एक आगळेवेगळे लग्न भाग ९

Maithili is worry about her mother's health

मागील भागाचा सारांश: मैथिलीचा नाशिकच्या हॉस्पिटलचा पहिला दिवस असतो, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मैथिलीला पेशंटसोबत बोलल्यावर समजते की केतन कश्या पद्धतीने गरीब रुग्णांवर गावाकडे जाऊन मोफत उपचार करतो. तसेच केतन तिला हॉस्पिटल मधील तिचे काम समजावून सांगतो आणि हॉस्पिटल मधील स्टाफ सोबत ओळख करून देतो.

आता बघूया पुढे...

मैथिलीची शिफ्ट संपल्यावर ती घरी जाण्यासाठी हॉस्पिटल मधून बाहेर पडत असतानाच तिची व केतनची भेट झाली. 

केतनने स्माईल देऊन तिला विचारले, " डॉ मैथिली आमच्या हॉस्पिटल मधील तुमचा पहिला दिवस कसा होता?"

मैथिली म्हणाली," छान होता सर, अगदी मला जसे काम करण्यासाठी हॉस्पिटल हवे होते अगदी तसेच आहे, स्टाफ फ्रेंडली वाटला. all credit goes to you sir"

केतन पुढे बोलू लागला," डॉ मैथिली आमचे हॉस्पिटल छानच आहे यात काही वाद नाहीच ये पण अस पहिल्याच दिवशी निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. हल्ली सर्वच क्षेत्रात पॉलिटिक्स खूप जास्त प्रमाणात वाढले आहे. आपल्याही हॉस्पिटलमध्ये कमी अधिक जास्त प्रमाणात पॉलिटिक्स आहेच सो जरा सावध रहा. काम करताना चुका करणे शक्यतो टाळा. तुम्हाला सांगायची गरज नाहीये पण आपले काम प्रामाणिकपणे करा म्हणजे तुमच्याकडे बोट दाखवण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. हळूहळू अनुभवाने तुम्हाला सगळं कळेलच. आणि समजा एखाद्याचे वागणे बोलणे त्या मागचा अर्थ जर तुम्हाला कळला नाही तर मला बिनधास्त विचारु शकता."

मैथिली म्हणाली, " सर पॉलिटिक्स आमच्याही हॉस्पिटलमध्ये होतेच.पण बरं झालं तुम्ही या सर्वांची कल्पना मला आधीच देऊन ठेवली. मी नक्कीच विचार करून वागेल"

केतन म्हणाला," चला मी निघतो, कोणी आपल्याला इथे जास्त वेळ एकत्र बघितलं तरी काहीतरी चर्चा करत बसायचे"

एवढे बोलून केतन त्याच्या कामाला निघून गेला. मैथिली हॉस्पिटलच्या बाहेर पडली, रिक्षात बसून घराकडे जायला निघाली. रिक्षात बसल्यावर मैथिलीला गौरीची आठवण आली म्हणून तिने लगेच गौरीला फोन लावला. चार ते पाच रिंग झाल्यावर गौरीने फोन उचलला. मैथिलीने बोलायला सुरवात केली, " हॅलो गौरी, अग कुठे आहेस? फोन उचलायला किती हा उशीर?"

गौरी म्हणाली," मैथिली मी तुझ्यासारखी रिकामटेकडी आहे का? देसाई मॅडमच्या केबिनमध्ये होते, त्या आमची शाळा घेत होत्या आणि तुझी काय अपेक्षा आहे की मी तुझा फोन त्यांच्यासमोर उचलावा"

मैथिली म्हणाली," तुला कोण बोललं की मी रिकामटेकडी आहे, आज हॉस्पिटलचा पहिला दिवस होता. देसाई मॅडम का चिडल्या?"

गौरी म्हणाली," अरे हो मी विसरलेच होते. तुझ्या जागेवर एक नवीन डॉक्टर जॉईन झाली आहे तिने एका पेशंटला चुकीचे इंजेक्शन दिले, त्यामुळे त्या पेशंटला ऍलर्जी झाली म्हणून देसाई मॅडम खूप चिडलेल्या होत्या. आमचं राहुदेत तुझा पहिला दिवस कसा गेला?"

मैथिली म्हणाली," खूपच छान, फक्त तु इथे पाहिजे होती. डॉ केतन सोडून माझी कोणासोबत ओळख नाहीये सो थोडं बोअर झालं पण हळूहळू सर्वांशी ओळख होईल. हॉस्पिटल छान आहे."

गौरी म्हणाली, " ऐक ना मैथिली, मी तुला रात्री फोन करते, मी अजून ड्युटीवर आहे, देसाई मॅडमने जर मला फोनवर बोलताना बघितलं तर माझी वाट लागेल."

मैथिली म्हणाली," ओके मॅडम"

मैथिली घरी गेल्यावर फ्रेश झाली, आईने तिच्यासाठी चहा बनवला.

मैथिली चहा पित पित आईला म्हणाली, "आई अस हॉस्पिटल मधून थकून आल्यावर तुझ्या हातचा चहा खूप मिस केला. असा आयता गरमागरम चहा हातात मिळायला पण नशीबच लागतं"

आई म्हणाली," म्हणून तर बाळा तुला आम्ही इकडे येण्याचा कधीपासून आग्रह करत होतो, हॉस्पिटल कसे आहे? पहिला दिवस कसा गेला?"

मैथिली म्हणाली," आई एकदम मस्त दिवस गेला, हॉस्पिटल छान आहे."

आई म्हणाली," मैथिली मी स्वयंपाक केलेला आहे, मी तासाभरात बुटीक मधून जाऊन आले. निलिमा ताईंचा फोन आला होता, एक अर्जंट ऑर्डर आली आहे. तुझे बाबा आले की त्यांना जेवण गरम करून वाढ"

मैथिली म्हणाली," ठीक आहे, तु जा, मी राहिलेली कामे आवरून घेईल"

आई बुटीक मध्ये गेल्यावर मैथिलीने घरातील राहिलेली कामे आवरून घेतली, काही वेळात तिचे बाबा कामावरून परतले. बाबा घरात आल्याबरोबर त्यांनी मैथिलीला विचारले, "बाळा तु आलीस पण, कसा होता पहिला दिवस? तुझी आई कुठे बाहेर गेली आहे का? घरात दिसत नाहीये"

मैथिली म्हणाली, " बाबा माझा पहिला दिवस मस्त गेला, आई बुटीक मध्ये गेली आहे, काहीतरी अर्जंट ऑर्डर आली अस काहीतरी म्हणत होती"

बाबा म्हणाले," स्वयंपाक करून गेली आहे की बाहेरून काही आणायचे आहे"

मैथिली म्हणाली," नाही बाबा, आई स्वयंपाक करून गेली आहे, तुम्हाला जेवायला वाढू का?"

बाबा म्हणाले," मी हातपाय धुतो, देवाला दिवा लावतो मग मला जेवायला वाढ, तु जेवलीस का?"

मैथिली म्हणाली, " नाही बाबा, मी आई आल्यावर जेवेल, तुम्ही हातपाय धुवून या तोपर्यंत मी जेवण गरम करून ठेवते"

बाबांची देवपूजा झाल्यावर मैथिलीने त्यांना जेवायला वाढले. बाबांचे जेवण झाल्यावर मैथिलीने त्यांना विचारले, " बाबा आईने आता बुटीक मधील काम बंद करायला पाहिजे, तिची खूप धावपळ होते"

बाबा म्हणाले, " मी हे तिला खूपदा बोललो आहे पण ती माझे काही ऐकत नाही. ती आल्यावर तूच तिच्याशी बोलून बघ."

मैथिली व बाबांचे संभाषण चालू होतेच तितक्यात आई बुटीक मधून परतते. 

"अरे वा, बापलेकीमध्ये काय बोलणे चालू आहे? नक्कीच माझ्याबद्दल कुट्याळ चालू असेल." आई बाबांना चिडवण्यासाठी बोलली.

बाबा म्हणाले," बघ मैथिली तुझ्या आईला आपण गप्पा मारणे सहन होत नाही,ती आपल्यावर जळते"

मैथिली म्हणाली, " आई बाबा तुमच्या दोघांच इक्वेशन अजून तसच आहे, एकमेकांना चिडवल्याशिवाय तुमचा दिवस काही पूर्ण होत नाही"

आई म्हणाली, " तुमच्या दोघांची जेवण झालीत का?"

"आई बाबांच झालंय, मी तुझ्यासाठी थांबले होते" मैथिली उत्तरली.

आई म्हणाली," अरे बाळा जेवून घ्यायचं ना, माझी वाट बघत का बसलीस? चल आता पटकन जेवून घेऊया'

आई व मैथिली जेवायला बसल्या. बाबा टीव्ही बघत बसले होते.

बाबा म्हणाले, "भारती मैथिलीचे म्हणणे आहे की आता बुटीक मधील नोकरी सोडायला हवी, तुझी खूप धावपळ होत आहे"

मैथिली बाबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली, " हो ना आई, आम्ही लहान असल्यापासून तु घर आणि शिवणकाम करत आली आहेस, पहिले आपली आर्थिक स्थिती बरी नव्हती म्हणून तुला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता हे मला मान्य आहे पण आता मीही नोकरी करत आहे, तुला खरच काम करण्याची काही गरज नाहीये. तु आराम करायला हवा आहेस"

आई मैथिलीकडे बघून बोलली," बाळा तुझे म्हणणे खरे आहे, पण मला या धावपळीची सवय लागली आहे. माझ्या शरीराला कामाची सवय आहे, मी जर घरी शांत बसले तर माझ्या एकेक शारीरिक व्याधी चालू होतील. फक्त पैसे भेटता म्हणून मी बुटीक मध्ये जात नाही तर तिथे गेल्यावर चार बायांशी बोलणे होते, मनाचा एक विरंगुळा होतो. या वयात मानसिक व शारीरिक दोन्हीही स्वास्थ्य टिकणे गरजेचे आहे. अजून माझ्या वरच्या जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीयेत, तुझे लग्न होणे बाकी आहे, सौरभचे शिक्षण बाकी आहे. मी घरात बसून कसे चालेल."

मैथिली म्हणाली," आई अग आमचा किती विचार करशील, जरा स्वतःचाही विचार करत जा. तुला मनशांती भेटत असेल तर नक्कीच बुटीक मध्ये जात जा पण जास्तीचे काम करणे टाळ आणि ज्यावेळी काहीही शारीरिक दुखणे उदभवेल तेव्हा गुपचुप काम सोडून घरी आराम करायचा"

आई म्हणाली," हो ग बाई, जेव्हा माझे शरीर थकेल तेव्हा मी घरीच आराम करेल, तु माझी जास्त काळजी करू नकोस"

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all