एक आगळेवेगळे लग्न भाग ५४

Nilima tai talks about ketan

मागील भागाचा सारांश: केतनने आईला हॉस्पिटलला नेऊन सरप्राईज दिले. हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केतनने सर्वांसमोर भाषण केले त्यात त्याने हॉस्पिटलला दिपनील हॉस्पिटल नाव का दिले हे सांगितले तसेच आईच्या वाढदिवसा निमित्त हॉस्पिटलचे उद्घाटन केले हे सांगितले, आपल्या बाबांनी आपल्याला काय शिकवण दिली हेही त्याने सांगितले.

आता बघूया पुढे....

केतनचे भाषण संपल्यावर सर्वांनी विनंती केल्यामुळे निलिमा ताईंना दोन शब्द बोलावे लागले, " सर्वांसमोर स्टेजवर येऊन बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे, शिवाय मी काही पूर्वतयारी सुद्धा केली नाहीये, माझं काही चुकलं तर माफ करा. सुरुवात कुठून करु हेच मला कळत नाहीये. जो मुलगा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एवढं मोठं सरप्राईज देतो याहून मोठं सुखं ते कोणतं असेल? केतनचे बाबा जिथून कुठून त्याला बघत असतील त्यांना सुद्धा केतनचा अभिमान वाटत असेल.मी नेहमी केतन माझा मुलगा आहे याबद्दल स्वतःला भाग्यवान समजते. केतनचे बाबा ज्यावेळेस कोमात होते त्यावेळेपासून मी केतनचा समजूतदारपणा, शहाणपणा बघत, अनुभवत आली आहे. साधारणपणे केतनचे बाबा दीड वर्ष हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा केतनने माझी पुरेपूर साथ दिली. केतनचे बाबा गेल्यावर माझ्यापुढे सर्वांत मोठा प्रश्न उभा होता तो म्हणजे केतनवर संस्कार करणे, त्याला वाढवणे मला एकटीला जमेल का? मला आजूबाजूचे लोकं नेहमी म्हणायचे की तुमचा केतन होस्टेलला राहतो, त्याला वडिलांचा धाक राहिलेला नाहीये, त्याच्याकडे बारीक लक्ष द्या, बिना बापाचे पोरं वाया जातात, बिघडतात. सर्वांचं बोलणं ऐकून मलाही टेन्शन यायचं पण मला केतनला घडवण्यात काहीच कष्ट लागले नाही, तो आपोआप घडत गेला, त्याच्यावर संस्कार आपोआप होत गेले. केतनला परिस्थितीची जाणीव असल्याने तो एका मर्यादेच्या पलीकडे गेलाच नाही.

केतनचे लहानपणापासून एक स्वप्न होते की त्याला एअर फोर्स मध्ये जायचे होते पण त्याचे बाबा गेल्यावर तो माझा एकमेव आधार होता, आणि तो जर एअर फोर्स मध्ये गेला असता व देव न करो जर काही वाईट घडले असते तर मी एकटीने काय केले असते? म्हणून मी त्याला एअर फोर्समध्ये जाऊ नको असे सांगितले यावर त्याला हवे असते तर त्याने माझा विरोध करु शकला असता पण त्यावेळी केतनने माझ्या भावना समजून घेतल्या व आपल्या स्वप्नाला तिलांजली दिली. पुढे जाऊन त्याने कधी तक्रार सुद्धा केली नाही. केतनच्या बाबांनी युद्धावर जाण्याआधी त्याला सांगितले होते की आईला कधी एकटं सोडू नकोस, तिला सुखात ठेव, केतनने आजपर्यंत बाबांचा शब्द काही मोडला नाही.

तर असा आहे माझा केतन. तीन महिन्यांसाठी मला अमेरिकेत बरोबर घेऊन गेला. केतनचे मैथिलीसोबत लग्न होणार आहे, मैथिलीने माझ्या आयुष्यात मुलीची कमी भरून काढली आहे. दोघांनी सुखी संसार करावा हीच माझी एकमेव इच्छा आहे बाकी काही नाही. मी देवाकडे प्रार्थना करेल की तु इतका चांगला मुलगा देऊन माझ्यावर आधीच खूप मोठे उपकार केले आहेत, इथून पुढेही त्याला सुखात ठेव आणि माझे राहिलेले आयुष्यही त्याला देऊन टाक. 

तुम्ही ज्या सर्वांनी माझ्या केतनची साथ दिली आहे त्याबद्दल सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते."

निलिमा ताईंचे भाषण झाल्यावर जमलेल्या सर्वांनी निलिमा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि केतनचे हॉस्पिटलसाठी अभिनंदन केले व हॉस्पिटलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमा साठी जमलेल्या सर्वांसाठी चहा नाश्त्याचे आयोजन केलेले असते. डॉ अजय सूर्यवंशी कार्यक्रमा साठी आलेले होते, ते मैथिली व केतन जवळ आले, त्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले,"केतन आमच्या हॉस्पिटलची एक efficient डॉक्टर तुझ्यामुळे कमी झाली आहे, स्वतःचे हॉस्पिटल असल्यावर डॉ मैथिली आता माझ्या हॉस्पिटलमध्ये काम का करतील? डॉ मैथिली मुळे माझ्यावरील कामाचा भार हलका व्हायचा. डॉ मैथिली हॉस्पिटलला आपली कमी कायम जाणवेल पण असो तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."

कार्यक्रम, चहा नाश्ता करुन झाल्यावर एकेक जण निघून गेले. आता हॉस्पिटलमध्ये केतन, त्याची आई आणि मैथिलीच्या घरची मंडळी ( मैथिलीचे आई बाबा, सौरभ, राधिका, शेखर व माही) राहिले होते. शेखर जिजू केतनला म्हणाले," डॉ केतन हॉस्पिटलचे काम अगदी भव्य झाले आहे, इतक्या कमी वयात असे हॉस्पिटल उभे करणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे."

केतन म्हणाला," हे सर्व तुमच्या सर्वांच्या आशिर्वादामुळे शक्य झाले आहे. माझ्या गैरहजेरीत मैथिली व सौरभनेच सर्व काम सांभाळलं होतं."

शेखर जिजू म्हणाले," सौरभनेही तुम्हाला मदत केली का?"

केतन म्हणाला," हो त्याचे विशेष कौतुक करावे लागेल."

सौरभ म्हणाला," जिजू तुम्ही जे सांगितलं तेच काम मी केले, माझं विशेष कौतुक करण्याची गरज नाहीये, माझा रिकामा वेळ तुमच्या मुळे मार्गी लागला."

केतनने एक घड्याळाचा बॉक्स काढला व तो सौरभच्या हातात देत म्हणाला, " सौरभ हे तुझ्यासाठी माझ्याकडून एक छोटेसे गिफ्ट. तु माझी खूप मोठी मदत केली आहे, त्याचा मोबदला देऊन मला आपल्या नात्यात फूट पाडायची नाहीये."

यावर मैथिलीचे बाबा म्हणाले," केतनराव तुम्ही आमच्यासाठी काही परके नाही, आपल्या माणसासाठी काही केलं तर ते उपकार थोडीच होतात. सौरभ मोकळा होता म्हणून तुमच्या कामी आला, त्याने खूप काही मोठे काम नाही केले."

सौरभ घड्याळ घ्यायला नाही म्हणत होता पण केतनच्या आग्रहाखातर त्याने घड्याळ घेतले. मैथिलीने निलिमा ताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये केक मागवून घेतला. सगळयांच्या उपस्थितीत निलिमा ताईंनी केक कापला. मैथिलीने केतन व निलिमा ताईंसोबत फोटो काढले. मैथिली व तिच्या घरचे हॉस्पिटल मधून निघायला लागले तेव्हा निलिमा ताई म्हणाल्या," आमची अमेरिकेची वारी झाली, हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, आता आपल्याला केतन व मैथिलीच्या लग्नाची घाई करावी लागेल, मला वाटतंय की पुढच्या महिन्यातच एखादा मुहूर्त बघून लग्नाचा बार उडवून टाकूयात, मैथिलीचे बाबा यावर तुमचं काय म्हणणं आहे?"

मैथिलीचे बाबा म्हणाले," ताई तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. माझंही हेच म्हणणं होतं. तुमची काही हरकत नसेल तर आमच्या गुरुजींकडून मी मुहूर्ताच्या तारखा काढून घेऊ का?"

निलिमा ताई म्हणाल्या," नक्कीच हे काय विचारण झालं, तुम्ही तारखा काढून मला कळवा, मग आपण सगळे मिळून जी तारीख सोयीस्कर वाटेल ती पक्की करुन टाकूयात. केतन तुला चालेल ना? की अजून थोडे दिवस थांबूयात, बघ आम्हाला काही अडचण नाही."

केतन म्हणाला," नाही आई, आधीच खूप उशीर झाला आहे, जी जवळची तारीख असेल ती ठरवूयात, मला तर कधीची घाई झाली आहे."

केतन असे बोलल्यावर सगळे हसायला लागले मग केतनच्या लक्षात आले की आपण काहीतरी चुकीचे बोलून गेलो. राधिका ताई म्हणाली," अरे बापरे म्हणजे नवरदेव तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे, बाबा लवकरात लवकर एखादी तारीख काढा. नवरदेवाला घाई झाली आहे."

मैथिलीचे बाबा म्हणाले," हो मग, मी आजच संध्याकाळी आपल्या गुरुजींसोबत बोलून घेतो."

मैथिली व तिच्या घरचे हॉस्पिटल मधून निघून गेले. घरी पोहोचल्यावर सौरभ म्हणाला," आई बाबा माझ्या कॉलेजमधून सकाळी फोन आला होता, आमचा रिझल्ट लागला आहे पण माझा व अजून एक दोन जणांचा रिझल्ट दिसतच नाही, होल्डवर आहे असं दाखवत आहे तर मी कॉलेजमध्ये जाऊन काय झालं आहे ते बघून येतो, कॉलेजमधील सरांनीच बोलावलं आहे, रिझल्ट व्यवस्थित असेल तर कंपनीत जाऊन नोकरीचंही बघतो, नोकरी लागली तर मी पुण्यालाच राहील, मला घरी यायला जमणार नाही."

हे ऐकून मैथिली म्हणाली," सौरभ रिझल्ट होल्डवर असण्याचं कारण काय आहे? फी तर आपण भरलेली आहे मग असं काय झालेलं आहे की तुझा रिझल्ट होल्डवर ठेवला आहे."

सौरभ म्हणाला," दीदी उद्या मी कॉलेजमध्ये गेल्या शिवाय मला काहीच कळणार नाही. मी तिथे गेल्यावर तुला कळवतो."

मैथिली म्हणाली," ठीक आहे पण कंपनी जॉईन करण्यापूर्वी जरा विचार करुन जॉईन कर. पुढच्या महिन्यात जर लग्नाची तारीख ठरली तर तुला पुन्हा सुट्ट्या भेटल्या पाहिजे."

बाबा पुढे म्हणाले," सौरभ मैथिली म्हणते ते अगदी बरोबर आहे, कॉलेजला काही प्रॉब्लेम असेल तर मी सोबत येऊ का?

सौरभ म्हणाला," नाही बाबा तुम्ही येण्याची काही गरज नाहीये आणि मी कंपनी जॉईन करताना सर्व बघूनच जॉईन करेल."

बाबा म्हणाले," ठीक आहे, काही मदत लागली तर फोन कर."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all