एक आगळेवेगळे लग्न भाग ५३

Inauguration ceremony of ketan's hospital

मागील भागाचा सारांश: केतन व त्याची आई अमेरिकेहून भारतात परत येतात, ते येण्याच्या आधी मैथिलीने त्यांचे घर अगदी लखलखीत करुन ठेवले होते. केतन व त्याची आई घरी पोहोचल्यावर मैथिली त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येते. केतनने मैथिलीसाठी एक सुंदर, नाजूक सोन्याचे ब्रेसलेट आणलेले असते, मैथिलीला ब्रेसलेट खूप आवडते. केतन आईला सांगतो की आपल्याला उद्या माझ्या मित्राच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला जायचे आहे.तर दुसऱ्या दिवशी केतनच्या आईचा वाढदिवस असल्याने मैथिली त्यांच्यासाठी एक साडी घेऊन येते व तीच साडी दुसऱ्या दिवशी नेसण्यासाठी आईला सांगते. मैथिलीने केतनसाठी सुद्धा नवीन ड्रेस आणलेला असतो.

आता बघूया पुढे.....

केतन व त्याची आई हॉस्पिटलला पोहोचण्याआधी मैथिलीला व तिच्या घरच्यांना हॉस्पिटलला पोहोचायचे होते. मैथिलीला तिथे जाऊन उद्घाटनाची तयारी करायची असते म्हणून मैथिली सकाळी लवकर उठून आवरासावर करत असते. साडी नेसायची असल्याने मैथिलीला आवरायला जरा जास्तच वेळ लागत होता. आई मैथिलीला बोलावण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते व तिला म्हणते," मैथिली अग आपल्याला तिकडे पोहोचायला उशीर होईल, पटकन आवर ना, किती वेळ लावत आहेस, आम्ही सगळे केव्हाच तयार होऊन बसलो आहोत."

मैथिली म्हणाली," आई तुला तर माहीत आहे ना ग, मला साडी नेसायला जमत नाही, खूप वेळ लागतो, मी राधिका ताईला म्हणून घरी बोलावले होते पण ती म्हणाली की आम्ही डायरेक्ट हॉस्पिटललाच येवू, अजून फक्त पाच मिनिटांत मी आवरते."

आई म्हणाली," मैथिली आज निलिमा ताईंना किती आनंद होईल ना, केतनराव हे सगळं फक्त आईच स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहेत. निलिमा ताई खरंच खूप भाग्यवान आहेत."

मैथिलीने पटपट आवरलं व ती म्हणाली," आई आपण याबद्दल संध्याकाळी बोलूयात, आता चल पटकन."

मैथिली व तिच्या घरचे हॉस्पिटलला जाण्यासाठी रवाना झाले. निलिमा ताईंना केतनच्या मित्राच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला जायचे नसते पण केतनच्या आग्रहास्तव त्यांना जावे लागणार होते. निलिमा ताई तयार होऊन बाहेर हॉलमध्ये येऊन केतनची वाट बघत बसल्या. निलिमा ताईंनी केतनला आवाज दिला," केतन अरे किती वेळ लावशील, उद्घाटन होऊन जाईल आणि मग आपण जाऊ, पटकन बाहेर ये."

"अग हो आई, तिकडे मोठमोठे डॉक्टर असणार आहेत, चांगलं तयार होऊन गेल नाही तर त्यांच्यावर माझी छाप पडणार नाही" केतन बोलत बोलतच आईसमोर येऊन उभा राहिला.

आई त्याच्याकडे बघून म्हणाली," केतन उद्घाटन तुझ्या मित्राच्या हॉस्पिटलंच आहे, तुझ्या हॉस्पिटलचं नाही. ब्लेझर का घातलस? आणि तुझा शर्ट व माझी साडी एकाच रंगाची आहे, अरे ते कसं वाटतं, थांब मी पाच मिनिटांत दुसरी साडी नेसून येते."

केतन म्हणाला," आई आपल्याला जायला उशीर होईल, तु जी साडी नेसली आहेस ती खूप छान आहे. तु दुसरी साडी नेसलीस तर मैथिलीला राग येईल. चल आपण पटकन जाऊया."

आई म्हणाली," मैथिलीलाही हॉस्पिटलच्या उद्घाटनाला यायचे होते ना?"

केतन म्हणाला," आई ती डायरेक्ट हॉस्पिटलला येणार आहे."

आई अजून काही प्रश्न विचारणार इतक्यात केतनने आईला बळजबरीने घराबाहेर काढले व गाडीत बसवले. केतनने घरुन निघताना मैथिलीला 'आम्ही निघालो आहोत' असा मॅसेज केला.

थोडं पुढे गेल्यावर निलिमा ताई केतनला म्हणाल्या," केतन मित्राला देण्यासाठी फुलांचा गुच्छ घ्यावा लागेल ना तर एखाद्या फुलांच्या दुकानाजवळ गाडी थांबवशील का?"

केतन म्हणाला," आई फुलांचा गुच्छ मैथिली आणणार आहे" तो मनातल्या मनात म्हणाला, 'हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आई किती प्रश्न विचारणार आहे काय माहीत आणि मला किती खोटं बोलावं लागणार हे त्या वरच्यालाच ठाऊक'

"केतन तु हॉस्पिटल टाकण्याचा कधी प्लॅन करतो आहेस? किती दिवस अस तु व मैथिलीने इतर हॉस्पिटलमध्ये काम करायचं? लग्न होण्याआधी हॉस्पिटलचं काम मार्गी लावायला हवं." निलिमा ताईंनी दुसरा प्रश्न विचारला.

केतन म्हणाला," आई आपण ते सगळं निवांत बोलूयात का? मी गाडी चालवत आहे आणि तु मधे मधे बोलून मला डिस्टर्ब करू नकोस."

हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत निलिमा ताई काहीच बोलल्या नाही. केतनने गाडी हॉस्पिटलजवळ पार्क केली व तो म्हणाला," आई हॉस्पिटल आलंय, आता काही बोललीस तरी चालेल."

निलिमा ताई म्हणाल्या," तो दिपनील हॉस्पिटलचा बोर्ड दिसतोय, ते तुझ्या मित्राचं हॉस्पिटल आहे का?"

केतन गाडीच्या आरशात बघत बघत म्हणाला, "हो आई तेच हॉस्पिटल आहे."

निलिमा ताई म्हणाल्या," हॉस्पिटलचं नाव मस्तच ठेवलं आहे. आणि हे काय तु आरशात बघून केस का नीट करत आहेस? तुला कोणी इथे बघायला येणार आहे का?"

केतन म्हणाला," आई आपण गाडीच्या खाली उतरुया का? म्हणजे आपल्याला उद्घाटनाला जाता येईल."

केतन व निलिमा ताई गाडीच्या खाली उतरुन हॉस्पिटलच्या दिशेने जातात,ते हॉस्पिटलच्या गेटजवळ पोहोचल्यावर मैथिली त्यांच्या दिशेने आली. निलिमा ताई तिला बघून म्हणाल्या, "मैथिली तु आज साडी का नेसली आहेस? आणि शिवाय मला ज्या रंगाची साडी नेसायला सांगितलीस त्याच रंगाची साडी तु नेसली आहेस आणि केतननेही त्याच रंगाचा शर्ट घातला आहे. हे सगळं नेमकं काय आहे?"

मैथिली म्हणाली," आई सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, पहिले आतमध्ये येऊन तुमच्या हाताने आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन करा."

निलिमा ताईंनी केतनकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितल्यावर केतनने स्माईल देऊन मान हलवली. हॉस्पिटलच्या आत असलेल्या सर्वांना मैथिलीने बोलावले. हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाला रिबीन बांधण्यात आली होती. मैथिलीने निलिमा ताईंच्या हातात कात्री दिली व रिबीन कापण्यास सांगितली. निलिमा ताईंनी रिबीन कापल्यावर जमलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. निलिमा ताईंचे डोळे पाणावलेले होते. हॉस्पिटलचा रिसेप्शन एरिया फुलांनी व फुग्यांनी सजवलेला होता, रिसेप्शन एरिया जवळील मोकळ्या जागेत जमलेल्या पाहुण्यांसाठी खुर्च्या टाकण्यात आलेल्या होत्या, रिसेप्शन टेबलवर केतनच्या बाबांचा हार घातलेला फोटो ठेवण्यात आला होता. जमलेल्या सर्व पाहुण्यांना केतनने बसून घेण्याची विनंती केली तसेच आपल्या आईलाही बसण्यास सांगितले.

केतनने बाबांच्या फोटोजवळ जाऊन त्यांचे दर्शन घेतले, त्यानंतर तो आईच्या पाया पडला. सर्वांना दिसेल व ऐकू जाईल अश्या अगदी मधोमध रिसेप्शन टेबल जवळ जाऊन केतन उभा राहिला व त्याने बोलण्यास सुरुवात केली, " माझ्या शब्दाला मान देऊन आपण इथे आलात, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आनंदात सामील झालात याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. गेल्या तीन महिन्यांपासून मी अमेरिकेत असल्याने मला प्रत्यक्ष भेटून तुम्हाला कोणालाही आमंत्रित करता आले नाही याबद्दल मी तुमची माफी मागतो. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप विशेष आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, मी मुद्दाम सकाळ पासून आईला विश नव्हते केले. हॅपी बर्थडे आई.( निलिमा ताईंचे डोळे पाणावले होते) आई मला कल्पना आहे की तुझ्या डोक्यात खूप प्रश्न असतील, शंका असतील. मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करणार आहे. आई मला तुझ्या या वाढदिवशी हॉस्पिटलचे उद्घाटन तुझ्या हस्ते करुन तुला सरप्राईज द्यायचे होते, यात माझी मदत मैथिलीने केली. मैथिली शिवाय मला हे करणे शक्य झाले नसते. आता सर्वांना हा प्रश्न पडला असेल की केतनने आपल्या हॉस्पिटलचे उद्घाटन एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते न करता आईच्या हस्ते का केले असेल? तर मला त्यांना हे सांगायचे आहे की आज मी जो कोणी आहे तो केवळ फक्त माझ्या आईमुळेच मग हा मान तिचाच असेल ना.मी डॉक्टर झालो ते माझ्या आईमुळेच. 

माझे सर्व पेशंट, माझे सहकारी डॉक्टर्स सतत म्हणतात की डॉ केतन किती संयमी आहे, तो सर्वांशी नेहमी आदराने बोलतो, डाऊन टू अर्थ राहून काम करतो. जेव्हा कधी कोणीही माझे कौतुक करतो तर त्यांना मला हेच सांगायचे आहे की तुमच्या कौतुकाची मानकरी माझी आई आहे, मी संयमी आहे कारण माझ्यावर आईने तसे संस्कार केलेले आहे. माझे बाबा तसे लवकर गेलेत पण तेही मला बरंच काही शिकवून गेलेत. मी त्यांची शिकवण लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आयुष्य जगत आहे. आई येताना म्हणाली की दिपनील नाव खूप छान आहे तर याचे क्रेडिट आई मैथिलीला असेल. मला तुमच्या दोघांच्या नावाचं मिळून हॉस्पिटलला नाव द्यायचं होतं, हे नाव मैथिलीनेच सुचविले. दिपक +निलिमा= दिपनील.

माझे बाबा नेहमी म्हणायचे की केतन ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, मी त्याच पद्धतीने काम करतो. माझ्या हॉस्पिटलचा एक मुख्य हेतू असेल तो म्हणजे गोरगरीबांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत ज्यांना उपचारांची गरज असेल त्यांच्यावर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतील तर इथे जमलेल्या माझ्या डॉक्टर मित्रांना ही विनंती आहे की माझा हा हेतू साध्य करण्यासाठी ज्यांना माझी स्वखुशीने मदत करायची असेल ते करु शकतात. इथे जमलेल्या सर्वांनी आजपर्यंत माझी जशी साथ दिली तशीच इथून पुढेही द्यावी ही नम्र विनंती. भावनांच्या भरात मी जरा जास्त बोलून तुम्हाला बोअर केले असेल तर मला माफ करा."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all