Login

एक आगळेवेगळे लग्न भाग ६२

At a time all problems comes in maithili's life.

मागील भागाचा सारांश: मैथिलीचे लग्न पंधरा दिवसांवर आल्यावर शेखर राधिका व माहीला मैथिलीच्या घरी नेऊन सोडवतो व राधिकाची काळजी घ्या असेही मैथिलीला बजावून सांगतो. सौरभच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचा फोन मैथिलीच्या बाबांना येतो, ते त्यांना सांगतात की सौरभला एका ड्रग्जच्या रॅकेटमध्ये पकडण्यात आले होते, त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षा सुद्धा दिलेली नाही त्यामुळे प्रिन्सिपल सरांनी मैथिलीच्या आई बाबांना त्वरित पुण्याला बोलावले होते. आई बाबा पुण्याला निघून गेल्यानंतर राधिका चक्कर येऊन खाली पडली. मैथिलीने केतनच्या मदतीने राधिकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

आता बघूया पुढे....

ऑपरेशन थिएटर बाहेर केतन मैथिलीला समजावून सांगत होता तोच शेखर तिथे येऊन मैथिलीला म्हणाला," मैथिली राधिकाला चक्कर का आली? मी तुला तिची काळजी घ्यायला सांगितली होती ना? आणि तुझे आई बाबा कुठे आहेत?"

शेखर खूपच रागात दिसत होता. मैथिलीला काय बोलावे हे सुचत नव्हते म्हणून केतन म्हणाला," आई बाबा पुण्याला गेले आहे, सौरभच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी त्यांना भेटायला बोलावले असल्याने त्यांना अर्जंट तिकडे जावे लागले, ते तिकडे गेल्यावर राधिका ताईंना चक्कर आली. मी तुमचा राग समजू शकतो पण मैथिलीची मनस्थिती समजून घ्या,आपण या विषयावर सविस्तर चर्चा करु. आता थोडी शांतता घ्या."

तेवढ्यात डॉ पुजा ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आल्या होत्या, मैथिली त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली, "पुजा मॅडम ताई कशी आहे ?"

"मैथिली ताई बरी आहे पण तिच्या बाळाला आम्ही वाचवू शकलो नाही" डॉ पुजाने खाली मान घालून उत्तर दिले.

मैथिलीच्या डोळयात पाणी आले होते,ती रडक्या आवाजात म्हणाली," मी ताईला भेटू शकते का?"

डॉ पुजा म्हणाली," तिला स्पेशल रुममध्ये शिफ्ट करतील,तेव्हा तु तिला भेटू शकते."

यावर शेखर म्हणाला," नाही तुमच्यापैकी कोणीही राधिकाला भेटायचं नाहीये, मी खूप विश्वासाने तिला तुमच्या घरी सोडले होते पण तुम्ही तिची काळजी न घेतल्याने आम्हाला आमचं बाळ गमवावं लागलं आहे. मी माझ्या बायकोची काळजी घ्यायला समर्थ आहे."

मैथिली म्हणाली," जिजू तुम्ही असं कसं बोलत आहात? मला माझ्या ताईला भेटायचं आहे, हे जे काही घडलं आहे ते काही आम्ही मुद्दाम केलेलं नाहीये."

केतन दोघांच्या मध्ये पडत म्हणाला," हे बघा आता यात दोष कोणाचा नाहीये, जे आपल्या नशिबात होतं ते घडलं आहे, मैथिली, जिजू तुम्ही दोघेही थोड्या वेळ शांतता घ्या, ही वेळ वाद घालायची नाहीये आणि हो इतक्यात आई बाबांना फोन करुन काही सांगू नका, आधीच ते वेगळ्या टेन्शन मध्ये आहेत."

शेखर म्हणाला," मी लगेच काही बोलत नाही म्हटल्यावर मी शांत बसेल अस नाहीये, आई बाबा पुण्याहून येऊदेत मग बघतो."

एवढं बोलून शेखर राधिकाला ज्या रुममध्ये शिफ्ट केलं होतं तिकडे निघून गेला, मग केतन मैथिलीला म्हणाला," मैथिली तु सध्या ह्या माणसाशी डोकं लावू नको, ते काही बोलले तरी रिऍक्ट होऊ नकोस. थोड्या वेळाने राधिका ताईला जाऊन भेट. आणि आई बाबांना फोन करुन तिकडे काय परिस्थिती आहे याचा अंदाज घे."

मैथिलीने शेजारच्या काकूंना फोन करुन माहीची चौकशी केली. बाबांना फोन लावला पण बाबांनी फोन उचलला नाही. मग ती राधिका ताईच्या रुममध्ये गेली तर राधिका ताई रडत होती व शेखर खूप चिडलेला होता. मैथिलीला बघितल्यावर राधिका ताई म्हणाली, "मैथिली माही कुठे आहे?"

"शेजारच्या काकूंकडे आहे, मी आत्ताच फोन करुन चौकशी केली आहे." मैथिलीने उत्तर दिले.

"आई बाबांसोबत काही फोन झाला का?" राधिका ताईने विचारले

मैथिलीला काहीतरी बोलणार इतक्यात शेखर म्हणाला," राधिका तु या सगळयात पडायचं नाही, इथून पुढे या लोकांचा आणि आपला काहीच संबंध असणार नाही, आज जे काही झालं ते फक्त तुझ्या हट्टामुळे, तुलाच माहेरी जाण्याची खूप घाई झाली होती ना? तर आता भोगा आपल्या हट्टाची फळ. मी आईला फोन केला आहे, ती थोड्या वेळात इथे येईल, आई आल्यावर मी माहीला आपल्या घरी घेऊन जाईल, तुला आम्ही हॉस्पिटल मधून डायरेक्ट घरी नेणार आहोत आणि प्लिज आता काही हट्ट करु नकोस. एका बाळाला गमावलं आहे, आता माहीला व तुला काही होऊ द्यायचे नाहीये."

मैथिलीच्या डोळयात खूप पाणी आले होते, ती डोळे पुसून राधिका ताई जवळ जाऊन म्हणाली, "ताई तु तुझी काळजी घे, उद्या किंवा परवा तुला डिस्चार्ज मिळेल, काही लागलं तर फोन कर, मी येते"

एवढं बोलून मैथिली तेथून निघून गेली. मैथिली केतनच्या केबिनमध्ये जाऊन खूप रडली. केतनने तिला थोडावेळ तसच रडू दिलं, ती थोडी शांत झाल्यावर तो म्हणाला," मैथिली शेखर जिजू काही बोलले का?"

मैथिली म्हणाली," केतन मला हे सर्व असह्य होत आहे, शेखर जिजू या सर्वाचा दोष आम्हाला देत आहेत शिवाय आमचा व राधिका ताईचा काहीच संबंध असणार नाही असंही ते म्हणाले."

केतन म्हणाला," मैथिली शेखर जिजू रागाच्या भरात बोलले असतील, त्यांचा राग कमी झाला की ते स्वतःहून तुझ्याशी व्यवस्थित बोलतील. तु रडून स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस. आई बाबांचा काही फोन झाला का?"

"नाही,मघाशी मी फोन केला होता पण बाबांनी फोन उचलला नाही."मैथिलीने उत्तर दिले

तेवढ्यात केतनचा फोन वाजला, केतनने बघितलं तर फोन मैथिलीच्या बाबांचा होता,तो मैथिलीला म्हणाला," बाबांनी मला फोन केलाय"

"अरे मग उचल ना" मैथिलीने सांगितले

केतनने फोन उचलला, "हॅलो बाबा"

"हॅलो केतनराव, तुम्हाला मैथिली कडून समजले असेलच की आम्ही पुण्याला आलो आहोत" बाबा बोलले

केतन म्हणाला,"हो मैथिली बोलली मला, सौरभ कसा आहे? नेमकं काय झालंय?"

बाबा पुढे म्हणाले," सौरभला ड्रग्सचे व्यसन लागलेले होते, बाकीची काही व्यसने असतील तर मला माहीत नाही. ड्रग्स साठी तो त्याच्या मित्रांकडून पैसे उसने घ्यायचा, बरेच दिवस झाले पैसे दिले नाही म्हणून त्याच्या मित्राने गुंड पाठवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी या सगळयांनाच पकडले. सौरभला बरेच लागलेले आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे पण तो व्यसनाच्या इतका आहारी गेला आहे की त्याला वेगळेच ऍटॅक्स येत आहेत, डॉक्टरांच म्हणणं आहे की त्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे लागेल तर मला तुम्हाला हे विचारायचं होत की आपल्या नाशिकमध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे का? आपण तिथे याला लगेच हलवू शकतो का?"

केतन म्हणाला," अरे बापरे, सौरभ इतका ड्रग्ज च्या आहारी जाईल अस मला वाटलं नव्हतं. नाशिकमध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे, मी तिकडे चौकशी करुन तुम्हाला कळवतो पण त्याला इकडे हलवण्या साठी आपल्याला त्या हॉस्पिटलची व तेथील पोलिसांची परवानगी लागेल."

बाबा म्हणाले," मी याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली आहे, ते म्हणाले की पुढच्या आठ दिवसांनी तुम्ही त्याला तिकडे घेऊन जाऊ शकतात."

" बरं बाबा मग मी तिकडे येऊ का? तुम्ही तिथेच थांबणार आहात का?" केतनने विचारले

बाबा म्हणाले," नाही तुम्ही इकडे येऊ नका, आम्ही दोघे रात्रीच्या बसने नाशिकला परत येणार आहोत. लग्न तोंडावर आलंय, सौरभ मुळे तुमच्या लग्नात अडथळा यायला नको. मैथिली सोबत बोलायची माझ्यात हिम्मत नाहीये, तुम्ही तिला कळवून टाका की उद्या सकाळ पर्यंत आम्ही परत येऊ."

केतन म्हणाला,"हो बाबा, काही मदत लागली तर फोन करा."

बाबांशी फोनवर बोलून झाल्यावर केतन मैथिलीला म्हणाला," आई बाबा उद्या सकाळी परत येणार आहेत, मैथिली मला काय वाटतंय की आपण आपलं लग्न थोडं पुढे ढकलूयात का? बाबांना आपल्या लग्नाची जास्त काळजी वाटत आहे, इकडे येऊन त्यांना जेव्हा राधिका ताईच्या बाळा बद्दल समजेल तेव्हा मला नाही वाटतं की त्यांची मनस्थिती ठीक असेल."

मैथिली म्हणाली," तुझं म्हणणं मला पटतय पण बाबांशी याबाबत बोलल्याशिवाय आपण काहीच निर्णय घेऊ शकणार नाही. सौरभला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवावं लागणार आहे का?"

केतन पुढे म्हणाला," हो मी इथल्या चांगल्या व्यसनमुक्ती केंद्रात चौकशी करुन ठेवतो. मला वाटलं होतं की सौरभ सुधारला असेल पण त्याच्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. पुढे काय होणार आहे हे देवालाच माहीत. बाबांच्या आवाजावरुन जरी वाटत असले की बाबा ढासळलेले नाही पण मला तरी वाटतंय की बाबा आतून खूप खचलेले असणार आहेत."

मैथिली म्हणाली," केतन संकटांचं चक्रीवादळ आल्यासारखं वाटत आहे, देवा अजून काही संकट नको येऊ देऊ, मला तरी सहन होणार नाही."

केतन म्हणाला," मैथिली तु घरी जाऊन जरा आराम कर, आई बाबा आल्यावर आपण पुढे काय करायचं? याबद्दल बोलू. राधिका ताईचा विचार आत्ता तरी करु नकोस.आणि अशी खचून जाऊ नकोस."

©®Dr Supriya Dighe