटे येतच आहेत."

राधिका खाली मान घालून म्हणाली," हो ना आणि या संकटांत तु एकटीच होतीस, मी तुझी काहीच मदत करु शकले नाही. मैथिली मी शेखरला विरोध करुच शकले नाही. शेखर चिडू नये म्हणून मीच शांतता घेऊन टाकली होती. आई बाबांच्या अपघाताबद्दल मला कोणी काहीच बोललं नाही, त्या दिवशी आईने फोनवर सगळं सांगितल्यावर मला कळलं, त्यादिवशी मी बाबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये यायला हवं होतं पण शेखर नाही म्हणाले म्हणून मी येऊ शकले नाही. मैथिली माझं चुकलंच. मला बाबांचा चेहरा सुद्धा बघायला भेटला नाही. मैथिली मला माफ करशील ना?"

मैथिली म्हणाली," मी तुला माफ करणारी कोण आहे, तुला तुझी चूक कळाली यातच सगळं आलं, आता स्वतःला दोष देऊन काही होणार नाही. आपले बाबा परत येणार नाहीत हेच सत्य आहे. बाबांना वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेत पण आमच्या हाताला यश आले नाही हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. बरं ते सगळं जाऊदेत, तु घरी कधी जाणारेस? म्हणजे तुला शेखर जिजूंनी घरी बोलावले असेल तर तु जाऊ शकतेस. मी इथलं सर्व सांभाळून घेईल."

राधिका म्हणाली," मैथिली तुला शेखरचा राग येणं स्वाभाविक आहे पण त्यांचा राग तु माझ्यावर आणि माहीवर काढू नकोस प्लिज. तु माहीची एकदाही चौकशी केली नाहीस. असं आम्हाला दोघींना अंतर देऊ नकोस."

मैथिली म्हणाली," ताई मला जर तुला अंतर द्यायचे असते तर आता मी तुझ्या सोबत बोललेच नसते आणि राहिला प्रश्न माहीचा तर तिच्या सोबत माझं नातं काय आहे? आणि आमची attachment किती आहे? याची तुला कल्पना आहेच पण शेखर जिजूंनी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जी बडबड केली त्यामुळे मी थोडी दूर राहिलेलीच बरी उगाच त्याचा त्रास तुम्हालाही होईल आणि मलाही होईल. शेवटी माही तुमच्या दोघांची मुलगी आहे, तिच्यावर तुमचा जास्त अधिकार आहे. ताई तुला माझं बोलणं चुकीचं वाटत असेल पण गेल्या काही दिवसांत मी जे काही अनुभवलं आहे त्यावरुन मी हे बोलत आहे. तुला दुखावण्याचा माझा हेतू नाहीये."

राधिका काही बोलणार इतक्यात तिला शेखरचा फोन आला, शेखर सोबत बोलून झाल्यावर राधिका मैथिलीला म्हणाली, "मैथिली शेखरचा फोन आला होता, ते मला घरी बोलावत आहेत, आता मी जाते आणि दोन तीन दिवसांनी परत येते. माझा पण नाईलाज आहे ग, तु मला समजून घेशील ही अपेक्षा मी करते."

मैथिली म्हणाली," ताई मी तुला समजून घेईल, तु घरी जा आणि डायरेक्ट दहाव्याच्या दिवशी आलीस तरी चालेल, दहाव्याचा विधी आपण गंगेवर करणार आहोत, त्या दिवशी घरी न येता डायरेक्ट गंगेवर आलीस तरी चालेल."

राधिका म्हणाली," मैथिली प्लिज माझ्यावर रागावू नकोस ना, मला इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. ह्या घरातून माझाही पाय निघत नाहीये पण मला जावं लागणार आहे, मी आईला सांगून निघते."

मैथिलीने राधिका ताईकडे बघितलं पण नाही. मैथिली तिच्या रुममध्येच बसून होती, ती झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला झोपच लागत नव्हती. 

"मैथिली आत येऊ का?" डॉ पुजाने विचारले

मैथिली स्माईल देऊन म्हणाली," अरे या ना"

डॉ पुजा मैथिली जवळ येऊन बसली व ती म्हणाली," तु झोपली होतीस का?"

"नाही झोपच लागत नाहीये, डोकं खूप जास्त जड पडलं आहे." मैथिलीने सांगितले

" जेवण केलंस का?" डॉ पुजाने विचारले

"हो" मैथिलीने उत्तर दिले.

डॉ पुजा म्हणाली,"काकूंकडे जाण्याची मला हिम्मतच होत नाही, त्या बऱ्या आहेत का? राधिका ताई त्यांच्या जवळ आहे का?"

मैथिली म्हणाली," राधिका ताई आत्ताच काही वेळापूर्वी तिच्या घरी गेली. सकाळपासून एकदाच मी आईजवळ गेली होती, मला आईचा चेहराच बघवत नाही. बाबा एकटे गेले नाहीत ते आमच्या मूळ आईलाही घेऊन गेलेत असं वाटतंय. आईच्या कपाळावर आता टिकली दिसणार नाही की आईच्या हातात हिरव्या बांगड्या दिसणार नाहीत की आईच्या गळयात मंगळसूत्र, पायात जोडवे दिसणार नाहीत. आई आता चांगली काठापदराची साडी घालून नटून थटून मिरवू शकणार नाही. बाबा आईचा सर्व साज शृंगार घेऊन गेले आहेत."

डॉ पुजा म्हणाली," आपली संस्कृती आहे त्यानुसार हे सगळं आलंच."

मैथिली चिडून म्हणाली," पण बाईचा नवरा वारला आहे यात त्या बाईचा काय दोष? हे सर्व बाईलाच का सामोरं जावं लागतं. आता समजा एखाद्या माणसाची बायको वारली तर त्याच्या रुटीन मध्ये काही बदल होत नाहीत, असं का?"

डॉ पुजा म्हणाली,"मैथिली आपण या रूढी परंपरा बदलू शकत नाही. तो विषय राहूदेत. राधिका ताई सोबत तु बोललीस की नाही?"

मैथिली म्हणाली," हो थोडफार बोलणं आमच्यात झालं. तिने मला सांगितलं आहे की तिला समजून घे म्हणून. मॅडम मला यावेळी माझ्या मोठ्या बहिणीच्या आधाराची किती गरज होती पण ती माझ्याजवळ थांबू शकत नाही का तर तिचा नवरा नाही म्हणतोय म्हणून. मला तर ना यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहीये. सगळया जबाबदाऱ्या खांद्यावर पेलून खांदे दुखायला लागले आहेत, थोड्या वेळासाठी का होईना मला यातून विश्रांतीची गरज आहे. आता बाबांच्या विधींची तयारी करावी लागेल, दहावा, तेरावा अजून काय काय असतात काय माहीत?"

डॉ पुजा म्हणाली," मैथिली हे सगळं तुला करावंच लागणार आहे, तु सध्या इमोशनली खचली आहेस हे मला मान्य आहे पण इमोशन्सच्या भरात कोणाला काही चुकीचं बोलून जाऊ नकोस. थोडी शांतता घे. मी काकूंना भेटून येते."

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all