एक अबोली भाग 4

रहस्य आणखी गडद होत आहे.ह्या सगळ्याच्या मागे कोण असेल?
राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कथामालिका फेरी
एक अबोली भाग 4

मागील भागात आपण पाहिले त्रिशाच्या मृत्यूचे कारण शोधत असताना त्याचे धागेदोरे सर्जेराव पर्यंत पोहोचले होते.इकडे अश्विनी मॅडम त्यांच्या मैत्रिणीला घेऊन घरी आल्या.आता पाहूया पुढे काय वळण येते.

अश्विनी मॅडम आणि निशा घरी आल्या.निशा म्हणाली,"मावशी,अंघोळ करून घे.मी कॉफी करते मस्त."


निता अंघोळीला गेली.अश्विनी मॅडमनी तिला कपडे दिले.अंघोळ केल्यावर ती बाहेर आली.

तिला पाहून निशा म्हणाली,"मावशी काय सुंदर दिसतेस तू!"

निता खिन्न हसत म्हणाली,"हेच सौंदर्य शाप ठरलं मला आणि माझ्या मुलीलासुद्धा."

निशाने तिचा हात हलकेच हातात घेतला,"तू आधी कॉफी घे.थोड खाऊन आराम कर.मग आपण बोलू."


इतक्यात अनिताने फोन केला आणि निशा लगेच घराबाहेर पडली.अनिताने तिला घरीच बोलावले होते.

निशा आत येताच अनिता म्हणाली,"चहा घेणार?"

निशा हसली,"नको,आता कॉफी घेऊन आलेय.तू काय सांगणार होतीस?"

अनिताने लॅपटॉप उघडला,"हा त्रिशाच्या फोनचा व्हॉट्स ॲप बॅकअप.तिला अनोळखी नंबर वरून धमक्या मिळत होत्या.कोणीतरी तिला ब्लॅकमेल करत होते."

निशा म्हणाली,"अग हे नंबर शोध मग."

अनिता हसली,"खोटे कागदपत्र देऊन घेतलेले नंबर आहेत ते.एक मात्र नक्की त्रिशाच्या बाबांना काहीतरी माहित आहे.त्यांच्यावर पाळत ठेवली आहे."

निशा म्हणाली,"अनिता माझ्याकडे एक प्लॅन आहे.आपण ह्या नंबरला रिप्लाय देऊ. त्रिशा म्हणून."


अनिता हसली,"त्रिशा ह्या जगात नाही.त्यांना माहीत असणार."


निशा तरीही निर्धाराने म्हणाली,"आपण प्रयत्न करून पाहू."


इकडे मिस्टर जाधव ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच एक आलिशान गाडी समोर येऊन थांबली.जाधव गाडीत बसले.


त्याबरोबर समोरच्या व्यक्तीने सांगितले,"एक पोरगी गेली.पण तुला दुसरी पोरगी आहे."


जाधव हात जोडत गयावया करू लागला,"माझ्या मुलीला काही करू नका.मी पोलिसांना काही सांगणार नाही."


गाडी थांबली.जाधव यंत्रवत खाली उतरले आणि विमनस्क स्थितीत चालताना त्यांना गेल्या दोन महिन्यांतील घटनाक्रम आठवू लागला.त्या दिवशी अचानक ते त्रिशाला शाळेतून घेऊन येताना त्यांना सर्जेराव भेटले.त्यांनतर मुलाच्या वाढदिसानिमित्त असलेल्या पार्टीत त्यांनी सहकुटुंब बोलावले.खर तर सर्जेराव आणि त्यांचे कार्यकर्ते कुप्रसिद्ध होते.त्यामुळे मुलींना न्यायचे नव्हते.पण शेवटी नोकरीचा प्रश्न होता.


पार्टीमध्ये गेल्यावर अचानक एका श्रीमंत तरुणाने त्रिशाला नृत्य करायला ऑफर केले.आपण संतापलो होतो.परंतु त्यानंतर सर्जेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत असताना अचानक त्रिशा गायब झाली.



आजही जाधवांना घाम येत होता. पार्टीत त्या श्रीमंत मुलांनी त्रिशावर अत्याचार केला होता. त्रिशा प्रचंड घाबरलेली.ती रात्रभर रडत होती.आपण मात्र लाचार होतो तेव्हाही आणि आताही.


विचारांच्या तंद्रीत चालत असताना अचानक समोरून गाडीचे ब्रेक करकचून दाबले गेले.निशा पटकन कॅब मधून उतरली.

तिने समोरच्या गृहस्थाला पाणी दिले,"काका,तुम्हाला बरे वाटतेय ना?"


आता जाधव भानावर आले,"हो, बरा आहे."

असे म्हणून ते चालायला उठले.पण पाय जागचा हलत नव्हता.निशाने कॅब चालकाला सांगून त्यांना घरी सोडायची व्यवस्था केली.


निशा स्वतः त्यांच्या घरी गेली. हॉलमध्ये त्रिशाचा फोटो पाहताच तिला आश्चर्य वाटले.

तसे चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली,"येते मी,काळजी घ्या."


त्रिशाची आजी रडत म्हणाली,"खूप खूप उपकार झाले पोरी.आधीच नात गेल्याच दुःख आहे.त्यात आणखी अघटीत घडले नाही."


निशा जाताना म्हणाली,"काका,मी पत्रकार आहे.काही मदत लागल्यास नक्की सांगा.हे माझे कार्ड."


जाधवने फक्त मान डोलावली.निशा घरी जात असताना तिला दोन संशयास्पद माणसे दिसली.ह्याचा अर्थ इथे कोणीतरी नजर ठेऊन होते.तिने अनिताला मॅसेज करून सगळे कळवले.



निशा घरी आली.तोपर्यंत निता आराम करून बऱ्यापैकी सावरली होती. निशाची आई मात्र मैत्रिणीची अशी अवस्था पाहून हळहळत होती.

निशा म्हणाली,"आई भूक लागलीय.लवकर जेवायला वाढ."


निता जेवत असताना गप्प होती.जेवण झाल्यावर मात्र निशा म्हणाली,"मावशी दुःख मनात अडवून धरले तर तुला जास्त त्रास होईल.आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख कमी होते."


निता हसली,"अगदी आईवर गेली आहेस.अश्विनी अशीच होती.मनमिळावू,कायम सर्वांना मदत करणारी."


अश्विनी मॅडम म्हणाल्या,"निता,नक्की काय झाले आहे?एकेकाळी प्रचंड आत्मिश्वासपूर्वक वावरणारी निता देशमुख कुठे आहे?"



निता बोलू लागली,"तुला आठवते अश्विनी,कॉलेज संपले आणि कोणताही विचार न करता मी देवा माने सोबत पळून गेले."


अश्विनी मॅडम म्हणाल्या,"हो,त्यानंतर किती बंधने आली आमच्यावर.तो देवा आणि तू?काहीच ताळमेळ नव्हता ग."


निता म्हणाली,"प्रेमात माणूस फक्त आंधळाच नाही तर बहिरा,मुका सुद्धा होत असावा.तुझ्यासारख्या जिवलग मैत्रिणीचा सल्ला धुडकावून मी पळून गेले.

सुरुवातीला त्याने मला मुंबईत एका चाळीत खोली घेऊन दिली.आम्ही लग्न केले.मला तर अगदी स्वर्गात आहे असे वाटत होते.पण लवकरच मला समजले देवा काहीही काम करत नाही.त्याला व्यसने आहेत.केवळ एक पैज म्हणून त्याने माझ्याशी लग्न केले आहे.


"निशा किंचाळली,"काय?पैज म्हणून?"


निता पुढे बोलू लागली,"हो,त्याच्या मित्रांनी शिकलेली मुलगी पटवायची पैज लावलेली.मला आता परतीचा मार्ग नव्हता.माझ्या शिक्षणाच्या जोरावर मला प्राध्यापक म्हणून नोकरी लागली.मी देवाला समजावू लागले.इतक्यात बाळाची चाहूल लागली.


देवा आता माझ्याशी छान वागू लागला.मला खूप जपू लागला.पण तो कुठे आणि काय काम करतो हे मात्र मला सांगत नव्हता.लवकरच मला सातवा महिना लागला आणि अचानक देवा गायब झाला.


मी त्याला शोधायचे सगळे प्रयत्न केले.त्याचे मित्र वगैरे सगळीकडे विचारले.शेवटी मी पोलिसात गेले.तिथे मला इन्स्पेक्टरने फोटो मागितला.मी लग्नातील फोटो दाखवला.


तेव्हा तो इन्स्पेक्टर मला म्हणाला,"मॅडम,हा नक्की तुमचा नवरा आहे?काय काम करतो?त्याच्या घरी कोण असते?"माझ्याकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते.

त्या इन्स्पेक्टरने मला समजावले,"मॅडम हा देवा एक दलाल आहे.मुलींना फसवून विकतो.तुमचे नशीब थोर तुम्ही वाचलात.शक्य तेवढे त्याच्यापासून लांब रहा."


माझ्या पायाखालची जमीन हादरली.तरीही मला पोटातील बाळाचा विचार करणे आवश्यक होते.मी मुंबई सोडली.नाशिकला माझी मामे बहीण राहते.तिच्या मदतीने तिकडे नोकरी शोधली.त्यानंतर मी एका गोंडस मुलीला जन्म दिला.माझे आयुष्य थोडेसे सावरले.आता मुलीला शिकवून मोठे करायचे एवढे एकच ध्येय माझ्यासमोर होते.


माझी मुलगी स्मिता.खूप हुशार आणि सुंदर.

तेवढ्यात निशा म्हणाली,"मावशी मग आता स्मिता कुठे आहे?"


निता हताश होऊन म्हणाली,"जे सौंदर्य मला शाप ठरले त्यानेच तिचा बळी घेतला.एका मॉडेलिंग ऑडिशन साठी गेलेली माझी स्मिता परत आलीच नाही."

निशा आणि तिची आई म्हणाल्या,"काय?कधी?कशी? कुठे?"


निता म्हणाली,"महिना झाला.तिला ह्या गावातील एका पत्त्यावर शूट करीता बोलावले.मी तिला थांबवत होते पण वय वेडे असते.रुपेरी जगताची स्वप्ने पहात होती.ती घरातून बाहेर पडली.त्यानंतर दोन तासांनी तिचा फोन बंद झाला.मी तिला शोधत इथवर आले.गेले दोन महिने वेड्यासारखी फिरत आहे."एवढे बोलून निता गप्प झाली.


निशा निर्धाराने म्हणाली,"मावशी,तुला शब्द देते.स्मिता कुठे गेली.मी शोधून काढेल.तिचा फोटो आणि फोन नंबर फक्त मला देऊन ठेव.तू शांतपणे झोप."


कुठे असेल स्मिता? त्रिशावर अत्याचार करणारे लोक आणि स्मिता गायब होणे ह्याचा काही संबंध असेल का? किती अबोली अशा गायब होत असतात.निशा आणि अनिता रहस्य शोधू शकतील का?
वाचत रहा.
एक अबोली.

प्रशांत कुंजीर
जिल्हा पुणे

🎭 Series Post

View all