एक अबोल कथा ( भाग तिसरा )

प्रत्येक गोष्टी मागे पण एक गोष्ट असते.


एक अबोल कथा ( भाग तिसरा )

बघता बघता वहिनींची पण पाळमूळ त्या घरात चांगलीच रुजली. एक दिवस वहिनींनी आपल्या घरी बाळ येणारं असल्याची आनंदाची बातमी तुळशीला आणि वेलीला सांगीतली. तुळशीने मख्खपणं ती बातमी ऐकली. काहीचं प्रतिक्रिया दिली नाही. पण वेल मात्र आनंदाने वेडीपिशी झाली. वाऱ्यावर झोके घेऊ लागली. वहिनींच्या अंगावर फुलांचा वर्षाव करु लागली. तिचा जोडीदार वृक्ष मात्र आकाशातल चिरंतन सत्य शोधत अंतर्मुख होता.

वहिनी बाळंतपणासाठी गावी गेल्या. घरी फक्त बाळासाहेब असायचे. तेही कधी कधी घरी यायचेच नाही. अशा वेळी वेलीला फार एकट वाटे. कामाला एक बाई ठेवलेली होती. वेलीला ती मुळीच आवडत नसे. बऱ्याच वेळा ती खरकट पाणी वेली जवळ टाकी. त्याचा वास वेलीला आवडत नसे. कधीकधी त्या पाण्या मुळे उंदीर घुशी येतं. वेलीला ईजा करतं. मग वेल वहिनींची आठवण काढत मनात झुरत राही.

मध्यंतरी वेलीने ज्या झाडाचा आश्रय घेतला होता त्या झाडावर देखील एका पक्षाने घरटं बांधायला सुरुवात केली होती. हळुहळू घरटं आकार घेत होतं. त्यात ते जोडपं राहायला आलं होतं. असं सगळं घर गोकुळा सारखं बहरत चाललं होतं.

एक दिवस कधी नव्हे त्या घरात लहान बाळाचा आवाज ऐकू आला. सगळं घर आनंदाने शहारून गेलं. त्या दिवशी वेलीने आनंदाच्या भरात अंगण भर फुलांची रांगोळी काढली. वहिनींनी बाळाला वेली जवळ आणलं. वेलीने अलगद एक सुगंधी फूल बाळाच्या अंगावर टाकलं. बाळं खुदकन हसलं. वहिनींनी त्याचा पटकन पापा घेतला.

मग नित्यक्रम सुरू झाला. वहिनी त्यांच्या कामाच्या वेळी बाळाची खाट वेली खाली टाकत. मग वेल पान सळ सळवत त्याच्या सोबत खेळत राही. हलणाऱ्या पानातून झिरपणारा सूर्य प्रकाश पाहून बाळ हवेत हातपाय उडवीत उगाच हसत बसे.

हळुहळू बाळ मोठं झालं. त्याचं नाव विश्वास ठेवलं. विश्वास खूप हुशार होता. किती काळ गेला आता वेलीला आठवत नाही. पूर्वीसारखं फुलणं आणि आकाशाची स्वप्न पाहणं तिनं सोडून दिलं होतं. तिचं नातं ना त्या झाडाशी होतं ना जमिनीशी. ती त्या घराशी जोडली गेली होती.


त्यातच एक लबाड बोका आला होता. त्याचा वेलीला खूप राग येई. एक दिवस त्याने वहिनींच्या हातून चुकून उघडं राहिलेल्या पातेल्यातल सगळं दूध पिऊन टाकलं होतं. वरतून तो वेलीच्या अंगावर अंग घासून तिथंच उन्हात लोळत पडला होता. आजकाल तर तो तिच्या अंगाला नखं घासून धार लावत असे. या सगळया गोष्टी वेल निमूट पणं सहन करत असे.

एक दिवस...

( क्रमशः )
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all