Dec 01, 2021
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ६७

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ६७

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागाचा सारांश: मैथिलीने आईला सर्व सत्य परिस्थिती सांगितल्यावर आईच्या डोळयात पाणी आले होते पण तिने खचून न जाता समोर आलेल्या संकटांवर कशी मात करता येईल याचा विचार केला. सौरभच्या ट्रिटमेंटच्या खर्चाची व्यवस्था मैथिलीला कुठून करायची हे आईने सांगितले तर स्वतःची काळजी घेण्यासाठी मैथिलीला अडकून न ठेवता रमा नावाच्या बाईला माझ्यापर्यंत घेऊन ये ती माझ्या सोबत राहील याची कल्पना आईने मैथिलीला सांगितले. राधिकाला फोन करुन जे काही आत्ता पर्यंत घडले होते ते सर्व काही सांगितले तसेच वरुन हेही सांगितले की हे तुझं आयुष्य आहे, निर्णय तुझा आहे, पुन्हा तु म्हणाली असते की एवढं सगळं घडून गेलं आणि मला कोणीच काही सांगितलं नाही. मैथिलीच्या आईला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला होता. सौरभ ट्रिटमेंटला रिस्पॉन्स देत होता.

आता बघूया पुढे....

मैथिलीने हॉस्पिटल पुन्हा जॉईन केले. हॉस्पिटलमध्ये असताना बाबांकडेही लक्ष देता येत होते आणि आपण काहीच काम करत नाही ही भावना निर्माण होत नव्हती. पेशन्ट्स तपासून झाल्यावर मैथिली आपल्या केबिनमध्ये बसलेली होती तेव्हा केतन तिच्यासोबत बोलायला केबिनमध्ये येतो. केतन आल्यावर आपल्या हातातील पेशंटची फाईल मैथिलीने बाजूला ठेवली. केतन म्हणाला, "मैथिली तु रात्रीची नीट झोपत नाहीयेस का? तुझा चेहरा अजिबात प्रसन्न दिसत नाहीये. काही वेगळं टेन्शन आहे का?"

मैथिली म्हणाली," केतन मी दररोज समोर आलेल्या परिस्थिती विरोधात लढत आहे, संकटांना तोंड देत आहे पण कधी कधी हे सर्व मला असह्य होत आहे."

केतन तिला धीर देण्यासाठी म्हणाला," मैथिली मी समजू शकतो की तु आतून कितीही खचली तरी तुला ते बाहेरुन दाखवता येत नाहीये. आत्ता सध्या आपल्या समोर जी संकटे आहेत ते वेळेनुसार जातील त्याला आपण काहीच करु शकत नाहीये. सौरभ ट्रिटमेंटला थोडाफार रिस्पॉन्स द्यायला लागला आहे, आई बऱ्या होत आहेत, त्यांची काळजी घ्यायला रमा मावशी आहेत, आता राहिला प्रश्न बाबांचा तर ते कोमातून कधी बाहेर येतील हे आपण कोणीच सांगू शकत नाहीये. त्या बाबतीत वाट बघणंच आपल्या हातात आहे."

मैथिली पुढे म्हणाली," केतन आज तारीख किती आहे? हे बघितलंस का? केतन आज आपलं लग्न होणार होतं. माझ्या कुटुंबावर आलेल्या संकटांमुळे तुझ्यावर अन्याय केल्यासारखा मला वाटत आहे."

केतन चिडून म्हणाला," मैथिली हे तुझं- माझं आपल्यात कुठून आलं. मी हे सर्व आपलं म्हणून करतो आहे आणि तु मला परकं मानत आहेस हे योग्य नाही. अग आपलं लग्न आज नाही झालं म्हणून काय झालं? घरातील सर्व परिस्थिती निवळल्यावर थाटामाटात आपलं लग्न होईल. माझ्यावर काही अन्याय होत नाहीये."

केतन बोलत असतानाच एक नर्स धावतपळत मैथिलीच्या केबिनमध्ये येऊन म्हणाली," केतन सर मैथिली मॅडमचे बाबा कसे करत आहात बघा ना?"

नर्सचं बोलण ऐकताच केतन लगेच आय सी यू च्या दिशेने निघाला त्याच्या पाठोपाठ मैथिली सुद्धा घाईघाईत निघाली पण केतनने तिला आय सी यू मध्ये येण्यास मनाई केली. मैथिलीच्या बाबांची बिघडलेली परिस्थिती बघता केतनने पटापट बाकीच्या डॉक्टरांना फोन फिरवला. मैथिलीला आधार देण्यासाठी डॉ पुजा तिच्या सोबत बसून होती. केतनने बोलावल्यावर डॉक्टरांची सर्व टीम पुढच्या काही मिनिटांतच हॉस्पिटलमध्ये हजर होती. आय सी यू मध्ये काय चालू आहे? याची कल्पना मैथिलीला नव्हती. डॉक्टर, नर्सची धावपळ बघून आतमध्ये काहीतरी गडबड आहे हे मैथिलीला जाणवले होते. साधारणपणे पुढील एक तासानंतर केतन आय सी यू मधून बाहेर आला. केतनला बघितल्यावर मैथिली उठून उभी राहिली, ती केतनकडे आशेने बघत होती. केतन तिच्या जवळ आला पण त्याने मान वर केली नाही. "केतन बाबांना काय झालं होतं? बाबा कसे आहेत?" मैथिलीने घाबरतच विचारले.

केतन मैथिलीकडे बघून म्हणाला," I am so sorry मैथिली, बाबांना वाचवण्यात मला यश आले नाही. बाबा आपल्याला सोडून देवाघरी गेले आहेत."

हे ऐकून मैथिली जागेवर बसली, तिच्या डोळयातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. केतनच्याही डोळयात पाणी होते. मैथिली केतनकडे बघून म्हणाली," केतन आईला काय सांगायचं? आईला मी हे सांगावं एवढी माझ्यात हिम्मत नाहीये."

मैथिली हुंदके देत रडायला लागली होती. डॉ पुजा व केतनने तिला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. डॉ पुजा म्हणाली," मैथिली असं काय करतेस? तुच जर अशी खचली तर आईला कोण धीर देईल. आज रोजी तु आईचा एकमेव आधार आहेस."

केतन म्हणाला," मैथिली मी आईला सांगतो ती तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला घडलेल्या घटनेबद्दल सांगेल पण तुमच्या बाकीच्या नातेवाईकांना तर निरोप द्यायला लागेल ना? बाबांना पोस्टमार्टमला नेण्याआधी एकदा बघून घे ना."

मैथिली म्हणाली," केतन मला बाबांचा खूप राग आला आहे. माझं कन्यादान करण्याआधी ते कसे आपल्याला सोडून जाऊ शकतात? आज आपलं लग्न झालं असतं तर बाबांनी माझं कन्यादान केलं असतं."

केतन म्हणाला," मैथिली एवढा विचार करु नकोस नाहीतर तुला त्याचा अजून त्रास होईल. चल एकदा बाबांना बघून घे."

केतनने मैथिलीचा हात धरुन तिला आय सी यू मध्ये नेऊन तिच्या बाबांचा चेहरा दाखवला. बाबांचे पार्थिव बघितल्यावर मैथिली खूप जास्त रडली. केतनने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. केतनने मैथिलीचे बाबा गेल्याचे आपल्या आईला कळवले व आईला मैथिलीच्या घरी जाऊन तिच्या आईला हा निरोप द्यायला सांगितला. मैथिली पुढचा वेळ कोणाशी काहीच बोलली नाही मग तिला तिच्या जबाबदारीची जाणीव झाली, तिने नातेवाईकांना फोन करुन बाबा गेल्याचा निरोप द्यायला सुरुवात केली. सगळया जवळच्या नातेवाईकांना फोन करुन झाल्यावर मैथिलीने राधिकाला फोन लावला. राधिकाने फोन उचलला," हॅलो मैथिली, आज बहिणीची कशी काय आठवण झाली? मला वाटलं होतं की तु माझ्यावर रागावली असशील, मला फोन करणार नाहीस."

मैथिली रडक्या आवाजातच म्हणाली," ताई आपले बाबा आपल्याला सोडून गेले आहेत. शेखर जिजूंची परवानगी असेल तर बाबांच्या अंत्यविधीला ये."

एवढं बोलून मैथिलीने फोन कट केला. निलिमा ताई मैथिलीच्या घरी गेल्या, त्यांनी मैथिलीच्या आईला मैथिलीचे बाबा गेल्याचं हळूवार समजावून सांगितलं. मैथिलीची आई खूप रडायला लागली, रमाने व निलिमा ताईंनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. निलिमा ताईंनी बुटीकमधील बायकांना सुद्धा निरोप कळवल्याने त्याही मैथिलीच्या घरी जमू लागल्या होत्या. त्यांचे जवळपासचे नातेवाईक मैथिलीच्या घरी पोहोचले होते. मैथिली मात्र एकटीच आपल्या केबिनमध्ये बसून होती. डॉ पुजा केबिनमध्ये जाऊन मैथिलीला म्हणाली, "मैथिली डॉ केतनने सांगितलंय की तुझ्या घरी तुझे नातेवाईक आप्तस्वकीय यायला सुरुवात झाली आहे, तुलाही घरी जावं लागेल, अशी किती वेळ इथेच बसून राहणार आहेस? चल पटकन मी तुला घरी सोडते."

यावर मैथिली म्हणाली," पुजा मॅडम मला माझ्या घरी जायची इच्छाच होत नाहीये, आईच्या समोर कसं जाऊ हेच कळत नाहीये. बाबांशिवाय त्या घरात राहणं कसं शक्य होईल?"

डॉ पुजा म्हणाली," मैथिली यावर जास्त विचार करु नकोस, चल आपल्याला घरी जावं लागेल."

डॉ पुजाने मैथिलीला बळजबरी हॉस्पिटल मधून बाहेर काढले आणि तिच्या घरी तिला नेऊन सोडलं. मैथिली घरी गेल्यावर काही वेळातच ambulance बाबांच्या पार्थिवाला घेऊन घरी पोहोचली. मैथिलीच्या आईच्या पायाला प्लास्टर असल्याने तिला जागेवरुन उठता येत नव्हते की चालता येत नव्हते. दोघा तिघांनी मिळून मैथिलीच्या आईला उचलून तिच्या बाबांच्या पार्थिवाजवळ आणले. राधिका ताई व शेखर जिजूही आले होते. राधिका ताई आईच्या गळयात पडून खूप रडली. शेखर जिजू सगळ्यांपासून जरा लांबच उभे होते. राधिका ताई मैथिलीच्या जवळ गेली पण मैथिली तिच्यासोबत फारसं काही बोलली नाही. 

अंत्यविधीची तयारी करण्यात आली होती. सौरभची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला बाबांच्या अंत्यविधीला आणू शकले नाही. सौरभ अंत्यविधीला हजर नसल्याने बाबांच्या पार्थिवाला अग्निडाग कोणी द्यावा हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला होता तेव्हा मैथिलीच्या आईने सांगितले की मैथिली तिच्या बाबांच्या पार्थिवाला अग्निडाग देईल. आईने सांगितलंय म्हटल्यावर मैथिली लगेच तयार झाली मग मैथिलीनेच बाबांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. जमलेल्या बऱ्याच लोकांना एका मुलीने वडिलांच्या चितेला अग्निडाग देणे पटलेले नव्हते पण मैथिलीच्या आईने ठाम निर्णय दिल्यामुळे कोणी काही बोलू शकलं नाही.

©®Dr Supriya Dighe
❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now