मागील भागाचा सारांश: मैथिली सतत टेन्शनमध्ये दिसत असल्याने डॉ पुजाने तिला समजावून सांगितले. सौरभला नाशिकच्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती करण्यात आले होते, त्यासाठी लागणाऱ्या पैश्यांची जुळवाजुळव करताना मैथिलीला नाकेनऊ येत होते. मैथिलीच्या चेहऱ्यावरील काळजी ओळखून आईने तिला खरं खरं सांगायचा आग्रह केला मग मैथिलीला सुद्धा राहवले गेले नाही, तिने आईला खरी परिस्थिती सांगून टाकली.
आता बघूया पुढे...
मैथिलीचं बोलणं ऐकता ऐकताच आईच्या डोळयात पाणी यायला सुरुवात झाली होती. मैथिलीने एका दमात सर्व काही सांगून टाकलं होतं. आपलं बोलून झाल्यावर मैथिलीने आईकडे बघितले तर आईच्या डोळयातून पाणी जरी येत असले तरी आई डोळे मिटून शांत बसलेली होती. मैथिलीला आईची काळजी वाटल्याने ती म्हणाली, "आई तु ठीक आहेस ना?"
यावर आई डोळे पुसत म्हणाली, "हो मी ठीक आहे, तुझ्या बाबांच्या तब्येतीबद्दल डॉक्टर काय म्हणत आहेत? ते कधी शुद्धीत येतील? "
" बाबा शुद्धीत कधी येतील हे कोणीच पक्कं सांगू शकत नाही, बाबांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होताना दिसत नाहीये " मैथिलीने उत्तर दिले.
आई म्हणाली, "राधिकाचं बाळ गेल्या पासून तुझ्यात व तिच्यात काहीच बोलणं झालं नाही का? तु तिला फोन केला होतास का?"
मैथिली म्हणाली," नाही, शेखर जिजूंचे रागातील बोलणं ऐकल्याने ताईला फोन करण्याची माझ्यात हिम्मतच उरली नव्हती. मला वाटलं होतं की राधिका ताई स्वतःहून एखाद्या दिवशी फोन करेल पण तिचाही फोन आला नाही"
आई म्हणाली," माझा मोबाईल कुठे आहे?"
" तुझा मोबाईल बिघडला होता म्हणून तो मी रिपेरिंगला दिला होता, कालच मी मोबाईल घेऊन आले, आता माझ्या केबिन मध्ये आहे" मैथिलीने उत्तर दिले.
आई पुढे म्हणाली," मला माझा मोबाईल आणून देशील, सौरभच्या ट्रीटमेंट साठी लागणाऱ्या खर्चाची तु जास्त काही काळजी करत बसू नकोस. बाबांनी त्याच्या नावे बँकेत काही पैसे फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलेले होते, आता ते त्यांनी जरा वेगळया कामासाठी ठेवले होते पण असो तर त्याच्या पावत्या कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या आहेत आणि समजा अजून पैसे लागत असतील तर माझे दागिने विकून टाक. बरं मला एक सांग, हॉस्पिटलमध्ये मला किती दिवस थांबावं लागणार आहे?"
मैथिली म्हणाली," आई तुला आजही घरी नेता येईल पण मला बाबांकडे व सौरभकडे दिवसातून एक तरी चक्कर मारावा लागेल, माझी ही सतत धावपळ सुरु असते मग तुझ्याकडे लक्ष कोण देणार? तुझ्या जवळ सतत कोणीतरी असण्याची गरज आहे म्हणून मी तुला घरी नेत नाहीये "
आई म्हणाली," बरं त्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे, आपण पहिले जिथे रहायचो ना तिथे रमा राहते, तु खूप लहान असल्याने तुला रमा आठवत नसेल, मी तुला तिचा पत्ता देते, तु तिच्याकडे जाऊन आपली सत्य परिस्थिती सांग. रमा माझ्या सोबत दिवसभर घरी थांबेल म्हणजे तुला काही अडचण होणार नाही. रमा घरातील कामे आवरण्यात तुझी मदत सुद्धा करेल, तिला माझ्याकडे घेऊन ये, मी तिच्या सोबत सविस्तर बोलते"
मैथिली आईकडे आश्चर्याने बघत म्हणाली, "आई या सर्वावरची तुझी प्रतिक्रिया इतकी नॉर्मल कशी असू शकते? मला वाटलं होतं की तु खूप रडशील, स्वतःला त्रास करुन घेशील पण तु किती शांत आहेस. काही प्रॉब्लेम्स वर तु किती पटपट सोल्युशन काढलेत"
आई म्हणाली," मैथिली बाळा अनुभव कशाला म्हणतात. आपल्या पुढे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा विचार तु तुझ्या पद्धतीने केला आणि मी माझ्या पद्धतीने करत आहे. तुझ्या कडून सर्व सत्य कळल्यावर मलाही खूप धक्का बसला होता पण मी जर रडत बसले आणि स्वतःला त्रास करुन घेत बसले तर तु अजून एकटी पडशील. मैथिली तु दाखवत नसली तरी तु आतून खूप खचलेली आहेस हे मला जाणवत आहे. मला खंबीर व्हावचं लागेल ना?"
मैथिली म्हणाली," आई पण ती रमा मावशी आपली मदत का करेल?"
आई म्हणाली," हे बघ जे मदत करणार नाहीत त्यांची नावे सुद्धा मी घेतली नाहीत. रमाला तिच्या पडत्या काळात मी बरीच मदत केलेली होती म्हणून ती नाही म्हणणार नाही याची गॅरंटी मला आहे. माझा मोबाईल घेऊन ये जा."
मैथिली आपल्या केबिनमध्ये जाऊन आईचा मोबाईल घेऊन येते. आईने मैथिली कडून आपला मोबाईल घेऊन राधिकाला फोन लावला. तीन ते चार रिंग गेल्यावर राधिकाने फोन उचलला,
"हॅलो आई" राधिकाचा बोलण्याचा सूर वेगळाच होता.
"शेखरराव आसपास आहेत का?" आईने विचारले
"हो ते इथेच आहेत" राधिकाने उत्तर दिले
आई म्हणाली," फोन स्पिकरवर टाक"
आईच्या सांगण्यावरुन राधिकाने फोन स्पिकरवर टाकला.
आईने पुढे बोलायला सुरुवात केली, "शेखरराव, राधिका माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत दोघेही मध्ये बोलू नका. माझं बोलणं पूर्ण झाल्यावर तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला, तोपर्यंत फक्त माझं बोलणं शांतपणे ऐकून घ्या. राधिका बेटा तुझं बाळ गेल्याच मला आत्ता याक्षणी मैथिली कडून कळाले आहे इतक्या दिवस मला काहीच माहीत नव्हते, शिवाय माझा मोबाईल सुद्धा माझ्याकडे नव्हता. जे झालं ते फार वाईट झालं, तुझं दुःख मी समजू शकते. एक आईच आईचं दुःख समजून घेऊ शकते. पण यासाठी शेखरराव तुम्ही आम्हाला जबाबदार धरलं हे फार चुकीचं केलंत. शेखरराव जे आपल्या नशिबात आहे ते आपण टाळू शकत नाही पण त्या करता आपण आपल्याच लोकांना जबाबदार धरणं हे कितपत योग्य आहे. तुमची मनस्थिती मी समजू शकते पण असे आपल्याच लोकांवर आरोप करणे योग्य नाही, माझ्या मनाला ते पटलेले नाही. राधिका तु विचार करत असशील की आपली आई कशी आहे? इतक्या दिवसात हिने साधा एक फोन करुन आपली चौकशी सुद्धा केली नाही. राधिका अशीच अपेक्षा मलाही तुमच्या कडून होती. तु माझ्या पर्यंत येऊ शकणार नाहीस याची कल्पना मला होती पण शेखरराव सुद्धा मला भेटायला आले नाहीत याच वाईट वाटत आहे. तुला शेखररावांनी काही सांगितलं की नाही हे मला माहित नाही म्हणून मीच तुला हे सर्व सांगण्यासाठी फोन केला. राधिका पुण्यावरुन परत येताना आमच्या बसला अपघात झाला होता. माझा पाय फ्रॅक्चर झाला असून माझ्या पायाचे ऑपरेशन केले होते तर तुझ्या बाबांच्या मेंदूला मार लागल्याने ते कोमात गेलेले आहेत. सौरभला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे लागले आहे. मैथिलीचं लग्न कॅन्सल करावं लागलं यासगळया गोष्टी इतक्या कमी दिवसात घडून गेल्या आहेत. तु विचार कर एवढ्या दिवसापासून मैथिलीची मनस्थिती काय असेल? ती बिचारी एकटीच या सर्व लढाया लढत आहे. तुला या सर्व गोष्टी माहीत नसतील म्हणून तुला या सर्वांची कल्पना देणे गरजेचे आहे असं मला वाटलं म्हणून मी तुला फोन करत आहे. तुला यायचं असेल ये नसेल यायचं तर नको येऊस, माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. शेखरराव आम्ही तुम्हाला आमच्या मुलासारखं मानलं होतं. तुम्हाला वाटत असेल की तुमचं बाळ आमच्यामुळे गेलं असेल तर आम्हाला माफ करा."
एवढं बोलून आईने फोन कट केला.मैथिली म्हणाली," आई तु ताईला हे सगळं का सांगितलंस? तिला खूप वाईट वाटेल."
आई म्हणाली," हे बघ तिला जर हे नंतर कळालं असतं तर ती म्हटली असते की मला तुम्ही आधीच या सर्वाची कल्पना का दिली नाही तर याचे उत्तर आपल्याकडे नसते. मी माझं कर्तव्य केलं आहे. इथून पुढे तिला काय करायचं आहे हे तिचं तिने ठरवावे. रमाच्या घरी जाऊन ये म्हणजे तु मला घरी घेऊन जाशील."
आईने दिलेला पत्ता शोधत शोधत मैथिली रमाच्या घरी गेली, तिथे जाऊन तिने आईचा अपघात झाल्याचे सांगितल्यावर रमाने आपली कपड्यांची बॅग घेतली व ती मैथिली सोबत हॉस्पिटलमध्ये आली. मैथिली आईला हॉस्पिटल मधून घरी घेऊन गेली. आईच्या हट्टाखातर हॉस्पिटल मधून घरी जाता जाता आय सी यु मध्ये जाऊन आईने बाबांना लांबून डोळे भरुन बघितलं. रमा आईची काळजी घेण्यासोबतच घरातील सर्व कामे करुन घ्यायची म्हणून मैथिलीला आता घरची काहीच काळजी उरली नव्हती. मैथिलीला आता एकच चिंता लागून राहिली होती की बाबा कोमातून कधी बाहेर येतील. सौरभ ट्रीटमेंटला थोडा फार रिस्पॉन्स दयायला लागला होता.
©®Dr Supriya Dighe