Login

एक आगळेवेगळे लग्न भाग ५५

Maithili and ketan's first day at their own hospital

मागील भागाचा सारांश: हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निलिमा ताईंनी भाषण केले,त्यांनी आपल्या भाषणात केतनचे कौतुक केले. सौरभने केलेल्या कामासाठी केतनने एक घड्याळ दिले. मैथिलीने हॉस्पिटलमध्ये केक मागवून निलिमा ताईंचा वाढदिवस साजरा केला. तसेच केतन व मैथिलीच्या लग्नाची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्याचे ठरले. सौरभचा रिझल्ट होल्डवर असल्याने तो पुण्याला जाणार आहे असं त्याने घरच्यांना सांगितले.

आता बघूया पुढे....

सौरभ सकाळी लवकरच पुण्यासाठी रवाना झाला. मैथिलीला हॉस्पिटलला जायचे असल्याने ती सकाळी लवकर उठून आपले आवरत होती. आईने मैथिलीला नाश्ता करण्यासाठी आवाज दिला. मैथिली आवरुन नाश्ता करण्यासाठी किचन मध्ये आले. मैथिलीचे बाबा नाश्ता करत होते, ते मैथिलीला बघून म्हणाले," मैथिली मी आजच गुरुजींकडे जाऊन पुढच्या महिन्यातील मुहूर्ताच्या तारखा काढून घेतो. केतनरावांनी जर काही विचारलं तर त्यांना सांग, तुम्हाला कपड्यांची खरेदी कुठे करायची ते ठरवून घ्या, मुहूर्त जवळचा असेल तर जास्त घाई गडबड होईल."

मैथिली म्हणाली," हो बाबा, आज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मी केतन सोबत बोलून घेते."

मैथिलीची आई म्हणाली," मैथिली तुझी ती मैत्रीण डॉ पुजा काल उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दिसली नाही, तु आमंत्रण दिले नव्हते का?"

" मी पुजा मॅडमला आमंत्रण दिले होते, त्यांच्या नातेवाईकाच्या घरी काही तरी कार्यक्रम होता म्हणून त्या आल्या नाही. पुजा मॅडम आमचं हॉस्पिटल जॉईन करत आहेत, केतनने त्यांना खूप आधीच विचारलं होतं तेव्हा आता कुठे जाऊन त्यांनी प्रपोजल स्विकारलं आहे. आता आमच्या दोघींची रोज भेट होईल." मैथिलीने उत्तर दिले.

आई म्हणाली," मी फक्त पुजा उद्घाटनाला का नव्हती एवढंच विचारलं होतं. पुजा तुझी खूप जवळची मैत्रीण आहे ना? तु तिच्याबद्दल आणि केतनरावांबद्दल बोलायला लागली की बोलतच राहतेस."

यावर मैथिली म्हणाली," आई पुजा मॅडम कडून मला खूप काही शिकायला भेटतं, त्या स्वभावाने खूप चांगल्या आहेत, जाऊदेत आमच्यातील मैत्री तुला कळायची नाही."

मैथिलीने पटकन नाश्ता उरकला,आईने बनवलेला डबा घेतला व हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाली. मैथिली हॉस्पिटलला पोहोचण्याआधी केतन हॉस्पिटलला आलेला होता. मैथिली आपल्या केबिनमध्ये जाऊन थोड्यावेळ बसली, मग ती केतनला गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये गेली. केतन कागदपत्रांची फाईल चाळत बसला होता. केतन मैथिलीकडे बघून म्हणाला, "गुड मॉर्निंग मैथिली, केव्हा आलीस?"

"दहा मिनिटं झाले असतील, तु कसले कागदपत्र चाळत आहेस?" मैथिलीने विचारले.

"हॉस्पिटलच्या उभारणीला लागलेल्या खर्चाचा हिशोब लिहून ठेवतोय, सगळी बिलं एकदा तपासून घेत आहे, सध्या वेळ आहे तर बघून घेतो, पुढे जाऊन जास्त पेशंट यायला सुरुवात झाली तर मोकळा वेळ मिळणार नाही." केतनने उत्तर दिले.

मैथिली म्हणाली," बाबा आज दुपारी गुरुजींकडे जाऊन लग्नासाठी मुहूर्त काढणार आहे, बाबा म्हणत होते की कपड्यांची खरेदी कुठे करायची हे ठरवून घ्या."

केतन हातातील फाईल बाजूला ठेवत म्हणाला, " मला आईसाठी येवल्या वरुन पैठणी घ्यायची आहे, तुला घ्यायची असेल तर तुही घेऊ शकतेस. आपल्या दोघांच्या कपड्यांचं घेशील तर हळद, लग्न आणि रिसेप्शन असे तीन फंक्शन असतील तर त्यासाठी कॉम्बिनेशन कसं करायचं हे थोडं नेटवर सर्च करुन ठरवूयात नाहीतर एखादा डिझाइनर शोधूयात म्हणजे जरा सोपं जाईल. तुझ्या डोक्यात काही आयडिया असेल तर सुचवू शकतेस. Prewedding फोटोसेशन आपण नाशिकच्या आसपासच करुयात, त्यासाठी कोणते कपडे घ्यायचे हे तु ठरव."

मैथिली केतनकडे आश्चर्याने बघत म्हणाली, "केतन तु तर सगळंच ठरवून बसला आहेस."

केतन म्हणाला," मी जास्त गोंधळ घालत बसत नाही, आपले थॉट्स क्लिअर असतात."

केतन व मैथिलीचे बोलणे चालू असतानाच डॉ पुजा केबिनच्या दरवाजावर नॉक करुन आत येऊ का? म्हणून विचारते. 

केतनने आत येण्याची परवानगी दिल्यावर डॉ पुजा केबिनमध्ये येऊन मैथिली शेजारच्या खुर्चीत बसून बोलते," डॉ केतन आणि मैथिली नवीन हॉस्पिटलसाठी तुमचे हार्दिक अभिनंदन, काल मला येण्याची खूप इच्छा होती पण नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्याने मला येता आले नाही."

केतन म्हणाला,"इट्स ओके मॅडम, काही हरकत नाही. मी तसंही तुम्हाला बोलावणारच होतो. तुम्हाला तुमची केबिन, ऑपरेशन थिएटर माहीत असेलच. आपलं हॉस्पिटल नवीन चालू झाल्याने थोड्या दिवस पेशंट्स कमी असतील त्यामुळे कदाचित तुम्हाला बोअर होऊ शकेल."

डॉ पुजा पुढे म्हणाली," हम्मम मला कल्पना आहे सर, हेच बरं आहे, गेल्या काही वर्षांपासून दररोज पेशंट्स बघून बघून कंटाळा आला आहे, आपण स्वतः हे प्रोफेशन निवडलं आहे त्यामुळे कंटाळा करुन चालणार नाही हेही मला कळतंय पण सतत बिजी लाईफ असलं की नको वाटतं."

केतन हसून म्हणाला," मॅडम इतकं explanation नका देऊ, मला तुमच्या भावना कळाल्या आहेत. तुम्ही व मैथिली एकाच ठिकाणी असल्याने तुम्हाला बोअर होणार नाही."

मैथिली म्हणाली," पुजा मॅडम आपण माझ्या केबिनमध्ये जाऊन बोलूयात, केतनला त्याच काही काम असेल ते करुदेत."

डॉ पुजाने मान हलवून होकार दिला. मैथिली केबिन मधून बाहेर पडत असताना केतन म्हणाला," मैथिली बाबांचा फोन आला तर मला सांगशील."

मैथिली म्हणाली," हो लगेच"

डॉ पुजा मैथिली सोबत तिच्या केबिनमध्ये जाऊन विचारते," बाबांचा काय फोन येणार आहे? डॉ केतन फोनसाठी एवढे आतुरलेले का वाटत आहेत?"

" बाबा गुरुजींकडे जाऊन लग्नाचा मुहूर्त काढणार आहे." मैथिलीने उत्तर दिले.

डॉ पुजा म्हणाली," ओह अस आहे तर, बाकी काय म्हणतेस?तुझा साखरपुडा झाल्यापासून माझ्याशी तु जास्त काही बोललीच नाहीयेस. खूपच बिजी झाली आहेस. लग्न झाल्यावर तर माझी आठवण सुद्धा काढणार नाहीस."

यावर मैथिली म्हणाली," अस काही नाहीये, केतन अमेरिकेत गेल्यावर हॉस्पिटलच्या कामाची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडली, मध्यंतरीच्या काळात माझी खूप धावपळ झाली तरी सौरभ सोबतीला होता म्हणून बरं झालं. आता आपण रोज एकमेकींना भेटणार आहोत तेव्हा विसरण्याचा काही संबंधच येणार नाही. बरं झालं तुम्ही आमचं हॉस्पिटल जॉईन केलंत."

डॉ पुजा म्हणाली," हम्मम अग सुरवातीला हे नकोच म्हणत होते, डॉ केतन यांच्या सोबत बोलले मग ते तयार झाले. मी पण त्या हॉस्पिटलमध्ये काम करुन कंटाळले होते, आता हे कसं आपल्या मैत्रिणीचं हॉस्पिटल आहे म्हटल्यावर काही टेन्शन नाही. मी तुझ्यासाठी एक पर्सनलाईज्ड पेनस्टॅन्ड ऑर्डर केला आहे, उद्या परवा पर्यंत येऊन जाईल."

मैथिली म्हणाली," अरे मॅडम मग तुम्ही मला हे आज का सांगत आहात? "

" अग पुन्हा म्हणशील मैत्रीण असून काही गिफ्ट दिलं नाही." डॉ पुजाने उत्तर दिले

दोघींच्या गप्पा चालूच होत्या तोच एक नर्स येऊन डॉ पुजाला पेशंट आलं म्हणून सांगून गेली, मग डॉ पुजा आपल्या केबिनमध्ये निघून गेली.

डॉ पुजा निघून गेल्यावर मैथिलीला राधिकाचा फोन आला, "हॅलो मैथिली बिजी आहेस का?"

"नाही ग ताई, काय म्हणतेस? मैथिली उत्तरली

राधिका पुढे म्हणाली," तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ कोणी जॉईन झालंय का?"

मैथिली म्हणाली," हो तुला पुजा मॅडम माहीत असतीलच ना? त्याच आमच्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाल्या आहेत, काय झालं?"

" अग काही विशेष नाही, मलाच जरा त्रास होतो आहे तर म्हटलं एकदा दाखवून घेऊयात." राधिकाने उत्तर दिले.

मैथिली म्हणाली," ठीक आहे चालेल मग आज येऊन जा."

राधिका म्हणाली," हो संध्याकाळी मॅडम किती वाजेपर्यंत असतील ते सांग मग येऊन जाईल."

मैथिली म्हणाली," संध्याकाळी मी हॉस्पिटलमध्ये नसले तरी तु येऊन पुजा मॅडमला दाखवून जा, मी नंतर त्यांच्या सोबत बोलून घेईल."

राधिका म्हणाली," ठीक आहे चालेल."

©®Dr Supriya Dighe