Aug 16, 2022
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ६३

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ६३
मागील भागाचा सारांश: राधिका ताईच्या बाळाला वाचवण्यात यश आले नाही. शेखरने या सर्वासाठी मैथिली व तिच्या घरच्यांना दोषी मानले होते. सौरभला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे लागणार असल्याने याबाबत मैथिलीच्या बाबांनी केतनकडे चौकशी केली.
आता बघूया पुढे....
मैथिलीला घरी पोहोचल्यावर तिला शेजारच्या काकूंकडून समजले की शेखर येऊन माहीला आपल्या सोबत घेऊन गेला होता. घरात मैथिली एकटीच असते, तिला खूप रडायला येते, ज्या घरात कालपर्यंत लग्नाच्या तयारीचा जल्लोष सुरु होता, आज मात्र त्या घरात भयानक शांतता असते. मैथिली आपल्या विचारात गुंग असतानाच दरवाजा वरची बेल वाजते, कोण आलंय हे बघण्यासाठी मैथिली दरवाजा उघडते तर निलिमा ताई आलेल्या असतात. निलिमा ताईंना बघून मैथिली म्हणाली," आई तुम्ही यावेळी इथे कशा काय आल्या?"
निलिमा ताई घरात येत म्हणाल्या," जे काही घडलं आहे ते केतनने मला सांगितलं, केतननेच मला इकडे पाठवलं आहे, सकाळपासून तु काहीच खाल्लेले नसेल याची कल्पना मला आहे, मी जेवणाचा डबा घेऊन आले आहे, तु पहिले खाऊन घे, मग आपण उर्वरीत विषयावर बोलू."
मैथिली म्हणाली," आई मला जेवण करण्याची अजिबात इच्छा नाहीये, आई सौरभच एक टेन्शन डोक्याला कमी होतं का त्यात आता राधिका ताईचं असं झालं, शेखर जिजूंना तर वाटतंय की हे सगळं आमच्या हलगर्जीपणा मुळे झालं आहे."
बोलता बोलता मैथिलीला भरून आलं होतं. निलिमा ताई मैथिलीला समजावण्याच्या सुरात म्हणाल्या," मैथिली बाळा संकट अशी सांगून येत नाहीत, ती कधीही आणि केव्हाही येऊ शकतात, आपण फक्त त्या संकटांना धीराने तोंड द्यायचं असतं आणि हे बघ आता सध्या तुच तुझ्या आई बाबांचा आधार आहेस, तु जर जेवली नाहीस तर तुला अशक्तपणा येईल व तु आजारी पडशील, मग आई बाबांना तुझं टेन्शन येईल. पहिले दोन घास खाऊन घे."
निलिमा ताईंनी बळजबरी मैथिलीला जेवण करण्यास भाग पाडले. मैथिलीचे जेवण झाल्यावर निलिमा ताई म्हणाल्या," आई बाबा कधी येणार आहेत? तुला भीती वाटत असेल तर मी तुझ्या सोबत इथे थांबू का? नाहीतर तु माझ्या सोबत आपल्या घरी चल."
मैथिली म्हणाली," नको आई, मी इथेच थांबते. तुम्ही घरी जा. केतनही दमून घरी येईल, तुम्ही घरात नसाल तर त्याला करमणार नाही. आई बाबा रात्री बसणार आहेत, पहाटेपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे."
निलिमा ताई म्हणाल्या," बरं ठीक आहे, मी थोड्या वेळात जाईल आणि बाळा तु ह्या सर्वाचा जास्त विचार करु नकोस. राधिकाचं बाळ गेलं यात तुझी काहीच चूक नाहीये, शेखर आता सध्या रागात असेल म्हणून ते अस बोलत आहेत. तु त्यांना काही बोलायला जाऊ नकोस कारण ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतील, आई बाबा आले की त्यांना बोलायला सांगशील उगाच तुझ्यात आणि शेखरमध्ये वाद व्हायला नको."
अश्या रीतीने मैथिली व निलिमा ताईंमध्ये गप्पा रंगल्या होत्या. निलिमा ताई मैथिलीची समजूत घालत होत्या. रात्री अकराच्या सुमारास निलिमा ताई आपल्या घरी निघून गेल्या. मैथिलीला रात्री उशिरा झोप लागली. पहाटे चार साडेचारच्या सुमारास मैथिलीचा फोन वाजला, एवढ्या पहाटे कोणाचा फोन असेल यामुळे मैथिली जरा घाबरलीच, मैथिलीने घाबरत घाबरत फोन उचलला व ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली," हॅलो कोण बोलतंय?"
समोरील माणसाने जे काही सांगितले ते ऐकून मैथिलीच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता, पुढचे काही सेकंद मैथिलीच्या डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं झालं होतं, तिने हिम्मत करत केतनला फोन लावला, केतनने फोन उचलल्यावर मैथिली रडतच होती. केतन म्हणाला," मैथिली काय झालंय? तु रडत का आहेस? तु काही सांगितलंच नाहीतर मला कस कळेल, तु काही सांगणार आहेस की मी तुझ्या घरी येऊ?"
मैथिली शांत होण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "केतन आई बाबा ज्या बसमध्ये येत होते, त्या बसला सिन्नर घाटात अपघात झाला आहे, त्यांना तिथे जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे."
यावर केतन म्हणाला," काय? बरं ऐक मी पुढच्या पाच मिनिटांत घरातून निघतो, तु तयार रहा, आपण लगेच तिकडे जाऊयात आणि तु थोडी शांत रहा, आई बाबांना काही होणार नाही."
मैथिलीचा फोन झाल्या बरोबर केतन आईला सांगून मैथिलीच्या घरी तिला घेण्यासाठी गेला. मैथिली तयारी करुन बसली होती. केतन व मैथिली अपघात स्थळी पोहोचले, तेथून सगळ्या पेशन्ट्स ला जिथे ऍडमिट केलं आहे तेथील पत्ता कळला. केतन व मैथिली हॉस्पिटलला पोहोचल्यावर त्यांना कळाले की मैथिलीच्या बाबांच्या डोक्याला मार लागलेला असून ते बेशुद्ध आहेत तर मैथिलीच्या आईचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिच्या पायाचे त्वरित ऑपरेशन करणे आवश्यक आहे. त्या हॉस्पिटल मधील काही डॉक्टर केतनच्या ओळखीचे असल्याने केतनने त्यांच्या सोबत चर्चा करुन मैथिलीच्या आई बाबांच्या पुढच्या ट्रीटमेंट चा प्लॅन बनवला आणि पुढच्या काही तासांत केतनने मैथिलीच्या आई बाबांना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. मैथिलीच्या आईच्या पायाचे लगेच ऑपरेशन करण्यात आले तर मैथिलीच्या बाबांवर आई सी यू मध्ये उपचार सुरु होते.
मैथिलीच्या बाबांवर उपचार करण्यासाठी केतनने नाशिक मधील बेस्ट न्यूरॉलॉजिस्ट ला बोलावून घेतले होते तसेच पुणे मुंबई येथील डॉक्टरांच्या संपर्कात केतन होता, वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन केतन घेत होता. आजवर जे काही नाव,ओळख केतनने कमावली होती त्याचा वापर करुन केतन मैथिलीच्या बाबांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. 
 मैथिली तिच्या केबिनमध्ये डोक्याला हात लावून बसली होती. डॉ पुजा मैथिलीसाठी चहा घेऊन तिच्या केबिनमध्ये आली व म्हणाली, "मैथिली चहा पिऊन घे, जरा बरं वाटेल."
मैथिली रडक्या आवाजात म्हणाली," नको पुजा मॅडम माझ्या घश्याच्या खाली काहीच उतरणार नाही, माझ्या घरातील मी एकटी सोडून सर्वजण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, मला काहीच सुचत नाहीये, बाबा बेशुद्ध आहेत, त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे, मनात नको नको ते विचार येत आहेत."
डॉ पुजा म्हणाली," मैथिली प्लिज, तु जर अशी रडत बसली तर कस होईल? आणि निगेटिव्ह विचार मनात आणायचे नाहीयेत. आई थोड्या वेळातच शुद्धीत येईल आणि बाबांनाही काहीच होणार नाहीये. राधिका ताई पूर्णपणे बरी आहे, सौरभ पण बरा असेल. तु जर स्वतःला सांभाळले नाही तर आई शेजारच्या बेडवर तुला झोपावे लागेल मग आईची काळजी कोण घेईल? मैथिली मी तुझी मनस्थिती समजू शकतो आणि तु एकटी नाहीयेस. केतन, मी आम्ही तुझ्या सोबत आहोत."
" तुम्ही आई बाबांच्या अपघाता बद्दल राधिका ताईला काही सांगितलं का?" मैथिलीने विचारलं
" तुझे शेखर जिजू म्हणाले की राधिकाला यातील काही कळू देऊ नका, मग मीही काही बोलले नाही, जस्ट चेकअप करुन निघून आले." डॉ पुजाने उत्तर दिले.
मैथिली म्हणाली," शेखर जिजू असे का वागत आहेत? ते असे नाहीयेत. केतन इतका धावपळ करत आहे आणि हे साधा मानसिक आधार पण देऊ शकत नाही."
डॉ पुजा म्हणाली," मैथिली यावर मी काय बोलू शकते, तु केतन सोबत धीराने उभी रहा, ते त्यांच्या परीने सर्व काही करत आहेत पण जर तु अशी नाराज दिसली तर त्यांच्या मनाला काय वाटेल याचा विचार कर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आई शुद्धीत आल्यावर तिला राधिका ताईबद्दल काहीच खरं सांगू नकोस, आधीच त्या सौरभच्या टेन्शनमध्ये आहेत , अपघाता मुळे त्या अजून खचलेल्या असतील आणि राधिका ताईबद्दल समजलं तर माहीत नाही काय होईल. पुढचे काही दिवस आई सोबत खोटं बोल. काही फरक पडत नाही आणि शेखर जिजूंच्या वागण्याचा काही विचार करु नकोस."
मैथिली म्हणाली," हम्मम, मला केतनला आधार द्यावा लागेल आणि प्लिज माझी मैत्रीण म्हणून एक काम कराल का?"
"हो करते ना, काय करायचं आहे?" डॉ पुजाने विचारलं
मैथिली म्हणाली," मी जर पुन्हा खचले तर माझ्या जबाबदारीची जाणीव मला करुन द्या आणि लग्नासाठी मी पार्लर वाली व मेहंदी वाली बुक केली होती त्यांना लग्न कॅन्सल झालं असं सांगून टाका, माझ्या कडून ते होणार नाही, एवढी हिम्मत माझ्यात नाहीये आणि परिस्थिती बघता लग्न ठरलेल्या दिवशी होईल असे मला वाटत नाही." मैथिलीला हे बोलता बोलता भरुन आले होते. ज्या लग्नाचे स्वप्न गेल्या कित्येक दिवसांपासून ती बघत होती पण ते त्या वेळेवर होणार नाही याचा त्रास मैथिलीला किती होत असेल हे तिलाच माहीत.
©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now