Aug 16, 2022
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ५९

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ५९

मागील भागाचा सारांश: मैथिलीने आई बाबांना सौरभने केतनच्या हॉस्पिटलच्या पैश्यांमध्ये केलेल्या घोळाबद्दल सांगितले तसेच त्याने राधिका कडून पैसे घेतल्याचेही सांगितले. आई बाबांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. आई बाबा या विषयावर मैथिली सोबत जास्त काही बोलले नसल्याने मैथिलीला त्यांची काळजी वाटू लागली होती. मैथिलीने याबद्दल केतनला फोनवर सांगितले असता केतनने तिला सांगितले की मी उद्या घरी येऊन तुझ्या आई बाबांसोबत बोलतो.

आता बघूया पुढे....

केतन सोबत फोनवर बोलून झाल्यावर मैथिलीला थोडं रिलॅक्स वाटत होतं. रात्री उशिरा मैथिलीला झोप लागली आणि सकाळी लवकरच जाग आली. मैथिली उठून हॉलमध्ये आली तर मैथिलीची आई हॉल मध्ये एका कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसलेली तिला दिसली. मैथिली आई जवळ जाऊन म्हणाली," आई काय झालं ग? तु रडत का आहेस? रात्री झोपली होतीस की नाही?"

आई मैथिली कडे बघून म्हणाली," मैथिली अजून काय काय बघावं लागणार आहे ग? विचार करुन करुन डोकं फुटायला लागलं आहे. मी उभ्या आयुष्यात तुझ्या बाबांना एवढं खचलेलं पाहिलं नव्हतं. रात्रभर त्यांचा डोळ्याला डोळा नव्हता, ते माझ्याशी सुद्धा काहीच बोलले नाही."

मैथिली म्हणाली," आई आपण त्या विषयावर आत्ता बोलायला नको, तु ब्रश करुन घे, मी चहा ठेवते. आई तुच मला आयुष्याची लढाई लढायला शिकवलं आहे ना मग तु अशी का खचली आहेस. बाबा खचले असतील तर आपल्याला त्यांच्या सोबत भक्कमपणे उभं रहावं लागेल की नाही. आई मला तुझ्या वेदना कळत आहेत पण त्यातून जर बाहेर पडायचे असेल तर सावराव लागेल की नाही."

मैथिली एवढं बोलून चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. मैथिलीचा चहा करुन होईपर्यंत तिचे बाबा हॉल मध्ये येऊन बसले. मैथिलीने आई व बाबा या दोघांना चहा दिला, दोघांनीही मैथिलीच्या आग्रहास्तव चहा घेतला. मैथिली किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी निघून गेली, आई बाबा एकाच पोझिशन मध्ये हॉल मध्ये बसून होते.

काही वेळाने केतन मैथिलीच्या घरी आला त्याने दरवाजातून बघितले तर मैथिलीचे आई बाबा शून्यात बघत बसलेले होते. केतन घरी आलेला त्यांना कळले सुद्धा नाही. 

"काका आत येऊ का?" केतनने दरवाजावर टकटक करत विचारले

केतनचा आवाज ऐकल्यावर मैथिलीच्या आई बाबांनी केतनकडे बघितले, मग लगेच तिचे आई बाबा जागेवरुन उठले, मैथिलीचे बाबा खोट हसू चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत म्हणाले," अरे केतनराव तुम्ही या वेळेला इथं? या ना आत, तुमचंच घर आहे, परवानगी कशाला घेता."

केतन आत आला, मैथिलीची आई त्याच्या साठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. केतन व मैथिलीचे बाबा सोप्यावर बसले. मैथिलीची आई केतन साठी पाणी घेऊन आली, मैथिलीचे बाबा तिच्या आईला म्हणाले, "अग मैथिलीला केतन रावांसाठी चहा करायला तरी सांग."

यावर मैथिलीची आई म्हणाली," हो ती चहा करतच आहे."

मैथिलीच्या आईला उभं बघून केतन म्हणाला, "काकू तुम्ही अश्या उभ्या का? तुम्ही बसा, मैथिली आपल्या चहा नाश्त्याचं बघेल. मला तुमच्या दोघांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे."

मैथिलीची आई एका खुर्चीत बसली. केतन म्हणाला," सौरभने माझ्या पैश्यांच्या हिशोबात घोळ केला हे तुम्हाला मैथिली कडून कळालेच आहे, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्याने माझ्या पैश्यांचा घोळ केला याच तुम्ही दोघे दडपण घेऊ नका. मी ते पैसे सौरभ कडून बरोबर वसूल करेल, तुम्ही त्याची काळजी करु नका."

केतनचं हे बोलणं ऐकल्यावर मैथिलीच्या बाबांनी केतनपुढे हात जोडले व ते म्हणाले, "केतनराव मी सौरभच्या वतीने तुमची माफी मागतो" 

मैथिलीचे आई व बाबा या दोघांचे डोळे पाणावले होते. केतन मैथिलीच्या बाबांचे हात पकडत म्हणाला," काका प्लिज तुम्ही माझी माफी मागू नका आणि तुम्ही हात का जोडत आहात?"

तेवढ्यात मैथिली केतन साठी चहा घेऊन आली व ती आईच्या शेजारील खुर्चीत जाऊन बसली. केतन पुढे म्हणाला," बाबा कोणत्या मुलीला तिच्या वडिलांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्यापुढे हात जोडलेले आवडेल? हे कोणालाच आवडू शकत नाही. आणि तुम्ही अस करुन मला परकं करत आहात. काका सौरभ चुकला आहे हे मान्य आहे पण त्यात तुमची काहीच चूक नाहीये,तुम्ही स्वतःला दोषी मानू नका."

मैथिलीचे बाबा म्हणाले," केतनराव आमचा सौरभ असा कसा घडला गेला हे आम्हाला कळलं कसं नाही? आता पुढे काय करावं हेही कळत नाहीये, डोकं अस सुन्न झालंय."

केतन म्हणाला," काका तुम्ही शांत व्हा, जास्त विचारच करु नका, मी जरी म्हटलं तुम्हाला की यावर विचार करु नका पण ते पूर्णपणे शक्यही नाहीये. आता सौरभने या सगळ्या पैश्यांचं काय केलं? त्याने हा पैसा कुठे वापरला हे आपल्यापैकी कोणीही सांगू शकणार नाही. आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सौरभ कडूनच घ्यावी लागतील पण त्यासाठी तुम्हाला भक्कम रहावं लागेल. काका सौरभ सारखी मुलं काय करु शकतात? आणि काय नाही करु शकत? याची मला थोडी फार कल्पना आहे. सौरभचं काय करायचं? उभा विषयावर आपण नंतर बोलूयात. पहिले मला तुमची जी प्रतिक्रिया आहे त्यावर बोलायचं आहे, काका काकू तुम्ही एवढं खचून जाता कामा नये, आता ही खचून जाण्याची वेळ नाही तर भक्कम उभं राहून शांतपणे निर्णय घेण्याची आहे. तुम्ही सौरभचे आई बाबा आहात, त्याच्या अश्या वागण्याचा तुम्हाला धक्का बसू शकतो हे मला मान्य आहे पण तुम्ही दोघेही हे लक्षात ठेवा की सौरभ सोडून तुम्हाला अजून दोन मुली आहेत ज्यांना तुमची गरज आहे. राधिका ताई प्रेग्नंट आहे, त्यांच्या या नाजूक परिस्थितीत त्यांना तुमची सर्वात जास्त गरज आहे आणि मैथिलीचं घ्याल तर आमचं लग्न महिन्यावर येऊन ठेपलं आहे, अश्यात जर तुम्ही तोंड सोडून, निराश होऊन बसलात तर मैथिलीला काय वाटेल? याचाही विचार करा. कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल पण जे सत्य आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवावं लागेल नाहीतर.."

केतन बोलता बोलता थांबला म्हणून मैथिली म्हणाली," नाहीतर काय केतन, अरे आई बाबांना वाटेल की मीच तुला हे सर्व बोलण्यासाठी इथं बोलावले आहे. केतन सौरभने वाईट मार्गावर जाऊ नये ही माझी व राधिका ताईची सुद्धा इच्छा आहे, आम्हालाही त्याच चांगलं व्हावं असंच वाटत आहे."

केतन मैथिलीला थांबवत म्हणाला," मैथिली तु माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत आहेस, मला उदाहरण द्यायचं नव्हतं पण देतो. माझ्या बाबांचा शाळेतील मित्र होता, बाबा होते तेव्हाचीच ही गोष्ट आहे, त्या काकांना एक मुलगा, एक मुलगी होते. काका पोलीस होते. काका साधे सरळ, सुस्वभावी, एका सरळ रेषेत चालणारे असे होते, त्यांना चोरी करण्याचा व खोटं बोलण्याचा खूप राग येत असे. त्यांचा मुलगा माझ्या पेक्षा दोन ते तीन वर्षांनी मोठा असेल, तो पाचवीत असतानाची गोष्ट आहे, तो वर्गातील मुलांच्या वस्तू चोरायचा, तशी त्याला चोरीची सवय लहानपणापासूनच होती, कोणाची पेन्सिल चोर, कोणाचा पेन चोर अस काही ना काही चोरत असायचा आणि तो सफाईदारपणे खोटं बोलायचा. पाचवीत असताना त्याने त्याच्या शिक्षकांचा मोबाईल चोरला आणि तो मोबाईल त्याने जवळच्या एका मोबाईल शॉपमध्ये जाऊन विकला. मोबाईल शॉपच्या मालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना फोन करुन त्याबद्दल कळवले, नेमकी ती केस त्या काकांच्या हातात सोपवण्यात आली म्हणून ते चौकशी करण्यासाठी शाळेपर्यंत पोहोचले, तपासा अंती त्यांना कळले की आपलाच मुलगा चोर आहे. शेजारी पाजारी त्यांना चोराचा पोलिस बाप म्हणून चिडवू लागले. या सर्व गोष्टींचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी आत्महत्या केली. पुढे त्या कुटुंबाचं काय झालं? याची काही कल्पना नाही पण काका गेल्यावर त्या एका मुलीचं आणि तिच्या आईसाठी हे सगळं सहन करणं किती अशक्य झालं असेल, ज्याने चोरी केली त्याला थोडी एवढा फरक पडला असेल का? मी काका काकूंना त्यांच्या जबाबदाऱ्या यासाठी सांगत होतो की त्यांचं लक्ष दुसऱ्या गोष्टींवर केंद्रीत व्हावे म्हणून. आपलं सगळ्यांच हेच तर चुकतं आपण जेव्हा दुःखात असतो ना तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा किंवा आपल्या आयुष्यातील इतर व्यक्तींचा विचार करत नाही. बाबा माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा."

मैथिलीचे बाबा म्हणाले," केतनराव तुमचं काहीच चुकलं नाहीये, तुम्ही आम्हा दोघांना एका कोशात जाण्यापासून वाचवलं आहे. काल सौरभच कळल्यापासून एकदाही मैथिली किंवा राधिकाचा विचार डोक्यात आला नाही. तुमचं म्हणणं खरं आहे की मैथिली व राधिकाला सुद्धा आमची गरज आहे. केतनराव पण सौरभ बद्दल काय निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत आहे?"

केतन म्हणाला," हे बघा बाबा, आता जर तुम्ही रागाच्या भरात सौरभला फोन करुन बडबड केली किंवा काकू फोनवर रडून बोलल्या तर तो तुमच्याशी खरं बोलणार नाही, त्यापेक्षा तुम्ही त्याला काही दिवसांसाठी इकडे बोलवून घ्या आणि मग त्याच्याशी शांततेत बोला. जर तो घरी भेटायला यायला नाही म्हणाला तर तुम्ही दोघे त्याच्याशी समक्ष भेटून यावर बोला. हे प्रकरण खूप शांततेत हाताळावे लागणार आहे. जर समजा तुम्हाला याबद्दल कळलंय अशी पुसटशी कल्पना जरी त्याला आली ना तरी तो घरी येणार नाही आणि वरुन तो तुमच्याशी काही दिवस संपर्कही तोडू शकतो. सौरभ कसा आहे तुम्हाला जास्त चांगलं माहीत आहे, त्याच्या स्वभावानुसार त्याच्या सोबत बोला, कोणत्या परिस्थितीत त्याची काय प्रतिक्रिया असू शकेल हे तुम्हाला ठाऊक असेलच."

मैथिलीच्या बाबांना केतनचे म्हणणे पटले. केतन घरी आल्यामुळे मैथिलीच्या आई बाबांच्या चेहऱ्यावर थोडी तरी स्माईल आली होती.

©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now