Login

एक आगळेवेगळे लग्न भाग ५८

Maithili talks with her parents about saurabh's mistakes

मागील भागाचा सारांश: मैथिलीने सौरभला जाब विचारण्यासाठी फोन केला असता सौरभ त्याचा रिझल्ट लागल्याची बातमी तिला देतो, मैथिली सौरभला पैश्यांच्या घोळाबद्दल विचारते तेव्हा सौरभ तिला सांगतो की मी काही चुकीचे केलेले नाही, केतन जिजूंना माझ्यामुळे बराच फायदा झाला आहे तर त्याच्या बदल्यात मी थोडे पैसे घेतले तर काही बिघडणार नाही. सौरभला त्याने केलेल्या चुकीचा काहीच पश्चाताप नव्हता. हे ऐकून मैथिलीला खूप वाईट वाटले. राधिका ताई हॉस्पिटलला आल्यावर तिच्यात व राधिका ताईत बऱ्याच गप्पा झाल्या. मैथिली घरी गेल्यावर तिने सौरभच्या रिझल्ट मुळे आई बाबांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद, समाधान बघितले.

आता बघूया पुढे....

मैथिली आई बाबांचे जेवण होण्याची वाट पाहत होती. आई बाबा जेवण करताना सुद्धा सौरभचे खूप कौतुक करत होते, त्यांचे जेवण झाल्यावर बाबा हॉलमध्ये बसले होते तर आई किचन मध्ये आवरासावर करत होती. मैथिलीने आईचा हात पकडून तिला हॉलमध्ये आणून बसवले. आई म्हणाली," मैथिली मला इथे का आणून बसवलं? अग सकाळी लवकर आम्हाला देवीच्या दर्शनासाठी जायचे आहे, सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करुन ठेवायची आहे, भरपूर कामं पडली आहेत."

बाबा मैथिलीकडे आश्चर्याने बघत होते. मैथिली आईला शांत करत म्हणाली," आई थोडी शांत हो, मला तुम्हा दोघांनाही काही सांगायचं आहे, तेवढं ऐकून घ्या आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागा."

मैथिलीचा भरलेला आवाज ऐकून बाबा म्हणाले," मैथिली बेटा काही काळजी करण्यासारखं आहे का? तु सांग बरं काय झालंय?"

मैथिली म्हणाली," आई बाबा आज तुम्ही खूप आनंदात आहात, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला घालवायचा नाहीये पण काय करु आज तुम्हाला खरं काय आहे हे समजलाच हवे, मी हे अजून तुमच्या पासून लपवू शकत नाही, तुम्हाला चुकीच्या भ्रमात मला बघवत नाहीये पण मी काही सांगण्याआधी मला तुमच्या कडून एक प्रॉमिस हवे आहे, मी जे काही सांगेल त्यामुळे तुम्ही खचून जायचं नाहीये, आपण सर्व मिळून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणार आहोत."

आई काळजीच्या सुरात म्हणाली,"मैथिली प्रस्तावना देण्यापेक्षा जे काही आहे ते एकदाची सांगून मोकळी हो"

मैथिली म्हणाली," आई बाबा तुमच्या प्रमाणेच सौरभवर माझा खूप विश्वास होता आणि तो असायलाच पाहिजे होता ना? त्याचा आज रिझल्ट ऐकून मलाही तुमच्या इतकाच आनंद झालेला आहे पण आई बाबा आपला सौरभ चुकीच्या मार्गावर गेला आहे, तो नेमकं काय करतोय हे मला सांगता येणार नाही पण तो पैश्यांची अफरातफर करत आहे. केतनने अतिशय विश्वासाने सौरभवर हॉस्पिटलच्या कामाची जबाबदारी टाकली, तो मागेल तितके पैसे त्याने दिले. आज केतनने जेव्हा पैश्यांची व बिलांची टॅली केली तेव्हा त्याच्या लक्षात आले की सौरभने पन्नास ते साठ हजारांचा घोळ केलेला आहे. मी हे विचारण्यासाठी सौरभला फोन केला होता तर त्याच्या कडून असे उत्तर आले की त्याने केलेले कृत्य त्याला चुकीचे वाटत नाही, केतन कडे खूप पैसे आहेत त्याला पन्नास ते साठ हजारांनी काय फरक पडेल अस तो म्हणत आहे.शिवाय तो असंही म्हणाला की पुन्हा या पैश्यांबद्दल विचारणा करण्यासाठी फोन करु नकोस. आता तुम्हीच मला सांगा की यावर आपण काय बोलायचं? केतन समजदार मुलगा आहे म्हणून तो आपल्याला समजून घेतो नाहीतर एखाद्या मुलाने लग्न मोडले नसते का?"

मैथिलीचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले होते तर बाबांचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते, दोघेही कितीतरी वेळ शांतच होते. बाबा मैथिलीला म्हणाले," अजून असं काही आहे का? की जे आम्हाला माहीत नाही."

मैथिली म्हणाली," काही दिवसांपूर्वी सौरभने थोडे थोडे पैसे करुन राधिका ताईकडून पन्नास हजार रुपये घेतले होते, मलाही आधी माहीत नव्हतं. मला जेव्हा समजलं तेव्हा मी राधिका ताईचे पैसे परत देऊन टाकले."

आई बाबांचा चेहरा बघून मैथिलीने सौरभच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सांगणे टाळले कारण हे ऐकून त्यांची मनस्थिती अधिकच बिघडली असते. बाबा मैथिलीच्या आईकडे बघून म्हणाले," आपलं काय चुकलं होतं की आपल्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आपण आपल्या पोटाला पीळ देऊन याच शिक्षण केलं, जितके पैसे मागेल तितके पाठवले असतील, कधी कशाची कमी पडू दिली नाही. आपले चांगले पांग फेडले आहेत."

आई म्हणाली," आपण संस्कार देण्यात कमी पडलो असेल, आपलंच काहीतरी चुकलं असेल. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला डोळ्याआड शिक्षणासाठी पाठवलं हीच आपली चूक आहे."

मैथिली म्हणाली," आई बाबा तुम्ही प्लिज असा विचार करु नका, तुमची यात काहीच चुकी नाहीये, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आहे. सौरभ त्याच्या कर्तव्यात कमी पडला आहे. तुम्ही जे केलं ते सौरभच्या चांगल्या साठीच केलं. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका."

बाबा काहीच न बोलता आपल्या रुममध्ये निघून गेले, त्यांच्या पाठोपाठ आई सुद्धा काहीच न बोलता हॉल मधून निघून गेली. मैथिली काही तास एकटीच हॉल मध्ये बसून होती. आई बाबांना कसं सांभाळावे,त्यांना यातून कसं बाहेर काढावे या विचारात ती होती तोच तिच्या मोबाईलची मॅसेज टोन वाजली, तिने मोबाईल मध्ये बघितलं तर केतनचा मॅसेज होता, "हाय डिअर, काय करते आहेस? झोपलीस का?"

या क्षणाला मैथिलीला कोणासोबत तरी बोलायचे होते म्हणून तिने केतनला रिप्लाय केला, " आपण आत्ता फोनवर बोलू शकतो का?"

केतनने तिला लगेच फोन लावला, केतन सोबत नीट बोलता यावे म्हणून ती तिच्या रुममध्ये निघून गेली आणि मैथिलीने केतनला आई बाबांसोबत झालेलं सर्व बोलणं सांगितलं. केतन सोबत बोलता बोलता तिला रडायला येत होते. केतन मैथिलीला शांत करत म्हणाला, "मैथिली तु पहिले शांत हो,तुझी आत्ताची मनस्थिती मी समजू शकतो. हे बघ तुला आई बाबांना सर्व सांगावंसं वाटतं होतं तस तु केलंस मग आता तु वाईट का वाटून घेत आहेस?"

मैथिली म्हणाली," केतन आई बाबांचा चेहरा मला बघवत नव्हता रे, त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. आई बाबा दोघेही काही न बोलता त्यांच्या रुममध्ये निघून गेले. सौरभ बद्दल कळण्याआधी ते खूप खुश होते, त्यांना कसं समजवायचं हेच मला कळत नाहीये, मी एकटी हे करु शकेल का? राधिका ताई यावेळी इथे असती तर किती बरं झालं असतं."

केतन म्हणाला," हे बघ त्यांना धक्का बसणं स्वाभाविक आहे, एकतर बरं झालं की आई बाबांना आत्ताच सर्व खरं कळालं आहे, सौरभ कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आपल्याला ठाऊकच आहे. सगळेच आई वडील आपल्या मुलांवर खूप विश्वास ठेवतात पण सौरभ सारखी मुलं त्यांचा विश्वासघात करतात. उद्या सकाळीच मी तुझ्या घरी येतो. मी आई बाबांना समजावतो. तु या लढाईत एकटी नाहीयेस, मी तुझ्या सोबत आहे. मी आलो की तुझं बरचसं टेन्शन हलकं होईल."

मैथिली म्हणाली," केतन तु खरंच किती चांगला आहेस, बघायला गेलं तर अजून आपलं लग्न झालेलं नाही तरी तु माझ्या सुखदुःखात नेहमी माझी साथ देतोस, माझ्या सोबत उभा राहतोस, माझी मदत करतोस. तसा तर तुझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये तरी तु इतकं काही करतो आहेस."

केतन म्हणाला," अग वेडाबाई तुझी साथ द्यायला आपलं लग्न कशाला व्हायला पाहीजे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. जर तुला त्रास होत असेल तर अप्रत्यक्षरीत्या मलाही त्रास होईल आणि मला हे चालणार नाही. मी तुला दुःखात बघू शकत नाही. आता बाकीचा विचार करु नकोस, शांत झोप. उद्या सकाळी मी घरी येऊन आई बाबांसोबत बोलतो त्यानंतर आपल्याला prewedding फोटोज साठी कपडे घ्यायला जायचं आहे. सो आता डोकं शांत करुन झोप. गुड नाईट."

©®Dr Supriya Dighe