एक आगळेवेगळे लग्न भाग ६

Maithili and ketan's first meet

मागील भागाचा सारांश: मैथिली देसाई मॅडम सोबत कॅम्पला जाण्यासाठी निघते, वाटेत त्यांच्यात बऱ्याच गप्पा होतात.

आता बघूया पुढे...

मागील काही भागात आपण मैथिली व तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेतले, आता आपण केतनचे काय चालू आहे हे बघूयात...

केतन हॉस्पिटल मधून रात्री दहाच्या सुमारास घरी येतो. आई जेवणासाठी त्याची वाट बघत बसलेली असते. केतनला वाटले की आई झोपली असेल म्हणून त्याने चावीने हळूच दार उघडले तर बघतो काय की आई अजून जागीच आहे. पायातील सॉक्स काढता काढता केतन आईला म्हणाला, " आई तुला किती वेळेस सांगितलंय की तु जेवणासाठी माझी वाट बघत बसू नको, तु लवकर जेवण करून झोपत जा पण तु काही ऐकत नाही, ह्या वयात जेवण एवढे उशिरा करू नये. पचनसंस्थेचे विकार चालू होतील"

आई म्हणाली," डॉ केतन आपण आता हॉस्पिटलमध्ये नाही आहात, घरी आला आहात तेव्हा माझ्याशी केतन म्हणून बोलशील का? कुठलाही विषय तु आजारावर येऊन थांबवतोस, जा पटकन हातपाय धुवून ये, मी जेवायला वाढते."

केतन हसून आईला म्हणाला," आई विषय टाळायला तुझ्याकडून शिकले पाहिजे, बरं मी फ्रेश होऊन येतो"

केतन हातपाय धुवून येईपर्यंत आईने जेवण वाढून ठेवले. दोघांनीही जेवण करायला सुरुवात केली.

केतन म्हणाला," आई मी उद्या मेडिकल कॅम्पला धुळ्याला जाणार आहे. चार दिवसांसाठी जाणार आहे"

आई काळजीने केतनला म्हणाली, "अरे बाळा किती दगदग करशील? आठवड्यातून एक दिवस तरी आरामासाठी काढत जा. हॉस्पिटल झालं की कॅम्प एवढेच चालू आहे. पेशंट, हॉस्पिटल सोडून तु कशाला महत्व देणार आहेस का?"

केतन म्हणाला, " आई मला माझे काम आवडते, मी त्यात रमतो आणि मला असं वाटत की आपण जर आपले काम प्रामाणिकपणे, आनंदाने केले तर त्याचे फळही चांगलेच भेटते. अजून दुसरं काय करायला हवे आहे."

आई म्हणाली," मी एकटी किती दिवस तुझी आणि घराची काळजी घेऊ, माझंही वय झाले आहे, मला ही दगदग सहन होत नाही"

केतन शांतपणे म्हणाला," आई मी कधीपासून म्हणतोय की घरकामासाठी आणि स्वयंपाकासाठी एखादी बाई ठेवुयात पण तु तर ऐकतच नाही. बुटीक वर जाणे येणे कमी करत जा."

आईने डोक्याला हात मारला व ती बोलली, "अरे बाबा मी कामाला बाई ठेवण्याबद्दल नाही बोलत आहे. जाऊदे घुमवून फिरवून बोलण्यापेक्षा डायरेक्टच बोलते. केतन लग्नाच मनावर घ्यायला हवे. तुझ्या मनात एखादी मुलगी असेल तर सांग माझी काहीही हरकत नाही"

केतन म्हणाला," आई अस काही नाहीये, तुला जशी सून हवी आहे तशी शोध, फक्त माझी एकच अट आहे तिने या घराला,तुला व्यवस्थित सांभाळले पाहिजे आणि माझ्या कामाला समजून घेतले पाहिजे."

आई हसली व म्हणाली," म्हणजे आता हेही काम मलाच करावे लागेल, अरे असा कॅम्पला किती किती दिवस जातोस, तिकडे एखादी मुलगी शोध"

केतन जेवणाच्या ताटावरून उठत बोलला, "आई मी तिकडे काम करण्यासाठी जातो, लग्नासाठी मुली शोधण्यासाठी नाही"

"उद्या सकाळी डबा घेऊन जाणारेस का?" आईने केतनला विचारले.

"आई डबा न्यायला मी लहान राहिलो आहे का? सकाळी लवकर जायचे आहे, मी उठून तयारी करून जाईल, तु निवांत झोप" केतनने आईला उत्तर दिले आणि तो झोपण्यासाठी त्याच्या रुममध्ये निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी केतन धुळ्याला कॅम्पला जाण्यासाठी निघाला.वाटेत नाश्ता करण्यासाठी एक हॉटेलवर त्याने गाडी थांबवली. केतन हॉटेलमध्ये बसण्यासाठी जागा शोधत होता तोच केतनला कोणी तरी आवाज दिला, केतनने आवाजाच्या दिशेने बघितल्यावर त्याला देसाई मॅडम नजरेस पडल्या. केतनने त्यांच्या कडे बघून हलकीसी स्माईल दिली आणि तो त्यांच्या दिशेने गेला.

देसाई मॅडम म्हणाल्या,"डॉ केतन तुम्ही पण कॅम्पलाच चालला आहात ना?"

केतन म्हणाला,"हो मॅडम जिथे कॅम्प तिथे मी असणारच ना"

देसाई मॅडम हसून म्हणाल्या,"हो ते आहेच, तुम्ही उभे का बसा, आमच्यासोबत नाश्ता करायला बसा ना"

केतन खुर्चीत बसता बसता त्याने मैथिलीकडे बघितले. देसाई मॅडमने मैथिलीला केतनची ओळख करून देताना त्या म्हणाल्या," मैथिली हे डॉ केतन नाशिकमध्ये एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि आठवड्यातून दोन दिवस आपल्या गावी जाऊन गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात, यांची व माझी ओळख एका कॅम्पमध्ये झाली होती. डॉ केतन ही डॉ मैथिली आमच्या हॉस्पिटल मधील सर्वात होतकरू, कार्यशील ज्युनिअर डॉक्टर, मैथिलीला नाशिकला शिफ्ट व्हायचे आहे, तुमच्या ओळखीत जर एखादा जॉब असेल तर तिला सांगा आणि बर का आमच्या मैथिलीला तुमच्यासारखीच गरिबांची सेवा करायला खूप आवडते"

केतनने नाश्त्याची ऑर्डर दिली व तो म्हणाला, "हो नक्कीच तुम्ही तुमचा resume मला पाठवून ठेवा. आमच्या हॉस्पिटलमध्येही सध्या vacancy आहे, मी माझ्या सिनिअर सरांसोबत बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो"

मैथिली स्माईल देऊन बोलली," थँक्स डॉ केतन"

अश्या प्रकारे मैथिली, देसाई मॅडम आणि केतनमध्ये कॅम्पला घेऊन बरीच चर्चा झाली. चहा, नाश्ता झाल्यावर तिघेही आपापल्या गाडीत बसून कॅम्पच्या दिशेने रवाना झाले.

कॅम्पच्या दरम्यान देसाई मॅडमने मैथिलीची ओळख भरपूर डॉक्टर्स सोबत करून दिली. मैथिली व केतन मध्येही कॅम्प, पेशंट यावर बऱ्याच गप्पा झाल्या. मैथिलीला कॅम्पच्या दरम्यान भरपूर नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हसतखेळत, काम करत कॅम्पचे चार दिवस कसे संपून गेले हे कोणालाच कळले नाही. कॅम्पच्या इथून निघताना केतन मैथिलीला म्हणाला," डॉ मैथिली तुम्ही खूप छान डॉक्टर आहात, तुमची पेशंट सोबत बोलण्याची शैली वेगळी व प्रभावी आहे. आमच्या हॉस्पिटलला तुमच्या सारख्या डॉक्टरची नितांत गरज आहे, मी नाशिकला गेल्यावर लगेच सिनिअर सरांसोबत तुमच्या नोकरी बद्दल बोलून घेतो व तुम्हाला कळवतो. तुम्ही आमच्या हॉस्पिटलच्या टीमचा भाग झालात तर मला खूप आनंद होईल"

मैथिलीने हसून केतनला उत्तर दिले," डॉ केतन या चार दिवसांत मी तुमच्याकडून बरेच काही शिकली आहे, पैश्यांपेक्षा कामाला महत्त्व देणारे तुमच्या सारखे डॉक्टर खूप क्वचित बघायला मिळतात. तुम्हाला समोरच्याचा कितीही राग आला तरी तुम्ही शांतपणे समोरच्याशी बोलतात, त्याला रागवत नाही. तुमचे तुमच्या कामावर खूप प्रेम आहे. तुम्ही तुमची ड्युटी प्रामाणिकपणे, निष्ठतेने निभावतात. एवढ्या कमी काळात, कमी वयात तुम्ही प्रसिद्ध डॉक्टर झाला आहात, कॅम्पमध्ये आलेले सर्व डॉक्टर्स तुमचं कौतुकच करत होते."

केतन म्हणाला," अरे बस बस, किती कौतुक कराल. तुमच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावी लागेल. माझा एकच फंडा आहे, आपण आपले काम प्रामाणिकपणे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करायची. चला मी निघतो घरी जायला उशीर होईल. येत्या दोन दिवसांत मी तुम्हाला फोन करून नोकरीचे कळवतो."

एवढे बोलून केतन निघून गेला, काही वेळातच मैथिली व देसाई मॅडम सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.

मैथिली व केतनची भेट तर झाली आहे, आता त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडते ते बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all