Login

एक आगळेवेगळे लग्न भाग ६१

Another Tragedy Comes In Maithili's Life

मागील भागाचा सारांश: मैथिलीच्या बाबांनी सविस्तर चर्चा करता यावी म्हणून सौरभला नाशिकला बोलावले होते पण सौरभने नवी नोकरी आहे लगेच सुट्टी भेटणार नाही, मैथिलीच्या लग्नासाठी आठ दिवस सुट्टी घेतल्याचे सांगून येणे टाळले.मैथिलीच्या बाबांनाही वाटले की मैथिलीचं लग्न पार पडूदेत मग आपण सौरभ सोबत यावर बोलू. केतन व मैथिली यांचे prewedding फोटोशूट पार पडते. मैथिली व केतनच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु असते. लग्न पंधरा दिवसांवर येऊन ठेपले असताना मैथिलीला सौरभचा फोन येतो, तो तिच्याकडे वीस हजार रुपयांची मागणी करतो, मैथिलीने पैसे द्यायला नकार दिला असता तो तिला सांगतो की मी जर आत्ता पैसे दिले नाही तर ते लोक येऊन मला मारतील. मैथिलीचा सौरभच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही, ती त्याला सांगते की तु लगेच नाशिकच्या बसमध्ये बस आणि इकडे निघून ये, बघू तुला कोण मारायला येत ते.

आता बघूया पुढे....

सौरभचा विचार करत करत मैथिली घरात गेली तर शेखर जिजू राधिका ताईला व माहीला सोडवायला आलेले असते, ते मैथिलीला बघून म्हणाले," काय नवरी बाई लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? फक्त डॉ केतन सोबत फोनवर बोलत बसू नकोस, आमच्याकडे जरा लक्ष द्या, काही दिवसांनी तुला केतनच्या घरीच रहायला जायचं आहे."

शेखर जिजूंना वाटले होते की केतनचा फोन असेल म्हणून मैथिली दुसरीकडे जाऊन फोनवर बोलत होती.

मैथिली म्हणाली," जिजू केतनचा फोन नव्हता, माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता, तिला लग्नाला यायला जमणार नसल्याने तिने मला फोन केला होता" मैथिलीने तात्पुरतं खोटं बोलून तो विषय थांबवला होता.

शेखर जिजू म्हणाले," बरं मैथिली मी राधिका व माहीला इथे सोडून जातो आहे, तुला तुझ्या ताईची कमी भासायला नको. पण तिची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, तिची स्थिती जरा नाजूक आहे. राधिकाची मानसिक स्थिती नीट राहील याची काळजी घ्या. गोळ्या औषधे वेळेवर घ्यायला सांगशील,ती कधीकधी विसरुन जाते. तु डॉक्टर असल्याने तुला या सर्वाची कल्पना असेलच पण तुला याची जाणीव करुन देणे माझे काम होते. घरातील कुठलीही तणावाची बातमी राधिका पर्यंत पोहोचू देऊ नका."

मैथिली म्हणाली," हो जिजू, मी ताईची काळजी घेईन."

मैथिली मनातल्या मनात म्हणाली," माझं लग्न आहे आणि माझे भाऊ बहीण बघा, एकजण वीस हजार रुपये मागत आहे आणि बहिणीचा नवरा मला तिची काळजी घ्यावी लागणार आहे याची जाणीव करुन देत आहे. जिजूंचा इतका राग आला होता की त्यांना म्हणावं वाटलं, तुमच्या बायकोला घेऊन जा, माझं लग्न ती नसली तरी होईल पण मी अस नाही बोलू शकत कारण माझ्यावर तसे संस्कार झालेले नाहीत. लहानपणापासून आईने एकच सांगितले की मैथिली बाळा सगळ्यांचा आदर करायचा, कोणाला उलटून बोलायचे नाही, कोणी कसेही वागू, काहीही बोलू आपण व्यवस्थितच वागायचे. आपण आपली पायरी सोडायची नाही. मग माझ्या मनाला कितीही यातना झाल्या तरी त्या मी सहन करायच्या."

शेखर जिजू निघून गेले होते. जेवण झाल्यावर राधिका ताई आराम करत एका रुममध्ये बसलेली होती, मैथिलीने जाऊन तिला विचारले," ताई गोळ्या घेतल्या का? तुला खायला काही पाहिजे आहे का? तुला बरं वाटत आहे ना? तुला काही हवं असेल तर मला निःसंकोचपणे सांग."

यावर राधिका म्हणाली," मैथिली हे काय होतं? तु एवढे प्रश्न का विचारत आहेस?"

" शेखर जिजूंचा आदेश आहे, तो पाळावा तर लागेल ना. त्यांचा फोन आला तर मी तुझ्याकडे लक्ष देत आहे असं सांगायला विसरु नकोस." मैथिलीने अतिशय शांतपणे उत्तर दिले.

राधिका म्हणाली," तुला शेखरचा स्वभाव माहीत नाही का? कधी कधी ते जरा अति करतात. मैथिली तुला माझ्या सोबत काही बोलायचे आहे का?"

मैथिली म्हणाली," नाही,पण तुला अस का वाटत आहे?"

राधिका हसून म्हणाली," मैथिली मी तुझी मोठी बहीण आहे, तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगत आहे. तुला शेखरच्या बोलण्याचा राग आला आहे का? की सौरभचं काही टेन्शन आहे का? सांग ना काय झालं?"

मैथिली म्हणाली," ताई वेळ अशी आहे ना की मी तुला काहीच सांगू शकत नाहीये. माझ्या मनात काय चालू आहे ते फक्त मी केतनलाच सांगू शकते, आता काही गोष्टी मी त्यालाही सांगू शकत नाही पण ठीक आहे. तु माझा विचार करु नकोस."

" मैथिली तुझ्या लग्नाच्या खरेदीत मी तुझी मदत करु शकले नाही याचं मला फार वाईट वाटतं आहे. तुला माहीत आहे मैथिली मला स्वतःला तुला लग्नासाठी तयार करायचे होते, आजपर्यंत मी एवढया नवऱ्या मुलींना नटवलं आहे पण बघ ना माझं दुर्दैव असं आहे की मी स्वतःच्या बहिणीला नाही नटवू शकले." बोलता बोलता राधिकाच्या डोळ्यात पाणी आले होते. मैथिली पुढे काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला, मैथिली रुमच्या बाहेर जात असताना म्हणाली," ताई अशी इमोशनल होऊ नकोस नाहीतर मलाही रडायला येईल, केतनचा फोन आला आहे, मी आलेच."

मैथिली निघून गेल्यावर राधिका मनातल्या मनात म्हणाली," मैथिली तु कितीही नाही म्हणत असली तरी तुला शेखरच्या बोलण्याचा राग आला आहे याची कल्पना मला आहे, आपल्या लग्नात आपल्या एका बहिणीची मदत होत नाहीये याचाही तुला राग आला असेल. सौरभचं काय चालू आहे? हे तुला आणि त्यालाच माहीत. देवा सध्याची परिस्थिती कशीही असो पण माझ्या मैथिलीला नेहमी सुखात ठेव, तिच्या आयुष्यात जास्त संघर्ष येऊ देऊ नकोस."

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा हॉल मध्ये चहा पिता पिता पेपर वाचत बसलेले होते तर आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. राधिका चहा पित होती तर मैथिली माहीला चोकोज खाऊ घालत होती. जे ते आपल्या कामात व्यस्त होतं, तितक्यात बाबांचा फोन वाजला. 

"एवढ्या सकाळी माझी कोणी आठवण काढली असेल बरं" बाबा फोन घेता घेता पुटपुटले.

"हॅलो कोण बोलतंय?" बाबांनी विचारलं

समोरुन काय बोलले ते कोणाला कळाले नाही पण इकडून बाबा म्हणाले," हो सौरभ पाटील माझाच मुलगा आहे."

समोरील व्यक्ती बराच वेळ बोलत होती. बाबा खूप टेन्शनमध्ये वाटत होते, घरातील सर्वांचे लक्ष त्यांच्याकडेच होते, त्यांच्या हातातून पेपर खाली गळून पडला होता. समोरील व्यक्ती नक्कीच काहीतरी गंभीर बोलत आहे असे बाबांच्या चेहऱ्यावरुन वाटत होते.

" हो मी तिकडे येण्यासाठी लगेच निघतो" एवढं बोलून बाबांनी फोन ठेवला व ते खुर्चीत बसले.

" बाबा काय झालं? कोणाचा फोन होता?" मैथिलीने विचारलं

बाबा म्हणाले," सौरभच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांचा फोन होता. काल रात्री सौरभला एका ड्रग्ज रॅकेटच्या रेडमध्ये पकडलं होतं, सौरभला काही लोकांनी खूप मारले होते, सौरभ जखमी अवस्थेत पोलिसांना सापडला होता. सौरभ आपल्या बरोबर खोटं बोलत होता, त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षाच दिलेली नव्हती तर तो इंजिनिअर तरी कुठून झाला असेल. निकालही खोटा आणि ती नोकरीही खोटी. प्रिन्सिपल सरांनी मला व आईला त्वरित पुण्याला बोलावलं आहे. आम्ही तिकडून जाऊन येतो, येताना सोबत सौरभला घेऊन येतो. तुम्ही लग्नाची तयारी थांबवू नका. तु नाराज होऊ नकोस, सौरभमुळे मी तुझ्या लग्नात विघ्न येऊ देणार नाही."

हे ऐकून आईचे हातपाय गळाले होते, बाबाही आतून खचले होते पण बाहेरुन नॉर्मल असल्या सारखे दाखवत होते. मैथिली व राधिका काहीच बोलल्या नाहीत. पुढील दहा ते पंधरा मिनिटांत आई बाबा घराबाहेर पडले. आई बाबा गेल्यावर मैथिली राधिकाच्या डोळ्यातील पाणी बघून म्हणाली," राधिका ताई सर्व काही ठीक होईल, तु टेन्शन घेऊ नकोस. तु रुममध्ये जाऊन जरा आराम कर."

तसं बघायला गेलं तर मैथिलीला सुद्धा खूप टेन्शन आले होते पण ती स्वतःला समजावत होती. राधिका रुममध्ये जाण्यासाठी उठली, पुढे दोन पावलं चालत जाऊन ती चक्कर येऊन खाली कोसळली. मैथिली राधिका ताईच्या नावाने जोरात ओरडली व तिने तिच्याकडे धाव घेतली. राधिका ताईला घाम सुटलेला होता, ती बेशुद्ध अवस्थेत होती. मैथिली तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण व्यर्थ, शेवटी लगेच तिने केतनला फोन लावून हॉस्पिटलची ambulance बोलावून घेतली. 

माहीला शेजारच्या घरी ठेऊन मैथिली राधिकाला हॉस्पिटलला घेऊन गेली, हे पोहोचेपर्यंत केतनने डॉ पुजाला सांगून सर्व तयारी करुन ठेवली होती. हॉस्पिटलला पोहोचल्यावर राधिकाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले. आत जायची हिंमत होत नसल्याने मैथिली बाहेरच थांबली होती. मैथिलीने शेखर जिजूंना फोन लावून हॉस्पिटलला यायला सांगितले होते. मैथिलीला आधार देण्यासाठी केतन तिच्या शेजारी जाऊन बसला व तिचा हात हातात घेऊन म्हणाला," मैथिली टेन्शन घेऊ नकोस, राधिका ताई बरी असेल. पण मला सांग घरी काही घडलं होत का? आणि आई बाबा कुठे आहेत?"

मैथिलीने इतंभूत कथा केतनला सांगितली व पुढे ती म्हणाली," केतन राधिका ताईचं बाळ तर वाचेल ना?"

" मैथिली मी खोटी आशा तुला दाखवू शकत नाही, बाळ वाचण्याची शक्यता खूप कमी आहे, राधिका ताईचा ब्लड प्रेशर खूप वाढलेला असल्याने तिला घाम येत होता आणि अश्या केसमध्ये बाळ वाचण्याची शक्यता नसते." केटनने उत्तर दिले.

मैथिली प्रचंड घाबरलेली होती. बाळ वाचलं नाही तर शेखर जिजू खूप चिडतील आणि त्यांना समजवायला आई बाबाही नव्हते. बिचारी मैथिली एकीकडे भावाचं टेन्शन तर दुसरीकडे बहिणीच. मैथिली वेगळ्याच कात्रीत सापडली होती.

राधिकाचं बाळ वाचेल का? सौरभ आई बाबांबरोबर नाशिकला परत येईल का? बघूया पुढील भागात


....

©®Dr Supriya Dighe









🎭 Series Post

View all