Aug 18, 2022
कथामालिका

एक आगळेवेगळे लग्न भाग ५७

Read Later
एक आगळेवेगळे लग्न भाग ५७

मागील भागाचा सारांश: केतन व मैथिलीच्या लग्नाची तारीख फिक्स करण्यात आली, लग्नाची कामे कशी करायची याचे दोघांनीही नियोजन केले. केतनने मैथिलीला सांगितले की सौरभने जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचा घोळ केला आहे. राधिका ताई प्रेग्नंट असल्याचे मैथिलीला डॉ पुजा कडून समजते. आई बाबांना सौरभने केलेल्या घोळाबद्दल सांगावे की नाही या संभ्रमात मैथिली होती.

आता बघूया पुढे....

केतन निघून गेल्यावर मैथिलीने सौरभला फोन लावला, सुरवातीला त्याने फोन उचलला नाही, चार ते पाच वेळेस तिने फोन लावल्यावर सौरभ फोन उचलून म्हणाला,"हॅलो दीदी अग मी जरा महत्त्वाच्या कामात बिजी आहे, किती वेळेस फोन करशील."

मैथिली खूप चिडलेली होती, स्वतःला जरा शांत करत ती म्हणाली," सौरभ अरे गेल्यापासून तुझा काही फोनच आला नाही, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी तुला फोन केला, तुझ्या रिझल्टचं काय झालं? काही समजलं का?"

सौरभ पुढे म्हणाला," हो दीदी आत्ताच मला माझा रिझल्ट मिळाला आहे, फर्स्ट क्लास मिळाला आहे, मी आत्ता बाबांना फोन लावणारच होतो तेवढ्यात तुझा फोन आला."

मैथिली म्हणाली," अरे वा congrats, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे, आई बाबांनाही खूप आनंद होईल."

सौरभ म्हणाला," हो ना, बाबांनी मला काल सांगितलं की लग्नाची तारीख २५ फिक्स केली आहे."

मैथिली म्हणाली," हो, तु इकडे कधी येण्याचा विचार करत आहेस?"

" दीदी मी एकदा कंपनीत जाऊन येतो नंतर मी तुला सांगतो" सौरभने सांगितले

मैथिली म्हणाली," बरं ऐक ना राधिका ताई प्रेग्नंट आहे, तु पुन्हा मामा होणार आहेस."

" अरे वा आजचा दिवस तर खूपच छान आहे, सगळ्या चांगल्या बातम्या ऐकायला भेटत आहेत." सौरभ खुश होऊन म्हणाला.

मैथिली म्हणाली," पण माझ्यासाठी आजचा दिवस खूप काही छान नाहीये, मला जे ऐकायला नको होते तेच ऐकायला भेटले."

"काय झालं? तु असं का बोलत आहेस?" सौरभने विचारले

मैथिली म्हणाली," सौरभ मला एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील?"

सौरभ म्हणाला," हो विचार ना"

"सौरभ तु केतनचा विश्वासघात का केलास? एवढ्या पन्नास ते साठ हजारांचा घोळ का केलास? ते पैसे कुठे आहेत? आणि प्लिज खोटं बोलण्याचा विचार करु नकोस." मैथिलीने विचारले

सौरभ म्हणाला," दीदी केतन जिजूंकडे पैश्यांची काही कमी नाहीये, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, पन्नास ते साठ हजारांनी त्यांना काही फरक पडणार नाहीये, मी त्यांचे भरपूर पैसे वाचवले आहेत, त्या बदल्यात मला काहीतरी मिळायला हवे होते. मला पैश्यांची गरज होती म्हणून मी घेतले,आता कशासाठी आणि का? हे मी तुला सांगू शकत नाही. मला वाटलं होतं की जिजू माझ्या कामाचा मोबदला जास्त देतील पण त्यांनी दिलं काय तर एक घड्याळ, हीच माझी किंमत केली वाटतं. तुला जर ह्या विषयावर माझ्याशी बोलायचं असेल तर मला पुन्हा फोन करु नकोस, बाय."

थोड्या वेळासाठी मैथिलीच्या डोळयासमोर अंधारी आली. मैथिली विचारात पडली की सौरभ आपल्या सोबत अश्या भाषेत कसा काय बोलू शकतो? केलेल्या चुकीचा पश्चाताप तर सोडा पण आपण केले ते योग्यच केले अस त्याला वाटत आहे. पाणी आता डोक्यावरुन चालले आहे. ह्या विषयावर राधिका ताईसोबत तर बोलू शकत नाही, माझी इच्छा नसली तरी मला आई बाबांसोबत ह्या विषयावर बोलावेच लागेल.

मैथिली सौरभचा विचार करत असतानाच तिच्या केबिनच्या दरवाजा उघडून राधिका म्हणाली," डॉ मैथिली आत येऊ का?"

मैथिली वर बघून म्हणाली," अरे ताई तु ये ना आत, तु माझी परवानगी का घेत आहेस?"

राधिका येऊन मैथिली समोरील खुर्चीत बसली. " ताई तु एकटीच आलीस का? शेखर जिजू सोबत आले नाही का?"

राधिका म्हणाली,"नाही ग, मी एकटीच आली आहे, डॉ पुजाचा फोन आला तेव्हा शेखर ऑफिसमध्ये निघून गेले होते, माही शाळेत होती म्हणून मी विचार केला की आपण एकटेच जाऊन येऊयात."

मैथिली म्हणाली," पुजा मॅडमची भेट घेतलीस का?"

"हो त्यांची भेट घेऊनच तुझ्याकडे आले आहे." राधिकाने उत्तर दिले

मैथिली म्हणाली," पुजा मॅडम म्हणत होत्या की काळजी घ्यावी लागेल म्हणून."

राधिका म्हणाली," हो, माहीच्या वेळी जो प्रॉब्लेम होता तोच आत्ता प्रॉब्लेम आहे, बाकी विशेष काही नाही."

"राधिका ताई पण तु तर इतक्यात चान्स घेणार नव्हतीस मग" मैथिलीने विचारले

राधिका म्हणाली," हो विचार नव्हताच तसा, पण गेल्या काही दिवसांपूर्वी माझी व शेखरची चर्चा झाली तेव्हा विचार केला की जर चान्स घ्यायचाच असेल तर आत्ताच घेऊयात, पुढे जाऊन वय वाढेल मग तसे त्रासही वाढतील."

मैथिली म्हणाली," बरं केलंस, पण तुला माझ्या लग्नात धावपळ करता येणार नाही"

राधिका म्हणाली," हो ना पण जाऊदेत देवाचीच ती मर्जी असेल तर, तुला सौरभचा फोन आला होता का? त्याचा रिझल्ट लागलाय म्हणे."

"हो आला होता" मैथिलीने सांगितले

राधिका म्हणाली," बरं झालं एकदाचं, आई बाबांच्या डोक्याचा मोठा ताण कमी झाला. तुझा चेहरा असा का पडलेला आहे? काही झालंय का?"

मैथिली चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली," नाही ग कुठे काय? रात्री व्यवस्थित झोप झाली नाही म्हणून चेहरा असा दिसत असेल."

राधिका मिश्किल हसून म्हणाली," मैथिली बाळा मी तुझी मोठी बहीण आहे, तुझ्या नक्कीच वेगळं वादळ उठलं असणार, पण असो तु तर मला सांगणार नाहीस कारण मी प्रेग्नंट आहे आणि मला स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून. मैथिली तु जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, अवघ्या चाळीस दिवसांवर तुझं लग्न येऊन ठेपल आहे, तुझ्या डोक्यात अनेक विचार चालू असतील. हा पिरियड एन्जॉय कर, बाकी गोष्टींचा जास्त विचार करु नकोस."

मैथिली हसून म्हणाली," हो ताई, तु तुझी काळजी घे, माझ्या होणाऱ्या भाचा/ भाचीला जप,सध्या ते जास्त महत्त्वाचे आहे."

माहीची शाळा सुटण्याची वेळ झाल्याने राधिकाने मैथिलीचा निरोप घेतला. संध्याकाळी हॉस्पिटल मधून निघाल्यावर मैथिली थेट घरी गेली. मैथिली दारातच होती तोच आईने तिला पेढा भरवला. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मैथिली म्हणाली, "अग आई मला घरात तर येऊदेत, तु एवढी खुश का आहेस?"

आई म्हणाली," माझ्या घरच्या गरिबीमुळे मला शिकता आले नाही तेव्हाच मी ठरवले होते की मी माझ्या मुलांना भरपूर शिक्षण देईल, राधिकाला जेमतेम graduation करता आले, तु डॉक्टर झालीस आणि आपला सौरभ आज इंजिनिअर झाला. आमच्या आयुष्यभराची तपश्चर्या फळाला लागली म्हणायची."

मैथिली चेहऱ्यावर कस बसं हसू आणून म्हणाली,"हो आई तुमचं स्वप्न पूर्ण झालं. आई तुला राधिका ताईची गुड न्यूज समजली का?"

आई म्हणाली," हो राधिकाचा दुपारी फोन आला होता. मैथिली मी देवीला नवस केला होता की सौरभचं शिक्षण निर्विघ्नपणे पार पडावं, मी उद्याच पायी जाऊन देवीचं दर्शन घेऊन येते म्हणजे नवसही पूर्ण होईल."

यावर मैथिली म्हणाली," आई पाच किलोमीटर तु चालत जाणारेस? आई असे नवस तरी का करायचे?"

मैथिली बोलत असतानाच बाबा येऊन म्हणाले, "अग तिची देवीवर श्रद्धा आहे तर तिला करुदेत, उद्या मी पण तिच्या सोबत देवीच्या दर्शनाला जाणार आहे."

मैथिली मनातल्या मनात म्हणाली,' आई बाबा किती खुश आहेत? ह्यांना मी सगळं खरं सांगून त्यांचा मूड बिघडवू शकत नाही पण हे जर देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी चालत जाणार असतील तर तेही बघवत नाहीये. मनावर दगड ठेऊन मला सर्व आई बाबांना सांगावंच लागणार आहे.'

©®Dr Supriya Dighe

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now