Login

एक आगळेवेगळे लग्न भाग ५६

Saurabh makes fraud in hospital's money

मागील भागाचा सारांश: मैथिली व केतनचा आपल्या हॉस्पिटल मधील कामाचा पहिला दिवस होता. डॉ पुजा सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली होती. नवीन हॉस्पिटल असल्याने पेशन्ट्स यायला वेळ लागेल याची कल्पना केतनने डॉ पुजा व मैथिलीला दिली. केतन व मैथिलीमध्ये लग्नाच्या कपडे खरेदी वरुन चर्चा झाली. डॉ पुजा व मैथिली या दोघींच्याही बऱ्याच गप्पा झाल्या. राधिकाला थोडा फार त्रास होता त्यामुळे तिला एखाद्या स्त्रीरोगतज्ञाला दाखवायचे असल्याने मैथिलीने तिला डॉ पुजाचे नाव सुचविले.

आता बघूया पुढे.....

हॉस्पिटलमध्ये मैथिली आपल्या कामात गुंतलेली होती, तेवढ्यात तिला बाबांचा फोन आला व त्यांनी तिला सांगितले की पुढील महिन्याच्या २५ व २७ लग्नासाठी योग्य तारखा निघत आहेत तर तु केतनरावांना विचारुन कोणती तारीख ठरवायची हे सांग. मैथिलीने लगेच याबद्दल केतनला विचारले असता त्याने थोडा वेळ विचार करुन तसेच आईसोबत चर्चा करुन २५ तारीख चालेल असं सांगितलं कारण २५ तारखेला रविवार होता तसेच लागून दोन तीन दिवस सलग सुट्ट्या येत होत्या म्हणजे लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना सोयीचे होईल. सर्वानुमते लग्नाची २५ तारीख फिक्स केली. लग्नाला बरोबर ४० दिवस बाकी राहिले होते त्यामुळे लग्नाची कामे पटपट उरकावी लागणार होती.

मैथिली व केतन या दोघांनी मिळून लग्नाच्या कामांची एक यादी तयार केली, एक टाईमटेबल तयार केले. मैथिलीच्या बाबांनी त्याच दिवशी संध्याकाळी लग्नासाठी हॉल व केटरर्स बुक केले. मैथिलीला या गडबडीत राधिकाला तिच्या तब्येतीबद्दल फोन करुन चौकशी करण्याचे राहून गेले. दुसऱ्या दिवशी मैथिली हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर लगेच डॉ पुजाच्या केबिनमध्ये गेली. डॉ पुजा मैथिलीला बघून म्हणाली," मैथिली सकाळी आल्याबरोबर माझ्याकडे कशी काय आलीस? काही काम होत का?"

" काल संध्याकाळी तुमच्याकडे राधिका ताई आली होती का?" मैथिलीने विचारले

डॉ पुजा म्हणाली," हो का?"

मैथिली म्हणाली," काल माझ्या लग्नाची तारीख फिक्स केली, त्या गडबडीत मी राधिका ताईला फोनच केला नाही. आज सकाळपासून फोन लावतेय पण लागत नाहीये. ताईला काय झालं आहे? Is everything ok?"

डॉ पुजा म्हणाली," थोड्या वेळात रिपोर्ट्स येतील तेव्हा मी तुला सगळं सांगते, आत्ता जरा मी एका केसचा अभ्यास करत आहे, आपण नंतर बोलूयात."

यावर मैथिली म्हणाली," रिपोर्ट्स आल्यावर मला सांगा."

डॉ पुजाने मान हलवून होकार दिला. त्यानंतर मैथिली आपल्या केबिनमध्ये जाऊन बसली, नेटवर लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांचे डिझाईन ती बघण्यात मग्न होती, इतक्यात केतन तिथे येऊन म्हणाला," मैथिली कामात आहेस का?"

मैथिली त्याच्याकडे बघून म्हणाली, "अरे काही विशेष नाही, लग्नाच्या कपड्यांचे डिझाईन बघत होती. तु काय म्हणत होतास?"

केतन म्हणाला," माझं फोटोग्राफर सोबत बोलणं झालं आहे, तो prewedding फोटो शूट पुढच्या आठवड्यात करायचं म्हणतो आहे, आपल्याला त्यासाठी कपडे फायनल करावे लागणार आहे, माझ्याकडे काही फोटोज आहेत ते मी तुला पाठवतो, त्यातील तुला जे आवडतील ते आपण फायनल करुयात. बरं ऐक ना सौरभ कुठे आहे? नाशिक की पुणे?"

मैथिली म्हणाली," सौरभ उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच पुण्याला गेला आहे. का? तु अस अचानक त्याच्या बद्दल का विचारतो आहेस? तुझं त्याच्याकडे काही काम होत का?"

केतन खुर्चीत बसला व तो म्हणाला," मैथिली मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे"

मैथिली म्हणाली," प्रॉमिस? आणि कसलं? केतन तुला काय बोलायचं आहे? इतक्यात सौरभची चौकशी करतो आहेस आणि इतक्यात माझ्या कडून प्रॉमिस पाहिजे आहे, जरा क्लिअर बोलशील का?"

केतन म्हणाला," मी जे आत्ता तुला काही सांगणार आहे, त्याचा तुझ्या मनावर तु जास्त परिणाम करुन घेणार नाहीस. तु सध्या आपल्या लग्नाच्या तयारीत आहेस, तुझा मूड बऱ्यापैकी छान आहे, प्लिज तो मूड न बिघडवण्याचं प्रॉमिस मला पाहिजे आहे."

मैथिली म्हणाली," ठीक आहे, मी तुला प्रॉमिस देते की मी माझा मूड बिघडवू देणार नाही. आता बोल काय झालं आहे ते."

केतन म्हणाला," मैथिली आपण सौरभवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे, त्याने काम चांगलं केलं म्हणून मी न विचार करता, त्याच्याकडून हिशोब न घेता त्याला पैसे पाठवत गेलो. आता सर्व बिलं तपासल्यावर माझ्या अस लक्षात आलं की सौरभने जवळपास पन्नास ते साठ हजारांचा घोटाळा केला आहे."

मैथिली आश्चर्याने म्हणाली," काय? इतका मोठा घोळ त्याने कसा काय घातला? आणि कधी?"

केतन म्हणाला," सौरभ हॉस्पिटलच्या कामाकडे बघत असल्याने तु आणि मी आपण दोघे निश्चिन्त राहिलो, तु हिशोबाकडे लक्ष दिले नाही,तु हॉस्पिटलला चक्कर मारला नाही आणि हे सर्व तेव्हाच घडले असेल, मलाही खूप मोठा धक्का बसला होता."

मैथिली म्हणाली," आणि त्याला हे माहीत असेल की आपल्याला त्याचा घोळ कळेल म्हणून तो घाई घाईने नाशिकला निघून गेला."

केतन म्हणाला," असंच असेल कारण काल मी त्याला फोन लावत होतो, सुरवातीला त्याने फोन उचललाच नाही आणि नंतर त्याचा फोन लागलाच नाही."

मैथिली म्हणाली," केतन इतक्या पैश्याच हा काय करणार असेल? सौरभ नेमका कशात अडकला आहे? त्याला कोणी अडकवलं तर नसेल ना? की त्याने ड्रग्ज घेणे सोडलं नसेल. मला तर काहीच कळत नाहीये, थांब मी त्याला फोन करुन विचारते."

मैथिली हे बोलत असतानाच डॉ पुजा तिच्या केबिनमध्ये येऊन म्हणाली," सॉरी मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब तर केले नाही ना?"

मैथिली म्हणाली," नाही, राधिका ताईचे रिपोर्ट आले आहेत का?"

डॉ पुजा म्हणाली," हो त्याबद्दलच मी तुझ्या सोबत बोलायला आली आहे."

केतन म्हणाला," सॉरी मी तुमच्या दोघींच्या मध्ये बोलत आहे पण राधिका ताईला काय झालं आहे? काही सिरिअस आहे का?"

डॉ पुजा म्हणाली," एक गुड न्युज आहे, राधिका ताई प्रेग्नंट आहे, काल तिच्या लक्षणांवरुन ती प्रेग्नंट असल्याचे मला जाणवत होते पण रिपोर्ट आल्या शिवाय मी कन्फर्म काहीच सांगत नाही. काल मी राधिका ताईला सोनोग्राफी करायला सांगितली होती, सोनोग्राफीच्या रिपोर्ट आणि ब्लड टेस्टसच्या रिपोर्ट्स वरुन असं लक्षात येतंय की राधिका ताईला पहिले तीन महिने खूप काळजी घ्यावी लागणार आहे, तिने स्ट्रेस घेतलेला अजिबात चालणार नाही, राधिका ताईला जपावे लागणार आहे."

यावर मैथिली म्हणाली," अरे वा ही तर गुड न्युज आहे, माहीच्या वेळी सुद्धा ताईला डॉक्टरांनी हेच सांगितले होते त्यामुळे ते आमच्या साठी एवढं विशेष नाहीये. तुम्ही ताईला तसं याबद्दल डिटेल मध्ये सांगा म्हणजे ती काळजी घेईल. राधिका ताई पुन्हा चान्स घेणार आहे याबद्दल काहीच बोलली नव्हती मग तिने अचानक हा निर्णय कसा घेतला काय माहीत?"

केतन म्हणाला," मैथिली सध्या एकच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राधिका ताई प्रेग्नंट आहे आणि आपल्याला तिची काळजी घ्यायची आहे."

डॉ पुजा म्हणाली," हो मीही तेच म्हणणार होते, मी राधिका ताईला बोलावून सगळ्या सुचना देणारच आहे, तुमच्या दोघांनाही या सर्वाची कल्पना असावी म्हणून सांगितलं. मी निघते."

डॉ पुजा निघून गेल्यावर केतन मैथिलीला म्हणाला," मैथिली सौरभचा विषय सध्या बाजूला राहूदेत, राधिका ताईला याबद्दल काहीच कळू देऊ नकोस, त्यांना या गोष्टीचा नक्कीच त्रास होईल."

मैथिली म्हणाली," हो केतन मी राधिका ताईला काहीच सांगणार नाही पण सौरभचा विषय असाच सोडून देऊन कसा चालेल, याबद्दल आई बाबांना थोडी फार तरी कल्पना द्यावी असं माझ्या डोक्यात चालू होतं. सौरभ आपल्या हाताबाहेर गेला आहे असं वाटतंय."

यावर केतन म्हणाला," हे बघ मैथिली तुझे आई बाबा आपल्या लग्नाची तयारी एवढ्या मोठ्या हुरूपाने करत आहेत तसेच राधिका ताईची गुड न्युज ऐकून ते अजून आनंदी होतील पण जर सौरभ बद्दल त्यांना काही कळलं तर या सर्व आनंदावर विरजण पडेल. आपलं लग्न होऊन जाऊदेत मग आपण या बाबतीत आई बाबांशी शांततेत बोलूयात."

मैथिली म्हणाली," केतन पण जास्त उशीर तर होणार नाही ना?"

केतन म्हणाला," हे बघ मैथिली मला जे वाटतंय ते मी तुला सांगितलं, आता यावर तुला काय निर्णय घ्यायचा आहे हे तुझं तु बघ आणि दुसरं म्हणजे तु मला प्रॉमिस केलं आहेस की तु तुझा मूड खराब होऊ देणार नाही."

एवढं बोलून केतन तेथून निघून गेला. मैथिलीच्या मनात एकच विचार येत होता, सौरभने केलेल्या घोळाबद्दल आई बाबांना सांगावे की नाही? 

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all