मागील भागाचा सारांश: मैथिली घरी एकटी असल्याने तिच्या साठी जेवण घेऊन निलिमा ताई तिच्या घरी जातात. निलिमा ताई मैथिलीला समजावून सांगतात. मैथिलीच्या आई बाबांच्या बसला अपघात होतो. केतन व मैथिली दोघेही अपघात स्थळी पोहोचतात. मैथिलीच्या बाबांना डोक्याला मार लागलेला असल्याने ते बेशुद्ध असतात तर मैथिलीच्या आईचा पाय फ्रॅक्चर झालेला असतो.
आता बघूया पुढे....
केतन डोळे मिटून त्याच्या खुर्चीवर बसलेला असतो. मैथिली त्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याला म्हणाली," केतन काय झालं? तुला बरं वाटतं नाहीये का?"
केतन तिच्याकडे बघत म्हणाला," नाही ग, मी ठीक आहे, डोळे जरा चुरचुरत होते आणि डोकंही चालत नव्हतं म्हणून डोळे मिटून बसलो होतो. तु ठीक आहेस ना?"
"हो मी ठीक आहे" मैथिलीने उत्तर दिले
"सौरभची काही चौकशी केलीस का? हॉस्पिटलमध्ये तो एकटाच असेल" केतनने विचारले
मैथिली म्हणाली," नाही मला त्याचा पेक्षा आई बाबांचे टेन्शन आले आहे, केतन बाबा शुद्धीत कधी येतील? डॉक्टर काय म्हणत आहेत?"
केतन म्हणाला," इथे आई बाबांकडे लक्ष द्यायला आपण आहोत पण सौरभ तिकडे एकटा आहे, त्याची काळजी घेणेही आपलं कर्तव्य आहे ना? बाबा शुद्धीत कधी येतील हे कोणीच सांगू शकत नाहीये. बाबांच्या मेंदूला मार लागलेला आहे, पुढचे चोवीस तास बाबांसाठी अति महत्त्वाचे आहेत, बाबा चोवीस तासात शुद्धीवर नाही आलेत तर ते कोमामध्ये जाऊ शकतात आणि कोमातून पेशंट बाहेर येण्याची शक्यता किती असते? हे तुला माहीतच आहे. मैथिली मला आज ना हतबल झाल्या सारख वाटत आहे, बाबांची परिस्थिती बघितल्या पासून मी इतक्या डॉक्टरांसोबत बोललो आहे, त्यांच्याशी चर्चा केली आहे पण सगळ्यांनी एकच ट्रीटमेंट प्लॅन सांगितला आहे आणि सर्वजण एकच सांगत आहेत की बाबा शुद्धीत कधी येतील ते कोणीच exact सांगू शकत नाही. माझे बाबा गेलेत तेव्हा मी लहान होतो, मला त्यातील फारसं काही कळत नव्हतं पण आता सर्व काही कळत असून सुद्धा मी काहीच करु शकत नाहीये. आपलं माणूस अस ऑपरेशन थिएटर मध्ये बघण्याची सवय नाहीये, मला तर ऑपरेशन थिएटर मध्ये जाण्याची हिम्मत सुद्धा होत नाहीये."
मैथिली म्हणाली," केतन तुझी मनस्थिती अशी असेल तर माझी मनस्थिती कशी असेल? याचा विचार कर, आपल्या आई वडिलांना अस आपल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट बघितल्यावर किती वाईट वाटतं. आई शुद्धीत आल्यावर ती बाबांबद्दल विचारेल, राधिका ताईची चौकशी करेल, मी काय उत्तर देणार आहे हे मलाच माहीत नाही. केतन तुला माहीत आहे मी आजपर्यंत माझ्या आई बाबांना आजारी पडलेलं व आराम करताना कधीच बघितलेलं नाहीये, ते दोघेही सतत कामात दंग असायचे."
केतन पुढे म्हणाला," मैथिली आलेल्या परिस्थितीला तुला धीराने तोंड द्यावे लागेल, तुझ्या या प्रवासात मी तुझ्या सोबत कायम असेल हे लक्षात ठेव. आईला तुला सावराव लागेल, कदाचित त्यांना या सर्वाची कल्पना द्यायला लागू शकते पण त्यांना कधी व कसं सांगायचं हे आपण नंतर ठरवू."
तेवढ्यात एका नर्सने येऊन मैथिलीला सांगितले की तिची आई शुद्धीत आली आहे म्हणून मग मैथिली आईच्या रुममध्ये निघून गेली. आई मैथिलीला बघून म्हणाली," मैथिली तुझे बाबा कुठे आहेत? त्यांना जास्त लागलं आहे का?मला त्यांना बघायचं आहे."
मैथिली म्हणाली," आई तु आधी शांत हो, बाबा ठीक आहेत, ते दुसऱ्या रुममध्ये आहेत, तुला लगेच तिकडे जाता येणार नाही, तुझा पाय फ्रॅक्चर झाल्याने तुझ्या पायाचे ऑपरेशन करावे लागले आहे म्हणून तुला कुठेही जाता येणार नाही."
"मैथिली पण अस मला किती दिवस पडून राहावं लागणार आहे? मी जरी अशी झोपून राहिले तर तुझ्या लग्नाची तयारी कशी करणार? अग दहा दिवसांवर लग्न आलं आहे." आईने विचारले
मैथिली म्हणाली," आई तु लग्नाची चिंता करु नकोस, केतन व म आम्ही दोघांनी आमचं लग्न पुढे ढकलायच अस ठरवलं आहे. तु, बाबा, सौरभ पूर्णपणे बरे झाले की मग आपण धुमधडाक्यात लग्न करुयात."
" अग बाळा पण लग्न ठरलेल्या वेळेत नाही केलं तर ते नाट लागल्या सारखं होईल, आपल्या सर्व नातेवाईकांना तुमच्या लग्नाची तारीख माहीत आहे, ते काय विचार करतील?" आई काळजीने म्हणाली
मैथिली थोडी चिडून म्हणाली," आई प्लिज आत्ता यावेळी तो विचार करु नकोस, मला माझ्या लग्नात माझे आई वडील भाऊ आवश्यक आहेत, नातेवाईक काहीही बोलूदेत आणि नाट वगैरे काही लागत नाही. माझं ज्याच्या सोबत लग्न होणार आहे त्याला मान्य आहे तर मग बाकीचे लोक काही बोलूदेत मला काही फरक पडत नाही. आई मी विनंती करते की तु या सगळ्याचा विचार करत बसू नकोस, तु लवकरात लवकर बरी होऊन घरी येणार आहेस हे लक्षात ठेव आणि तु तुझ्या तब्येतीची काळजी घे."
आई म्हणाली," बरं, राधिका, माही कुठे आहेत? सौरभला फोन केला होतास का?"
मैथिली म्हणाली," राधिका ताई व माहीला जिजू त्यांच्या घरी घेऊन आले आहेत. सौरभला मी थोड्या वेळात फोन करणार आहे. आता तु जास्त काही बोलणार नाहीयेस, मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते."
मैथिली रुमच्या बाहेर आल्यावर तिला कोणीतरी आवाज दिला म्हणून तिने मागे वळून पाहिले व ती म्हणाली," सुरेखा काकू तुम्ही आणि इथे?"
" निलिमा ताईंकडून आई बाबांचा अपघात झाल्याचे समजले तर म्हटलं की भारती ताईंना डबा घेऊन जावा म्हणून आले." सुरेखा काकूंनी उत्तर दिले
मैथिली म्हणाली," काकू तुम्ही का त्रास घेत आहात? मी व्यवस्था केली असती."
सुरेखा काकू म्हणाल्या," हे बघ तु भारती ताईंच्या जेवणाची काळजी करु नकोस, आम्ही बुटीकमधील सर्व बायकांनी ठरवले आहे की रोज सकाळ संध्याकाळ आम्ही एकेक जण भारती ताईंसाठी डबा घेऊन येणार आहेत, त्या निमित्ताने त्यांची भेटही होईल आणि आमच्या गप्पाही होतील, तेवढंच भारती ताईंना एकटं वाटणार नाही. अग आम्ही इतक्या वर्षांपासून एकत्र काम करत आहोत, आम्ही एकमेकींच्या सुख दुःखात कायम राहतो."
मैथिली म्हणाली," काकू तुम्ही माझं ऐकणार नाहीत तेव्हा मी काही तुम्हाला समजावत नाही पण एक लक्षात ठेवा की आईला राधिका ताई व बाबांबद्दल खरं काही माहीत नाहीये, तिच्याशी बोलताना तेवढं जपून बोलत जा."
सुरेखा काकूंनी मान हलवून होकार दिला व त्या मैथिलीच्या आईला भेटण्यासाठी तिच्या रुममध्ये गेल्या. मैथिलीने सौरभला फोन करुन त्याच्या तब्येतीची चौकशी केली, ती सौरभच्या डॉक्टरांसोबत फोनवर बोलली तेव्हा ते म्हणाले की त्याच्या सोबत इकडे कोणी थांबू शकत नसले तर त्याला तुम्ही नाशिकला घेऊन जा. केतन सोबत चर्चा करुन मैथिलीने नाशिक मधील व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क केला. बाबा शुद्धीत यावे म्हणून मैथिली देवाकडे प्रार्थना करत होती. एकाच वेळी मैथिली अनेक जबाबदाऱ्या निभावण्यात व्यस्त होती.
मैथिली हॉस्पिटलच्या रिसेप्शन जवळ उभी असताना राधिका ताईला डिस्चार्ज दिला असल्याने तिला शेखर जिजू घरी घेऊन चाललेले असतात. दोघींची नजरानजर होते, मैथिली व राधिका दोघींना खूप भरुन आले होते, मैथिलीला आपल्या मोठ्या बहिणीला खूप काही सांगायचे होते आणि राधिकाला सुद्धा आपल्या लहान बहिणीला खूप काही विचारायचे होते.पण शेखर असताना दोघींनी एकमेकींशी बोलणं टाळलं. मैथिलीच्या डोळयात पाणी येत असल्याने तिने आपले तोंड राधिका ताईच्या समोरुन विरुद्ध दिशेला केले व ती तिथून निघून गेली. आज खऱ्या अर्थाने मैथिलीला तिच्या बहिणीची गरज होती, तिच्या आधाराची आवश्यकता होती पण शेखर जिजूंनी करुन घेतलेल्या गैरसमजामुळे दोन बहिणींची ताटातूट झाली होती.
मैथिलीचे बाबा शुद्धीत येतील की कोमात जातील हे बघूया पुढील भागात....
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा