Aug 09, 2022
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ६०

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ६०

मागील भागाचा सारांश: सौरभचे खरे प्रताप आई बाबांना मैथिली कडून कळाल्याने ते खूप खचतात, त्यांना समजावून सांगण्यासाठी केतन त्यांच्या घरी येतो. केतन आई बाबांना सौरभच्या विषयापासून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो, तो त्यांना सांगतो की सौरभ व्यतिरिक्त तुम्हाला अजून दोन मुली आहेत ज्यांना तुमची यावेळी गरज आहे म्हणून फक्त सौरभचा विचार न करता या दोघींचाही विचार करा. केतनने समजवल्यावर आई बाबांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या.

आता बघूया पुढे....

केतन व आई बाबांमधील चर्चा संपल्यावर मैथिली नाश्त्यासाठी केलेले पोहे घेऊन आली. केतनने आग्रह करुन मैथिलीच्या आई बाबांना पोहे खाण्यास भाग पाडले. पोहे खाऊन झाल्यावर केतन मैथिलीच्या बाबांना म्हणाला, "बाबा तुमचं आणि सौरभचं बोलणं झालं की मला कळवा. मी आता निघतो, हॉस्पिटलला पोहोचायला उशीर व्हायला नको. मालकालाच उशीर झाला तर स्टाफ उशीरा येण्याचे प्रयत्न करेल आणि मला ते परवडणार नाही. मैथिली तुही घरातील कामे पटकन आवरुन हॉस्पिटलला ये."

मैथिलीचे बाबा म्हणाले," केतनराव तुमचे आभार मी कसे मानू हेच कळत नाहीये."

केतन म्हणाला,"काका प्लिज नको ना. मी माझं कर्तव्य केलं. तुम्ही असे टेन्शनमध्ये राहिल्यावर मैथिलीला चैन पडेल का आणि तिच्या चेहऱ्यावर जर हसू नसेल तर ते मला आवडणार नाही. मैथिलीला खुश ठेवणं हे मी माझं पहिलं कर्तव्य समजतो. काकू दुपारी मी व मैथिली हॉस्पिटल मधूनच थोडं खरेदीला जाणार आहे, येत्या तीन चार दिवसांत prewedding फोटोज काढायचे आहेत, त्यासाठी तयारी करायला हवी."

मैथिलीच्या आईने मान हलवून होकार दिला. केतन हॉस्पिटलमध्ये निघून गेला. केतन गेल्यावर मैथिली बाबांजवळ गेली व म्हणाली, "बाबा सौरभ बद्दल ऐकून तुमच्या मनात मोठं वादळ निर्माण झालेल असेल याची कल्पना मला आहे. पण बाबा हेच बघा देव एका हाताने संकट निर्माण जरी करत असेल पण दुसऱ्याच हाताने संकटांना सामोरे जाण्यासाठी आपल्या सोबत माणसंही उभे करतो. सौरभ बद्दल विचार करुन मनात कुढत बसू नका. सौरभला फोन करुन घरी बोलावून घ्या नाहीतर तुम्ही तिकडे जाऊन त्याच्याशी बोला पण अस विचार करत बसू नका, त्याने तुम्हाला जास्त त्रास होईल.बाबा काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या नशिबावर सोडून द्यावा लागतात. आपल्या हातात एवढंच आहे की आपल्या समोर जी परिस्थिती उभी राहिली आहे, त्याला धीराने सामोरे जाणे."

बाबांनी कौतुकाने मैथिलीकडे बघितलं, तिच्या डोक्यावरुन हात फिरवत ते म्हणाले," भारती बघितलंस आपली मुलगी किती समजदार झाली आहे. दररोजच्या धावपळीत मुलगी कधी आणि कशी मोठी झाली हे समजलेच नाही ग. आपण मुलांना संस्कार देण्यात कमी पडलो नाही याचे उदाहरण मैथिली आहे, सौरभला आपले संस्कार घेता आले नाही त्यात आपला दोष नाहीये. आपण फक्त म्हणतो की केतन रावांसारखा जावई नशिबाने मिळतो पण अग मैथिली सारखी मुलगी सुद्धा नशिबानेच मिळते. आपली मुलगी इतकी चांगली आहे म्हणून तिला केतन रावांसारखा जोडीदार भेटला आहे."

आई व बाबा दोघांचे डोळे भरुन आले होते. वातावरण निवळण्यासाठी मैथिली म्हणाली, "चला मी पटकन आवरुन हॉस्पिटलला जायला निघते, मला उशीर झाला तर ज्या जावयाचं तुम्ही इतकं कौतुक करत आहात ना तो जावई मला नोकरीवरुन काढून टाकेल."

मैथिलीच्या या बोलण्यावर आई बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं. मैथिलीने पटपट आपलं आवरलं व ती हॉस्पिटलला निघून गेली. हॉस्पिटल मधील काम आवरल्यावर केतन व मैथिली दोघे शॉपिंगला गेले. चार ते पाच तास सतत दोघे ह्या दुकानातून त्या दुकानात खरेदी करत फिरत होते. त्यामुळे दोघांना घरी जायला उशीर झाला. केतन मैथिलीला सोडण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा मैथिलीच्या बाबांनी त्याला जेवणासाठी आग्रह करुन थांबवून घेतले. मैथिलीच्या बाबांनी खूप आग्रह केल्यामुळे केतन नाही म्हणू शकला नाही. जेवण करता करता केतन मैथिलीच्या बाबांमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. जेवण झाल्यावर केतन घरी जायला निघाला तेव्हा मैथिलीचे बाबा म्हणाले, "केतनराव आज दुपारी मी सौरभला फोन केला होता, त्याला घरी येण्याबद्दल बोललो तर तो म्हणाला की आत्ताच नवीन कंपनी जॉईन केली आहे लगेच घरी येता येणार नाही, तुमच्या लग्नाच्या वेळेस आठ दिवसांची सुट्टी त्याने काढलेली आहे, तेव्हाच येईल असं तो म्हणतोय आणि मी पुण्याला येण्या बद्दल बोललो तर तो म्हटला की दिदीच्या लग्नाची तयारी व्यवस्थित करा, आपली भेट होतच राहील. आता मी काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे."

केतन म्हणाला," काका तुम्हाला सौरभचं बोलणं नॉर्मल वाटत असेल तर लग्नानंतर त्याच्याशी बोललात तरी चालेल. सौरभ बद्दल मी काही अंदाज बांधू शकत नाही. उगाच असंही व्हायला नको की आपण अति घाई करायला जाऊ आणि त्याचे परिणाम उलटेच होतील."

मैथिलीचे बाबा म्हणाले," हो माझ्याही मनात तीच भीती होती. लग्नानंतरच सौरभ सोबत बोलावं असा मी विचार करतोय. उगाच लग्नाच्या आधी त्याच्याशी बोलायचं आणि त्याने भलतेच पाऊल उचलले तर लग्नात विघ्न यायचे,मला तसे व्हायला नको."

केतन म्हणाला," काका तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. मी निघतो"

मैथिली पुढे म्हणाली," केतन दोन मिनिटं थांब, तु माझ्या आई बाबांना तुझ्या आई बाबांसारखं मानतोस बरोबर ना? मी तुझ्या आईला आई म्हणावं असा तुझा आग्रह होता ना, मग तु माझ्या आई बाबांना काका काकू का म्हणतोस? तु त्यांना आई बाबा म्हणूच शकतोस ना?"

केतन हसून म्हणाला," मी तुझ्या आई बाबांना माझ्या आई बाबांसारखंच मानतो त्यात काही शंकांचं नाहीये पण तोंडात आई बाबा पटकन येत नाही. इथून पुढे मी त्यांना आई बाबाचं म्हणत जाईल, मग तर ठीक आहे ना?"

मैथिलीने मान हलवून होकार दर्शवला. केतन त्याच्या घरी निघून गेला. दोन तीन दिवसांनी केतन व मैथिलीचे prewedding फोटोशूट झाले. केतन व मैथिलीने खूप एन्जॉय केला. केतन व मैथिली या दोघांनी मिळून दोघांची कॉमन song playlist काढली व ते songs फोटोशूट मध्ये वापरायला सांगितले. फोटोशूट करताना केतनच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण जसे हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो तसा सिन आपण शूट करु म्हणजे त्यावेळी आपल्या भावना खऱ्या वाटतील आणि एक मस्त मेमरी म्हणून ते फोटोज, व्हिडिओ आपल्याकडे राहील. मैथिलीला केतनची आयडिया आवडल्याने तिनेही होकार दर्शविला. त्याचप्रमाणे त्यांच फोटोशूट हॉस्पिटलमध्ये झालं. 

मैथिली यात राधिकाला खूप मिस करत होती. मैथिलीला लग्नाची शॉपिंग करताना राधिका तिच्या सोबत असणे अपेक्षित होते पण राधिका प्रेग्नंट असल्याने ती मैथिलीची काहीच मदत करु शकत नव्हती. केतनला आपल्या आईसाठी येवल्या वरुन पैठणी घ्यायची असते, पैठणी घेण्यासाठी जात असताना केतन मैथिली व तिच्या आईलाही सोबत घरुन जातो. केतनने आपल्या आईसोबतच मैथिलीच्या आईलाही पैठणी घेऊन दिली. लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी जवळजवळ पूर्ण झाली होती. लग्न ऐन पंधरा दिवसांवर आले होते. मैथिली व केतनच्या घरी लग्नाच्या कामांची धावपळ सुरु होती. अशातच एके दिवशी संध्याकाळी मैथिलीला सौरभचा फोन आला. सौरभ व मैथिली मध्ये गेल्या काही दिवसांत बोलणं झालं नव्हतं म्हणून आज सौरभचा फोन कसा काय आला? हा प्रश्न मैथिलीच्या मनात आला होता. मैथिलीने फोन उचलला तर समोरुन सौरभ भेदरलेल्या आवाजात म्हणाला," हॅलो दीदी मला अर्जंट वीस हजार रुपये पाहिजे होते, मी जर पैसे दिले नाही तर ते लोकं मला मारुन टाकतील."

मैथिली पुढे म्हणाली," हॅलो सौरभ तु काय बोलतो आहेस? कसले पैसे आणि कोण लोकं तुला मारुन टाकतील. तु काय बोलतो आहेस? मला काहीच कळत नाहीये, जरा उलगडून सांगशील का?"

सौरभ म्हणाला," दीदी मी घरी आल्यावर तुला निवांत सगळं सांगेन पण आत्ता मला वीस हजार रुपये पाठव ना प्लिज."

मैथिली थोडी चिडून म्हणाली," सौरभ अरे पंधरा दिवसांवर माझं लग्न येऊन ठेपलं आहे, इथे येऊन आम्हाला मदत करायची तर ते काहीच नाही. मी सध्या कुठल्या गोंधळात आहे हे समजून न घेता तुला पैसे पाहिजे आहे. माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझी जी काही सेव्हिंग होती ती मी लग्नाच्या खरेदीसाठी वापरली आहे. एकतर तुला पैसे कशासाठी पाहिजे आहे हे सुद्धा तु सांगत नाहीयेस."

सौरभ चिडून म्हणाला," दीदी तुम्ही लोकं मला आणि माझ्या परिस्थितीला समजूनच घेत नाहीयेत, तुम्हाला फक्त पैसा प्रिय आहे, माझ्याशी कोणाला काही घेणं देणं नाहीये. तुझ्याकडे पैसेच नाहीयेत तर मी तुझ्याशी बोलतो तरी का आहे?"

मैथिली म्हणाली," म्हणजे माझ्याकडे पैसे असेल तरच तु माझ्याशी बोलणार आहेस तर, सौरभ तु शुद्धीत असल्या प्रमाणे बोल. तु एक काम कर तु आत्ताच्या आत्ता नाशिकला येणाऱ्या बसमध्ये बस आणि घरी निघून ये, बघू तुला कोण मारायला येत ते."

सौरभने काही न बोलता फोन कट करुन टाकला. मैथिली मनातल्या मनात म्हणाली,'या सौरभच आता हे काय नवीन नाटक आहे, हा आम्हाला सुखाने जगू देणार आहे की नाही? अजून काय गोंधळ घालून ठेवला आहे कोण जाणे? नीट व्यवस्थित क्लीअर कट बोलत सुद्धा नाहीये'

©®Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now