एक आगळेवेगळे लग्न भाग ७

Maithili moving in nashik

मागील भागाचा सारांश: मैथिली व केतनची एकमेकांशी ओळख कॅम्पच्या दरम्यान होते. केतन मैथिलीला नाशिकला जॉब शोधण्यासाठी मदत करणार असतो.

आता बघूया पुढे...

मैथिली मुंबईला परतल्यावर हॉस्पिटलमध्ये नोकरीचा राजीनामा देते, एक महिना नोटीस पिरिअड असल्याने फक्त पुढील एक महिना मैथिली मुंबईला राहणार असते. गौरीला ज्या वेळेस समजते की मैथिली आता आपल्या सोबत फक्त एक महिना असणार आहे त्यावेळी तिला खूप वाईट वाटते व ती मैथिलीला म्हणते,"मैथिली यार तु गेल्यावर मला किती बोअर होईल, तु नाशिकला गेल्यावर मला विसरून जाशील"

मैथिली तिला समजावण्यासाठी बोलू लागली, "गौरी मला तुझी मनस्थिती कळू शकते, मलाही तुझ्याशिवाय खूप बोअर होईल पण काय करणार आपण नेहमीच सोबत नाही राहू शकत. मी तुला कधीच विसरणार नाही आणि तुलाही मला विसरू देणार नाही हे लक्षात ठेव. माझी तुला खूपच आठवण आली की मला भेटायला नाशिकला येत जा आणि जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला भेटायला येत जाईन"

गौरी म्हणाली," इथे तर राजीनामा दिला आहेस पण पुढे नोकरीचे काय? देसाई मॅडम सोबत काही बोललीस का?"

मैथिली म्हणाली,"अरे हो ते मी तुला सांगितलेच नाही ना, अग कॅम्पमध्ये देसाई मॅडमने माझी ओळख डॉ केतन सोबत करून दिली, ते त्यांच्या ओळखीने माझ्यासाठी नोकरी शोधणार आहेत. डॉ केतन कुल, हँडसम, यंग आणि मस्त आहेत"

गौरी हसून बोलली," अरे वा एकाच भेटीत डॉ केतनचे एवढे कौतुक!"

मैथिली म्हणाली,"अग त्यांची काम करण्याची पद्धत खूप छान आहे, ते आठवड्यातून दोन दिवस त्यांच्या गावी जाऊन गरिबांवर मोफत उपचार करतात."

मैथिली गौरीसोबत बोलत असतानाच मैथिलीचा फोन वाजतो, तिचा फोन गौरीपासून जवळ असतो म्हणून गौरी फोन हातात घेते, हसून ती बोलली,"घे बाई तुझ्या आवडत्या डॉ केतनचा फोन आहे"

मैथिली गौरीच्या हातातून फोन घेते आणि रुमच्या बाहेर जाऊन फोन उचलते व बोलायला सुरुवात करते," हॅलो डॉ केतन"

केतन पुढे बोलतो," हॅलो डॉ मैथिली, तुम्ही बिजी आहात का?"

मैथिली म्हणाली," नाही बोला ना"

केतन म्हणाला," काही वेळापूर्वी मी माझ्या सिनिअर सरांसोबत तुमच्या बद्दल बोललो, सरांना तुमचा resume आवडला आहे, तुम्ही जॉईन कधी करू शकता हे सरांनी विचारले आहे"

मैथिली आनंदीत होऊन म्हणाली," म्हणजे माझा जॉब फिक्स झाला"

केतन म्हणाला,"हो तुम्हाला जॉब मिळाला"

मैथिली म्हणाली," थँक्स डॉ केतन, इतक्या कमी वेळात मला तुमच्यामुळे जॉब मिळाला आहे"

केतन पुढे म्हणाला," तुम्ही जॉईन कधी करू शकता?"

मैथिली म्हणाली,"या हॉस्पिटलचा एक महिना नोटीस पिरिअड आहे, तो पूर्ण झाला की अगदी दुसऱ्या दिवसापासूनच मी जॉईन करू शकेल."

केतन म्हणाला," ठीक आहे, तस मी सरांना इंफॉर्म करतो"

मैथिली म्हणाली," थँक्स डॉ केतन"

केतन म्हणाला," its my pleasure"

एवढे बोलून केतनने फोन कट केला.मैथिलीने जॉब मिळाल्याची बातमी पहिले गौरीला सांगितली आणि त्यानंतर आईला फोन करून सांगितली. मैथिलीला नाशिकला नोकरी मिळाल्याची बातमी ऐकून आई खूप खुश झाली कारण आता मैथिली नाशिकला राहायला येणार होती.

बघता बघता एक महिना संपत आला. शेवटच्या दिवशी देसाई मॅडम व हॉस्पिटलच्या टीमने मैथिली सेन्डऑफ करण्यासाठी केक आणला, स्नॅक्स पण ठेवले होते. सर्वांनी एकत्र मिळून मैथिलीला बाय म्हणाले. मैथिली हॉस्पिटल मधून निघण्याच्या आधी देसाई मॅडमला भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेली, "मॅडम आत येऊ का?"

देसाई मॅडम हसून म्हणाल्या," अरे मैथिली ये ना, काय म्हणतेस?"

मैथिली केबिनमध्ये जाऊन मॅडम समोरच्या खुर्चीत जाऊन बसली व बोलू लागली,"मॅडम थँक्स, तुमच्यामुळे डॉ केतनची ओळख झाली त्यामुळे मला इतक्या लवकर जॉब मिळाला."

देसाई मॅडम म्हणाल्या," इट्स ओके मैथिली"

मैथिली म्हणाली," मॅडम मला तुम्ही सुरवातीला बिलकुल आवडायच्या नाहीत पण हळूहळू तुमचा मूळ स्वभाव कळाला, मला तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले. मॅडम पुढे जाऊन माझ्या आयुष्यात जर काही अडचण आली तर मी तुम्हाला फोन करून त्रास देऊ शकते का?"

देसाई मॅडम म्हणाल्या," मैथिली मला माहित आहे की माझा हा स्वभाव कोणालाच आवडत नाही पण अशी एकच व्यक्ती आहे की जिने सरळसरळ सांगितले की तुला माझा स्वभाव आवडायचा नाही. मैथिली तु मला कधीही आणि कशासाठीही फोन करू शकते. मला शक्य असेल तेवढी मी तुझी मदत करेल. मैथिली माझा शेवटचा एक सल्ला आहे, तुला तुझे काम प्रचंड आवडते ते तु करच पण त्यासोबत पर्सनल आयुष्याकडेही लक्ष दे. माझी सर्वात मोठी चुक झाली आहे, मी पर्सनल लाईफ पेक्षा प्रोफेशनल लाईफला जास्त महत्व दिले आहे. मी जी चुक केली ती तु करू नकोस."

मैथिली म्हणाली," मॅडम मी तुमचा सल्ला कायम लक्षात ठेवेल, येते मी"

मैथिलीने निघताना मॅडमच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतला.

मैथिली गौरीचा निरोप घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाली.गौरीचा निरोप घेताना मैथिली व गौरी दोघींच्याही डोळ्यात पाणी होते.

मैथिलीच्या बहिणीच्या मुलीचा म्हणजे माहीचा बर्थडे असल्याने दोन दिवसांनंतर ती हॉस्पिटल जॉईन करणार होती. मैथिलीने माहीसाठी मुंबई तून जाण्याआधी गिफ्ट घेऊन ठेवले होते. मैथिलीचे नाशिकला सर्वांनी मिळून स्वागत केले. आज कितीतरी वर्षांनी मैथिली तिच्या घरी कायमस्वरूपी रहायला जाणार होती. मैथिलीला बघून माहीने तिच्याकडे लगेच झेप घेतली, दोघींचा बॉण्ड खूप छान होता. मैथिली कितीही दिवसांनी भेटली तरी माही तिच्याकडे पटकन झेप घ्यायची. 

माहीचा पाचवा बर्थडे होता, त्यासाठी मैथिलीचा भाऊ सौरभ ही आला होता. माहीचा बर्थडे जोरात साजरा करण्याचे ठरले होते. माहीची आई म्हणजेच राधिका ताई मैथिलीला म्हणाली," मैथिली बर केलंस तु नाशिकला शिफ्ट झालीस ते, आई बाबांच्याही सोबत कोणी तरी हवेच होते. शिवाय तु आल्यामुळे माही ला तुझ्याकडे ठेऊन मला थोडाफार आराम तरी भेटेल आणि जेव्हाही कधी माहीला तुझी आठवण येईल, तिला तुझ्याकडे सोडता येईल. तु मुंबईला होतीस तेव्हा सारखी विचारायची, मावशी मला भेटायला कधी येईल म्हणून. आता मावशीच आमच्या जवळ आलीय म्हटल्यावर सर्व टेन्शनच मिटले आहे."

मैथिली म्हणाली," ताई मलाही इतक्या वर्षांपासून घरापासून दूर रहाण्याचा, मेसचे खाऊन कंटाळा आला होता म्हणून मीही विचार केला की नाशिकला नोकरी भेटतच आहे तर चला तिकडेच जाऊन राहूया. माहीची मलाही खूप आठवण यायची"

माहीचा बर्थडे सर्वांनी मिळून अति उत्साहात साजरा केला. माहीला खूप सारे गिफ्ट्स मिळाले होते. सर्वांनी एकत्र येऊन खूप मजा मस्ती केली. माही घरातील एकटी लहान मुलगी असल्याने सर्वांची लाडकी होती. माहीच्या बर्थडेच्या निमित्ताने मैथिलीला सर्व नातेवाईकांना भेटता आले होते. खूप वर्षांनी सर्वांना भेटून मैथिलीला छान वाटत होते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all