एक आगळेवेगळे लग्न भाग ८

Maithili's first day in hospital of nashik

मागील भागाचा सारांश: मैथिलीला केतनच्या ओळखीने त्याच्याच हॉस्पिटलमध्ये जॉब मिळतो. मैथिली मुंबईहून नाशिकला परतते. माहीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मैथिलीची सर्व नातेवाईकांशी बऱ्याच दिवसांनंतर भेट होते.

आता बघूया पुढे...

मैथिलीचा नाशिकच्या हॉस्पिटल मधील पहिला दिवस असतो, पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला म्हणून ती घाईघाईने आवरत असते.आईला तिच्याकडे कौतुकाने बघत असते. आई आपल्याकडे एकटक बघत आहे हे मैथिलीच्या लक्षात आल्यावर ती आईला म्हणाली," आई अशी माझ्याकडे एकटक का बघत आहेस?"

आई हसून म्हणाली," तुला अस सकाळी उठून आवरताना पहिल्यांदाच पाहतेय ना म्हणून जरा तुझे कौतुक वाटत आहे. तुझी आणि बाबांची वेळेत कामावर जाण्याची सवय एकसारखीच आहे. मुली किती लवकर मोठ्या होतात ना. आता कालपर्यंत आई वेणी घालून दे म्हणून मागे मागे करणारी तु आज स्वतःचे काम स्वतःच करत आहेस"

मैथिली म्हणाली," आई सहावीपासून होस्टेलला राहत आहे म्हणून माझे काम मला करण्याची सवय लागली आहे. आई माणूस कितीही मोठा झाला ना तरी त्याला वेळेची किंमत हवी. सकाळी थोडे लवकर उठून वेळेच्या पाच मिनिटे आधी तरी आपल्या कामावर पोहोचावे. वेळेत गेले की कोणी वरिष्ठ अधिकारी आपल्याला ओरडत नाही, त्यांच्या नजरेत आपली इमेज चांगली राहते"

आई म्हणाली," माझी गुणी बाळ आहेस. बरं डबा घेऊन जाणार आहेस की इथेच खाऊन जाणार आहेस"

मैथिली विचार करून म्हणाली, " आई मला माझ्या ड्युटीच्या शिफ्टस माहीत नाहीये, आज इथून खाऊन जाते, उद्यापासून ठरवेल डबा न्यायचा की नाही. आणि डोन्ट वरी भूक लागली तर कँटीन मध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेईल"

मैथिलीच्या बोलण्यावर आईने मान डोलावली. मैथिलीने तिचे पटपट आवरले, जेवण केले. घरातून निघताना पहिले देवाला नमस्कार केला, नंतर आईला नमस्कार केला. मैथिली जरी नाशिकची असली तरी तिला नाशिकबद्दल फारशी माहिती राहिली नव्हती. बाबांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षात बसून ती हॉस्पिटलला पोहोचली. तिथे गेल्यावर तिने डॉ केतनला फोन लावला, पण फोन उचलला गेला नाही, थोडयावेळ वाट बघून तिने रिसेप्शन वर डॉ केतनबद्दल चौकशी केली, त्यावेळी तिला समजले की डॉ केतन ऑपरेशन थिएटर मध्ये इमर्जन्सी केस ऑपरेट करत आहेत. डॉ केतनला किती वेळ लागेल याबद्दल मैथिलीला काहीच कल्पना नव्हती. 

हॉस्पिटलमध्ये मैथिली कोणालाही ओळखत नव्हती, तिच्यासाठी ते हॉस्पिटल नवे होते. ती कितीतरी वेळ हॉस्पिटल न्याहाळत होती. अर्धा तास झाला तरी डॉ केतनचा यायचा पत्ता दिसत नव्हता. मैथिली डॉ केतनच्या केबिनबाहेर त्यांची वाट बघत बसली होती. मनातून तिला त्यांचा राग आला होता. तिला वाटत होते की डॉ केतनला कोणाच्या वेळेची किंमतच नाहीये. मैथिली केबिनबाहेर बसलेली होती त्यावेळी तिथे एक मुलगी येते ती मैथिलीला विचारते," मॅडम डॉक्टर आत आहेत का?"

मैथिली त्या मुलीला सांगते,"डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये आहे, तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे का?"

ती मुलगी म्हणाली, " काल मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनीच यावेळी मला बोलावले, तुमचं कोण आजारी आहे?"

मैथिली म्हणाली," मी डॉक्टर आहे, ह्या हॉस्पिटलमध्ये मला नोकरी लागली आहे, मी डॉ केतनची वाट बघत आहे"

ती मुलगी म्हणाली," तुम्ही माझ्या वडिलांचे रिपोर्ट बघून त्यांना काय झाले आहे हे सांगू शकतात का?"

मैथिली म्हणाली," तुमचे वडील तुमच्या सोबत नाही आलेत का? नुसते रिपोर्ट बघून आजाराचे निदान करणे कठीण जाते"

ती मुलगी म्हणाली," माझे वडील गावी आहेत, डॉक्टर दर शनिवारी व रविवारी गावी येतात, आमची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, आम्हाला महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणे शक्य नाहीये, डॉक्टर साहेब माझ्या वडिलांवर मोफत उपचार करतात, मागच्या वेळी ते आले होते तेव्हा त्यांनी काही रिपोर्ट करायला सांगितले होते आणि तेच रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांना दाखवायला घेऊन आले आहे. डॉक्टर साहेब खूप चांगले आहेत." 

डॉ केतन बद्दल बोलताना त्या मुलीच्या चेहऱ्यावर त्यांच्या बद्दल खूप आदर दिसत होता. तिचे बोलणे ऐकल्यावर मैथिलीच्या मनात आले की, "डॉ केतन इतके चांगले कसे असू शकतात? आजच्या जगात विनामूल्य उपचार करणारा डॉक्टर बघायलाही मिळत नाही".मैथिलीने त्या मुलीच्या हातातील रिपोर्ट्स घेतले आणि ते त्या मुलीला हळूहळू समजावून सांगू लागली. मैथिली त्या मुलीशी बोलत असतानाच डॉ केतन तिथे येतात, ते मैथिलीला म्हणतात," अरे वा डॉ मैथिली अजून हॉस्पिटल जॉईनही नाही केलेस आणि काम मात्र चालू केले"

मैथिली उठून उभी राहते," सॉरी डॉ केतन तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या पेशंटसोबत बोलणे चुकीचे आहे पण त्यांनीच रिपोर्ट दाखवले आणि यात काय आहे हे विचारले, माझ्यातील कर्तव्यदक्ष डॉक्टर पेशंटने काही विचारल्यावर शांत बसू कशी शकेल?"

केतन हसून म्हणाला," मी तुम्हाला जाब विचारत नाहीये. एनिवेज तुम्ही दोघीही आतमध्ये या"

मैथिली व ती मुलगी केतनच्या पाठोपाठ त्याच्या केबिनमध्ये जातात.केतन त्यांना म्हणाला," डॉ मैथिली, रंजना तुम्ही दोघी बसून घ्या, तुम्ही चहा घेणार की कॉफी?"

मैथिली म्हणाली," नको सर काही नको"

रंजनाने पण नकारार्थी मान हलवली. केतनने रंजनच्या हातातून रिपोर्ट्स घेतले, जरावेळ ते रिपोर्ट्स शांतपणे बघितले आणि तो पुढे बोलू लागला," अचानक इमर्जन्सी केस आली, दुसरे कोणी डॉक्टर उपस्थित नसल्याने मलाच ती केस हँडल करायला लागली. म्हणून तुम्हाला माझी वाट बघावी लागली. डॉ मैथिली रंजनाला गावी जायचे असल्याने मी पहिले तिला रिपोर्ट्स बद्दल सांगतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. तर रंजना ज्याची मला भीती होती किंवा याची कल्पना मी तुम्हाला आधीच दिलेली आहे, तुझे वडील बऱ्याच वर्षांपासून दारू पित आहेत आणि बिडी ओढत आहेत म्हणून त्यांचे लिव्हर खराब झाले आहे. अजूनही जर त्यांनी त्यांचे व्यसन सोडले नाही तर मी काय देवही त्यांना वाचवू शकणार नाही. मी तात्पुरत्या काही गोळ्या औषध लिहून देतो त्या त्यांना दे आणि व्यसन सोडण्याबद्दल सांग. तसा मी शनिवारी आल्यावर त्यांच्याशी बोलेनच."

केतन रंजनाला गोळ्यांची चिट्ठी लिहून देतो आणि तिला गोळ्या कश्या द्यायच्या ते समजावून सांगितले. रंजना निघून गेल्यावर केतन मैथिलीला म्हणाला," गावाकडच्या लोकांमध्ये awareness कमी असल्यानेच आजारांचे प्रमाण वाढत आहे"

मैथिली म्हणाली,"गावांकडे व्यसनमुक्ती केंद्र उघडायला हवीत"

केतन म्हणाला," डॉ मैथिली गावाकडे जाऊन काम करायला डॉक्टर्स सहजासहजी तयार होत नाहीत. हा विषय असा आहे ना की याच्यावर कितीही बोललं तरी कमीच आहे. आधीच तुमचा माझ्यामुळे खूप टाईमपास झाला आहे, मी तुमची व हॉस्पिटलच्या इतर स्टाफची ओळख करून देतो आणि तुम्हाला तुमची ड्युटीही सांगतो"

केतनने मैथिलीला पूर्ण हॉस्पिटल दाखवले, सर्व हॉस्पिटलच्या स्टाफची ओळख करून दिली. केतनने मैथिलीला तिचे काम समजावून सांगितले.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all